शरावती नदीवरील जोग धबधबा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 21 जून 2021

भूवारसा पर्यटन

कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतातून वहात येणाऱ्या शरावती नदीवर जोग किंवा गिरसप्पा धबधबा आहे. समुद्र सपाटीपासून ४८८ मीटर उंचीवर आढळणारा हा धबधबा २५४ मीटर खाली कोसळतो. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ‘राजा’, ‘राणी’, ‘रोअरर’ आणि ‘रॉकेट’ या नावांच्या चार जलधारांनी खाली कोसळतो. 

जोग धबधबा ज्या कड्यावरून खाली येतो त्या कड्याची सरासरी रुंदी ४७२ मीटर आहे. या कड्याचा वरचा भाग सरळ रेषेत नसून वक्राकार असल्याचे दिसून येते. सेकंदाला १५३ घन मीटर या वेगाने या धबधब्यातून पाणी खाली पडत असते. 

जोगचा धबधबा हा भारतातील तिसरा मोठा धबधबा आहे. मेघालयातील ३३५ मीटर उंचीचा नोहकालिकाई आणि गोव्यातील ३१० मीटर उंचीच्या दूधसागर धबधब्यांची उंची याच्या २५४ मीटर उंचीपेक्षा जास्त आहे. तीर्थहळ्ळी तालुक्यातील अंबुतीर्थ येथे शरावतीचा उगम होतो. तिथून वायव्येच्या दिशेने वाहत जाऊन गिरसप्पा धबधब्यावरून ती खाली जाते आणि ३० किमी अंतरावर असलेल्या गिरसप्पा गावाजवळून पुढे जाते. अखेरीस होनावर या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते.

धबधब्याच्या वर २३० मीटर रुंदीच्या खडकाळ नदीपात्रातून शरावती नदी एकदम २५४ मीटर उंचीच्या कड्यावरून चार जलधारांनी खाली झेपावते. ‘राजा’ नावाची पहिली जलधारा सरळ २५० मीटर खाली येते. साधारणपणे निम्म्यावर तिला ‘रोअरर’ नावाची दुसरी धारा येऊन मिळते. राजा धारेच्या पायथ्याशी एक ४० मीटर खोल प्रपात आघात खड्डा (Plunge pool) तयार झाला आहे. ‘रॉकेट’ ही तिसरी धारा अनेक तुटक फवाऱ्यांच्या (Jets) स्वरूपात खाली येते, तर चौथी धारा ‘राणी’ फेसाळलेल्या पाण्याच्या प्रपात रूपांत खाली झेपावते. या धारांच्या खालीही असेच आघात खड्डे तयार झाले आहेत.

हा धबधबा शिमोगा आणि उत्तर कर्नाटकाच्या सीमेवर शिमोगापासून १०० किमी अंतरावर आहे. तो अतिशय घनदाट अशा सदाहरित अरण्यात आणि शरावती अभयारण्यात आहे. तालगुप्पा हे नजीकचे रेल्वे स्थानक १३ किमी अंतरावर आहे. जोग धबधब्याच्या आजूबाजूला आणि नदीपात्रात नीस या रूपांतरित ग्रॅनाईट खडकांचेच प्राबल्य दिसून येते. धबधब्याच्या उत्तरेकडच्या भिंतीवर जो प्रस्तरभंग कडा (Fault scarp) दिसतो, त्यावर ग्रॅनाईटमध्ये घुसलेला एक भित्ती खडकही (Dyke) दिसून येतो. त्यावरून असेही म्हणता येते की हा धबधबा नदीत निर्माण झालेल्या विभंग प्रदेशावर तयार झाला आहे. जोगा या ठिकाणी शरावती नदीपात्रात उत्तर दक्षिण जाणारे विभंग पट्टे आहेत. ते सह्याद्री पर्वताच्या निर्मिती प्रक्रियेवेळी निर्माण झाले असावेत.

सह्याद्रीत या नदीने निर्माण केलेल्या धबधब्यावरून खाली आल्यावर शरावती नदी त्यापुढे २५ किमी लांबीच्या आणि ३०० मीटर खोल अशा तीव्र उताराच्या गिरसप्पा घळईतून (Gorge) पुढे जाते. शरावती जलविद्युत प्रकल्प नदीच्या डाव्या किनाऱ्यावर दिसतो. 

जलापहरण किंवा नदीचौर्य (River capture) या नदीच्या विकासातील घटनेचे शरावतीचा वरच्या टप्प्यातील नदीप्रवाह हे एक उत्तम उदाहरण आहे. घळईच्या शीर्षभागी असलेल्या प्रवाहाने शीर्ष दिशेने केलेल्या अपक्षरणामुळे (Headward erosion) सह्याद्रीच्या माथ्यावर पूर्वेकडे वाहणाऱ्या वरदा नदीच्या एका उपशाखेतील पाण्याचे अपहरण (Capture) केले आहे. असे असले तरी अपहरण दर्शविणारे वातखिंड (Wind gap) किंवा नदीचे जुने वळण (River bend) असे काही पुरावे इथे आढळत नाहीत. तलगुप्पा गावाजवळ दिसणारी वरदा नदीपात्रातील खिंड (Gap) एवढा एकमेव पुरावा नदीचे झालेले अपहरण सूचित करतो. 

शरावतीने वरदा नदीच्या उपप्रवाहाचे केलेले अपहरण केव्हा घडले याचे नेमके भूशास्त्रीय अनुमान काढता येत नसले, तरी इथल्या मूळ खडकाचा अपक्षरण दर लक्षात घेता ही घटना चतुर्थक या भूशास्त्रीय कालखंडाच्या आधी (Pre quaternary) म्हणजे २५ लाख वर्षांपूर्वीच्याही आधी झाली असावी असा निष्कर्ष काढता येतो.  

सह्याद्री पर्वतात या धबधब्याचे स्थान खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. डी. एन. वाडिया या प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पश्चिम घाटाचा कडा प्रस्तरभंग प्रक्रियेतून १.२ कोटी वर्षांपूर्वी तयार झाला. त्यानंतरच्या कालखंडात तो अनाच्छादन, विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे बरेच अंतर पूर्वेकडे मागे हटल्याचेही भूशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांच्या मते घाटाचा कडा हा एक प्राचीन समुद्र कडा आहे. समुद्र पातळी खाली गेल्यामुळे हा कडा उघडा पडला आणि गेल्या लक्षावधी वर्षांत विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे त्याचे मूळचे रूपच पालटून गेले. 

दख्खन पठाराच्या पश्चिम सीमेवर असलेल्या या पर्वत रांगेचे दक्षिण टोक मलबारच्या दक्षिणेस आहे. दोडाबेटा येथे त्यांची उंची २,६५२ मीटर आहे. पालघाटच्या पुढे अन्नामलाई पर्वतरांगेतून पश्चिम घाट भारतीय द्वीपकल्पाच्या टोकापर्यंत जातो. तीन ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात झालेल्या लाव्हाच्या उद्रेकातून तयार झालेले थर या दक्षिणेकडच्या भागात दिसत नाहीत. इथे सर्वत्र प्राचीन स्फटिकजन्य खडकांचाच प्रादुर्भाव आढळतो. 

या पर्वतात वलीकरण प्रक्रियेचे पुरावे आढळत नाहीत. मात्र अनेक ठिकाणी सामान्य प्रकारचे प्रस्तरभंग दिसून येतात. आजूबाजूच्या आर्कियन समतल प्रदेशापासून १०७० ते १८३० मीटर उंचीवर असलेल्या कार्डमम डोंगर रांगांतील तीव्र कडे आणि निलगिरी - पळणीचे उत्थापित भाग प्रस्तरभंग क्रियेचेच पुरावे आहेत. शरावती नदीच्या पात्रात आढळणाऱ्या विभंग रेषा या पश्चिम घाट निर्मितीचाच परिणाम आहे. जोग धबधब्याचा कडा (Scarp) हासुद्धा प्रस्तरभंग कडा असावा असे अनेक भूशास्त्रज्ञांना वाटते. 

पश्चिम घाटाच्या कड्याची निर्मिती कशी झाली याबद्दल एकापेक्षा अधिक मतप्रवाह आहेत. काहींच्या म्हणण्याप्रमाणे दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस झालेला प्रस्तरभंग मूलतः समुद्रात झाला. त्यानंतर तयार झालेला कडा गेल्या कोट्यवधी वर्षांत हळूहळू मागे सरकत आजच्या स्थितीला आला. काहींच्या म्हणण्याप्रमाणे तो प्रस्तरभंगाने तयार झाला. शरावतीवरील जोग धबधब्याला पश्चिम घाटातील एक आगळे वेगळे आणि नयनरम्य भूवारसा पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे.

स्थान संदर्भ 

  • १४.२३ अंश उत्तर अक्षांश/७४.८१ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ४८८ मीटर 
  • धबधब्याची उंची : २५४ मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २ कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : शिमोगा (१०० किमी), तालगुप्पा (१३ किमी)

संबंधित बातम्या