गिरनार पर्वत

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 5 जुलै 2021

भूवारसा पर्यटन

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१०५१ मी) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या बेसॉल्ट खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या   नैऋत्य भागात आहे. भादरची उपनदी ओजतच्या शिर्ष दिशेने होणाऱ्या झिजेमुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण आहे, पण त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते. 

गिरनारचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व मॉँझोनाइट यांनी तयार झालेला आहे. याच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही शिखरे विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे आहेत. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथांचे मंदिर आहे. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारे दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते.

गिरनारचे वय, रचना आणि खडक याबद्दल अजूनही भूशास्त्रज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. ज्वालामुखीच्या नळीतून उद्रेक झाल्यावर त्या नळीत लाव्हा घट्ट होऊन तयार झालेला तो पर्वतीय भाग (Volcanic plug) आहे. ६.६ कोटी वर्षांपूर्वी दख्खनच्या पठारावर जो लाव्हाचा उद्रेक झाला, त्यात तयार झालेले बेसॉल्ट खडक या पर्वतात सर्वत्र आढळतात. काही शास्त्रज्ञांच्या मते तो काठेवाड उत्थापनानंतर लाव्हाच्या थरांत घुसलेला (Intruded) उपपातालीय (Lacolith) प्रकारचा खडक आहे. त्यामुळे तुलनेने थोडा अलीकडचा आहे. दख्खन उद्रेकाच्यावेळी जी निरनिराळी अल्क धर्मीय लाव्हाची वेगवेगळी उद्रेकाची ठिकाणे तयार झाली, त्यातलेच गिरनार हे एक स्थान आहे. त्यादृष्टीने भूशास्त्रीय परिभाषेत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची निर्मिती ६.५ कोटी वर्षांपूर्वी झाली. काही भूशास्त्रज्ञांच्या मते गिरनारचे खडक खूपच जुने म्हणजे ५० कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. काही शास्त्रज्ञांना वाटते की गिरनारच्या बेसॉल्ट खडकांचा संबंध समुद्रातील बेटावरच्या बेसॉल्टशी जास्त जवळचा आहे. काहींच्या मते गिरनार पर्वत हा एक मृत ज्वालामुखी (Extinct volcano) आहे.

निर्मितीच्यावेळी गिरनार पर्वताचे आजचे स्थान दक्षिणेला ३२५० किमी अंतरावर आजच्या दिएगो गार्सिआ जवळ होते. भारतीय भूतबक जसे ईशान्येकडे सरकले तसा हा पर्वत आजच्या स्थानी येऊन स्थिरावला. त्यावेळी त्याचा विस्तार आजच्यापेक्षाही जास्त असावा. गिरनारचा आजचा प्रदेश अनेक डोंगर आणि दऱ्यांनी तयार झाला आहे त्याचा विस्तार १५ किमी आहे. त्याची सर्वोच्च उंची एक किमीपेक्षा थोडी जास्तच आहे. तो एक प्रकारचा ज्वालामुखीय घुमट (Dome) आहे असेही म्हटले जाते. त्याच्या पश्चिमेला माथ्यापासून साडेचार किमीवर जुनागढ शहर आहे. इथे उत्खननात जी पुरातत्त्वशास्त्रीय (Archaeological) हत्यारे सापडली, त्यावरून ७० ते ९५ हजार वर्षांपूर्वी या भागात आदिमानवाची वसतिस्थाने असावी असा अंदाज बांधता येतो. 

गिरनार पर्वत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची रचना बघून त्याला वज्र चक्राची उपमा दिली जाते, कारण मधे असलेल्या गिरनार पर्वताकडून सर्व दिशांनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत आणि त्याच्या  भोवतीच्या वर्तुळाकृती डोंगररांगांना त्या चक्राच्या आऱ्यांसारख्या जाऊन मिळताना दिसतात. 

गिरनार हा सौराष्ट्र आणि कच्छच्या सपाट प्रदेशातील सर्वात उंच प्रदेश आहे. एका

वर्तुळाकृती दिसणाऱ्या खोलगट भागात गिरनार पर्वताचे स्थान आहे. भोवती असलेला डोंगरांत चार प्रमुख दिशांना असलेल्या वाटा ओलांडून तिथपर्यंत जाता येते. मध्यवर्ती भाग ही उंच डोंगररांग असून त्यावरच इथली सर्वोच्च शिखरे आहेत. ही रांग पूर्व पश्चिम पसरली असून तिच्या दोन्ही टोकांना ती दोन दोन उपशाखांत विभागली जाते. मध्यवर्ती डोंगररांगेच्या भोवती पाच किलोमीटर अंतरावर आग्न्येय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा चारही दिशांना चापाकृती (Arcute) टेकड्या आहेत आणि त्यांनी मधल्या उंच भागाभोवती एक कडे (Ring) केले आहे. अशी विलक्षण नैसर्गिक रचना इथे आढळते. या सगळ्या भागाला गिरनार समूह (Complex) असे म्हटले जाते.

 हा गिरनार समूह डोंगराळ आणि अति तीव्र डोंगरउताराने अगदी भरून गेला आहे. गिरनार पर्वताच्या चारही बाजूंनी असलेले कडे तीव्र उताराच्या जणू भिंतीच आहेत. त्याचा दक्षिणेकडच्या कडा ५५० मीटर उंचीचा उभा उतार आहे! मध्यवर्ती गोरखनाथ शिखराच्या पूर्व पश्चिम दिशेत अंबाजी (उंची १०१० मीटर), ओघडनाथ, दत्तात्रेय, अनसूया आणि कालिका ही शिखरे दिसतात. गोरखनाथ (१११६ मीटर) शिखराच्या भोवती चार किमीच्या परिसरात इंद्रेश्वर, जांबुडी, लिंबडी धार आणि दातार अशा लहान लहान टेकड्यांचा वेढाच असल्याचे दिसून येते. या समूहाच्या पायथ्याशी भरपूर झाडे, नद्यांचे खोल मार्ग, घळया आणि इतस्ततः पसरलेले  ग्रॅनाइट खडक आढळतात. दक्षिणेकडे दातार टेकड्या, बोर देवी, डुंगर थाना यांनी घेरलेल्या २५५ मीटर उंचीवरच्या खोलगट भागात अशा घळया दिसून येतात. 

गिरनार समूहातील मध्यवर्ती उंच भागात उगम पावून चार वेगवेगळ्या दिशांनी खाली येणारे चार प्रमुख जलप्रवाह बाहेरच्या डोंगरांच्या कड्यातून खोल घळया करून त्यातून बाहेर पडतात.

भूशास्त्रीय अभ्यासातून असे लक्षात आले आहे की गिरनार समूहाच्या बाहेरच्या बाजूला असलेले खडक जुने असून मध्यवर्ती भागातील खडक नवीन आहेत. दख्खनच्या पठारावर भेगी उद्रेकातून (Fissure eruption) लाव्हाचे थर पसरले. या उद्रेक प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यातला उद्रेक गिरनार प्रदेशात केंद्रित होऊन गिरनारचा घुमटाकृती पर्वत तयार झाला, असेही एक मत व्यक्त करण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०२०पासून आता इथे 

‘रोप वे’ची सुविधा उपलब्ध झाली आहे. २३२० मीटर लांबीच्या या ‘रोप वे’ने ८५० मीटर उंचीवरच्या अंबा मंदिरापर्यंत जाता येते. यामुळे हे विलक्षण सुंदर भूवारसा ठिकाण अनेकांच्या आता आवाक्यात आले आहे!

स्थान संदर्भ 

  • २१.५२ अंश उत्तर अक्षांश/७०.५२ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : १०५१ मीटर
  • भूशास्त्रीय वय : ६.५ कोटी वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : जुनागढ (४.५ किमी) 
     

संबंधित बातम्या