उष्ण पाण्याचे झरे
भूवारसा पर्यटन
भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे (Hot water springs) आहेत. गरम पाण्याचे झरे असणारी ठिकाणे सध्या पर्यटन क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. भूकवचाच्या हालचालींमुळे आणि अंतरंगातील विविध प्रक्रियांमुळे (Tectonic activities) भूपृष्ठाला ज्या खोलवर जाणाऱ्या भेगा पडतात, त्यामुळे अशा ठिकाणी हे झरे आढळतात.
भूपृष्ठावरील विभंग रेषांतून (Faults/ Lineaments) पाणी अंतरंगात झिरपते. ते जेव्हा अंतरंगातील उष्ण खडकाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे तापमान वाढते आणि ते पुन्हा वर पृष्ठभागाकडे येते. ते वर येताना, उष्ण पाण्याचे झरे (Spring), फवारे (Geysers), धुम्रवलय (Fumaroles) आणि चिखलकुंड (Mud pots) अशा विविध रूपांत बाहेर येते.
भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेने (Geological survey) आत्तापर्यंत भारतात असे ३४० उष्ण पाण्याचे झरे असल्याचे म्हटले आहे. या सर्व ठिकाणांच्या भूशास्त्रीय संरचनेनुसार सहा मुख्य भूऔष्णिक (Geothermal) विभागांमध्ये त्या ठिकाणांची विभागणी करण्यात आली आहे.
दोन अब्ज ते ६.६ कोटी वर्षांपूर्वीचा हिमालय जिथे आहे, त्या प्रदेशाच्या निर्मिती प्रक्रियेत (Himalayan orogeny) तयार झालेला हिमालय विभाग, २५० कोटी वर्षांपूर्वीच्या अरवली पर्वत निर्मितीत तयार झालेला प्रस्तरभंग प्रदेश, अंदमान निकोबारचा ज्वालामुखीय चाप (Arc) प्रदेश, ६.१ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली खंबातच्या आखाताची गाळाची द्रोणी (Basin), किरणोत्सर्जन करणाऱ्या खडकांचे प्रदेश आणि ढालक्षेत्रांचे (Cratons) प्रदेश या भागातील झरे असे त्यांचे वर्गीकरण केले जाते.
ही अशी ठिकाणे आहेत जिथे भूगर्भातून उष्ण किंवा उबदार पाणी, नियमितपणे पृष्ठभागावर येत असते. सामान्यपणे आजूबाजूच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त तापमान असलेल्या या झऱ्यांच्या पाण्यात अनेक प्रकारची खनिजे विरघळलेली असतात.
भारतात प्रत्येक राज्यात कमी अधिक संख्येत उष्ण पाण्याचे झरे दिसून येत असले, तरी वज्रेश्वरी (महाराष्ट्र), बाकरेश्वर (पश्चिम बंगाल), तप्तपाणी (ओडिशा), अत्री (ओडिशा), थिंग्बू आणि ताशू (अरुणाचल प्रदेश), यूमेस्मडोंग (सिक्कीम), मणिकरण (हिमाचल प्रदेश), वशिष्ठ (हिमाचल प्रदेश), गौरीकुंड (उत्तरांचल) आणि पनामिक (लडाख) ही त्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
असे झरे जिथे आहेत ती ठिकाणे भूऔष्णिक (Geothermal) स्वरूपाची आणि सामान्यपणे भू-हालचालींनी नियंत्रित असतात. खडकांतील विभंग, विभंग रेषा, खचलेली ज्वालामुखीय विवरे (Caldera) यांच्याशी ती निगडित असतात. त्यांची सर्वसाधारण खोली तीन किमी इतकी असते.
तापी, नर्मदा विभंग प्रदेश, कच्छ, महेंद्रगड-डेहराडून भंग रेषा, मुंगेर-सहस्रधारा विभंग प्रदेश, तमिळनाडूतील कावेरी विभंग प्रदेश, किन्नेरसामी-गोदावरी विभंग रेषा आणि गुजरात व महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील विभंग प्रदेश या भागांत उष्ण पाण्याचे झरे प्रामुख्याने आढळून येतात. भारतात सल्फरयुक्त उष्ण झरे सर्वाधिक आहेत. बिहारच्या राजगीर व गुजरातच्या रामकुंड भागात किरणोत्सारी (Radioactive) पाणी असलेले झरे आहेत. कुलू मधल्या मणिकरण इथल्या उष्ण झऱ्यातून व मुंबई जवळच्या उनई इथल्या झऱ्यातून रेडिअमचे उत्सर्जन होते असे दिसून आले आहे. सह्याद्री पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाला आहे, याचा भक्कम पुरावा म्हणजे कोकणातील उष्ण पाण्याचे झरे. सल्फरयुक्त पाण्याचे हे झरे असून कोकणात यांना ‘उन्हाळे’ म्हणतात. त्वचेच्या आणि हाडांच्या सर्व विकारांच्या निराकरणासाठी या पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो.
आपल्याकडे महाराष्ट्रात जो उष्ण पाण्याच्या झऱ्यांचा प्रदेश आहे, तो एका उत्तर दक्षिण पसरलेल्या भूऔष्णिक पट्ट्यात असून जवळजवळ एक किमी जाडीच्या, लाव्हाने तयार झालेल्या बेसॉल्ट खडकात तो असल्याचे दिसते. हा खडक त्याखाली असलेल्या अतिप्राचीन प्री कॅम्ब्रिअन स्तरीत
खडकाच्या वरचा भाग आहे. या बेसॉल्ट खडकात लाव्हाचे अनेक थर असून त्यांची जाडी १० मीटर पासून १२० मीटर इतकी आहे. हे थर बरेचसे समकक्ष (Horizontal) असून त्यांचा कल ६ ते ८ अंश इतका असतो. या सगळ्या प्रदेशात ईशान्य - नैऋत्य, आग्न्येय - वायव्य आणि पूर्व - पश्चिम दिशेत खडकात अनेक विभंग रेषा (Lineaments) आहेत.
कोकणात असे एकूण १८ झरे असून त्यांची विभागणी उत्तरेकडील सहा झरे, मध्य कोकणातील चार आणि दक्षिण कोकणातील आठ झरे अशी केली जाते. उत्तर विभागात कोकनेरे, पडूसपाडा, हलोली, साटीवली, गणेशपुरी आणि वज्रेश्वरी (अकलोली) येथील झरे; मध्य कोकणात सोव, वडवली, पाली आणि उन्हवरे (ताम्हाने); तसेच दक्षिण कोकणात उन्हवरे (खेड), खेड, आरवली, तुरळ, राजावाडी, संगमेश्वर, मठ आणि राजापूर या ठिकाणी हे झरे आहेत. हे सगळे झरे सात मुख्य नद्यांच्या खोऱ्यांत असल्याचे दिसून येते. कोकणातील या झऱ्यांच्या पाण्याचे तापमान ३४ ते ७१ अंश सेल्सिअस इतके आहे.
सगळे झरे एकाच प्रकारच्या भूशास्त्रीय विभागात असून सर्वसाधारणपणे ते समुद्र सपाटीपासून ५ ते २७ मीटर उंचीच्या प्रदेशात आणि नदी खोऱ्याच्या खालच्या टप्प्यात समुद्रापासून केवळ २५ ते ५५ किमी अंतरावर आढळतात. प्रत्येक झऱ्याच्या ठिकाणी पृष्ठजल, उष्णजल, उथळ भूजल आणि समुद्रजल अशा सर्व प्रकारच्या पाण्याची सरमिसळ आढळते. विभंग प्रदेश आणि लाव्हाचा थर व भित्तिखडक (Dyke) जिथे संलग्न आहेत त्या भागातच हे झरे आहेत.
या झऱ्यांच्या तापमानात दैनंदिन (Diurnal) फरक दिसत नाहीत, तसेच यातून होणारा उष्ण पाण्याचा विसर्ग (Discharge) ऋतू किंवा जवळपासच्या नदीतील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून नसतो. सगळ्याच ठिकाणी उष्ण पाण्याची हालचाल मुख्यतः वरच्या दिशेने होते. आडव्या दिशेत पाण्याचे प्रवाह आढळत नाहीत. विभंग प्रदेशाची पार्यता (Permeability) आणि सच्छिद्रता (Porosit) यांचा झऱ्यातील पाण्याच्या हालचालींवर परिणाम होत असतो.
प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञ डी. एन. वाडिया यांच्या मतानुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकाची क्रिया संपताना सल्फरयुक्त उष्ण पाण्याच्या झऱ्यांची निर्मिती होते. त्या दृष्टिकोनातून विचार करता महाराष्ट्रातील हे उष्ण पाण्याचे झरे ज्वालामुखीय उद्रेकाच्या तिसऱ्या टप्याच्या (Phase) शेवटी म्हणजे सहा कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाले असावेत असे म्हणता येते. इतके महत्त्वाचे भूशास्त्रीय वारसा स्थळ असूनही भारतातील अनेक उष्ण पाण्याच्या झऱ्यांची ठिकाणे आज अतिशय दुर्लक्षित अवस्थेत आहेत. पर्यटकांच्या अनिर्बंध वावरामुळे ती अस्वच्छ झाली असून त्यांच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दृश्य जवळपास सगळीकडेच दिसते आहे.