सह्याद्रीतील पलक्कड गॅप

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

भूवारसा पर्यटन

भारतातील पश्चिम घाट (Western Ghats) प्रदेशाला सर्वसामान्यप्रमाणे सह्याद्री म्हटले जाते. असे असले तरी या पर्वत रांगेला ‘सह्याद्री’ या नावाने मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत ओळखले जाते. केरळमध्ये याला ‘सह्यन’ किंवा ‘साहीआन’ म्हणतात. समुद्र सपाटीपासून २,६९५ मीटर (अन्नाई मुडी, केरळ) उंचीच्या आणि १,६०० किलोमीटर लांबीच्या पठाराची तीव्र उताराची बाजू म्हणजे सह्याद्रीचा कडा. 

डी. एन. वाडिया या प्रसिद्ध भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पश्चिम घाटाचा कडा प्रस्तरभंग प्रक्रियेतून १.२ कोटी वर्षांपूर्वी तयार झाला. त्यानंतरच्या कालखंडात तो अनाच्छादन, विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे बरेच अंतर पूर्वेकडे मागे हटल्याचेही भूशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांच्या मते घाटाचा कडा हा एक प्राचीन समुद्र कडा आहे. समुद्र पातळी खाली गेल्यामुळे हा कडा उघडा पडला आणि गेल्या लक्षावधी वर्षांत विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे त्याचे मुळचे रूपच पालटून गेले. 

या पर्वत रांगेचे दक्षिण टोक मलबारच्या दक्षिणेस आहे. दोडाबेटा येथे त्यांची उंची २,६५२ मीटर आहे. पालघाटच्या पुढे अन्नामलाई पर्वतरांगांतून पश्चिम घाट भारतीय द्वीपकल्पाच्या टोकापर्यंत जातो. तीन ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात झालेल्या लाव्हाच्या उद्रेकातून तयार झालेले बेसॉल्ट खडकाचे थर या दक्षिणेकडच्या भागात दिसत नाहीत. दक्षिण सह्याद्रीत सर्वत्र प्राचीन स्फटिकजन्य खडकांचाच प्रादुर्भाव आढळतो. उत्तरेकडे कळसूबाई शिखराच्या भागात ही पर्वतरांग किनाऱ्यापासून १०० किमी दूर आहे, तर कर्नाटकात अंकोला होनावर भागात ती किनाऱ्यापासून केवळ २० किमी इतकी जवळ आली आहे. 

या पर्वतात वलीकरण प्रक्रियेचे पुरावे आढळत नाहीत. मात्र अनेक ठिकाणी सामान्य प्रकारचे प्रस्तरभंग दिसून येतात. आजूबाजूच्या आर्कियन समतल प्रदेशापासून १,०७० ते १,८३० मीटर उंचीवर कार्डमम डोंगर रांगांत तीव्र उंच कडे आणि निलगिरी-पळणीचे उत्थापित भाग आहेत.  

महाराष्ट्रात कळसूबाई येथे याची उंची १,६४६ मीटर तर आंबोली या ठिकाणी ती केवळ ७०० मीटर आहे. अति दक्षिणेकडे अनंतपुरम येथे या रांगेची उंची ६६० मीटर, कलकाडू इथे १५२५ मीटर, तर उधगमंडलम इथे २३१९ मीटर आहे. 

पश्चिम घाटाची भूशास्त्रीय व भूरूपिक विविधता उंच शिखरे, पठारे, डोंगररांगा, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी खूपच समृद्ध आहे. इथे सगळ्यात जुने लाव्हाचे खडक सात कोटी वर्षे इतके जुने आहेत. लाव्हा उद्रेकाची घटना या भागात तीन कोटी वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असाव्यात. तमिळनाडूतील कोईम्बतुर आणि केरळातील पलक्कड या दोन ठिकाणांच्या मधे याच पश्चिम घाटात पूर्व पश्चिम पसरलेली पालघाट किंवा पलक्कडची गॅप म्हणजे फट किंवा खिंडार आहे. इथल्या चितूर थाथमंगलम इथे समुद्र सपाटीपासून ११२ मीटर उंचीवरची ही सह्याद्रीतील फट २२ ते ४० किमी रुंद आणि ८५ किमी लांब आहे. याच्या उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई-पळणी टेकड्या आहेत.

पंधराशे मीटर उंचीच्या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला सह्याद्रीची उंची पालघाट गॅपमध्ये ७५ ते ३०० मीटरपर्यंत कमी होते. दक्षिणेला ती अन्नामलाईच्या टेकड्यांत २,५०० मीटरपर्यंत पुन्हा वाढते. सह्याद्रीतील ही फट नेमकी कशी निर्माण झाली याबद्दल अनेक संकल्पना मांडण्यात येतात. एका कल्पनेनुसार या भागातून पूर्व आणि पश्चिमेकडे नद्या वाहत गेल्यामुळे जे भूस्खलन झाले त्यातून ही फट तयार झाली. या फटीच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांवरून जे नदी प्रवाह वाहतात ते एकत्र येऊन त्यापासून पोंनानी किंवा भारतपुझ्झा नदीचा उगम या भागात होतो.

पल्लकड गॅपमधून नैऋत्य मॉन्सूनचे वारे पूर्वेकडे तमिळनाडूच्या पश्चिम बाजूकडे वाहत जातात व भरपूर पाऊस देतात. तसेच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या उष्णकटिबंधीय वादळातील पर्जन्य वारे पश्चिमेकडे केरळकडे येऊन त्या भागाला खूप पाऊस देतात. सोळाशे किमी लांबीच्या सह्याद्रीत ही एकमेव फट असून तिच्या उत्तर आणि दक्षिणेकडील अनुक्रमे निलगिरी आणि अन्नामलाई टेकड्या ही ज्युरासिक कालखंडातील म्हणजे २० कोटी वर्षांपूर्वीची उर्वरित पठारे (Residual plateau) आहेत. या टेकड्यांची उंची आणि मधली सखल पालघाट गॅप यांची निर्मिती वीस कोटी वर्षांनंतरच्या काळात विभंग किंवा उत्थापन प्रक्रियेने झाली असल्याचे कोणतेही पुरावे आजूबाजूच्या प्रदेशांत आढळत नाहीत. त्याचप्रमाणे पूर्वी समजले जात होते त्याप्रमाणे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन त्याच्या आक्रमणामुळे ही गॅप तयार झाली असावी असे सुचविणारेही पुरावे सापडलेले नाहीत. 

ज्युरासिक काळातील ही गॅप भूकवचाला बाक येऊन (Upwarp) भूप्रदेश वर उचलला गेल्यानंतर तयार झाली. या प्रक्रियेत उचललेल्या प्रदेशावर दोन्ही दिशांनी जो प्रचंड ताण (Tensional stress) तयार झाला त्यामुळे हा भाग खचला आणि डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे बराच काळ झिजत राहिला. कालांतराने उंची कमी होऊन ही गॅप तयार झाली असावी असे येथे झालेले नवीन भूशास्त्रीय संशोधन सांगते.

ज्याचा उल्लेख आज आद्य अमरावती (Proto Amaravati) नदी असा केलेला आढळतो, असा पूर्वेकडे वाहत जाणारा एक प्राचीन नदीमार्ग (Palaeochannel) इथे असावा असे संकेत उपग्रह प्रतिमांतून स्पष्टपणे दिसून येतात. हा प्रवाह मायोप्लायोसीन काळात म्हणजे २.३ कोटी ते ५३ लाख वर्षांपूर्वी पूर्णपणे आटला व कोरडा झाला असावा असाही दावा केला जातो.

ज्या प्रक्रियेमुळे गॅपचा भाग वर उचलला गेला होता, ती प्रक्रिया साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या लाव्हाच्या उद्रेकाशी निगडित असावी, असेही भूशास्त्रीय अभ्यासातून लक्षात येते. या गॅपच्या दक्षिणेला नऊ अंश अक्षवृत्तावर शेनोकोत्ताई या ठिकाणी पश्चिम घाटाची रुंदी केवळ साडे सात किमी इतकी कमी झाली आहे. 

प्री कॅम्ब्रिअन कालखंडातील म्हणजे चारशे साठ कोटी वर्षे जुने ग्रॅनाईट खडक असलेल्या या गॅपच्या निर्मितीमागे मॉन्सून पावसाची प्राचीन काळी वाढलेली तीव्रताही कारणीभूत असावी, असे एक मत व्यक्त करण्यात आले आहे. या गॅपचा मोठा परिणाम पश्चिम घाटातील पक्षी, वनस्पती आणि काही प्राण्यांच्या संख्या रचनेवर (Population structure) झाला आहे.

सह्याद्रीत निर्माण झालेली ही एकमेव फट असल्यामुळेच तिचे भूवारसा स्थळ म्हणून महत्त्वही अनन्यसाधारण असेच आहे!  

स्थान संदर्भ 

  • १०.६७ अंश उत्तर अक्षांश/७६.७१ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : ११२ मीटर
  • भूशास्त्रीय वय : १ कोटी ते ५३ लाख वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण: कोईम्बतूर (५२ किमी), त्रिचूर (८५ किमी) 

संबंधित बातम्या