अरवली पर्वत आणि माउंट अबू

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

भूवारसा पर्यटन

अरवली, विंध्य, सातपुडा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या भारतीय द्वीपकल्पातील मुख्य पर्वत रांगा आहेत. अरवली पर्वत रांग ४०० ते ५५ कोटी वर्षे जुनी असून विंध्य पर्वत १.७ अब्ज वर्षांइतका जुना आहे. सातपुडासुद्धा ४०० ते २५० कोटी वर्षे, तर पूर्व घाट १६० कोटी वर्षे जुना असल्याचे भूशास्त्रीय पुरावे आढळतात. पश्चिम घाट, म्हणजेच आपला सह्याद्री सात ते तीन कोटी वर्षे जुना आहे. हिमालय भारतातील सर्वांत अलीकडचा तरुण, वलीपर्वत (Yong Fold mountain) असून तो फक्त २.१ कोटी वर्षांपूर्वीच निर्माण झाला आहे. 

अरवली वगळता भारतीय द्वीपकल्पातील इतर सर्व पर्वत अनाच्छादन आणि विदारण क्रियेतून तयार झालेल्या पर्वत रांगा असून त्या दक्षिण भारतीय पठाराचे अवशिष्ट भाग आहेत. यातील केवळ अरवली खऱ्या अर्थाने विवर्तनी (Tectonic) पर्वत शृंखला आहे. अरवली ही भारतीय द्वीपकल्पातील ६९२ किमी लांब नैऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेली सर्वात जुनी वलीपर्वत रांग आहे. भारतीय भूतबक युरेशियन तबकापासून अलग झाले तेव्हापासून अरवली अस्तित्वात आहे. अरवली ही जगातील सर्वात जुन्या भू-अभिनतीत (Geosynclines) तयार झालेली पर्वत रांग असून तिची शिखरे १,२०० ते १,५०० मीटर उंचीवर आहेत. 

अरवली पर्वताची उंची वाढण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे आज त्याची मोठ्या प्रमाणावर केवळ झीज झाल्याचे आढळून येते. साठ कोटी वर्षांपूर्वीच्या मूळ आर्कियन कालखंडातील स्तरीत खडकांच्या रूपांतरणातून तयार झालेला नीस खडक अरवलीत सर्वत्र आढळून येतो. १४.५ कोटी वर्षांपूर्वी अरवलीचे मोठ्या प्रमाणावर समतलन (Peneplanation) झाले. १८ लाख वर्षांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या हिमयुगाच्यावेळी (Ice age) अरवली पर्वतावर हिमनद्या असाव्यात असे सुचविणारा हिमानी भरड गाळ (Glacial Boulder clay) अरवलीत आजही अनेक ठिकाणी आढळून येतो. 

जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरवलीचा समावेश होतो, त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. हा पर्वत राजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्‍यापैकी पाऊस पडतो; मात्र अरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील आहेत. येथे वन्यजीववैविध्य असून वन्यजीवांची संख्या लक्षणीय आहे. रणथंभोर, सरिस्का ही काही प्रसिद्ध अभयारण्ये अरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुर) अरवली पर्वताच्या सान्निध्यात येतात.  

अरवली पर्वत रांगेने खऱ्या अर्थाने भारतीय उपखंडाचा वायव्येकडील आकार त्याच्या निर्मिती काळात निर्धारित केला. ३.२ ते १.२ अब्ज वर्षांपूर्वीच्या म्हणजे सरासरी दोन अब्ज वर्षांच्या काळात ढालक्षेत्रांची म्हणजे स्थिर आणि कठीण भूप्रदेशांची टक्कर, तसेच लाव्हाचे उद्रेक या घटनांमुळे या पर्वताची निर्मिती झाली. निर्मितीनंतरसुद्धा वारंवार होणारे लाव्हाचे उद्रेक, वाढलेल्या समुद्र पातळीमुळे होणारे निमज्जन (Submergence), पृष्ठभागाचे उत्थापन (Uplifting) व पाऊस वाऱ्याने झालेली झीज आणि विदारण अशा अनेकविध भूहालचालींचा या पर्वताने सामना केला. जोधपूरचा मेहरानगड किल्ला जिथे आहे, तिथे ७५ कोटी वर्षांपूर्वी प्रचंड मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. 

गुजरातमधील चंपानेर आणि पालनपूर इथे असलेल्या कमी उंचीच्या टेकड्यांपासून या पर्वत रांगेची सुरुवात होते. पर्वताच्या नैऋत्येकडच्या भागात एक हजार मीटरपेक्षा जास्त उंचीचे प्रदेश आढळतात. १,७२२ मीटर उंचीचे माउंट अबूवरचे गुरू शिखर इथेच आहे. उत्तरेकडे ही पर्वत रांग थोडी अरुंद होत जाते. दिल्लीजवळ गेल्यावर तिचा बराचसा भाग गाळाच्या आणि मातीच्या (Alluvium) आवरणाखाली झाकून गेला आहे. याच गाळातून काही टेकड्या अधून मधून डोके वर काढताना दिसतात.

पर्वत रांगेची ईशान्येकडची उंची ४०० ते ६०० मीटर असून दिल्ली शहर याच भागात वसले आहे. त्यापुढेही पर्वत रांगेचे टोक हरिद्वारपर्यंत जाते. दिल्ली-हरिद्वार हा अरवलीचा भाग गंगा आणि सिंधू या दोन नद्यांमधला जलविभाजक (Water divide) आहे. डुंगरपूर, उदयपूर, नाथद्वारा, भिलवाडा आणि अजमेर इथल्या अरवलीच्या सर्व टेकड्यांवर ग्रॅनाईट, संगमरवर, क्वार्टझाइट आणि नीस हे खडक प्रामुख्याने आढळतात. गेल्या काही वर्षांतील खनन कर्म (Mining) व्यवसायामुळे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

अपार्य (Impervious) आणि गाळाखाली झाकलेले खडक हे या पर्वताचे वैशिष्ट्य आहे. माउंट अबू हे राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतश्रेणीतील १,६७६ मीटर उंचीवरचे एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे. हे ठिकाण गुजरातमधील पालनपूरपासून ५८ किमी दूर आहे. येथे पर्वताचे २२ किमी लांब आणि ९ किमी रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरू शिखर हे या पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे. नद्या, तलाव, धबधबे आणि सदाहरित जंगले यांनी संपन्न असलेल्या माउंट अबूला ‘वाळवंटातले नंदनवन’ असेही म्हणतात. अबू पर्वताचे प्राचीन नाव अर्बुदांचल असे आहे. पुराणकाळात त्याला अर्बुदारण्य असे म्हटले जात असे.

माउंट अबू हा मूलतः एक पातालीय खडक (Batholith) आहे. याचा अर्थ असा की तो पृथ्वीच्या कवचाखाली खूप खोलीवर लाव्हा रस थंड होऊन तयार झालेला ग्रॅनाईट खडक आहे. अरवली पर्वत श्रेणीच्या पश्चिमेकडील बाजूला ७८ ते ७५ कोटी वर्षांपूर्वी जो दीर्घकालीन लाव्हा उद्रेक झाला, त्याचा हा परिणाम होता. दोन कोटी वर्षांपूर्वी अरवली पर्वताच्या या भागात अनेक भूपृष्ठ हालचाली झाल्या आणि भूकवचाला अनेक भेगा पडल्या. त्यामुळेच हा पृथ्वीच्या अंतरंगातील खडक भूपृष्ठावर आला.

या पर्वतावरील खडकांत विदारणाचे (Weathering), अपपर्णन (Exfoliation), खंड विघटन (Block disintegration), शीर्णन (Shattering), घनगोलीय विदारण (Spheroidal weathering) आणि मधुकोष विदारण (Honeycomb weathering) असे अनेक प्रकार आढळून येतात. अशा प्रकारे विदारीत झालेले अनेक खडक अबू पर्वतावर विखुरलेले दिसून येतात.

गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेला हा अतिप्राचीन अरवली पर्वत आणि त्यातील माउंट अबू हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भूवारसा आहे. आज विकासकामे, पर्यटन व्यवसाय आणि खाणकाम यामुळे त्यांची जी अनिर्बंध हानी चालू आहे, त्यामुळे हा वारसा जतन करून ठेवणे दिवसेंदिवस अधिकच कठीण होऊ लागले आहे. 

स्थान संदर्भ 

  • २२.४६-२८.६१ अंश उत्तर अक्षांश/७३.५१-७७.२० अंश पूर्व रेखांश 
  • समुद्रसपाटीपासून सरासरी उंची : १,२०० - १,५०० मीटर
  • लांबी : ६९२ किमी
  • भूशास्त्रीय वय : ४००-५५ कोटी वर्षे     
  • पर्वत रांगेतील मोठी ठिकाणे : उदयपूर, चित्तोडगढ, जयपूर, सवाई माधोपुर

संबंधित बातम्या