बेलमच्या चुनखडक गुहा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

भूवारसा पर्यटन

आंध्र प्रदेशाच्या कर्नुल जिल्ह्यात असलेल्या बेलम येथील चुनखडकाच्या गुहा (Limestone caves) भारतातील मेघालयात आढळणाऱ्या चुनखडक गुहांनंतरच्या लांबीनुसार दुसऱ्या क्रमांकाच्या गुहा आहेत. ‘कार्स्ट’ म्हणजे चुनखडक प्रदेशात तयार झालेल्या या साडेतीन किमी लांबीच्या गुहेत अनेक लवणस्तंभ असून ते अधोमुखी (Stalectites) आणि उर्ध्वमुखी (Stalegmites) असे दोन्ही  प्रकारचे आहेत. गुहेत असलेल्या पाताळगंगा या ४० मीटर खोलीवरच्या ठिकाणीही असे लवणस्तंभ दिसून येतात. ज्या ठिकाणी या गुहा आहेत, ती एक सपाट माथ्याची मेजासारखी टेकडी (Mesa) व पठार असून त्याच्या सर्व बाजूंनी ३५ मीटर उंचीचा कडा आहे. त्यावरच्या १५ मीटरच्या भागात गुहा आहेत. 

तेलगू भाषेत या गुहेला बेलम गुहालू म्हटले जाते. बेलम येथील चुनखडकाची गुहा सर्वप्रथम ब्रिटिश भूशास्त्रज्ञ रॉबर्ट बुस फूट यांनी १८८४मध्ये शोधली व नंतर १९८२-८४ या काळात जर्मन गुहातज्ज्ञ डॅनियल गेबर यांच्या गटाने तिचे अधिक सविस्तर संशोधन केले. आंध्र प्रदेश सरकारने १९८८मध्ये त्याला संरक्षित स्थळाचा दर्जा दिला आणि फेब्रुवारी २००२मध्ये आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने त्याचा प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही विकास सुरू केला.

एका विहिरीसारख्या दिसणाऱ्या प्रवेशद्वारातून खाली उतरत गेल्यावर अनेक गुहांचे एक वेगळेच विश्व आपल्या समोर येते. त्यात अनेक गुहा असून त्या अरुंद आणि लहान आहेत. त्यांची रुंदी अर्धा मीटर पासून केवळ दीड मीटर इतकीच आहे. गुहांतील मार्ग नऊ मीटर उंचीवर आहेत. मार्गांच्या दोन्ही बाजूला १५ मीटर लांबीच्या गॅलरीसारख्या रचना आहेत.

सन १९८३ नंतर गुहेतील उत्खननात इ.स.पूर्व ४५०० मधली काही मातीची भांडी सापडली होती. गुहेच्या वरच्या भागातील चुनखडकातील खाली झिरपणाऱ्या पाण्यानेच प्रामुख्याने गुहेचा सगळा आसमंत कोंदून गेलेला जाणवतो. गुहेच्या भिंतीवर चुनखडक विरघळून खाली आल्याच्या अनेक खुणा आणि जागोजागी चिकटलेले क्वार्ट्‍झ कणांचे अवसाद (Sediments) दिसतात. छतावरून खाली येणारे अधोमुखी लवणस्तंभ आणि जमिनीकडून वर वाढत जाणारे उर्ध्वमुखी लवणस्तंभ हे तर जागोजागी दिसून येतात.

गुहेत एकूण १६ अंतर्गत मार्ग (Passages), पोकळ्या (Chambers) आणि वक्रनलिका  (Siphones) आहेत. अनेक नरसाळ्याच्या आकाराची विवरेही (Dolines) दिसून येतात. गुहेत एक कायमस्वरूपी जलप्रवाह आणि धबधबाही आहे. हा जलप्रवाह त्याच्या दुसऱ्या टोकाला चुनखडकात एकाएकी लुप्त होतो. लुप्त झालेला हा प्रवाह दीड किमी अंतरावरील बेलम गावात पुन्हा पृष्ठभागावर येतो असे म्हटले जाते.  

सिंहाच्या डोक्यासारखा आकार असलेली एक लवणस्तंभ कमान रचना सिंहद्वारम या ठिकाणी दिसते, तर कोटीलिंगालू इथे उर्ध्वमुखी लवणस्तंभांचे शिवलिंगासारखे आकार दिसतात. सप्तसूर गुहा नावाच्या भागात जे अधोमुखी लवण स्तंभ आहेत, त्यावर काठी किंवा बोटातील अंगठी आपटून पाहिल्यास सुरांचा ध्वनी त्यातून ऐकू येतो. बेलम गुहांतील लवणस्तंभांचे संशोधन करून भारतीय मॉन्सूनमधल्या पावसाच्या प्रमाणात आणि तीव्रतेत प्राचीन काळात कसे बदल झाले असावेत याचा अभ्यास करण्यात आला आहे. असा अभ्यास मुख्यतः उर्ध्वमुखी लवणस्तंभात (Stalagmite) साठून राहिलेल्या कॅलसाईट (Calcite) खनिजांच्या अभ्यासातून आणि त्याचे भूशास्त्रीय वय नक्की करून केला जातो. चुखडकाच्या पृष्ठभागावर पडणारे पावसाचे पाणी जेव्हा त्यातील भेगांतून खाली झिरपते तेव्हा त्याबरोबर त्या भागातील सेंद्रिय द्रव्येही खाली जाऊ लागतात. त्यातील कार्बन डायऑक्साईडमुळे कार्बोनिक आम्ल तयार होते. या आम्लात चुनखडकातील कॅलसाईट विरघळते आणि चुनखडकात लहान मोठ्या गुहा तयार होतात. खाली येणाऱ्या पाण्यातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि कॅलसाईट खनिज गुहेच्या छतावर, भिंतीवर आणि तळभागावर साठू लागते. तळभागावर त्याचे हळूहळू एकावर एक असे थर तयार होतात आणि त्यातून उर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात. 

 युरेनियम थोरियम समस्थानिकांचा (Isotopes) वापर करून लवण स्तंभातील कॅलसाईटचे थर केव्हा तयार झाले त्याचे वय ठरवता येते. एखाद्या गुहेसारख्या बंदिस्त ठिकाणी असलेल्या आणि संचयनानंतर कुठलेही बदल किंवा दुषितीकरण  (Contamination)  न झालेल्या कॅलसाईट थराचा यासाठी उपयोग केला जातो. चुनखडीच्या प्रदेशातील वनस्पती पाण्याच्या संपर्कात आल्यावर किती कुजतील आणि त्यात किती कार्बन डायऑक्साईड तयार होईल, हे चुनखडीच्या प्रदेशातील तापमानावर ठरते. त्यामुळे अशा तापमानावर आणि पाऊसमानावर, त्याचप्रमाणे चुनखडीच्या डोंगरात पाणी ठिबकून की झिरपून खाली येते यावर गुहेत निर्माण होणाऱ्या लवणस्तंभांची उंची, जाडी तसेच कॅलसाईटच्या थरांचे प्रमाण ठरत असते. कॅलसाईटच्या थरातील ऑक्सिजन व कार्बन यांचे समस्थानिक वापरून पावसाचा आणि तापमानाचा, त्याचप्रमाणे वनस्पतीतील बदलांचा अंदाज घेता येतो.

या कालनिश्चिती तंत्राद्वारे सहा लाख वर्षांपर्यंतचे वय कळू शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून बेलम गुहेतील उर्ध्वमुखी लवणस्तंभ १ ते १.१ लाख वर्षे जुने असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. उर्ध्वमुखी लवणस्तंभात कॅलसाईटची कडी (Rings) जवळजवळ असली, तर ती जेव्हा तयार झाली त्यावेळच्या वातावरणात खूप बाष्प असावे. थर दूरदूर असतील तर पाऊसमान जास्त आणि जवळजवळ असतील तर कमी पाऊस असेल असे संकेत मिळतात. इथल्या लवणस्तंभांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला गेला, की ०.९ ते १ लाख वर्षांपूर्वी या भागातील मॉन्सूनच्या पावसात टप्प्याटप्प्याने घट (Stepwise decline) होत गेली. 

एकूण साडेतीन किमी लांबीच्या या गुहेत पर्यटनास दीड किमीपर्यंतच परवानगी आहे. याच्या जवळच उत्तरेला १५ किमी अंतरावर यगंटी या ठिकाणी कर्नुल श्रेणीतील क्वार्टझाईट खडकातील गुहा आढळतात. बेलमच्या ईशान्येला बनगनपल्ली हे ठिकाण असून येथे हिरे असलेले गुंडाष्म (Conglomerate) खडक आढळतात. मात्र त्यातील हिऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बेलम आणि आजूबाजूचा प्रदेश क्वार्टझाईट, शेल (पंकाश्म), चुनखडक, डोलेराईट व गुंडाष्म या खडकांनी तयार झालेल्या कर्नुल खडक श्रेणीचा भाग आहे.

अशारीतीने भूशास्त्रीयदृष्ट्या संपन्न असलेल्या आणि एक लाख वर्षांपेक्षा जास्त कालखंडाचा भूवारसा असलेल्या या गुहेला भारतातील महत्त्वाचे भूवारसा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळणे आवश्यक आहे.

स्थान संदर्भ 

  • १५.०९ अंश उत्तर अक्षांश/७८.१७ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : ३६८ मीटर
  • भूशास्त्रीय वय : १ लाख वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : बेलम (५.५ किमी)

संबंधित बातम्या