हिमालय ः एक विलक्षण आविष्कार

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

वेध

हिमालयाची निर्मिती, तिथले पर्यावरण, तसेच विकासकामे व पर्यटन यामुळे होणारा इथल्या समृद्ध निसर्गाचा ऱ्हास याकडे पुन्हा एकदा जागरूक होऊन पाहता यावे आणि जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने २०१० पासून ९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी हिमालय दिवस म्हणून पाळला जातो. हिमालय पर्वतातील पर्यावरणाचा आजवर झालेला संहार आणि ऱ्हास लक्षात घेता, त्याचा शाश्‍वत विकास करणे ही अर्थातच वाटते इतकी सहजसोपी गोष्ट नाही, हेही आता लक्षात येऊ लागले आहे. ते एक मोठे  आव्हानच आहे यात तिळमात्र शंका नाही. हे आव्हान पेलण्यासाठी हिमालय समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. 

हिमालय हा जगातील सर्वांत तरुण आणि पश्चिम-पूर्व पसरलेला सर्वाधिक लांबीचा वली पर्वत (Fold mountain) आहे. याची लांबी २,५०० किमी व रुंदी १५०-४०० किमी तर एकूण क्षेत्रफळ पाच लाख चौ.किमी. इतके आहे. हिमालयाची रुंदी पश्चिमेस जास्त आणि पूर्वेला त्यामानाने कमी आहे. तिच्या उत्तरेला विस्तीर्ण असे तिबेटचे पठार, तर दक्षिणेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पाकव्याप्त काश्‍मीर भागात असलेल्या नंगा पर्वत शिखरापासून ते पूर्वेस नामचा बारवा शिखरापर्यंतच्या पर्वतश्रेण्यांचा समावेश हिमालय पर्वतात केला जातो. 

हिमालयाचा आकार कमानीसारखा आहे. त्या कमानीची बहिर्वक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला  वळलेली आहे. हिमालयाचा विस्तार पाकिस्तान, चीन (तिबेट), नेपाळ, भूतान या देशांत आणि भारतातील जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांत आहे. 

हा पर्वत प्राचीन सागर तळावरील गाळाच्या झालेल्या वलीकरण प्रक्रियेतून व त्यानंतरच्या उत्थापन क्रियेतून (Uplifting) उंचावला गेलेला भूसांरचनिक (Geo structural) पर्वत आहे. हिमालयाचे वलीकरण जम्मू व काश्मीर राज्यातील नंगा पर्वत (८,१२६ मीटर), तर दुसरे पूर्वेकडील आसाम हिमालयातील तिबेटमधल्या प्रेमको प्रांतातील नामचा बारवा (७,७५६ मीटर) या दरम्यान झालेले आहे.                  

हिमालयाव्यतिरिक्त जवळच्या इतर पर्वत श्रेण्या हिमालयात समाविष्ट केल्या जात नसल्या, तरी त्या हिमालयाशीच निगडित आहेत. हिमालयाच्या उत्तरेस सिंधू नदीच्या पलीकडील काराकोरम श्रेणी असून तिचा विस्तार पामीर पठारापासून कैलास रांगेपर्यंत आढळतो. काराकोरम श्रेणीत के -२ किंवा माऊंट गॉडविन ऑस्टिन (८,६११ मी.) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. 

ॲल्फ्रेड वेगनर यांच्या खंड वहन सिद्धांतानुसार अगदी सुरुवातीला ३३.५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पॅन्जिया या विशाल खंडाचे (Supercontinent) १७.५ कोटी वर्षांपूर्वी तुकडे होऊन उत्तरेकडील लॉरेशिया (अंगाराभूमी) व दक्षिणेकडील गोंडवनभूमी अशी दोन भूखंड अस्तित्वात आली. दोन्ही भूखंडांच्या दरम्यानच्या भागात पडलेली भेग रुंदावत जाऊन त्या ठिकाणी पाणी साचून तेथे टेथीस समुद्र अस्तित्वात आला. दोन्ही भूखंडांकडून वाहत येणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेला गाळ, चिखल आणि वाळूचे, टेथीसच्या तळावर संचयन होत गेले. गाळाच्या वरच्या थराचा व पाण्याचा दाब पडत जाऊन या सर्व पदार्थांचे कालांतराने गाळाच्या स्तरित खडकांत रूपांतर झाले. कालांतराने गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकू लागल्यामुळे दोन्ही खंड एकमेकांजवळ येऊ लागले. परिणामतः टेथीसमधील गाळाच्या मृदू खडकांवरचा दाब वाढून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. दाब जसजसा वाढत गेला तसतशा वळ्या उंचावत गेल्या. ही क्रिया अगदी संथ गतीने दीर्घकाळपर्यंत चालू राहून टेथीस समुद्राच्या जागेवरच उंच हिमालयीन पर्वतश्रेण्या अस्तित्वात आल्या. 

सुमारे दहा हजार मीटर जाडीचे खडक या हालचालीत भरडले गेले. एक कोटी ते दहा लाख वर्षांपूर्वी टेथीसचा पूर्ण लोप झाला असावा. हिमालय निर्मितीच्या हालचालींमुळे हिमालयाच्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या शिवालिक किंवा बाह्य हिमालय (Outer Himalay),  मुख्य किंवा मध्य हिमालय किंवा हिमाचल (Lessar Himalay) आणि हिमाद्री म्हणजे बृहत् हिमालय (Grater Himalay) अशा पर्वतरांगा तयार झाल्या.हिमालयाची ही निर्मिती सुमारे ७० लाख वर्षे चालू असावी. त्याच वेळी अपक्षरण क्रियाही (Erosion) चालू होती. गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकण्याची आणि हिमालयाची उंची वाढण्याची क्रिया अजूनही चालू आहे, परंतु ती अतिशय मंद आहे. भारतीय भूतबक यूरेशियन भूतबकाखाली सरकत असल्यामुळे हा भाग भूकंपप्रवण झाला आहे.

उंच पर्वतरांगा, त्यांवरील हिमाच्छादित  शिखरे, खोलवर विच्छेदित घळ्या व रुंद दऱ्या, विस्तीर्ण हिमक्षेत्रे, धबधबे हिमालयात सर्वत्र आढळतात. हिमालयातील खिंडी या जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी आहेत. त्यांपैकी बहुतेक खिंडी नोव्हेंबर ते मे दरम्यान हिमाच्छादित असतात. 

हिमालयात वारंवार भूकंप होतात. हिमालयाची भूकंपप्रवणता हे भूशास्त्रीय वास्तव आहे! ते बदलणे कोणाच्याही हाती नाही. हिमालयाच्या विस्तृत भागातले बरेचसे लोक आज ‘भूकंप’ या अनिश्चित संकटाच्या गडद सावलीत आपले जीवन कंठत आहेत! ‘अनिश्चितपणा’ हा या संकटातील जास्त भयावह भाग आहे यात शंका नाही.

हिमालयात अनेक प्रकारची सरोवरे असून या सरोवरांच्या निर्मितीची कारणेही वेगवेगळी आहेत. हिमोढांच्या (Moraines) संचयनामुळे, हिमनद्यांच्या अडथळ्यांमुळे, भूस्खलनामुळे, कडे कोसळल्यामुळे किंवा हिमप्रपातांमुळे निर्माण झालेल्या बांधांमुळे, तसेच भूहालचालींमुळे येथील सरोवरांची निर्मिती झालेली असल्याचे दिसून येते. 

पृथ्वीवरील अंटार्क्टिक व आर्क्टिक वगळता हिमनद्यांनी व्याप्त असे सगळ्यात जास्त क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयातील हिमनद्यांची लांबीसुद्धा जगातील इतर हिमनद्यांच्या लांबीपेक्षा जास्त आहे. हिमालयातील हिमनद्या पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने वितळत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.  हिमालयातील हिमनद्या हवामान बदलाच्या उत्तम निर्देशक मानण्यात येतात. त्यांचे आकुंचन - प्रसरण हे तापमान व हिमवृष्टी यातील बदलांशी अत्युच्च दर्जाचे संतुलन साधूनच होत असते. 

हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे हटत गेल्या, तर कालांतराने त्या संपूर्णपणे नष्ट होतील. हिमप्रदेशातील हिमोढ बंदिस्त सरोवरे अतिशय अस्थिर असतात. हिम विलयनामुळे ती वारंवार फुटतात व महापुरांना आमंत्रण देतात. हिमनद्या वितळल्यामुळे होणाऱ्या फायद्या तोट्याचे नेमके गणित आज करता येत नसले, तरी त्यामुळे पर्यावरण आणि हवामान यांच्या ऱ्हासासारखे तोटे जास्त संभवतात असे संशोधकांना वाटते आहे.   

आज हिमालयात राहणाऱ्या माणसाला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी हिमालय पर्वताची मोठीच गरज आहे. या प्रदेशातील डोंगर उतारावर केली जाणारी शेती, जलविद्युत निर्मिती, विखुरलेल्या वस्त्या जोडणारे दुर्गम भागातून जाणारे रस्ते, उपलब्ध खनिजे, औषधी वनस्पती, अशा अनेकविध बाबतीत हा पर्वत आज इथल्या माणसांचा आधारस्तंभ झाला आहे. असे असले तरीही हिमालयाकडे आजपर्यंत झालेले दुर्लक्ष आणि माणसाने निष्काळजीपणाने केवळ स्वार्थापोटी चालू केलेला या पर्वतातील समृद्ध पर्यावरणाचा अनिर्बंध आणि अविवेकी वापर यामुळे या विलक्षण सुंदर पर्वताचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागला आहे. आता मात्र या पर्वताचे महत्त्व लक्षात यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. 

या पर्वताचे संधारण, संरक्षण केल्याशिवाय या पर्वतमय भागातील मानवी अस्तित्व आणि पर्यायाने पायथ्याजवळच्या मैदानी प्रदेशाची समृद्धता टिकविणे अशक्य आहे, हे सत्य कळायलाच आपल्याला इतकी वर्षे लागली आहेत.

संबंधित बातम्या