तीळमातीची दुर्मीळ पुळण

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

भूवारसा पर्यटन

कारवारच्या उत्तरेला दहा किमी अंतरावर गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेजवळ, कर्नाटकच्या किनाऱ्यावरील मजली आणि गोव्याच्या किनाऱ्यावरील पोलेम यांच्या मधे एक छोटीशी पुळण (Beach) आहे. तीळमातीची पुळण म्हणून ती प्रसिद्ध आहे. या पुळणीवरची वाळू करड्या आणि गडद काळ्या रंगाच्या भरड (Coarse) कणांनी तयार झाली असून हे वाळूचे कण तिळाच्या बियांसारखे  (Sesame seeds) दिसतात आणि म्हणूनच या पुळणीला तीळमातीची पुळण असे म्हटले जाते. 

सामान्यपणे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पुळणी गारगोटी खनिजांच्या स्फटिकांनी तयार झालेल्या पांढऱ्या रंगाच्या पुळणी असतात. काही ठिकाणी त्यात काळ्या रंगाचे इलेमनाईट खनिज मिसळल्यामुळे थोड्या काळपट असतात, पण त्यातील वाळूकण खूप लहान असतात. तीळमाती पुळणीवरील वाळू, काळी आणि तिळाच्या आकाराची असल्यामुळे ती दुर्मीळ पुळण असल्याचे दिसून येते.

ही पुळण जेमतेम १०० मीटर लांबीची असून २५ ते ३५ मीटर रुंद आहे. अतिशय मंद उतार असलेली काळ्या वाळूची ही पुळण तीन बाजूंनी असलेल्या डोंगरांमुळे बंदिस्त (Sheltered) झालेली आहे. उत्तरेकडे असलेली पोलेमची आणि दक्षिणेकडे असलेली देवबाग मजलीची पुळण या दोन पुळणी मात्र पांढऱ्या स्वच्छ वाळूच्या कणांनी तयार झालेल्या आहेत.

तीळमाती पुळणीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असलेल्या भूशिरांच्या टोकापाशी लहान समुद्रकडे (Sea cliffs) आहेत. उत्तरेकडच्या कड्याची उंची सात मीटर तर दक्षिणकड्यांची चार मीटर आहे. उत्तरेकडील कडे आर्किअन भूशास्त्रीय काळातील म्हणजे ४०० ते २५० कोटी वर्षांपूर्वीचे मेटाबेसॉल्ट या बेसॉल्टच्या रूपांतरित खडक प्रकारात तयार झालेले आहेत. दक्षिणेकडील खडक डोलेराइटचे भित्तिखडक (Dyke) व अँफिबोल शिस्ट खडक आहेत. पुळणीच्या मागच्या बाजूला सगळीकडे बेसॉल्ट खडकाच्या मोठमोठ्या शिळा पसरलेल्या दिसून येतात. यामुळे अर्थातच नैऋत्य आणि वायव्य दिशेकडून पुळणीकडे येणाऱ्या उंच सागरी लाटांपासून ही पुळण सुरक्षित आहे.

या पुळणीवरील वाळूचे तिळासारखे कण गोलाकृती आहेत. अँफिबोल शिस्ट या खडकाच्या झिजेतून हे कण तयार झाले असल्यामुळे ते तिळाच्या कणासारखे गोल आणि गडद काळ्या रंगाचे आहेत.

ही पुळण अनेक दृष्टींनी बाकीच्या पुळणींपेक्षा वेगळी आहे. आकाराने लहान आणि बंदिस्त असल्यामुळे पावसाळ्यातील काही दिवस वगळता वर्षभरात इथे काही बदल घडत नाहीत. जवळच्या बारीक वाळूच्या पांढऱ्या कणांनी तयार झालेल्या इतर पुळणींसारखी ही पुळण नाही. इथली वाळू काळी आणि मोठ्या आकाराची तिळासारखी दिसणारी आहे, इतकेच नसून या वाळूत अनेक जड खनिजांचे (Heavy minerals) मिश्रण झाले आहे. मॅग्नेटाइट, इलेमनाईट, हॉर्नब्लेंड, ट्रीमोलाईट अशी अनेक खनिजे या वाळूत आढळतात.

आजूबाजूच्या अँफिबोल शिस्ट खडकाच्या झिजेतून व विदारणातून ही काळी वाळू तयार झालेली आहे आणि ह्याच खडकातूनच ही सगळी खनिजे पुळणीच्या वाळूत आली आहेत. आजूबाजूच्या बंदिस्त नसलेल्या पुळणीवर जवळच्या काळी नदीतून समुद्रात जाऊन परत आलेली वाळू साठवली गेली आहे. तीळमातीवरची वाळू मात्र तिथल्याच खडकातून तयार झालेली आहे. अशा पुळणी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर इतरत्र आढळत नाहीत.

या पुळणीकडे दोन मार्गांनी जाता येते. पोलेम गावाजवळच्या टेकडीवरून पुळणीकडे जाणाऱ्या पायवाटेवरून डोंगर उतरून सरळ पुळणीकडे जाता येते. हे अंतर फक्त एक किमी आहे. पण अनेकजण मजली गावाकडून जातात. इथून जाताना एक छोटा नदीप्रवाह ओलांडून दक्षिणेकडच्या डोंगरावरील कड्याच्या बाजूबाजूने अरुंद चिंचोळ्या वाटेने तीळमाती पुळणीकडे जाता येते. हे अंतर दोन, सव्वा दोन किमी इतके आहे. या मार्गाने जाताना किनाऱ्याला लागून असलेला ३० मीटर रुंदीचा सागरतट मंच, त्यात दिसणारा आंतरमार्ग (Geo), आघात छिद्रे (Notches) अशी आकर्षक भूरूपे दिसतात. याच मार्गावर तीळमातीच्या अलीकडे ३०० मीटर अंतरावर सी शेल बीच (Sea Shell beach ) ही एक छोटेखानी परंतु अतिशय सुंदर अशी पुळण आहे. ओहोटीच्यावेळी पूर्णपणे उघडी पडणारी आणि भरतीच्यावेळी पूर्णपणे पाण्याखाली जाणारी ही केवळ ६० मीटर लांब व १५ मीटर रुंद अशी विलक्षण पुळण आहे. या पुळणीच्या दोन्ही टोकांना समुद्रात घुसलेल्या खडकांमुळे ती तयार झाल्याचे दिसून येते. 

तीळमाती पुळणीवर गेल्यावर असे लक्षात येते की ही पुळण इतकी लहान आहे की त्यावर मोठ्या पुळणीवर दिसणारे खालची पुळण, वरची पुळण, त्यामधील उंचवटा (Berm) किंवा पुळणीमागच्या वाळूच्या टेकड्या (Sand dunes) अशा गोष्टी अजिबात आढळत नाहीत. पुळणीच्या मागे २० मीटर उंचीची एक टेकडी मात्र दिसते.

गोव्याच्या किनाऱ्यावर अनेक सुंदर पुळणी आहेत. तीळमातीच्या उत्तरेला असलेली पोलेमची पुळण ७०० मीटर लांब आणि ३० ते ६० मीटर रुंद आहे. तिच्या मागे एक किमी रुंदीचे आणि सहा मीटर उंचीचे एक सपाट मैदान (Terrace) असून ते पूर्वीच्या थोड्या जास्त उंचीवर असलेल्या समुद्र पातळीचे निर्देशक आहे. तीळमातीच्या दक्षिणेला सात किमी लांबीची आणि ६० ते १०० मीटर रुंदीची मजली देवबाग ही अतिशय सुंदर पुळण आहे. तिच्याही मागे दोन मीटर उंचीचा सपाट भाग असून त्यावर शेती आणि घरेही आहेत. इथल्या आणि गोव्यातल्या इतर पुळणींवर इलेमनाईट ह्या काळ्या रंगाच्या खनिजाचे पट्टे अधून मधून दिसतात, मात्र त्यातील वाळू तीळमाती पुळणीवरच्या तिळासारख्या मोठ्या वाळूसारखी नाही.

 तीळमाती पुळणीजवळचा खडक ३०० ते २५० कोटी वर्षे जुना असल्यामुळे आणि त्याच्या झीजेतून तयार झालेले तिळासारखे मोठे काळे वाळूचे कण वर्षानुवर्षे इथे साठून राहिल्यामुळे या पुळण निर्मितीला कर्नाटक -गोव्याच्या किनाऱ्यावरचे महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. असे खडक गोव्यात इतर ठिकाणीही किनाऱ्यावर दिसतात, मात्र त्यांच्या झिजेतून तयार होणारी वाळू तीळमातीप्रमाणे छोट्या, अंतर्वक्र आणि बंदिस्त खोबणीत साठत नसल्यामुळे लाटांमुळे सर्वदूर पसरते. तीळमाती पुळणीच्या आजूबाजूची भौगोलिक रचना काळी भरड वाळू साठून राहायला पोषक असल्यामुळे ही पुळण दुर्मीळ झाली आहे. इतके महत्त्वाचे ठिकाण असूनही अजूनही फारसे पर्यटक ह्या पुळणीकडे फिरकत नाहीत, कारण तिथे जाणे सहज सोपे नाही. कदाचित ही पुळण अशी अस्पर्शित राहिल्यामुळेच तिच्यावरचा भूवारसाही सुरक्षित आहे, आजही!

स्थान संदर्भ 

  • १४.९ अंश उत्तर अक्षांश/७४.१ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : शून्य मीटर
  • पुळणीजवळच्या खडकाचे भूशास्त्रीय वय : ३०० ते २५० कोटी वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : पोलेम (१ किमी), कारवार (१० किमी)

संबंधित बातम्या