लायरी नदीचा जुना प्रवाह

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

भूवारसा पर्यटन

गुजरातच्या कच्छ प्रांतात आज कालबाह्य झालेले नद्यांचे अनेक छोटे मोठे खूप जुने नदीप्रवाह आहेत. अशा जलप्रवाहांना पुराप्रवाह (Paleochannel) असे म्हटले जाते. 

कच्छच्या मुख्य भागात असे पन्नास प्रवाह, तर कच्छच्या रणात जवळजवळ तितकेच म्हणजे चाळीस प्रवाह दिसून येतात. हे प्रवाह विविध रुंदीचे आणि कमी जास्त लांबीचे असल्याचे दिसून येते. सामान्यपणे त्यांची लांबी अर्ध्या किलोमीटर पासून दहा किलोमीटर पर्यंत व रुंदी ५० ते २०० मीटर इतकी दिसून येते. 

पुराप्रवाह मुख्य नदीचाच आज कार्यरत नसलेला भाग असतो, त्यामुळे ते मुख्य नदीला समांतर वाहत असल्याच्या खुणा आढळून येतात.

मुख्य नद्यांच्या किनारी प्रदेशात मुख्य नदीपासून थोड्या अंतरावर आणि त्यांना समांतर, बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र, अर्धचंद्राकृती किंवा सरळ नदीमार्ग अशा स्वरूपात ते आढळून येतात. मात्र हे कार्यरत नसलेले (Defunct) प्रवाह मार्ग नदीच्या कुंडलकासार सरोवरासारखे (Oxbow lake) सारखे दिसत नाहीत, कारण ते पूर्णपणे कोरडे असतात. बऱ्याच वेळा ते वाळू, कोरडा चिखल, दगडगोटे यांनी भरून गेलेले असतात.

काही ठिकाणी या पुराप्रवाहांचे जुने किनारे अस्पष्ट स्वरूपात दिसतात. त्यांचा आकार, स्वरूप व त्यांचा मुख्य नदीप्रवाहाशी असलेला संबंध बघून ते प्रवाह तयार होण्यामागची किंवा ते कालबाह्य होण्यामागची कारणे ओळखता येतात.

प्रामुख्याने तीन कारणांनी असे पुराप्रवाह निर्माण होतात. पुराप्रवाह आढळतो त्या प्रदेशात प्राचीन काळात मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणला जात असेल, तर त्या गाळाखाली गाडला जाऊन तिथला नदी प्रवाह कालबाह्य होतो. काही वेळा नदी आपला मार्ग वारंवार बदलत असते. यामुळेही नदीच्या जुन्या प्रवाह मार्गाचे तुकडे नदी किनारी सोडून दिले जातात, ज्यांचे रूपांतर कालांतराने पुराप्रवाहात होते. अनेक वेळा असेही दिसते, की भूपृष्ठाच्या हालचाली, हवामान बदल किंवा भूरूपातील बदल यामुळेही कायमस्वरूपी किंवा ऋतूनुसार वाहणाऱ्या नद्या किंवा त्यांच्या प्रवाहाचा काही भाग एखाद्या प्रदेशातून नष्ट होतो किंवा स्थानबदल करतो. यातूनही पुराप्रवाह निर्माण होतात.

भरपूर पावसामुळे नदीला पूर येऊन नदीतील भरड गाळाचे प्रमाणही वाढते. या गाळात टोकदार आणि गुळगुळीत दगडगोट्यांचे प्रमाण जास्त असते. असा गाळ वाहून नेता न आल्यामुळे नदी तिचा मार्ग बदलते व अशा गाळाने भरलेला नदी मार्गाचा तुकडा बाजूला पडतो. नदी मार्गात भूपृष्ठ उंचावण्याची (Uplift) घटना कठीण खडकांच्या प्रदेशात घडल्यास नदीपात्राचा काही भाग मुख्य नदीपासून उंचावतो व कालांतराने कालबाह्य होतो. अशा प्रकारे तयार झालेले पुराप्रवाह आणि मुख्य नदी यांच्या मधे खडकाचा एक उंचवटा नेहमीच आढळून येतो.

कच्छमधील नखत्राणा या ठिकाणापासून उत्तरेला १५ किलोमीटर अंतरावर लायरी नावाचा एक पुराप्रवाह आहे. त्याच्या जवळून चाराखाडा आणि अरल मोटी या चारीधांद पाणथळ प्रदेशाकडे जाणाऱ्या नदीप्रवाहांच्या मधे याचे स्थान आहे. 

दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या या प्रवाहाच्या वरच्या भागाची उंची ४८ मीटर असून दुसऱ्या टोकाची उंची २९ मीटर आहे. हा नदी प्रवाह सरासरी ४० मीटर उंचीवरून वाहतो. नदीचा हा प्राचीन मार्ग उथळ आणि मंद उताराचा आहे. पूर्वी मात्र हा प्रवाह खोल असावा आणि पाण्याचा वेगही जास्त असावा. नदी मार्गात आढळणारी भूरूपे नदीचे पूर्वीचे रौद्र स्वरूप सुचवितात. मुख्य नदीचा एवढाच तुकडा उत्थापन क्रियेमुळे थोडा उंचावला असावा आणि कालांतराने त्यातील पाणी कमी होऊन त्याचे जलवहनाचे काम थांबले असावे.

या पुराप्रवाहातील नदीचा तळ कठीण अशा गाळाच्या खडकात तयार झाला असावा. नदीमार्गात दोन्ही किनाऱ्यावर आणि तळभागावर विविध रंगाच्या गाळाच्या खडकांत जुन्या नदी प्रवाहाने तयार केलेली अनेक भूरूपे दिसून येतात. नदीपात्रात व किनाऱ्याजवळ वाळूचे थर आणि वाळूच्या लहान लहान टेकड्याही आढळतात.

 या पुराप्रवाहाच्या पात्रात वाळूत गाडले गेलेले आणि उघडे पडलेले रांजण खळगे (Pot holes) आणि झीज झालेले खडक दिसून येतात. तळ भागावर काही ठिकाणी चौकोनी आकाराचे घट्ट झालेल्या चिखलाचे तुकडे वाळूतून डोकावताना दिसतात. प्राचीन नदीला जिथे वळण होते त्या भागात बारीक वाळू, दगड गोटे साठून तयार झालेले संचयन किनारे तुटलेल्या अवस्थेत आढळतात. टेकड्यांसारखे दिसणारे वाळूचे उंचवटे आणि त्यावर वाढलेली निवडुंगाची झाडे नदीच्या किनाऱ्यावर खालच्या टप्प्यात सगळीकडे दिसून येतात. 

प्राचीन काळी हा प्रवाह प्रचंड वेगाने खडकाची झीज करीत वाहत असल्यामुळे त्या प्रवाहाने झिजवलेल्या खडकांना अतिशय आकर्षक आकार दिले आहेत. नदीतील खडक त्यातील अनेकविध खनिजांमुळे विविध रंगी झाले होते. या सगळ्या पाण्याने झिजलेल्या खडकांत, पिवळा, गुलाबी, लाल असे रंग आजही स्पष्टपणे दिसून येतात. पूर्वैतिहासिक काळात इथल्या नद्यांची नेमकी प्रणाली कशी होती हे सांगता येत नाही, मात्र उपग्रह छायाचित्रात नदीचे जुने व नवीन प्रवाह वाहत गेल्याच्या खुणा सहजपणे दिसून येतात. अशा पुराप्रवाहातून पाणी केव्हा वाहत असावे हे सांगणे कठीण असते.  

या नद्यांचे मार्ग किती जुने होते याचे भूरूपिक पुरावे नदी पात्रात अनेक ठिकाणी दिसून येतात. दोन हजार वर्षांपूर्वी लायरी नदी क्रियाशील असावी व त्यानंतर उत्थापन झाल्यामुळे तिच्या अस्तित्वाला ग्रहण लागले असावे, असे इथल्या भूरूपांवरून लक्षात येते. फार मोठ्या भूशास्त्रीय उलथापालथीतून गेल्यावरच कच्छच्या या प्रदेशाला त्याची आजची सगळी वैशिष्ट्ये प्राप्त झाली आहेत. 

कच्छच्या ज्या बानी गवताळ प्रदेशात असे पुराप्रवाह आहेत, तो प्रदेश समुद्रातील आणि नद्यांतील चिखलयुक्त गाळाने पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी तयार झाला. दोन हजार वर्षांपूर्वी त्याचे उत्थापन झाले. पंचवीस कोटी वर्षे जुन्या स्तरित अवसादी खडकांचे प्राबल्य या भागात असल्याचे दिसून येते. आज कच्छमधल्या या अशा पुराप्रवाहांना आणि तिथल्या प्राचीन नदी पर्यावरणाला भूवारसा ठिकाण म्हणून कुठलेही संरक्षण नाही आणि म्हणावी तशी ओळखही दिली गेलेली नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असे जुने नदी प्रवाह हे भूजलाचे प्रचंड मोठे साठे असतात, असेही आता लक्षात आले आहे.

कच्छमधल्या लायरीसारख्या या भूवारसा पर्यटन स्थळाचा अभ्यास असे दाखवतो, की आपल्याकडे अशा प्रदेशांच्या संरक्षणाची कुठलीही ठोस आणि सुनिश्चित यंत्रणा आजही नाही. त्यामुळे हजारो वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आणि भूवारसा असलेल्या या स्थळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे हे नक्की. 

स्थान संदर्भ 

  • २३.४८ अंश उत्तर अक्षांश/६९.२६ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : ४० मीटर
  • भूशास्त्रीय वय : २००० वर्षे
  • नदी प्रवाहाची लांबी : ४.५ किमी 
  • नदी प्रवाहाची रुंदी : ७५० मीटर 
  • जवळची मोठी ठिकाणे : नखत्राणा (१५ किमी), भुज (५० किमी)

संबंधित बातम्या