कोकणातील कातळशिल्पे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

भूवारसा पर्यटन

कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर म्हणजे कातळावर आढळणारी कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व भाषा यांनी ही शिल्पे समृद्ध आहेत आणि ती कोणी आणि नेमकी केव्हा खोदली याचा उलगडा अजूनही झालेला नाही! कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा असे या भागात सुरू असलेले संशोधन सुचविते.

कोकण आणि गोव्यात आढळणारी ही चित्रे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इ.पू. १० ते १२ हजार वर्षे जुनी असावीत. इथल्या दुय्यम (Secondary) जांभा पठारावर ही शिल्पे आढळतात. आज अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे काही दुर्मीळ शिल्पे गायब झाली आहेत व होत आहेत. 

समुद्रसपाटीपासून ही कातळशिल्पे साधारणपणे १५० ते २०० मीटर उंचीवरच्या कातळांवर आढळतात. मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जल स्थानाशी निगडित आणि इतर अनेक चित्रविचित्र अशा खोद रचना कातळ खडकाच्या पृष्ठभागाच्या केवळ अर्धा ते एक सेंमी भागातच खोदलेल्या दिसून येतात.  इथल्या स्थानिकांना काही भागात कातळावर मनुष्याकृतीही कोरलेल्या आढळल्या आहेत. जांभा पठाराच्या विस्तृत भागात अशी अनेक पाषाण शिल्पे असावीत. कोकणातील आणि गोव्यातील कातळाच्या पृष्ठभागाची रचनाच अशी आहे, की यावर ही शिल्पे खोदणे सोपे गेले असेल. इथे वरच्या फूटभर भागातला जांभा खडक (Laterite) थोडा मृदू आहे. त्याखाली लगेचच तो इतका कठीण आहे की त्यात खोदलेल्या दगडाच्या (चिऱ्यांच्या) खाणी खूप खोल जाऊ शकत नाहीत असे इथल्या स्थानिकांचेही निरीक्षण आहे.  

या कातळाचा भूरूपिक (Geomorphic)आणि भूचुंबकीय (Geomagnetic) अभ्यास सुरू करण्याची गरज आहे. या कातळशिल्पाना भूचुंबकीय महत्त्व असावे असे राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावात आढळलेल्या, जांभा दगडात कोरलेल्या मनुष्याकृतीच्या अभ्यासातून लक्षात येते. या मनुष्याकृतीच्या नाभीच्या भागावर चुंबकीय सूची ठेवल्यास ती पूर्ण १८० अंशात सव्य (Clockwise) दिशेत फिरते आणि उत्तर दिशेचे निर्देशन दक्षिण दिशा असे करते. त्याच्या आजूबाजूचे चुंबकीय क्षेत्र तपासल्यावर परिसरात एक विशिष्ट असा चुंबकीय आकृतिबंध असावा असेही लक्षात येते.  

गोव्यातही अशी शिल्पे आढळतात. पणजीच्या दक्षिणेला ५० किमीवर रिव्होना गावापासून सोळा किमी अंतरावर उसगली माळ या नावाचे एक गाव आहे. हे गाव जिथे आहे तो भाग २०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या डोंगर रांगांनी बंदिस्त केलेला, सरासरी ५० मीटर उंची असलेला एक सपाट प्रदेश आहे. याच भागातून कुशावती नावाची नदी वाहते. या नदीच्या एका नागमोडी वळणापाशी तिच्या उजवीकडच्या उतरत्या तीरावर पाचशे चौरस मीटर प्रदेश व्यापून टाकणारी, खडकावर कोरलेल्या अनेक आकृत्यांनी समृद्ध अशी कातळशिल्पे आढळतात. या माळावरचा हा सखल नदीपात्राचा भाग समुद्र सपाटीपासून ४६ मीटर उंचीवर आहे आणि तो पान्साई माळ या नावाने ओळखला जातो. 

सन १९९३मध्ये नदी तीरावरच्या या भागातील माती व चिखल दूर केल्यावर ही कातळशिल्पे दिसू लागली. ही शिल्पे २० ते ३० हजार वर्षे जुनी व अश्मयुगीन किंवा मध्य अश्मयुगीन कालखंडातील असावीत आणि ‘कुश’ या आदिवासी जमातीने ती खोदली असावीत असा निष्कर्ष काढण्यात आलाय. हे ठिकाण वन विभागातर्फे ‘संरक्षित’ म्हणून घोषित करण्यात आले असून पुरातत्त्व विभागातर्फे तिथे तसा फलकही लावलेला दिसतो. प्रागऐतिहासिक काळातील पश्चिम भारतातील शिल्प म्हणून ते खूपच महत्त्वाचेही आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात व नदीला भरपूर पाणी असेपर्यंत जून ते सप्टेंबर अखेरीपर्यंत गोव्यातील ही सगळी शिल्पे पाण्याखाली असतात. त्यानंतर मात्र ती नदीचे पाणी ओसरल्यावर उघडी पडतात. आजही पात्राच्या उजव्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा व गाळाचा थर बाजूला केला तर त्याखाली अजून बरीच शिल्पे दिसण्याची शक्यता आहे.  

विशिष्ट प्राणी, पक्षी, नृत्य करणाऱ्या स्त्रिया यांची चित्रे आणि  चक्रव्यूहासारख्या काही आकृत्या नदीकिनारी दिसून येतात. यातील चक्रव्यूहासारखा आकार लक्ष वेधून घेणारा आहे. सात समकेंद्री वर्तुळांनी हे शिल्प तयार झाले असून ही वर्तुळे १५ सेंमी रुंद आहेत. दोन वर्तुळांतील मधल्या भागाची  खोली तीन ते चार सेंमी आहे. ही वर्तुळे नागाच्या डोक्याभोवती काढली असावीत असे प्रथम दर्शनी दिसून येते. या आकृतीचा उद्देश कदाचित सूर्य - ग्रह चक्र ओळखता यावे असाही असेल. जगात इतरत्र आढळणारी अशी चित्रे मध्यानीचा सूर्य, मकर व कर्क संक्रमण वगैरे समजण्यासाठी काढली गेली असावीत असाही एक मतप्रवाह आहे. 

यात हरिण, रानगवे याबरोबरच काही धार्मिक विश्वउत्पत्तीशास्त्राशी (Religious cosmology) निगडित खोद शिल्पे असावीत. चंद्र, सूर्य, तारे यांच्या आकृत्या मात्र दिसत नाहीत. फुलांची आणि पक्ष्यांची चित्रेही आढळत नाहीत. निदान तसे नक्की करता येत नाही. बैल, नृत्य करणारी स्त्री असेही काही आकार ओळखता येतात. दिशादर्शन करणारे बाण आणि क्रॉससारखी चिन्हेही दिसतात. 

चित्रातील प्राण्यांच्या शेजारी दिसणाऱ्या काटेरी बर्च्या आणि भाले यावरून ही चित्रे काढणारे शिकारीचा व्यवसाय करीत असावेत असा अंदाज करता येतो. नांगर, बैलगाडी, घोडा यांच्या चित्रांचा अभाव, ही  चित्रे ताम्रपाषाण (Chalcolithic) आणि नवाश्म (Neolithic) काळाच्या आधीची असावीत असे सुचवितो. काही तज्ज्ञांच्या मते यातील काही चित्रे चौदा ते तीस हजार वर्षांपूर्वीच्या युरोपातील हिमयुगाच्या काळातील असावीत.

कोकण व गोव्यातील या सर्वच शिल्पांच्या आजूबाजूला अजूनही मोठे संशोधन होणे गरजेचे आहे. शिल्पे तयार करताना इथल्या अश्मयुगीन माणसाने जी हत्यारे वापरली, त्यातली काही गेल्या काही महिन्यांत सापडली असल्याचे वृत्त आहे. आजूबाजूच्या तत्कालीन प्राचीन निसर्गाचे आणि पर्यावरणाचे प्रतिबिंब या कातळशिल्पात नक्कीच दडलेले असून कोकण आणि गोव्याचा तो एक महत्त्वाचा भूवारसा आहे यात शंका नाही. 

संबंधित बातम्या