हिमालयातील विलोभनीय सरोवरे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

भूवारसा पर्यटन

हिमालयात अनेक प्रकारची  सरोवरे असून ती प्रामुख्याने पाच हजार मीटरपेक्षा कमी उंचीवर आढळतात.   ही सरोवरे वेगवेगळ्या कारणांनी गेल्या दहा हजार वर्षांत तयार झाल्याचे दिसून येते.  हिमोढांच्या (Moraines) संचयनामुळे, हिमनद्यांच्या अडथळ्यांमुळे, भूस्खलनामुळे, कडे कोसळल्यामुळे किंवा हिमप्रपातांमुळे निर्माण झालेल्या बांधांमुळे, तसेच भूहालचालींमुळे येथील सरोवरांची निर्मिती झालेली  आहे.  

हिमालयातील काही सरोवरे तात्पुरत्या स्वरूपाची तर काही कायमची आहेत. अनेक सरोवरे हिवाळ्यात गोठलेली असतात. हिमालयाच्या   वाढत्या उंचीनुसार सरोवरांचा आकार  कमी होताना दिसतो. अधिक उंचीवरच्या  भागात ती विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. अनेक सरोवरे हिरव्यागार दाट वनश्रीने आच्छादलेल्या टेकड्यांनी किंवा हिमाच्छादित पर्वतश्रेण्यांनी वेढलेली आहेत. नेपाळमध्ये अन्नपूर्णा पर्वत रांगेत असलेले  ४९१९  मीटर उंचीवरचे  तिलिचो  हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या सरोवरांपैकी एक आहे. जम्मू व काश्मीर राज्यात श्रीनगरजवळ प्रसिद्ध दल सरोवर, तर झेलम नदीच्या पात्रात वुलर सरोवर आहे. 

हिमालयात हिमोढाच्या संचयनामुळे अनेक सरोवरे निर्माण झाली आहेत. काश्मीरमध्ये पहलगामवरून अमरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर असलेले सिशरम नाग सरोवर आणि कोलहोई (५,४२५ मी.) शिखरापासून बाहेरच्या बाजूस पसरलेल्या लहान खोऱ्यांमध्ये असणारी हर नाग व दूध नाग ही सरोवरे हिमोढाच्या संचयनामुळे निर्माण झाली आहेत.  श्योक हिम खोऱ्यात अनेकदा हिमनदीच्या अडथळ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची सरोवरे निर्माण होतात. लडाख आणि रूप्शू प्रदेशात आढळणारी सॉल्ट सरोवर, पॅन्गाँग सरोवर व त्सो मोरी ही सरोवरे सातत्याने आटत असून त्यांचे पाणी दिवसेंदिवस मचूळ होत आहे. 

हिमालयाच्या पलीकडे तिबेटच्या पठारावर मान सरोवर, राक्षसताल, यामड्रॉक त्सो अशी काही सरोवरे भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या बांधांमुळे तयार झाली आहेत. पंजाब हिमालयातील स्पिती नदीच्या वरच्या खोऱ्यात ४,४२० मीटर उंचीवर आढळणारे चंद्रताल सरोवर या प्रकारचे आहे. काही वेळा कडे कोसळल्यामुळे किंवा हिमप्रपातामुळेही सरोवरे निर्माण होतात. सिक्कीमच्या उत्तर भागात गुरूडोंगमार  व त्सांगमो ही  या प्रकाराची सरोवरे आहेत.

हिमालयाच्या पश्चिम भागातील  जम्मू व काश्मीर आणि लडाख या भागांत अनेक सरोवरे आहेत. त्यांपैकी श्रीनगर येथील दल सरोवर तर जगप्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. काश्मीर खोऱ्यात मानसबल, गंगाबल, जम्मू खोऱ्यात मान्सर व सुरिनसार सरोवरे आणि लडाखमध्ये पंगाँग त्सो, त्सो मोरिरी, त्सो कर, यारब त्सो, क्यागर त्सो ही सरोवरे आहेत.  लडाखमधील पॅन्गाँग सरोवरातून भारत आणि तिबेट (चीन) यांच्या दरम्यान  प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (‌‌एलएसी) जाते. येथे भारत-चीनमध्ये सीमावाद आहे. हे निसर्गसुंदर सरोवर हिवाळ्यात पूर्णपणे गोठलेले असते. याला ‘हाय ग्रासलँड लेक’ असेही  संबोधले जाते. 

हिमाचल प्रदेश या राज्यातील हिमालयाच्या भागात अनेक सरोवरे आहेत.  झास्कर पर्वतश्रेणीतील बारा लाचा ला खिंडीच्या खालील भागात लेह-मनाली महामार्गालगत सूरजताल सरोवर आहे. लाहूल व स्पिती या जिल्ह्यांत चंद्रताल सरोवर असून पाण्याचा बदलता रंग हे याचे वैशिष्ट्य आहे. कुलू व लाहूल जिल्ह्यांना जोडणाऱ्या रोहतांग खिंडीजवळ दशैर व स्पिती या जिल्ह्यांत धनकर सरोवर आहे. उत्तराखंड राज्यातील हिमालयात नैनिताल, भीमताल, हेमकुंड, रूपकुंड, केदारताल, देवरिया ताल, भुलाताल, खुर्पाताल, सातोपंथताल, नौकुचिआताल इत्यादी सरोवरे आहेत. चामोली जिल्ह्यात असलेल्या रूपकुंड सरोवराला स्थानिक लोक अद्‌भुत किंवा सांगाड्यांचे सरोवर असे म्हणतात; कारण या सरोवराच्या काठावर शेकडो मानवी सांगाडे सापडले होते. कधीकाळी अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथे आलेले यात्रेकरू मृत्यूच्या तावडीत सापडले असावेत. त्यांचेच हे सांगाडे असावेत.

पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयीन प्रदेशातील दार्जिलिंग जिल्ह्यात मिरिक (सुमेंदू), तसेच सेंचाल व जोरपोख्री  ही सरोवरे आहेत.  सिक्कीम  येथेही अनेक सरोवरे आहेत.  राजधानी गंगटोकपासून सुमारे ४० कि.मी.वरील त्सॉमगो (त्साँगमो) किंवा चांगु हे हिमानी (Glacial) सरोवर आहे. हे सरोवर नथु ला खिंडीजवळ असून गंगटोक-नथू ला हा महामार्ग येथून जातो. 

रारा हे देशातील सर्वांत मोठे व खोल सरोवर असून याच्या परिसरात रारा राष्ट्रीय उद्यान आहे. येथील १,५८३ हेक्टर क्षेत्र २००७मध्ये रामसर परिसर म्हणून घोषित केले गेले आहे. एव्हरेस्ट शिखराच्या परिसरात समुद्र  सपाटीपासून ४,७०० ते ५,००० मी. उंचीच्या प्रदेशात गोक्यो ही निळसर पाण्याची सरोवर मालिका आहे. हिमालय पर्वतराजीत स्थान असलेल्या भूतान या देशात पर्वतांतर्गत तसेच हिमोढांच्या अडथळ्यांमुळे आणि हिमानी क्रियेतून निर्माण झालेल्या प्रमुख सरोवरांची संख्या पन्नासपेक्षा अधिक आहे. त्यातली फक्त चार सरोवरे दोन हजार मी.पेक्षा कमी उंचीवर असून बाकीची त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत. तापमान वाढीमुळे हिमालयातील हिमनद्या मागेमागे सरकत आहेत. त्यामुळे नव्याने काही सरोवरांची निर्मिती होत आहे. काही सरोवरांचा आकार वाढत आहे. येथील हिमानी सरोवरांना येणारे पूर अनेकदा आपत्तीकारक ठरलेले आहेत.  हिमालयाच्या कैलास पर्वताजवळ समुद्र सपाटीपासूनपासून ४,५९० मी. उंचीवर असणारे जगप्रसिद्ध मानसरोवर हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थान आहे. मानसरोवराच्या पश्चिमेस १० कि.मी.वर राक्षसताल सरोवर आहे. ही दोन्ही सरोवरे एका जलमार्गाने एकमेकांना जोडलेली आहेत; परंतु त्यांच्या पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. मानसरोवराचे पाणी स्वच्छ व गोड, तर राक्षसताल सरोवराचे पाणी कडवट व तुरट आहे. हिमालयातील  इमजा ही हिमनदी आता सरोवरात रूपांतरित झाली आहे. जागतिक हवामान बदलाचा फटका हिमालयाला बसतो आहे. अनेक उंच व दुर्गम भागात  सरोवरे निर्माण झाल्यामुळे हिमालय पर्वताला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिमालयात ५१००  मीटर उंचीवरील सरोवरांच्या चारही बाजूंनी हिमनद्यांच्या हिमोढ गाळाची भिंत तयार झालेली आहे. ही भिंत कोसळल्यास सरोवरातील पाणी आपल्यासोबत दूरपर्यंत चिखल आणि दगडांना वाहून नेईल. यामुळे घरे  आणि शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होईल.  

हिमालयात अशा प्रकारे  सरोवरे निर्माण होण्याची घटना फक्त एकदाच होईल असे नाही. येणार्‍या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात ती तयार होतील. सगळ्या हिमालयीन क्षेत्रात आज तब्बल ३२,३९० हिमनद्या आणि  ४७०० सरोवरे निर्माण झाली आहेत. एकट्या नेपाळमध्ये १६००, तर भूतानमध्ये २७०० सरोवरे आहेत.

संबंधित बातम्या