घुग्रा धबधबा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

भूवारसा पर्यटन

अनेक विलक्षण भूशास्त्रीय घटनांनी आणि हालचालींनी नर्मदा नदीच्या पात्रात तयार झालेले समृद्ध असे भूवारसा पर्यटन स्थळ म्हणजे घुग्रा धबधबा!

नर्मदा ही भारताची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तिची लांबी १,३१२ किमी आहे. अमरकंटक येथील १,०४८ मीटर उंचीवर असलेल्या तिच्या उगमापासून पश्चिम किनाऱ्यावरच्या तिच्या मुखापर्यंतचा सगळा परिसर अतिशय पवित्र मानला जातो. नर्मदा नदीखोऱ्याचे आणि नदीमार्गाचे भूशास्त्रीय महत्त्वही फार मोठे आहे. भारतीय उपखंडात चौपन्न कोटी वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत घडलेल्या अनेक भूहालचालींचा इतिहास उलगडून दाखविणारी भूरूपे नर्मदेच्या पात्रात, किनाऱ्यावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात आढळून येतात. ही नदी चार कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली असावी याचे अनेक भूशास्त्रीय पुरावे सापडतात. 

नर्मदा नदी सरळ रेषेत नर्मदा-सोन या भंग रेषेवरून (Lineament) वाहते. नर्मदेच्या या मुख्य भंग रेषेला छेदून जाणारे अनेक भंग प्रदेश (Cross faults) आहेत. अशा भंगप्रदेशांत छेद मार्गांवर ठिकठिकाणी धबधबे आढळतात. बेडाघाट हे नर्मदेच्या नदीमार्गात जबलपूरपासून वीस किमी अंतरावर असलेले ठिकाण, हा भारतासाठी मोठा भूवारसा आहे. बेडाघाटचा नदीमार्ग घळईचा (Gorge) आहे. तेथून वरच्या नदीमार्गात तीन किमी अंतरावर ‘धुवांधार’ नावाचा फेसाळलेल्या पाण्याचा तीस मीटर उंचीचा धबधबा हेही तितकेच आकर्षक भूरूप आहे. ‘धुवांधार’च्या वर तीन किमीवर लॅमेटा घाट परिसरात असाच एक धबधबा आहे, त्याला घुग्रा धबधबा म्हणतात. ही दोन्ही प्रसिद्ध पर्यटन स्थळेही आहेत.

घुग्रा धबधब्याच्या आजूबाजूला संगमरवर आणि सुभाज (Schist) हे चौपन्न कोटी वर्षे जुने प्रीकॅम्ब्रियन काळातील आणि काही चौदा ते सहा कोटी वर्षे जुने क्रिटेशिअस काळातील लॅमेटा  खडकही आहेत. या धबधब्याच्या परिसरात चुनखडक, संगमरवर, शिस्ट हे लॅमेटा श्रेणीतील खडक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. खडकांच्या या श्रेणीचे खडक सर्वप्रथम लॅमेटा घाट याच भागात सापडले, त्यामुळे भूशास्त्रातील या श्रेणीला लॅमेटा हेच नाव देण्यात आले. या काही कोटी वर्षे जुन्या लॅमेटा श्रेणीतील चुनखडकांत डायनोसॉरचे, तसेच अनेक सस्तन प्राणी आणि साप यांचे जीवाश्म (Fossils) आढळून येतात. लॅमेटा शिला श्रेणीतील अठरा मीटर जाडीच्या खडकांचे चिखलयुक्त खडक (Clay stone), वालुकाश्म आणि गुंडाश्म (Conglomerate) असे प्रकार दिसून येतात.  या श्रेणीतील खडक गटांची खोली जास्त नसली, तरी त्यांचा समकक्ष किंवा आडवा विस्तार लक्षणीय असतो.

संगमरवर खडकात तयार झालेल्या बेडाघाट येथील प्रसिद्ध धबधब्याच्या वरच्या बाजूला केवळ पाच किमी अंतरावर आणि जबलपूर शहरापासून फक्त सतरा किमी अंतरावर घुग्रा धबधबा आहे. पण तरीही बेडाघाटपेक्षा इथे कमी प्रमाणात पर्यटक येतात, आणि म्हणूनच कदाचित इथले अतिशय जुने आणि देखणे खडक नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर व नदीपात्रात आजही सुरक्षित राहिलेले आहेत. नदीच्या उजव्या किनाऱ्यावर ३९७ मीटर उंचीवर लॅमेटा घाट हे ठिकाण आहे. तिथूनच लॅमेटा श्रेणीतील चुनखडक, संगमरवर, शिस्ट हे खडक दिसू लागतात. 

अनेक गोष्टींमुळे लॅमेटा धबधबा परिसराला भूशास्त्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सिलिकायुक्त चुनखडक हा इथे आढळणारा मुख्य खडक आहे आणि त्याची जाडी धबधब्याच्या आजूबाजूला आठ ते वीस मीटर इतकी असल्याचे दिसून येते. धबधब्याच्या परिसरात जमिनीवरच्या व गोड्या पाण्यात शंखशिंपल्यात वास्तव्य करून राहणाऱ्या मृदुकाय प्राण्यांचे (Mollusca) जीवाश्म (Fossils) आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे अनेक जिवावशेष सापडले आहेत. कासव, मासे आणि डायनोसॉर या पृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्मही इथे आढळतात. या जीवाश्मांवरून लॅमेटा प्रदेशातील गाळाचे खडक साडेसहा ते सात कोटी वर्षे जुने असावेत, हे नक्की करता आले. 

भारतात डायनोसॉरचा सर्वात जास्त विकास लॅमेटा काळातच झाला हेही यावरून लक्षात येऊ शकले. लॅमेटा प्रदेशातील डायनोसॉरचे जीवाश्म आणि ब्राझील, पँटागोनिया व मादागास्कर इथे सापडणारे जीवाश्म एकाच प्रकारचे आहेत. त्यामुळे सात कोटी वर्षांपूर्वी हिंदी महासागर आणि ॲटलांटिक महासागर भूसेतूंच्या (Land bridges) किंवा गोंडवाना भूमीच्या अनेक मोठ्या तुकड्यांमार्फत एकमेकांना जोडले गेले असावेत,  या संकल्पनेला यातून पुष्टी मिळते.

घुग्रा धबधब्याच्या ठिकाणी दोन्ही किनाऱ्यांवर रांगोळीचा दगड दिसून येतो. आजूबाजूच्या मोठ्या भागात विदारण झालेला रांगोळीचा खडक (Talcose) पसरलेला आहे. अतिशय ठिसूळ असा हा खडक मूलतः बेसॉल्ट किंवा डोलोमाईट खडकाचा रूपांतरित खडक, शिस्ट किंवा सुभाज, असून त्याचे मोठे थरही या भागात आढळतात. मूळच्या संगमरवर खडकात बेसॉल्ट खडकाचा भित्ती खडक (Dyke) घुसल्यामुळे त्याचे जे रूपांतरण झाले, त्यामुळे हे खडक ठिसूळ झाले. अशा ठिसूळ खडकात कालांतराने घुग्रा धबधबा असलेल्या नदीमार्गात झीज होऊन घळई (Gorge) निर्माण झाली. भूभ्रंश निर्माण झालेल्या नर्मदा नदीमार्गासारख्या भागात किंवा जेथे भूतबक खचते तेथे उष्णता व दाब यामुळे मूळ खडकाचे रूपांतरण होऊन हे मॅग्नेशिअम समृद्ध रांगोळीचे खडक तयार होतात. त्यांच्या ठिसूळपणामुळे या खडकांची झीजही मोठ्या प्रमाणावर होते.  

धबधबा जिथे आहे तिथे नदीमार्ग थोडासा अंतर्वक्र झालेला दिसून येतो. पाण्याची धार इथेच जास्त वेगाने खाली कोसळते. धबधब्याच्या आजूबाजूला या परिसरात अनेक विविधरंगी आणि विविध आकाराचे सुंदर खडक पसरलेले दिसतात. नदीचे किनारे व नदीपात्र आणि त्यातील खडक हे जीवाश्मांनी इतके समृद्ध आहेत की अजूनही सगळे जीवाश्म आपल्याला सापडलेले नाहीत, असे भूशास्त्रज्ञांना वाटते. लॅमेटा श्रेणीतील खडक विपुल असलेल्या या भागात उथळ समुद्रातील आणि खाडी व दलदल प्रदेशातील अनेक प्राचीन जीवाश्मांचे अस्तित्व असावे असाही दावा करण्यात आला आहे. इथे काही ठिकाणी आढळणारे रांगोळीचे दगड खालच्या थरातील ग्रॅनाईट खडक आणि वरच्या थरातील बेसॉल्ट यामध्ये विदारण झालेल्या अवस्थेत शिल्लक असल्याचेही दिसून येते. या सर्व गोष्टींच्या साहाय्याने नर्मदेची आणि ती ज्यावर तयार झाली, त्या प्रदेशाची उत्क्रांती आणि विकास अधिक नेमकेपणाने मांडणेही सोपे होत आहे!    

अशा अनेक विलक्षण भूशास्त्रीय घटनांनी आणि हालचालींनी नर्मदा नदीच्या पात्रात तयार झालेले असे हे समृद्ध भूवारसा पर्यटन स्थळ आहे. चांगले रस्ते आणि जवळच्या बेडाघाटमुळे इतर अनेक उपलब्ध सुविधा, यामुळे हा परिसर पाहणे आता सोईचे झाले आहे.

स्थान संदर्भ 

  • २३.१० अंश उत्तर अक्षांश/७९.८३ पूर्व रेखांश
  • समुद्रसपाटीपासून उंची : ३६० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : ७ ते १० कोटी वर्षे
  • धबधब्याची उंची : १५ मीटर    
  • जवळचे मोठे ठिकाण : जबलपूर (१७ किमी)  

संबंधित बातम्या