डेहराडूनचे डेहरा खोरे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

भूवारसा पर्यटन

हिमालयाच्या दक्षिण सीमेचा भाग असलेल्या शिवालिक या पर्वतरांगेत डेहराडून हे खोलगट खोरे आहे.  ही पर्वतरांग आणि त्यामागे असलेल्या हिमाचल पर्वतरांगेच्या दरम्यान या खोऱ्याचे स्थान आहे. अशा खोऱ्यांना ‘दून’ म्हटले जाते. 

डेहराडून हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक आंतरपर्वतीय स्वरूपाचा, भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींनी तयार झालेला लांबट खळगाच आहे.

हिमालय निर्मितीच्यावेळी झालेल्या हालचालींमुळे हिमालयाच्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्व पश्चिम दिशेत शिवालिक किंवा बाह्य हिमालय (Outer Himalay), मुख्य किंवा मध्य हिमालय किंवा  हिमाचल (Lessar Himalay) आणि हिमाद्री म्हणजे बृहत् हिमालय (Grater Himalay) अशा पर्वतरांगा तयार झाल्या. संपूर्ण हिमालयाची ही निर्मिती सुमारे ७० लाख वर्षे सुरू असावी.  

गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकण्याची आणि हिमालयाची उंची वाढण्याची क्रिया अजूनही सुरूच आहे, परंतु ती अतिशय मंद आहे. हिमालयाच्या बऱ्याचशा भागाची नेमकी आणि पुरेशी भूशास्त्रीय माहिती आजही आपल्याकडे नाही. ती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ॲल्फ्रेड वेगनर यांच्या खंड वहन सिद्धांतानुसार ३३.५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पॅँजिया या विशाल खंडाचे (Supercontinent) १७.५ कोटी वर्षांपूर्वी तुकडे होऊन उत्तरेकडील लॉरेशिया (अंगाराभूमी) व दक्षिणेकडील गोंडवनभूमी असे दोन भूखंड अस्तित्वात आले. दोन्ही भूखंडांच्या दरम्यानच्या भागात पडलेली भेग रुंदावत जाऊन त्या ठिकाणी पाणी साचून तेथे टेथीस समुद्र अस्तित्वात आला. दोन्ही भूखंडांकडून वाहत येणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहून आणलेला गाळ, चिखल आणि वाळूचे टेथीसच्या तळावर संचयन होत गेले.  गाळाच्या वरच्या थराचा व पाण्याचा दाब पडत जाऊन या सर्व पदार्थांचे कालांतराने गाळाच्या स्तरित खडकांत रूपांतर झाले. कालांतराने गोंडवनभूमी उत्तरेकडे सरकू लागल्यामुळे टेथीसमधील गाळाच्या मृदू खडकांवरचा दाब वाढून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. ही क्रिया अगदी संथ गतीने दीर्घकाळपर्यंत सुरू राहून टेथीस समुद्राच्या जागेवरच हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक या  हिमालयीन पर्वतश्रेण्या अस्तित्वात आल्या. सुमारे दहा हजार मीटर जाडीचे खडक या हालचालीत भरडले गेले. 

यापैकी शिवालिक या दक्षिणेकडील पर्वतरांगेत पश्चिम पूर्व दिशेत पिंजर डून, कोटा डून, डांग व देवखुरी डून, चितवन डून आणि भालुक पॉँग अशी अनेक खोरी असून त्यांना ‘डून’ किंवा ‘दून’ असे म्हटले जाते. ही ‘डून’ भूप्रक्षोभक हालचालींमुळे निर्माण झाली असून ती हिमाचल आणि शिवालिक या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान असलेले अवनतीय खळगे (Synclinal troughs) आहेत. हे सगळे खळगे दोन्ही बाजूच्या डोंगर उतारावरून वाहत आलेल्या गाळाने भरून गेले आहेत. डेहराडूनचे डेहरा खोरे हे हिमालयातील अशा ‘डून’चे प्रातिनिधिक खोरे आहे.

अनेक दृष्टींनी या डून खोऱ्यांना भूशास्त्रीय महत्त्व आहे. हिमालय निर्मितीच्यावेळी शिवालिकच्या  पर्वतरांगा, वलीकरण (Folding) व प्रस्तरभंग (Faulting) क्रियेतून हिमालयाच्या अग्रभागापर्यंत येऊन स्थिरावल्या असाव्यात. आजही या रांगात दलदलीच्या प्रदेशांत राहणाऱ्या प्राचीन प्राण्यांचे सांगाडे, कवट्या, जबडे, दात यांचे जीवाश्म मोठ्या प्रमाणावर सापडतात. शिवालिक पर्वतरांगांतील वालुकाश्म, गुंडाश्म अशा गाळाच्या खडकांत, नदीकिनारी, कडे, डोंगर उतार आणि ‘डून’ प्रदेशांत ते  प्रामुख्याने ते आढळतात. या दक्षिणेकडच्या शिवालिक, अग्रणी (Frontal) टेकड्यांची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी असावी यावर या डूनच्या अभ्यासातून माहिती मिळते. त्याचप्रमाणे २५ लाख ते १२ हजार वर्षे या क्वाटर्नरी कालखंडात हिमाचल या मध्य हिमालयातून आलेल्या गाळाचे संचयन ‘डून’मध्ये कसे झाले असावे याचीही कल्पना येऊ शकते. याचबरोबर डेहराडूनसारख्या मोठ्या डून खोऱ्यांच्या अभ्यासातून हेही लक्षात येते, की डूनमध्ये झालेल्या गाळ संचयनामुळे जवळच असलेल्या गंगा, यमुनेच्या सपाट मैदानी भागात जाणारा गाळ कसा कमी झाला असावा.

भरपूर गाळ साठल्यामुळे सुपीक झालेली ही सर्व डून खोरी मानवी वस्त्यांसाठी अतिशय अनुकूल झाली आहेत; डेहराडून हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. डेहरा खोऱ्यांत देवबन, चक्राता, मसुरी, रामगड, राजपूर, ऋषिकेश आणि वीरभद्र अशी अनेक मोठी औद्योगिक आणि पर्यटन शहरे  व ‘सहस्रधारा’सारखे उष्ण पाण्याचे झरेही आढळतात.

हिमाचल या हिमालयाच्या मध्यवर्ती पर्वतरांगांचा रेटा (Thrust) जसा त्या भागात जाणवतो, तसाच तो शिवालिक पर्वतरांगांतही जाणवतो. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी तितकीच भूकंप प्रवणता आहे. मात्र हिमाचल आणि शिवालिक या दोन्ही रांगांच्या मधल्या सगळ्याच ‘डून’ प्रदेशातील नद्या, त्यांचे वर्तन (Behaviour) आणि विकास (Development) या गोष्टी आणि त्यांची लांबी, रुंदी यात बरेच फरक आढळून येतात. त्यांच्यातील एकमेकातील अंतरही सगळीकडे सारखे नाही, प्रत्येक डूनच्या दोन टोकांपाशी मुख्य नद्यांचे बहिर्मार्ग (Outlets) आहेत. डेहरा खोऱ्याच्या पूर्वेला गंगा व पश्चिमेला यमुना या दोन नद्यांचे बहिर्मार्ग आहेत. 

प्रत्येक डूनची उत्तरेकडच्या दिशेला असलेली समुद्रसपाटीपासून उंची दक्षिणेकडच्या शिवालिक बाजूकडच्या उंचीपेक्षा जास्त आहे. डेहराडूनच्या डेहरा खोऱ्याची उत्तरेकडची उंची २३०० मीटर, पिंजरडून खोऱ्याची १५०० मीटर, तर कोटाडूनची २५०० मीटर आहे. यांची दक्षिणेकडची उंची अनुक्रमे ९००, ७८० व २००० मीटर आहे. या सर्व डूनमधील खडक २.३ कोटी ते ५३ लाख वर्षांपूर्वीच्या ‘मायोसीन’ कालखंडातील आहेत. डून खोऱ्यांच्या रुंदीतही एकसारखेपणा नाही. हिमाचल या वली (Fold) प्रदेशातून किती प्रमाणात गाळाचा रेटा शिवालिक प्रदेशाकडे आला, त्यानुसार या खोऱ्यांची रुंदी कमी जास्त झाली. डेहरा खोऱ्याप्रमाणेच प्रत्येक डून खोऱ्यात गाळाचे त्रिभुज (Alluvial fans) भाग, नदीकाठावरील वेदिक (Terraces), पूरमैदाने आणि लहान मोठ्या गाळाच्या टेकड्या अशी विविध भूरूपे आढळतात. खोऱ्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारे नदी प्रवाह याच इथल्या मुख्य नद्या असतात. 

हिमालय निर्मितीतील अखेरचा वलीकरण टप्पा म्हणून शिवालिक पर्वतरांगेला जेवढे महत्त्व आहे, तितकेच भूशास्त्रीय महत्त्व त्यामागे असलेल्या या खोऱ्यांना आहे. त्यातील भूरूपेही हिमालयाच्या इतर भागापेक्षा त्यांचे वेगळेपण आजही टिकवून आहेत. डेहराडूनच्या डेहरा खोऱ्याने हिमालयाचे हे अतिशय वेगळे असे भूरूप, भूवारसा म्हणून नक्कीच जतन करून ठेवले आहे यात शंका नाही.     

स्थान संदर्भ 

  •  ३०.३१ अंश उत्तर अक्षांश/७८.०३ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्रसपाटीपासून उंची : ६४९ मीटर
  • डून पट्ट्याची लांबी : सुमारे १७०० किमी 
  • भूशास्त्रीय वय :  ४३,००० वर्षे     
  • मोठे ठिकाण : डेहराडून

संबंधित बातम्या