गोंडवन फॉसिल वॉक

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 6 डिसेंबर 2021

भूवारसा पर्यटन

आत्तापर्यंत या लेखमालेत आपण भूवारसा महत्त्व असलेल्या भारतातील निवडक स्थळांचा पर्यटनासंदर्भात परिचय करून घेतला. जगाच्या कानाकोपऱ्यांत इतरत्रही अशी असंख्य ठिकाणे आहेत. त्या त्या देशांनी अशा स्थळांची जिवापाड जपणूक केली आहे आणि आपला भौगोलिक व भूशास्त्रीय वारसा जतन करून ठेवला आहे. लेखमालेच्या शेवटच्या टप्प्यात अशी काही विलक्षण भूवारसा ठिकाणांचा परिचय...

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतात शोलहेवन भागात ३५ अंश दक्षिण अक्षवृत्त आणि १५० अंश पूर्व रेखावृत्ताजवळच्या उल्लाडुल्ला शहराजवळ गोंडवन फॉसिल वॉक म्हणजे गोंडवन या भूशास्त्रीय प्रदेशातील आणि कालखंडातील जिवावाशेष भ्रमण मार्ग आहे. भूशास्त्रीय काळातील काही विशिष्ट सागरी जिवांचे व वनस्पतींचे अश्मिभूत जिवावशेष किंवा जीवाश्म (Fossils) या भागातील सागरतट मंचावर आढळतात.    

हा ५०० मीटर लांबीचा भ्रमण मार्ग ज्या सागरतट मंचावरून जातो, त्यावर दिसणाऱ्या जिवाशेषांप्रमाणेच इतरही अनेक भूशास्त्रीय गोष्टी इथे आजूबाजूला आढळतात. आजूबाजूला अनेक रूपांतरित आणि अग्निज खडक पसरलेले दिसतात. पुळणींच्या जमिनीकडच्या बाजूला सागरी कडे असून त्यात अधःकर्तन होऊन गुहा निर्माण झालेल्या आहेत. भरपूर भूशास्त्रीय व शैक्षणिक क्षमता असलेला हा वॉक अनेक दृष्टींनी आगळावेगळा आहे. इथे आढळणाऱ्या जिवावशेषाचा टिकाऊपणा (Preservation) आणि विपुलता आश्चर्यकारक अशीच आहे. 

पर्मियन या भूशास्त्रीय कालखंडात पूर्व ऑस्ट्रेलियाचा भाग अंटार्क्टिक वृत्ताच्या जवळ होता. त्यावेळचे म्हणजे २७ कोटी वर्षांपूर्वीचे सागरी अपृष्ठवंशीय (Invertibrates) जिवांचे अवशेष इथल्या किनाऱ्यावर अश्मिभूत अवस्थेत आढळतात. हे सगळे जिवावशेष प्राचीन वांद्रावाडीयन सिल्टस्टोन खडकात अश्मिभूत झाले आहेत. 

सिडनीच्या दक्षिणेला ससेक्स इनलेटच्या पुढे बेरारा, कानजोला, मिल्टन आणि उल्लाडुल्ला किनाऱ्यापर्यंत प्राचीन गोंडवन भूखंडावर हे अवशेष दिसून येतात. या भागात असलेल्या सागरतट मंचावर सिल्टस्टोन खडकाच्या आडव्या थरात पर्मिअन काळातील पेक्टन शेल, स्पायरीफेर, प्रोडक्टीड आणि सी लिली या प्राण्यांचे भरपूर जिवावाशेष अश्मिभूत  होऊन सर्वत्र विखुरलेले दिसून येतात. 

अनेक वर्षे संशोधकांच्या आणि पर्यटकांच्या नजरेतून निसटलेले हे वैभव २००९पासून फॉसिल वॉकच्या स्वरूपात जगासमोर आणले गेले. हे सर्व जिवावशेष २५ ते ३० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर होऊन गेलेल्या पर्मिअन भूशास्त्रीय कालखंडातील, ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या थंड पाण्यातील असून त्यात भरपूर वैविध्य आढळते. आजपर्यंत या भागात सी लिलीज्, सी फॅन्स, हॉर्न कोरल्स आणि दुर्मीळ अशा ब्रान्चिंग कोरल्सचे जिवावशेष सापडले आहेत. 
या फॉसिल वॉकवर फिरताना जीव अश्मिभूत होण्याची आणि त्यांच्या शरीराचे ठसे होण्याची क्रिया याबद्दल जशी कल्पना येते, तशीच थोडीफार कल्पना प्राचीन हवामान, समुद्र पातळी, गोंडवन प्रदेशातील हिमप्रक्रिया आणि ६० अंश व ३३० अंशात पसरलेल्या खडकातील जोडांच्या (Joints) दिशा, त्यांचे किनाऱ्याशी असलेले साधर्म्य आणि आजच्या किनाऱ्याची ठेवण याबद्दलही कल्पना येते. 

२० ते २५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एकच मोठे महाखंड होते. त्यानंतर साडेचौदा कोटी वर्षांपूर्वी उत्तरेकडे लॉरेशिया व दक्षिणेकडे गोंडवन असे याचे दोन भाग झाले. गोंडवन भूखंडात आजची दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिक यांचा समावेश होता. २७ कोटी वर्षांपूर्वी पर्मिअन काळात गोंडवनभोवतालच्या समुद्राची पातळी वाढलेली होती. त्याच्या पूर्व सीमेवर अनेक सागरी जीव, गाळ संचयनामुळे अश्मिभूत होऊन सागरतळावर साचू  लागले होते. गाळाच्या  संचयनातून ८०० मीटर जाडीचे गाळाचे खडक तयार झाले. भूशास्त्रज्ञ या खडकांना ‘शोलहेवन ग्रुप ऑफ रॉक्स’ असे म्हणतात. या खडकात आढळणारे जिवावशेष जगातील सर्वात उत्तम प्रकारे टिकून राहिलेले अवशेष मानण्यात येतात.  २७ कोटी वर्षांपूर्वी इथल्या उथळ समुद्रतळावर साठलेला गाळ अतिशय  बारीक अवसाद कणांनी तयार झालेला असावा. जिथे आज हे जिवावशेष सापडतात, तिथे त्या काळात संथ, शांत पाणी असलेले उपसागर असावेत. गाळाच्या प्रचंड थराखाली अचानक गाडले गेल्यामुळे, जिवांची शरीरे कुजून गेली असावीत. हळूहळू कठीण अशी बाह्य त्वचा विरघळून गेल्यावर प्राण्यांच्या शरीराचे ठसे सिल्टस्टोन खडकावर अश्मिभूत झाले असावेत. पर्मिअन कालखंडात ९५ टक्के समुद्री जीव आणि ७० टक्के  भूजन्य जीव नष्ट झाले असावेत. सागर पातळीतील बदलामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिवांचा संहार झाल्याचा हा एकमेव भूशास्त्रीय कालखंड मानण्यात येतो. 

आज ज्या सागरी जिवांचे अश्मिभूत अवशेष या वॉकवर सापडतात ते सगळे जीव चिखल व सिल्टयुक्त अवसादानी तयार झालेल्या सागरतळावर त्यावेळी २० मीटर खोलीवर असावेत. आज ज्या सागरतट  मंचावर सिल्टस्टोनमध्ये हे जिवावशेष आढळतात ते मंच फरशीच्या तुकड्यासारख्या चौकोनी आकारात तुटलेल्या खडकासारखे सगळीकडे किनाऱ्यावर पसरलेले दिसतात. सगळ्या गोंडवन किनाऱ्यावर कमी अधिक फरकाने तटीय मंचावर हाच आकृतिबंध दिसून येतो. गेल्या दोन कोटी वर्षांतच हे भूरूपीक आकृतिबंध तयार झाले असावेत, असाही भूशास्त्रज्ञांचा कयास आहे 

सहा कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर उत्थापन (Uplifting) झाले आणि उंचावलेल्या किनाऱ्यावर वालुकाश्माचे उंच कडे आणि डोंगराळ भाग तयार झाले. टास्मानियाचा  समुद्रही तयार झाला. न्यू झीलंड मुख्य भूमीपासून तुटला. तेव्हापासून या सगळ्या किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर झीज चालू आहे. किनाऱ्यावरील अपक्षरण क्रियेतून सिडनी हार्बर, जर्वीस बे आणि  उल्लाडुल्ला हार्बर या भागांना आजचा आकार प्राप्त झाला. त्यानंतर किनाऱ्यावर लाटांनी केलेल्या झीजेमुळे सागरतट मंच उघडे पडले आणि सिल्टस्टोन खडकांची जाडीही थोडी कमी झाली. 

या फॉसिल वॉकवर केवळ ओहोटीच्यावेळीच सहजपणे फिरता येते. ओहोटीच्यावेळीही या मंचावरून चालताना खूप काळजी घ्यावी लागते. खडक खूपच बुळबुळीत झालेले असतात. या वॉकवर सर्व प्रकारच्या जिवावशेषांचे फोटो घेता येतात, पण एकही जिवावशेष किनाऱ्यावरून उचलण्याला इथे कायद्याने बंदी आहे. 

गोंडवन प्रदेशातील भारताची गोंडवन खंडापासून फुटून उत्तरेकडे हालचाल १२ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली. पर्मिअन कालखंडात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे भूखंड एकमेकांना जोडलेले होते. त्या काळातील जिवांचे अश्मिभूत अवशेष शिवालिक हिमालयाच्या रांगातही आढळल्याच्या नोंदी आढळतात.

 

संबंधित बातम्या