शाश्वत पर्वतीय पर्यटनाची गरज

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 6 डिसेंबर 2021

चर्चा

पर्वतांना त्यांचे झपाट्याने नष्ट होत चाललेले गतवैभव आणि सौंदर्य पुन्हा मिळवून देण्यासाठी संवर्धनाच्या इतर उपायांबरोबर आज खरी गरज आहे, ती पर्वत रक्षणाचे महत्त्व समजून घेण्याऱ्या मानसिकतेची. स्थानिकांची आणि विशेषतः वाढत्या पर्वत पर्यटकांची, गिर्यारोहकांची आणि भ्रमंती करणाऱ्यांची अशी मानसिकता तयार करण्यात यश यावे हेच या वर्षीच्या जागतिक पर्वत दिवसाचे  उद्दिष्ट आहे. त्यामुळेच ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ (Sustainable Mountain Tourism) असे  यावर्षीच्या पर्वत दिनाचे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे.  

गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वच पर्यावरणप्रेमींना, शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना पर्वतांचे सर्वव्यापी, सर्वंकष महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच एक परिपाक म्हणजे, २००३पासून दरवर्षी ११ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा ‘पर्वत दिवस’. वास्तविक पाहता, जगातील अतिशय देखण्या व माणसासाठी अनेक क्षेत्रात वरदान ठरलेल्या या नैसर्गिक संपदेकडे आपण आजपर्यंत आपुलकीने कधी पाहिलेलेच नाही. त्याचे भूरूपिक, भूवैज्ञानिक, भूराजनैतिक आणि जैविक महत्त्व कळूनही पर्वतांकडे आपण दुर्लक्षच केले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पर्वतीय प्रदेशांचा जितक्या वेगाने उपयोग केला गेला, तितके पर्वतांच्या संधारण, संरक्षण आणि विकासासाठी मनापासून प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे या देवदुर्लभ नैसर्गिक भूरूपाविषयी प्रेम आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी या दिवसाला खूप महत्त्व आहे, हे निर्विवाद. 

‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ याचा अर्थ, पर्वत पर्यटनस्थळाच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीवर कमीत कमी परिणाम होईल, अशा प्रकारे केलेले पर्यटन. पर्वतातील भूशास्त्रीय विविधतेला आणि जैवविविधतेला हानी पोहोचणार नाही, तिथल्या स्थानिक लोकांच्या जीवनमानावर, नोकरी-व्यवसायावर तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेऊन पर्यटन करणे यात अपेक्षित आहे. पर्यटकांची पर्यटनस्थळांविषयी असणारी संवेदनशीलता आणि आस्था यांची सांगड घालणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे यात महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध पर्वत ठिकाणांबरोबरच पर्यटनासाठी नवीन पर्वत ठिकाणे शोधणेही या पर्यटनात अभिप्रेत आहे. 

अशा शाश्वत पर्वतीय पर्यटनाचा चांगला परिणाम म्हणजे, पर्वत प्रदेशाचा भूवारसा, सांस्कृतिक वारसा व नैसर्गिक संपदा या सगळ्याचे जतन व संवर्धन होईल. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने त्यांना रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार नाही. स्थानिकांच्या कलाकुसरीच्या वस्तू व कलाप्रकारासही संरक्षण मिळेल. 

पर्वत पर्यटनात पर्वतातील वस्त्या आणि तिथल्या स्थानिक गोष्टींना महत्त्व देणे, यादृष्टीने केल्या जाणाऱ्या पर्यटनावर जास्त भर दिला जातो. प्रत्येक पर्वत प्रदेशाची स्वतःची अशी एक स्वतंत्र संस्कृती असते. तिथल्या स्थानिकांना त्यांच्या डोंगराळ, खडकाळ आणि दुर्गम प्रदेशाचे नेमके ज्ञान असते. त्यांचे सगळे जीवनच त्या कठीण आणि खडतर प्रदेशाशी जोडलेले असते. भारतातील हिमालय, सह्याद्री, अरवली, सातपुडा या पर्वतांमध्ये पर्यटन विकासासाठी होत असलेल्या माणसाच्या हस्तक्षेपाचे दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत. इथल्या वस्त्या ज्या पद्धतीने आणि वेगाने बाधित होत आहेत, ते पाहता आपल्याला पर्वतांची हानी करणाऱ्या गोष्टींवर प्राधान्याने निर्बंध आणणे गरजेचे झाले आहे.  

जगातील सर्वच पर्वतप्रदेशांत आढळणारी विविधता ही केवळ अनाकलनीय व अचंबित करणारीच आहे. यासारख्या एखाद्या छोटेखानी लेखात पर्वतांना आणि त्यांच्या पर्यावरणाला सामावून घेणे त्यामुळेच अशक्य आहे. 

पृथ्वीवरचा २७ टक्के प्रदेश पर्वतांनी व्यापलेला आहे आणि त्यात आज जागतिक लोकसंख्येच्या १३ टक्के लोकसंख्या वास्तव्य करून राहत आहे. पृथ्वीवरील एकूण जैव आणि भूआवरण आरक्षित प्रदेशांपैकी (Bio-geosphere reserve) ५६ टक्के संरक्षित प्रदेश पर्वत प्रदेशातच आहेत. जागतिक पातळीवर आज १५ ते २० टक्के पर्यटक पर्वतांकडे आकर्षित होत असतात. जगातील ६० ते ७० टक्के शुद्ध पाण्याचा पुरवठा पर्वतांतून होतोय आणि जगातील न्यू यॉर्क, रिओ दी जानिरो, नैरोबी, टोकियो, मेलबर्न अशी काही मुख्य शहरे पर्वतांतील पाण्यावरच प्रामुख्याने अवलंबून आहेत. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांना सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी पर्वतीय प्रदेश खूपच लाभदायक ठरत आहेत. 

 जगात असलेले सगळे पर्वत आज जसे आहेत, तसेच अनादी-अनंत काळापासून आहेत, असे लोकांना वाटते. वास्तविक प्रत्येक पर्वत हा जन्म आणि मृत्यू या चक्रातून जात असतो. भूकवचाच्या उंचावण्याने (Uplifting) किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या घटनांतून पर्वताचा जन्म होतो. आपल्या लाखो आणि कोट्यवधी वर्षांच्या जीवनकाळात पर्वतांची नैसर्गिकपणे व माणसाच्या अनियंत्रित आणि बेजबाबदार हस्तक्षेपांमुळे अपरंपार झीज होते. अखेरीस या पर्वतरांगा झिजून झिजून लहान होतात, नष्ट होतात. काही वेळा भूकवच खचल्यामुळेही पर्वतांची उंची कमी होते. 

पर्वतांचे आकारमानानुसार पर्वतरांगा, पर्वतराजी, पर्वतीय साखळ्या, पर्वत प्रणाली असे प्रकार केले जातात. सगळ्यात कमी उंचीचे पर्वत सातशे ते एक हजार मीटर उंचीचे असतात. सह्याद्रीसारखे पर्वत किनाऱ्यासमीप, तर हिमालय आणि सातपुडा यांच्यासारखे पर्वत अंतर्गत पर्वत आहेत. हवाई बेटाजवळ ‘मोना की’सारखे एव्हरेस्टपेक्षाही (८,८४८ मी.) जास्त उंचीचे पर्वत समुद्रतळावर आहेत. भूप्रक्षोभक हालचालींमुळे (Tectonic movements) वली पर्वत, ठोकळ्यांचे पर्वत, घुमटाकृती पर्वत व ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. पृथ्वीवर आज आढळणारे पर्वत विभिन्न कालावधींत व भूशास्त्रीय काळात तयार झाले. युरोपमध्ये प्रिकेम्ब्रिअन काळातील पर्वत ५७ कोटी वर्षांपेक्षाही जुने आहेत. भारतातील अरवली, महादेव आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा कॅलेडोनियन कालखंडातील म्हणजे ५० ते ४० कोटी वर्षे जुन्या आहेत. टिएनशान, नानशान पर्वत हर्सिंनियन काळातील म्हणजे ३८ ते २८ कोटी वर्षांपूर्वीचे, तर रॉकीज, अँडीज हे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या अल्पाइन काळातील पर्वत आहेत. 

जगातील सर्वोच्च व जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम लांबी असलेला (अडीच हजार किलोमीटर) आणि पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला हिमालय हा अर्वाचिन पर्वत आहे. पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी टीथिस नावाच्या प्राचीन समुद्रतळातून हिमालयाची निर्मिती झाली, असे मानले जाते. अरवली हा आठशे किलोमीटर लांबीचा पर्वत शंभर कोटी वर्षांपूर्वी आणि सह्याद्री हा सोळाशे किलोमीटर लांबीचा व  सरासरी बाराशे मीटर उंचीचा पर्वत सात ते आठ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला.   

पर्वतीय प्रदेशांबद्दलचे अपूर्ण व काही वेळा चुकीचे ज्ञान आणि त्यांच्या क्षमतेबद्दलचे चुकीचे आडाखे यामुळेही पर्वत विकास योजनांत अडथळे निर्माण होत असतात. जगातील सगळ्याच पर्वतांबद्दलचे आपले ज्ञान तसे नवीनच आहे आणि गेल्या काही वर्षात ते अधिक योग्य आणि नेमके झाले आहे. त्यांची निर्मिती आणि उत्क्रांती यासंबंधीचे ठोस पुरावे आज आपल्याला मिळाले आहेत. यातूनच जगातील विविध प्रदेशांत आढळून येणाऱ्या निरनिराळ्या पर्वतांतील विविधता समजणे सुलभ झाले आहे. जगभरात हवामानात जे वैविध्य आढळते, त्याचे मुख्य कारण पर्वतच आहेत, असेही आता स्पष्ट होत आहे. पर्वतांचा परिणाम त्यांच्यापासून खूप दूर असलेल्या प्रदेशांच्या हवामानावरही होत असतो. हिमालय आणि सह्याद्री पर्वतांचा आपल्या मॉन्सूनच्या निर्मितीत होणारा परिणाम तर आपल्याला परिचित आहेच. 

कोणत्याही पर्वताच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत हवामानात जे सूक्ष्म बदल होतात, त्यामुळे पर्वत प्रदेशात भरपूर जैवविविधता निर्माण होते. मानववंश शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर पर्वत नसते तर आज आढळणाऱ्या विविध शारीरिक बांध्याच्या, वर्णाच्या, उंचीच्या आणि काटक व कणखर मनुष्य जमाती दिसल्याच नसत्या. पर्वतांचे माणसाला वाटणारे आकर्षण हाही एक सार्वत्रिक आवडीचा विषय आहे. माणसाच्या धाडसाला सदैव आव्हान देणाऱ्या या भूरूपाने अनेकांना पर्वतारोहण, प्रस्तरारोहण, मुक्त भ्रमण, शोध व संशोधन करण्यास उद्युक्त केले आहे. आज जगातील इतर पर्वतांप्रमाणेच भारतातील हिमालय व सह्याद्री या पर्वतीय प्रदेशात काही विशिष्ट पर्यावरणीय समस्या वेगाने वाढत आहेत. पर्यटकांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांच्या सोयीसाठी वाढत गेलेल्या बांधकाम व्यवसायामुळे होणारा डोंगर उतारांचा ऱ्हास यामुळे पर्वताचे नष्टचर्य अनेक ठिकाणी याआधीच सुरू झाले आहे. पर्वतातील लोकांच्या राहणीमानात येऊ लागलेला निकृष्ट दर्जा, जंगलतोड, जमिनीची धूप, आधीच तुटपुंज्या असलेल्या पाण्याचे प्रदूषण, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात वेगाने  सुरू असलेली नागरी वस्त्यांची वाढ अशा समस्यांनी जगातील इतर पर्वतांप्रमाणेच भारतातील पर्वतात ठाण मांडले आहे! 

आज माणसाला पर्वतांची त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठीच मोठी गरज आहे. एका अर्थी हे पर्वत माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटकच झाले आहेत. पर्वत प्रदेशातील डोंगर उतारावर केली जाणारी  शेती, जलविद्युत निर्मिती, उपलब्ध खनिजे, औषधी वनस्पती अशा अनेकविध बाबतीत पर्वत आज माणसाचे आधारस्तंभ झाले आहेत. असे असले तरीही पर्वतांकडे झालेले दुर्लक्ष आणि माणसाने निष्काळजीपणाने केवळ स्वार्थापोटी चालू केलेला पर्वतातील समृद्ध पर्यावरणाचा अनिर्बंध वापर, यामुळे जगातील पर्वतांचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागला आहे. आता मात्र जेव्हा या ऱ्हासाचे परिणाम पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या समृद्ध व विकसित प्रदेशांवर व मानवी वस्त्यांवर दिसू लागले, तेव्हाच पर्वतांचे महत्त्व लक्षात यायला खऱ्या अर्थाने  सुरुवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पर्वतांचे संधारण, संरक्षण व त्यांचा टिकाऊ विकास केल्याशिवाय डोंगराळ व पर्वतमय भागातील मानवी वस्त्यांचे अस्तित्व आणि पर्यायाने गंगा, यमुना मैदानासारख्या मैदानी प्रदेशांची समृद्धता टिकविणे अशक्य आहे, हे सत्य कळायलाच  आपल्याला इतकी वर्षे लागली आहेत. 

पर्वतीय पर्यावरणाचा आजवर झालेला संहार लक्षात घेता, पर्वतांचा टिकाऊ विकास (Sustainable Development) करणे, ही अर्थातच इतकी सहजसोपी गोष्ट नाही, हेही आता लक्षात येऊ लागले आहे. जगातील सगळ्याच पर्वतराजींचे संवेदनक्षम, नाजूक आणि विविधतेने ओतप्रोत भरलेले पर्यावरण पाहता, पर्वतांचे रक्षण व जतन करण्याचे काम हे एक मोठे आव्हानच आहे यात तिळमात्र शंका नाही. 

पर्वतीय व डोंगराळ प्रदेशाचा विकास व त्यांचे नियोजन याचा सगळा आधारच मुळी पावलोपावली बदलणारी भूरचना व भूमिस्वरूपे (Landscape and Landforms) यावर अवलंबून असल्यामुळे सपाट, मैदानी प्रदेशांच्या विकासाचे कोणतेही मापदंड पर्वत प्रदेशात उपयोगाचे ठरत नाहीत. अतिशय मर्यादित अशा सपाट जागा, तीव्र डोंगरउतार, घळया, जंगले किंवा बर्फाच्छादन आणि दरडी कोसळणे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती या सगळ्यांचा साकल्याने विचार करूनच पर्वतीय  प्रदेशांत विकास योजना राबविणे आवश्यक असते, नाहीतर ही देवदुर्लभ गिरिशिल्पे आजच्याहीपेक्षा जास्त वेगाने ऱ्हास पावतील हे नक्की!

संबंधित बातम्या