मादागास्करचे अश्म वन

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021


भूवारसा पर्यटन

हिंदी महासागरातील मादागास्कर या बेटावर ‘सिंगी दे बेमराह’ (Tsingy de Bemaraha) नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे. मादागास्कर बेटाच्या पश्चिम किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून ४५० मीटर उंचीवर असलेल्या या उद्यानात चुनखडीच्या दगडांची एक विलक्षण रचना आढळून येते. अश्म वन (Stone Forest) नावाने हा प्रदेश जगप्रसिद्ध आहे. १५०० चौ.किमीच्या विस्तीर्ण भागात पसरलेले हे दगडांचे जंगल चुनखडीच्या उंचच उंच स्तंभांनी अगदी भरून गेले आहे. हे जंगल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित केले आहे. 

मादागास्करवरील अश्म वन मोरोंडवा शहराच्या उत्तरेला मोनांबोलो नदीच्या काठी उत्तर किनाऱ्यावर १५० किमी अंतरावर आहे. या वनाचे छोटे त्सिंगी व बृहद त्सिंगी (Greater Tsingy) असे दोन भाग आहेत. छोटे त्सिंगी भाग नदी काठालगत व बृहद त्सिंगी त्याच्या उत्तरेला आठ किमी अंतरावर आहे. छोटे आणि बृहद त्सिंगी हे प्रकार इथल्या चुनखडक स्तंभांच्या उंचीवरून केले गेले आहेत.

हे अश्म वन म्हणजे, एक कमी उंचीचा चुनखडकात तयार झालेला उंचवटा असून तो ३०० ते ५०० मीटर जाडीच्या २० कोटी वर्षे जुन्या चुनखडक प्रदेशावरच तयार झालेला आहे. त्या काळात एका सिंधूतडाग प्रदेशात म्हणजे लगूनमध्ये (Lagoon) कॅलसाईट खनिजाचे थर साठून त्याची निर्मिती झाली. २५ लाख वर्षांपूर्वी म्हणजे प्लाईस्टोसीन काळात जगभरात हिमयुग आले, समुद्र पातळी खाली गेली आणि इथे मोठ्या प्रमाणावर चुनखडक उघडा पडला. उंचावलेल्या भागावर पाऊस पडून मृदू खडक कालांतराने झिजून गेले, पण कठीण झालेले चुनखडक शिल्लक राहिले. त्यात पाणी झिरपून भेगा तयार झाल्या. त्या रुंद होत गेल्या आणि चुनखडकांचे हजारो स्तंभ उभे राहिले.

अश्म वन हा एक अतिशय कठीण असा भूप्रदेश आहे. नजीकच्या अंतसलोवा (Antsalova) या शहरापासून हे वन इतके दूर आहे, की इथे पोचायला कमीतकमी पाच दिवस लागतात. या वनातल्या  चुनखडक स्तंभांतून फिरणे खूप कठीण आहे; दिवसभरात आपण जेमतेम अर्धा किमी अंतरच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे अर्थातच पर्यटकांची संख्याही इथे खूपच कमी असते. पर्यटकांना या अश्म जंगलातून सहजपणे फिरता यावे यासाठी जंगलात अनेक ठिकाणी या स्तंभांना धरून झुलते पूल (Suspension bridges) तयार करण्यात आले आहेत. 

हे जंगल सुरीसारख्या धारदार आणि चुनखडकाच्या १०० मीटरपर्यंत उंची असलेल्या, इतस्ततः पसरलेल्या ‘झाडांनी’ गच्च भरून गेले आहे. या स्तंभांची सर्वसाधारण उंची ६० मीटर असली, तरी काही ठिकाणी ती ९०० मीटर असल्याची माहितीही पुढे आली आहे. स्थानिक भाषेत या रचनांना ‘त्सिंगी’  म्हणतात. इथे बोलल्या जाणाऱ्या मॅलॅगॅसी भाषेत याचा अर्थ होतो, ‘जिथे अनवाणी चालता येत नाही अशी जागा.’ हा संपूर्ण प्रदेश २० कोटी वर्षांपूर्वी म्हणजे ‘ज्युरासिक’ कालखंडात समुद्रतळावरून उत्थापित झालेला (Uplifted) एक प्रचंड मोठा खडक आहे. या खडकांतील सच्छिद्र चुनखडक कालांतराने विरघळून या विस्मयकारी अवाढव्य रचना तयार झाल्या.

या भागात दरवर्षी सामान्यपणे एक हजार ते १५०० मिमी पाऊस पडतो. पावसाच्या पाण्याशी संबंध येऊन इथले चुनखडक (Calcium carbonate) विरघळल्यानंतर कार्बोनिक ॲसिड हे आम्ल तयार झाले. या आम्लामुळे चुनखडकात खोलवर भेगा पडल्या आणि कठीण चुनखडकाचे अनेक स्तंभ एकमेकांपासून अलग झाले. या भेगा ३ ते २० मीटर रुंद आणि ८० ते १२० मीटर खोल आहेत. विविध दिशांनी जाणाऱ्या या भेगा उभ्या, आडव्या आणि तिरक्याही आहेत. 

नद्या, ओढे यांचे पाणी भूमिगत होताना चुनखडकातून वर्षानुवर्षे झिरपत राहिले आणि त्यामुळे सगळ्या प्रदेशात अनेक लहान छिद्रे (Notches), मोठमोठ्या गुहा आणि प्रवाह मार्ग तयार झाले.  चुनखडकांचे स्तंभ अनेक पोकळ्यांनी पोखरले गेले. पोकळ्या आणि गुहा चुनखडकात कित्येक मीटर आतपर्यंत गेल्या. आतून या गुहा एकमेकींना जोडल्या गेल्या आणि अश्म वनाचा अंतर्गत भाग पोकळ भागांच्या क्लिष्ट जाळ्याने भरून गेला. कालांतराने या गुहांची छते खाली कोसळली आणि रुंद घळया  निर्माण झाल्या. घळयांच्या आजूबाजूला न विरघळलेल्या चुनखडकाचे उंचच उंच स्तंभ शिल्लक राहिले!
 चुनखडकाच्या उंच स्तंभांनी तयार झालेला हा भूलभुलैया एक विलक्षण क्लिष्ट असा व्यूहच (Labyrinth) आहे! उष्णकटिबंधीय हवामानातील जोरदार पावसामुळे या स्तंभांची उभी झीज झाल्यामुळे ते अधिकच टोकदार झाले आहेत. हा सगळा प्रदेश म्हणजे जणू एक विस्तीर्ण गुहा आहे, जिला छप्परच नाहीये! 

माणसे, गाईगुरे या दगडांच्या जंगलात संचार करूच शकत नाहीत. असे असले तरी इथली जैवविविधता खूप संपन्न आहे. इथे लेमुरच्या ११ प्रजाती, पक्ष्यांचे १००हून जास्त प्रकार, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४५ जमाती, वटवाघळे यांच्या बरोबरच केवळ इथेच आढळणारे ‘फोसा’ (Fossa) हे गोलाकार शेपटी असलेले मुंगूस आणि पानाच्या आकाराची शेपटी असलेल्या पाली बहुसंख्येने आढळतात. इथे संशोधन करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांना दरवर्षी, त्यांनी पूर्वी कधी न पाहिलेला एखादा नवीन जीव हमखास आढळतोच!

चुनखडकाच्या दगडाच्या या जंगलाचे अजूनही संपूर्ण सर्वेक्षण झालेले नाही. स्तंभांच्या दरम्यान वाढलेली उंच झाडे, स्तंभांची अगणित संख्या यामुळे इथे सहजपणे फिरता न येणे आणि सर्वेक्षणाची उपकरणे नेता न येणे ही यामागची मुख्य कारणे आहेत. यामुळे चुनखडक स्तंभांच्या निर्मितीची नेमकी कालगणना करणेही आजपर्यंत शक्य झालेले नाही. 

पृथ्वीवरील हे विलक्षण अश्म लेणे सांभाळून आणि सुरक्षीत ठेवण्याबरोबरच पर्यटकांना त्याचा पुरेपूर  आनंद घेता यावा म्हणून चांगले रस्ते, झुलते पूल, निवासी घरे यांची चांगली सोय इथे केली जात आहे.  या अश्म वनाचा नकाशा, त्याची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये सांगणाऱ्या माहितीचे फलक आणि भरपूर छायाचित्रे देऊन हे राष्ट्रीय उद्यान अधिक संपन्न केले जात आहे. जगातील एक विलक्षण भूवारसा पर्यटन ठिकाण म्हणून त्याची ओळख आता सर्वदूर पसरली आहे! 

(या लेखाबरोबरच ‘भूवारसा पर्यटन’ हे सदर समाप्त होत आहे.)

स्थान संदर्भ : 

  • १८.४३ अंश दक्षिण अक्षांश/४४.७३ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ४५० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २० कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : मोरोंडवा (१५० किमी)

संबंधित बातम्या