विंध्याचल

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

भूवारसा पर्यटन

वायव्येला अरवली आणि दक्षिणेला भारतीय द्वीपकल्पाचा उंच प्रदेश यामध्ये विंध्य किंवा विंध्याचल पर्वताची रांग पसरली आहे. १,१२६ किमी लांबीची ही पर्वतरांग गुजरातमधील जोरबात व राजस्थानमधील चितोडगडपासून बिहारमधील सासारामपर्यंत आढळते. या पर्वतरांगेला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते.  

विंध्याचल पर्वत ५७ कोटी वर्षे जुना आहे. त्याची उंची ७६० ते १२२० मीटर इतकी आहे. विंध्याच्या उत्तरेला आणि पश्चिमेला असलेला प्रदेश अतिशय रूक्ष आणि कोरडा आहे. विंध्याच्या दक्षिण उताराजवळून नर्मदा नदी वाहते. नर्मदा खोऱ्याच्या दक्षिणेला सातपुड्याच्या रांगा आहेत. चंबळ, बेटवा, सोन, केन इत्यादी मुख्य नद्या विंध्यमध्ये उगम पावतात आणि त्या सामान्यपणे उत्तरेस किंवा ईशान्येस वाहत जातात. केन नदी हे तर एक भूशास्त्रीय व भूरूपिक आश्चर्य आहे! विंध्य पर्वताचा कडा कापून उत्तरेकडे जाणाऱ्या कर्णावती किंवा केन नदीने पांडवन मंदिरापासून रानेहपर्यंतच्या ६० किमीच्या मार्गात खोल घळया आणि धबधब्यांची निर्मिती केली आहे. शोण आणि नर्मदा या नद्या अमरकंटकजवळ उगम पावतात. तिथेच विंध्य व सातपुडा या पर्वतश्रेण्या एकमेकींत मिसळलेल्या आहेत. मध्यप्रदेशातील पूर्वांचलमधील पन्नाच्या पठारावरून वाहणाऱ्या लहान, कमी लांबीच्या, मुख्य नदीच्या उपनद्या जेव्हा पठाराच्या सीमेवरून खालच्या सपाट भागात उतरतात, तेव्हा जे तीव्र उताराचे धबधबे तयार होतात, त्यांना स्थानिक भाषेत ‘सेहा’ म्हणतात. हे विलक्षण सुंदर आणि भयावह उंचीचे भूरूप इथल्या स्तरीत खडकांत तयार झाले आहे.

पूर्वी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील सातपुडा पर्वतश्रेणीचाही पूर्वांचलमध्ये अंतर्भाव केला जाई, परंतु आता फक्त नर्मदेच्या उत्तरेकडील टेकड्यांचाच विंध्यमध्ये समावेश केला जातो. पूर्वेकडील शोण नदीखोऱ्याच्या उत्तरेस तटासारख्या उभ्या असलेल्या कैमूर टेकड्या म्हणजे विंध्यचाच विस्तारित भाग मानला जातो. कैमूर टेकड्यांच्या पूर्वेस सासाराम ते राजमहाल यादरम्यान असलेल्या राजमहाल टेकड्यांचा समावेश निश्चितपणे विंध्यमध्ये केला जातोच असे नाही. 

विंध्य पर्वताचे भारताच्या भूवैज्ञानिक तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासात ‘विंध्यन कालखंड’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्राचीन भारतीय समजुतीनुसार, हा भारतातील सर्वांत जुना पर्वत असल्याचे मानले जाते. रामभक्त हनुमान द्रोणागिरी पर्वत लंकेला घेऊन जात असताना वाटेत त्यातील काही भाग गळून पडला; तोच विंध्य होय, अशीही एक कथा आहे. ‘विंध्य’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘पारधी’ असा होतो. प्रभू श्रीराम विंध्य पर्वताला वळसा घालून चित्रकूटमार्गे दक्षिणेत आल्याचे उल्लेख रामायणात आहेत.   

पश्चिमेकडील विंध्याचलचे वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा नदीखोऱ्याच्या दिशेने असणारा तीव्र उतार होय. बाघ टेकड्यांच्या प्रदेशामध्ये हा उतार सौम्य आहे. या भागात शेतीचे महत्त्व कमी आहे, खनिज संपत्तीही फारशी उपलब्ध नाही. लोकसंख्येची घनताही कमी आहे. उरी-कानर प्रदेशात जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे आणि त्याही भागात शेती महत्त्वाची नाही. कन्नोड-सेहोर ह्या प्रदेशात मर्यादित प्रमाणात खनिज संपत्ती आढळते. या भागात साग आणि साल यांसारख्या अरण्यांमुळे वनोत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये शेती केली जाते. उत्तरेस ४०२ किमी लांबीचे बुंदेलखंड व माळवा हे पठारी प्रदेश आहेत. ही पठारे ओबडधोबड आहेत. त्यावर टेकड्यांच्या लहान लहान रांगा दिसतात. या सर्व रांगा विंध्य प्रणालीमधीलच आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील झांशी, बांदा, अलाहाबाद व मिर्झापूर जिल्ह्यांतून गेलेल्या श्रेण्यांनाही विंध्याचल नावाने ओळखले जाते. या जिल्ह्यांमध्ये आजूबाजूच्या मैदानी प्रदेशातून वर आलेल्या अनेक एकाकी टेकड्या पाहावयास मिळतात.

भूवैज्ञानिकदृष्ट्या विंध्यची निर्मिती प्रामुख्याने प्रचंड अशा वालुकाश्मापासून झालेली आहे. या पर्वतात अधूनमधून थराथरांचा फरशीचा दगड आणि शेल खडकरचना आढळते. माळव्याच्या पठारावरील  वालुकाश्मांवर लाव्हाचा थर आढळतो. या पर्वतात कुठेही खडकांच्या रूपांतरणाची चिन्हे आढळून येत नाहीत. सगळीकडे गाळाचे क्षितिज समांतर आडवे पट्टे दिसतात. नर्मदा नदीच्या उत्तरेकडे, साधारणपणे  पूर्व-पश्चिम पसरलेल्या १.३ अब्ज वर्षे जुन्या आणि उत्थापनाने (Uplifting) वर उचलल्या गेलेल्या विंध्य पर्वतरांगेत प्रामुख्याने वालुकाश्म (Sandstone), सुभाज (Shale) आणि चुनखडक (Limestone) हे प्रमुख स्तरीत खडक आढळून येतात. या श्रेणीचे मोठ्या प्रमाणामध्ये विदारण झाले आहे.

इथल्या चुनखडकात लहान लहान भेगा, लाल चिखलयुक्त माती, विलयन खळगे (Sink holes), डोलाईन्स अशी कार्स्ट (Karst), म्हणजे लवण प्रदेशाची प्रातिनिधिक वैशिष्ट्ये आढळून येतात. सोन नदी खोऱ्यात ९०० मीटर जाडीचे वालुकाश्माचे व चुनखडकाचे थर आढळतात. उथळ समुद्रात गाळ साचून व नंतर समुद्रतळातून उंचावल्यामुळे ही पर्वतरांग तयार झाली आहे. असे असूनही विंध्याचलात जीवावशेष फार कमी ठिकाणी आढळतात. मानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचिन बहुपेशीय जीवाश्म मात्र विंध्य पर्वतरांगांतच सापडले होते. 

येथील वालुकाश्म अनेक शतकांपासून बांधकामासाठी वापरण्यात येतो. सांची व भारहूत येथील बौद्ध स्तूप, खुजराहो येथील अकराव्या शतकातील मंदिरे, ग्वाल्हेर येथील पंधराव्या शतकातील राजवाडे, तसेच इतर अनेक किल्ल्यांचे बांधकाम विंध्यमधील दगडांपासून केलेले आढळते. पोवळ्यासारखे सुंदर खडक बाघजवळ सापडतात. त्याचा उपयोग मांडू येथील राजवाडे व अन्य बांधकामासाठी विस्तृत प्रमाणावर करण्यात आलेला आहे. पन्ना हे गाव हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. विंध्य श्रेणीतील वेगवेगळ्या भागांत लोहखनिज, मँगेनीज व ॲस्बेस्टस ही खनिजे थोडीफार सापडतात. 

विंध्य श्रेणीतील टेकड्या सामान्यपणे खुरट्या व काटेरी वनस्पतींनी आच्छादलेल्या आहेत. मध्य  भारतात आढळणाऱ्या शुष्क अरण्यांतील वृक्षप्रकार या श्रेणीत पहावयास मिळतात व ठिकठिकाणी सागाचे वृक्ष आढळतात.

विंध्य पर्वताचा विस्तार व निबिड अरण्य, त्यातील वन्य जमाती यांमुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्यांना हा पर्वत एक मोठा अडसर होता. येथील चंबळचे खोरे तर पूर्वीपासून दरोडेखोरांच्या टोळ्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. विंध्य पर्वताच्या दोन्ही बाजूंना राज्य करणारे कलचुरी हे पहिले राजघराणे होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ‘विंध्य प्रदेश’ नावाचे छोटे राज्य होते. विंध्याचलातील भीमबेटका या ठिकाणी ९० कोटी वर्षे जुन्या चुनखडकातील गुहांमध्ये निवारा स्थाने (Rock shelters) असून त्यातील शैलचित्रे एक लाख वर्षे जुनी असावीत असा अंदाज आहे. वैविध्याने नटलेला असा हा समृद्ध विंध्य विलक्षण आकर्षक पर्वत आहे.

 

 

संबंधित बातम्या