आंग्रिया बँक

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 25 जानेवारी 2021

विशेष
भूवारसा पर्यटन

कोकणातील विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्रात १३० किमी अंतरावर आणि २० ते ४०० मीटर खोलीवर पसरलेले जगप्रसिद्ध असे आंग्रिया बँक नावाचे प्रवाळ बेट (Coral island/reef) आहे आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळचे एक महत्त्वाचे भूवारसा स्थळ आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्ग येथून मोहिमा सांभाळत होते. त्यामुळे त्यांचे नाव या प्रवाळ बेटाला देण्यात आले आहे. गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत (National Institute of Oceanography -NIO) १६ डिसेंबर २०१३ पासून या बेटाचे सविस्तर संशोधन सुरू झाले आहे. NIO आणि Central Marine Fisheries Research Institute (CMFRI) तसेच Forest Survey of India (FSI) यांनी प्राथमिक सर्वेक्षण करून या प्रदेशात विस्तृत प्रवाळ खडकांचे व प्रवाळांचे अस्तित्व असल्याचे याआधी म्हटले होतेच. आंग्रिया बँक या प्रवाळ बेटाचे संपूर्ण व सविस्तर संशोधन करणे हे एक महाकठीण काम आहे. प्रवाळ भित्तीचा (Coral reef) भूवारसा असलेला हा प्राचीन प्रदेश ‘सुरक्षित क्षेत्र’ म्हणून जाहीर करावा असा प्रस्ताव आता ऑगस्ट २०२० मध्ये राज्य सरकारतर्फे मांडण्यात आला आहे.                

आंग्रिया बँक हे एक बुडालेले कंकणाकृती प्रवाळ बेट (Atoll) असून जगातील सर्वात मोठा प्रवाळ साठा तिथे असावा असा अंदाज केला गेला होता. तो खरा असल्याचे या संशोधनातून आता लक्षात येत आहे. या प्रवाळ प्रदेशाकडे जाण्यासाठी, वन्यजीव संधारण संस्था (Wildlife Conservation Society -WCS) आणि सागरी जीवसंपदा आणि पर्यावरणशास्त्र केंद्र (Centre for Marine Living Resources and Ecology -CMLRE) यांच्यामार्फत मोहिमा आखल्या जात असल्या तरी अजूनही तिथे जाणे सुकर झालेले नाही. आंग्रियाच्या या बुडालेल्या मंचाचे दर्शन घेणे हा आजही साहस पर्यटनाचा (Adventure tourism) भाग आहे. जैवविविधतेने समृद्ध असा हा २०११ चौरस किमी क्षेत्रफळाचा प्रवाळ प्रदेश भारताच्या समुद्रबूड जमिनीच्या (Continental Shelf) सीमेजवळच आढळतो. त्याची उत्तर दक्षिण लांबी ४० किमी असून पूर्व पश्चिम रुंदी १५ किमी आहे. प्रवाळांची भरपूर वाढ आणि अत्यंत दुर्मीळ अशा व्हेल शार्कचे अस्तित्व यामुळे या प्रदेशाला अनेक दृष्टींनी महत्त्व प्राप्त झाले आहे. अजूनही या भागाचे संपूर्ण संशोधन होणे बाकी आहे.  

आंग्रिया बँकवर जिथे प्रवाळांची वाढ झाली आहे, तिथे तळ भागावर वाळू आणि शिंपल्यांचा थर आहे. प्रवाळ बेटाच्या ३५० चौरस किमी भागात विविध प्रकारच्या प्रवाळ भित्ती वनस्पती व प्राणी (Reef  flora and fauna) आढळतात. स्थलांतर करून येणारे १० ते १५ फूट लांबीचे व्हेल्स आणि शार्क व्हेल्स जमा होण्याचे ते मुख्य ठिकाण आहे. होलोसीन (Holocene) या जीवशास्त्रीय कालखंडात म्हणजे गेल्या दहा हजार वर्षांत वाढलेल्या समुद्र पातळीमुळे इथल्या प्रवाळांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली. काहींच्या मते हे प्रवाळ सेनोझोइक (cenozoic) कालखंडातील म्हणजे सहा ते साडेसहा कोटी वर्षे जुने असावेत. सरासरी २० मीटर खोलीवर असलेल्या या प्रदेशाच्या आजूबाजूच्या समुद्राची खोली एक हजार मीटर इतकी आहे.  

अलीकडेच झालेल्या भूशास्त्रीय आणि भूभौतिक (Geophysical) शास्त्रीय संशोधनातून असे दिसून आले आहे, की बेसॉल्ट खडकाने तयार केलेल्या आंग्रियाच्या ३६५ चौ.किमीच्या पृष्ठभागावरून आग्नेय - वायव्य आणि नैऋत्य - ईशान्य दिशेत दोन विभंग रेषा (Fault lines) गेलेल्या आहेत. या रेषांशी निगडित असे शिलापट्ट खडक (Sill) आणि भित्तिखडकही (Dyke) आढळतात. या संशोधनातून असेही नक्की करता आले, की आंग्रिया बँक हे अरबी समुद्रातील एक स्वतंत्र भूरूप असून भारत - सेशेल्स - लक्ष्मी पर्वतरांग यांच्या विलगीकरण प्रक्रियेच्यावेळी (Rifting) क्रिटेशिअस कालखंडाच्या अखेरीला सात कोटी वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली असावी!    

किनाऱ्याजवळ जेव्हा ऊर्जा निर्मिती केंद्रे निर्माण केली जातात, तेव्हा उष्ण पाण्याचे समुद्रात उत्सर्जन केले जाते. उथळ सागरजलाच्या तापमानात अशी वाढ होते, तेव्हा २० मीटर खोलीपर्यंतची प्रवाळ बेटे अक्षरशः नष्ट होतात. आंग्रिया बँक या प्रवाळ बेटाचे स्थानही असेच संवेदनशील झाले आहे.

 उथळ सागरतळांवर आणि सागरी बेटांच्या किनाऱ्याजवळ तयार होणाऱ्या प्रवाळ खडकांना प्रवाळ भित्ती (Coral Reef) असे म्हटले जाते. सीमावर्ती किंवा Fringing reef, रोधक किंवा Barrier reef  आणि कंकणाकृती किंवा Atoll असे त्यांचे मुख्य प्रकार आहेत. प्राचीन काळात भारताचे अपतट (Offshore) प्रदेश प्रवाळांनी आणि प्रवाळ खडकांनी समृद्ध होते.

गेल्या काही दशकांत किनारी प्रदेशात होणारे तेलजन्य व त्याज्य उत्सर्जन आणि औद्योगिक प्रदूषण, मासेमारीचे वाढते प्रमाण आणि खारफुटीचे पुनर्प्रापण (Reclamation) यामुळे हे प्रमाण खूपच घटले आहे. कच्छचे आखात, लक्षद्वीप समूहातील पिट्टी बेटे, मानारचे आखात, मालवण वेंगुर्ले किनारपट्टी व अंदमान ही आज  प्रवाळ प्रदेशांच्या संरक्षणाची नितांत गरज असलेली ठिकाणे आहेत.

भारताच्या किनाऱ्यावर नवीन प्रवाळ तयार होण्यासारखी परिस्थिती दिवसेंदिवस कठीणच होते आहे. किनाऱ्यावरील वाढते प्रदूषण आणि आपल्या सगळ्यांनाच समुद्राबद्दल वाटत असलेली अनास्था यामुळे जैवविविधतेने समृद्ध असे हे प्रदेश नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत आंग्रिया बँक हा किती महत्त्वाचा भूशास्त्रीय वारसा आहे ते लक्षात येते.      

आंग्रिया बँक हे जगातले सर्वोत्तम भूवारसा सागरी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येऊ शकते. तेवढी त्याची क्षमता नक्कीच आहे. सागरी वनस्पती, सागरी जीव आणि सागर पातळीतील भूशास्त्रीय बदलांचा सगळा इतिहासच उलगडून दाखविण्याची विलक्षण क्षमता या बेटात आहे आणि म्हणूनच हे प्रवाळ बेट इतके महत्त्वाचे आहे!

स्थान संदर्भ  
१६.५० उत्तर अक्षांश/७२.०८० पूर्व रेखांश
खोली : समुद्रसपाटीखाली २० मीटर 
भूशास्त्रीय वय : ६ ते ६.५ कोटी वर्षे
जवळचे मोठे ठिकाण : विजयदुर्ग (१३० किमी), मालवण (१५७ किमी)  

संबंधित बातम्या