दीव बेट

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

भूवारसा पर्यटन

गुजरातच्या दक्षिण किनाऱ्याजवळ, खंबातच्या आखाताच्या मुखाशी, किनाऱ्यानजीकच असलेले ‘दीव’ बेट हे एक अतिशय दिमाखदार, देखणे आणि महत्त्वाचे भूवारसा पर्यटन ठिकाण आहे. या बेटाचा सगळा भूशास्त्रीय इतिहास या भागात घडून गेलेल्या समुद्र पातळीच्या बदलांशी निगडित आहे. दीव बेटाचा सगळा  किनाराच समुद्रातून वर आलेला आहे आणि त्याचे पुरावे सर्वत्र पसरलेले आहेत. 

पंचवीस लाख वर्षे जुन्या अशा या बेटावर अनेक ठिकाणी शिंपलेयुक्त चुनखडकाचे (Shell limestone) तुकडे असलेले अवसाद (Sediment) पसरलेले असून त्यांनी तयार झालेल्या थराची जाडी ५० मीटर इतकी आहे. ४० चौ. किमी क्षेत्रफळाच्या या बेटावर सागरी चुनामिश्रित अवसादांचे (Carbonate deposits) प्राबल्य दिसून येते. 

दीव बेटावरील या खडकांना मिलिओलाइट असे म्हटले जाते. हे खडक खूप सच्छिद्र (Porous) आणि मृदू (Soft) असल्यामुळे त्यांची सहज झीज होऊन इथे अनेक आकर्षक समुद्रकडे (Sea cliffs), तरंग घर्षित सागरतट मंच (Wave cut Shore platforms), आघात छिद्रे (Notches) आणि पोकळ्या (Vugs) निर्माण झालेल्या दिसून येतात. समुद्र पातळीत वर-खाली पद्धतीने झालेल्या हालचालींमुळे या गोष्टींच्या निर्मितीला अधिकच हातभार लागलेला आहे. या खडकाचे वरचे थर घट्ट असून त्याखालचे २०० मीटर खोलीपर्यंतचे आणि पिवळ्या पांढऱ्या मातीचे चुनखडक थर दोन कोटी वर्षे जुने आहेत आणि त्याखाली बेसॉल्ट खडक आहे, असे भूगर्भशास्त्रीय आणि भूजल अभ्यासातून लक्षात आले आहे. 

या बेटाला मुख्य भूमीपासून वेगळे करणारी जी छासी नदीची खाडी (Creek) आहे, त्यात भरती ओहोटीच्यावेळी तयार होणारे चिखलयुक्त अवसादांचे मंच (Tidal flats) आणि प्रवाह मार्ग (Channels) दिसून येतात. समुद्रकडे, अधःकर्तीत कडे (Overhangs), सागरीतट मंच, पुळणी, वाळूच्या टेकड्या अशा विविध भूरूपांनी हे बेट समृद्ध आहे आणि तोच याचा भूशास्त्रीय वारसा आहे. १.३ लाख वर्षांपूर्वीच्या शेवटच्या आंतरहिमानी (Interglacial) कालखंडात आणि चार हजार वर्षांपूर्वीच्या मध्य होलोसीन कालखंडात जेव्हा या भागात समुद्रपातळी उंचावर होती, तेव्हा तयार झालेली अनेक छिद्रे (Notches) आजही इथल्या समुद्रकड्यांवर आणि भूशिरांवर (Headlands) दिसून येतात. इथल्या चुनखडकाच्या पृष्ठभागावर अनेक विवर छिद्रे (Sink holes), विलयन मार्ग (Solution Channels) आणि खळगे (Depressions) तयार झालेले आढळून येतात. उना (Una) आणि दीव यामधल्या चिंचोळ्या असलेल्या पुलावरून दीवला जाणे आता सोपे झाले आहे. नैऋत्येकडे वांकाबारा पुळणीपासून नगोवा पुळणीपर्यंतचा भाग पूर्णपणे वाळूच्या टेकड्यांचा (Sand Dunes) प्रदेश आहे. इथल्या सदैव स्थलांतर करणाऱ्या या वाळूच्या टेकड्या (Shifting dunes) ५ ते १५ मीटर उंचीच्या आहेत. 

नगोवा बीचपासून दीव शहराच्या दक्षिण टोकापर्यंतचा आग्न्येय दिशेकडचा भाग खडकाळ आहे. तिथे प्रामुख्याने वालुकाश्म (Sandstone) आणि चुनखडक (Limestone) या प्रकारचे खडक आढळतात. 

दीवच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या जवळ दिसते ती ‘जालंदर’ पुळण. इथून पुढे पश्चिमेला आहे ‘चक्रतीर्थ’ बीच. नगोवा आणि वेंकाबारा या पुळणीही अतिशय आकर्षक पुळणी आहेत. नागोवा पुळणीवर ठिकठिकाणी काळ्या दगडांचे पुंजके आढळतात. शास्त्रीय परिभाषेत यांना ‘बीच रॉक’ असे म्हटले जाते. पूर्वीच्या वाळूच्या पुळणी घट्ट होऊन त्यापासून हे खडक तयार झालेले आहेत. नगोवा पुळणीच्या दोन्ही टोकांना अशा तऱ्हेच्या खडकांमुळे किनारा अनेक तुकड्यांत कापून ठेवल्यासारखा दिसतो. नागोवा बीचवरून ही पाषाण शिल्पे पाहता येतात. भूशास्त्रीय अभ्यासात यांना फारच महत्त्व आहे. यामुळे दीवच्या सर्व बाजूंना असलेल्या समुद्राची पातळी पूर्वी जास्त उंचीवर असावी, असा अंदाज बांधता येतो. नागोवाच्या पश्चिम टोकाजवळही अशीच विलक्षण सुंदर पाषाण शिल्पे तयार झाली आहेत. समुद्रलाटांच्या आघातामुळे त्यावर असंख्य छिद्रे तयार होऊन त्यात वेगवेगळे आकारही तयार झालेत. 

दीव बेटाचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण आहे, दीवचा किल्ला. सन १,५३५ ते १,५४१ या कालखंडात बांधलेला हा किल्ला अजूनही सुस्थितीत आहे. किल्यावर पूर्वेकडच्या बुरुजावर दीपगृह आहे. किल्याच्या समोरच ‘फोर्ट दी मार’ हा एक छोटेखानी संरक्षक किल्लाही आढळतो. चौदाव्या शतकापासून १६ व्या शतकापर्यत दीव हे महत्त्वाचे बंदर व आरमारी ठाणे होते. अगदी सुरुवातीला जालंदर राजाच्या राजवटीत असलेले दीव, नंतर वाघेला राजपुतांनी ताब्यात घेतले. सन १,३८० च्या सुमारास मुसलमान राज्यकर्त्यांचे  दीववर वर्चस्व होते. त्यानंतर पोर्तुगीजांनी किल्ल्याचा व दीव बेटाचा ताबा घेतल्याचे उल्लेख आढळतात. किल्याच्या समुद्राकडील बाजू झिजून काही ठिकाणी कोसळू लागल्या आहेत. या छोटेखानी बेटावर वांकाबारा, बुचरवाडा, नागोवा, फुदाम आणि घोगला, दीव अशा लहान लहान वस्त्या आहेत. बेटावर मिठागरे आहेत. पक्ष्यांची अभयारण्ये आहेत आणि सगळ्या बेटावर सर्व बाजूंनी धीरगंभीर आवाजात साद घालत घोंघावणारा अथांग समुद्र आहे.

दीव बेटाला संपन्न असा हा सगळा भूशास्त्रीय वारसा आहेच, शिवाय इथे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असणाऱ्या अनेक वास्तूही आहेत. पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात बांधलेला किल्ला, छासी नदीच्या खाडीमुखावर (Creek mouth) असलेला, दगडी बांधकाम केलेला पानिकोटा किल्ला, सेंट पॉल चर्च, गंगेश्वर मंदिर यांसारख्या वास्तूंनी दीवच्या पर्यटन मूल्यात मोठीच भर टाकली आहे. नाइडा इथली खूप खोल गुहा साहस पर्यटनाच्या आणि भूशास्त्रीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जालंदर बीचजवळ असलेली ही गुहा पोर्तुगिजांनी त्या भागात आधीच असलेल्या एका लहानशा गुहेतून  किल्ल्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू आणि खडक खोदून काढल्यामुळे तयार झाली. नंतरच्या काळात गुहेतील मिलिओलाइट या शिंपलेयुक्त खडकाच्या सच्छिद्र आणि मृदू स्वरूपामुळे वारे आणि लाटा यामुळे ती आणखी मोठी झाली आणि त्यात अनेक उपगुहा तयार झाल्या. अनेक अंतर्गत मार्ग आणि ठिकठिकाणी कोसळलेल्या छतातून आत येणारा सूर्यप्रकाश यामुळे गुहेतील मिलिओलाइट खडकाच्या रचनेचे विलक्षण आकर्षक रूप इथे पाहता येते.  

 

स्थान संदर्भ : २०.४२ अंश उत्तर अक्षांश/७०.५४ अंश पूर्व रेखांश

समुद्र सपाटीपासून उंची : २० मीटर 
भूशास्त्रीय वय : २५ लाख वर्षे
जवळचे मोठे ठिकाण : उना (१३ किमी), देलवाडा (१० किमी)

संबंधित बातम्या