‘याना’ येथील चुनखडक गुहा  

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

भूवारसा पर्यटन

‘याना’ हे उत्तर कर्नाटकातील कुमटा जंगलात वसलेले एक गाव आहे. इथे चुनखडकांत तयार झालेल्या गुहा सह्याद्री पर्वतरांगेत, कारवार पासून ६० किमी आणि कुमटा गावापासून ३० किमी अंतरावर आढळून येतात. सह्याद्रीत इतरत्र अशा प्रकारचा स्फटिकमय कार्स्ट चुनखडक (Crystalline karst limestone)कुठेच आढळत नाही. मात्र केवळ इथेच गडद काळसर रंगाच्या सात कोटी वर्षे जुन्या चुनखडकात उंचच उंच असे स्तंभ तयार झाले असून खूप अंतरावरून होणारे त्यांचे दर्शन अंगावर रोमांच उभे करते. 

यानाच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटरच्या परिघात चुनखडकातील अशा ६१ रचना आहेत. मात्र त्या ‘याना’तील दोन शिखर रचनांएवढ्या नजरेत भरणाऱ्या नाहीत.

या सर्व रचना व त्यातील गुहा एकसंध अशा चुनखडकात तयार झालेल्या आहेत. त्यांचा विस्तीर्ण आकार आणि एकसंधपणा पाहून, या भागात प्राचीन काळी पडलेल्या उल्कांचे ते अवशेष असावेत असेही एक मत मांडण्यात येते. खडकांच्या खालच्या भागात आणि गुहेत, वितळलेला लाव्हा घट्ट होऊन तयार झालेले बेसॉल्ट खडकही दिसतात. इथल्या चुनखडकांत चुन्याच्या विरघळण्याने तयार झालेल्या गुहा मोठ्या प्रमाणावर विदीर्ण अवस्थेत आढळतात. गुहेत अनेक ठिकाणी ऊर्ध्वमुखी व अधोमुखी लवणस्तंभ (Stalactaites and Stalagmites) आढळतात. इथल्या गुहेच्या मुखाशी रुंदी तीन मीटर असून खडकात चुनखडकाबरोबरच मँगेनीज व लोहसुद्धा आढळते.  

इ .स . १८०१मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील एक अधिकारी डॉ. फ्रान्सिस बुखानन हॅमिल्टन यांनी या विलक्षण खडकांचा शोध लावला. त्या काळात या खडकाच्या आजूबाजूला आदिवासींची जवळजवळ दहा हजार लोकसंख्येची मोठी वस्ती होती. 

याना इथल्या या चुनखडकांतील असाधारण अशा संरचनांत उंच स्तंभाकृतींसारखे दोन दोन भाग दिसतात. त्यातल्या १२० मीटर उंचीच्या शिखराला भैरवेश्वर शिखर आणि थोड्याशा लहान ९० मीटर उंचीच्या शिखराला मोहिनी शिखर असे म्हटले जाते. या दोन शिखरांच्या प्रदेशात सर्वत्र राख मिश्रित काळी सैलसर माती आढळून येते.

नवीनच बांधण्यात आलेले शिवमंदिर भैरवेश्वर शिखराच्या तळभागातील गुहेत असून तेथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानण्यात येते. या शिवलिंगावर गुहेच्या छताकडून पाण्याचा सतत अभिषेक होत असतो आणि त्या पाण्याबरोबर येणाऱ्या विरघळलेल्या चुनखडकाच्या संचयनामुळेच त्याला पिंडीसारखा आकार प्राप्त झाला आहे. हे पाणी चंडीहोल नावाच्या एका लहान नदीच्या प्रवाहाच्या स्वरूपात, दक्षिणेकडे असलेल्या उप्पीनपट्टण या गावापाशी आगनाशिनी नदीला येऊन मिळते. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठा उत्सव होतो. महाशिवरात्रीच्यावेळी इथल्या गुहेतील झऱ्याचे पाणी समुद्रकिनारी असलेल्या गोकर्ण या ठिकाणी महामस्तक अभिषेक करण्यासाठी नेले जाते. यानाचा परिसर आजही जैवविविधतेने समृद्ध, संवेदनशील प्रदेश आहे.

जगभरात अनेक ठिकाणी चुनखडक प्रदेशांतील खडकात जोड, भेगा, भंग पातळ्या आढळतात व त्यातून पाणी झिरपण्याची क्रिया होऊन चुनखडक विरघळत असतो. त्यातील जोड रुंदावून विवरे तयार होतात. अशी विवरे चुनखडक खोलवर पोखरतात आणि त्यामुळे गुंफा (Cavern), गुहा अशी भूरूपे तयार होतात. विवरे आणि गुहा, गुंफा अनेक बोगद्यांनी एकमेकांशी जोडली जातात. अनेकदा गुहा आणि गुंफांची निर्मिती झाल्यावर त्यांच्या छतावरून पाणी ठिबकून गुहेच्या तळाशी लवणस्तंभ तयार होतात. जगातील अशा चुनखडीच्या गुहा २८ ते ४० कोटी वर्षे जुन्या आहेत.  

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत आढळणारे डोंगर उतारावरील व नदीपात्रातील धबधबे, लाव्हाच्या थरांच्या दरम्यान असलेल्या लांब, रुंद व खोल गुहा, भित्ती खडक, एकावर एक असलेल्या लाव्हाची स्तर रचना, ठिकठिकाणी कोसळणाऱ्या दरडी या सगळ्या गोष्टी म्हणजे सह्याद्रीच्या विशिष्ट अग्निजन्य भूरचनेचा आगळा वेगळा असा आविष्कार आहे! इथल्या वनस्पती, पाण्याचे झरे, जलाशये याबरोबरच विखुरलेल्या वस्त्या आणि त्यांचे विशिष्ट स्थान या सर्वांवर या अग्निज खडकांचाच प्रभाव आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पश्चिम घाटाचा कडा प्रस्तरभंग प्रक्रियेतून १.२ कोटी वर्षांपूर्वी तयार झाला. त्यानंतरच्या कालखंडात तो अनाच्छादन, विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे बरेच अंतर पूर्वेकडे मागे हटल्याचेही भूशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांच्या मते घाटाचा कडा हा एक प्राचीन समुद्रकडा आहे. समुद्र पातळी खाली गेल्यामुळे हा कडा उघडा पडला आणि गेल्या लक्षावधी वर्षात विदारण आणि अपक्षरण क्रियांमुळे त्याचे मुळचे रूपच पालटून गेले. मात्र याना याच ठिकाणी सह्याद्रीत चुनखडकाचे स्तंभ आणि गुहा आढळून येतात. 

दख्खन पठाराच्या पश्चिम सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेचे दक्षिण टोक मलबारच्या दक्षिणेस आहे.  दोडाबेटा येथे त्यांची उंची २,६५२ मीटर आहे. पालघाटच्या पुढे अन्नामलाई पर्वतरांगांतून पश्चिम घाट भारतीय द्वीपकल्पाच्या टोकापर्यंत जातो. तीन ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात झालेल्या लाव्हाच्या उद्रेकातून तयार झालेले थर या दक्षिणेकडच्या भागात दिसत नाहीत. इथे सर्वत्र प्राचीन स्फटिकजन्य खडकांचाच प्रादुर्भाव आढळतो. कळसूबाईच्या भागात ही पर्वतरांग किनाऱ्यापासून १०० किमी दूर आहे, तर अंकोला होनावर भागात ती किनाऱ्यापासून केवळ २० किमी इतकी जवळ आली आहे. याना येथे असलेली ही पर्वतरांग किनाऱ्यापासून २३ किमी दूर आहे. या पर्वतात वलीकरण प्रक्रियेचे पुरावे आढळत नाहीत. मात्र अनेक ठिकाणी सामान्य प्रकारचे प्रस्तरभंग दिसतात.  

सह्याद्रीत याना येथे आढळणाऱ्या या गुहा आजही खूप दुर्मीळ असल्यामुळे त्यांचे भूशास्त्रीय महत्त्व फार मोठे आहे आणि म्हणूनच भारतासाठी ‘याना’ येथील गुहा हा एक महत्त्वाचा भूवारसाही आहे. आज कर्नाटकाच्या पर्यटन नकाशावर, अनेक पर्यटक भेट देतात असे हे स्थळ असल्याचे म्हटले असले, तरी भूवारसा पर्यटन स्थळ म्हणून त्याची ओळख अधिक प्रकर्षाने मांडली गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने ‘याना’ येथील या स्तंभांचे आणि गुहेचे संरक्षण होणे नितांत आवश्यक आहे. 

  • स्थान संदर्भ : १४.५ अंश उत्तर अक्षांश/७४.५६ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : २०० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : सात कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : कारवार (६० किमी), कुमटा (३० किमी)

संबंधित बातम्या