पन्ना प्रदेशातील ‘सेहा’ धबधबे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 12 एप्रिल 2021

भूवारसा पर्यटन

मध्यप्रदेशातील पन्नाच्या पठारावरून वाहणाऱ्या लहान, कमी लांबीच्या, मुख्य नदीच्या उपनद्या जेव्हा पठाराच्या सीमेवरून खालच्या सपाट भागात उतरतात, तेव्हा जे तीव्र उताराचे धबधबे तयार होतात त्यांना स्थानिक भाषेत ‘सेहा’ म्हणतात. हे विलक्षण सुंदर आणि भयावह उंचीचे भूरूप इथल्या स्तरीत खडकांत तयार झाले असून एक महत्त्वाचे भूवारसा पर्यटन ठिकाणही आहे.

पन्नाचा प्रदेश मुख्यतः डोंगराळ असून अनेक टेकड्या आणि नदीच्या दऱ्या व खोऱ्यांनी समृद्ध झाला आहे. उत्तरेकडील बुंदेलखंड आणि दक्षिणेकडील विंध्याचल यांचा मोठा भाग पन्ना जिल्ह्यात समाविष्ट होतो. नर्मदा नदीच्या उत्तरेकडे साधारणपणे पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या १.३ अब्ज वर्षे जुन्या आणि उत्थापनाने (Uplifting) वर उचलल्या गेलेल्या विंध्य पर्वतरांगेत प्रामुख्याने वालुकाश्म (Sandstone), सुभाज (Shale) आणि चुनखडक (Limestone) हे प्रमुख स्तरीत खडक आढळून येतात. या वैशिष्ट्यपूर्ण खडकांमुळेच इथे स्तरीत खडकांत ‘सेहा’ या धबधब्यांची निर्मिती झाली आहे. 

पन्ना आणि पन्ना व्याघ्र प्रकल्प या भागात पांडव धबधबा, धुंदवा सेहा, बडोर, राणीपुर या ठिकाणी अनुक्रमे १४, २९, २५ आणि ५० मीटर उंचीचे मनोवेधक सेहा धबधबे दिसून येतात. याचबरोबर पन्ना टेकड्यांमध्ये हिनाऊट, उमरावन आणि भैराहा या ठिकाणीही सेहा धबधबे आढळतात. स्थानिकांना यांची नेमकी ठिकाणे सांगता येतात. यांची सरासरी उंची ३० मीटर असल्याचे आढळून येते. पन्ना पठाराच्या २२० किमी लांबीच्या तीव्र उताराच्या बाजूवर असे असंख्य सेहा धबधबे आहेत. 

पन्नाच्या या भागात सलग असा एकच चुनखडक थर आहे. त्याला नागोड चुनखडक थर असे म्हटले जाते. यामुळेच सेहा धबधब्यांच्या भिंतीवर चुनखडकात अनेक द्रावण पोकळ्या (Solution cavities) तयार झाल्या आहेत. भिंतीचा वरचा, पृष्ठभागालगतचा भाग खालच्या बाजूने कोसळून अधःकर्तित स्वरूपाचा आकार तयार झालेला (Overhang) दिसतो.

धबधब्यांच्या भिंतीवर असलेल्या क्वार्टझाइट खडकांत जोड, भेगा, कल पातळ्या (Beding planes), विदारीत (Weathered) भंग पावलेले आणि पाण्याने संपृक्त झालेले लहान मोठे प्रदेश आढळतात. यातूनच खडकांत मुरलेले पाणी बाहेर झिरपते आणि त्यामुळे तळभागात पाणी साठून तळी तयार होतात. क्वार्टझाइट हा अतिशय कठीण खडक आहे, पण इथल्या क्वार्टझाइटमध्ये पायराईट खनिज आहे. त्यामुळे त्याचे विदारण सहजपणे होऊ शकते. सेहांच्या तळभागातही गारगोटीचे (Quartz) प्रमाण मोठे असलेला वालुकाश्म आहे, त्यामुळे खालच्या भागात आडव्या पट्ट्या-पट्ट्यांनी तयार झालेले खडक दिसून येतात. चुनखडकाची झीज आणि द्रवीकरण यामुळे भिंतीवर मोठमोठ्या पोकळ्याही (Cavities) तयार झाल्या आहेत. सेहा धबधब्यांचा जो तीव्र कडा असतो त्यापुढे असलेल्या नदीमार्गात मोठी नैसर्गिक तळी तयार झालेली दिसून येतात. यांना स्थानिक लोक कुंड म्हणतात. गेली जवळ जवळ ३०० वर्षे आसपासच्या खेड्यांतील लोक त्यांचा वापर करीत आहेत. या कुंडांना भूजलाचा सतत पुरवठा सेहातील चुनखडकातून पाझरणाऱ्या पाण्यापासून होत असतो.

भीमकुंड (२७.४३ अं.उ./७९.३७ अं.पू.) हे बाजना गावाजवळच्या सेहाच्या पायथ्याशी तयार झालेले नैसर्गिक तळे ८० मीटरपेक्षाही जास्त खोल आहे. अर्जुनकुंड (२४.४५ अं.उ./७९.२१ अं.पू.), पाताळगंगा (२४.४९ अं.उ./७९.२५ अं.पू.), सदवा गुंफा (२४.४८ अं.उ./७९.२७ अं.पू.) या सेहांच्या तळभागाजवळ अशीच खोल तळी आहेत. सगळ्या सेहा धबधब्यांच्या पुढे कमी अधिक आकाराची आणि खोलीची तळी आहेत. विविध पक्षी आणि प्राण्यांचे निवास याच तळ्यांभोवती आढळतात.

इथल्या चुनखडकात लहान लहान भेगा, लाल चिखलयुक्त माती, विलयन खळगे (Sink holes), डोलाईन्स अशी कार्स्ट (Karst)  म्हणजे लवण प्रदेशाची प्रातिनिधिक वैशिष्ट्ये आढळून येतात. डोलोमाईट प्रकारचा खडक, शेल, वालुकाश्म, लोहयुक्त खडकांचे तुकडे आणि गुंडाष्म (Conglomerate) या क्रमाने वरून खाली असे अवसाद (Sediments) थर आणि सिलिकामुळे करडा, लाल, गुलाबी असे थरांचे रंग कमी अधिक प्रमाणात सगळ्याच सेहांमध्ये पाहायला मिळतात. सेहा, त्यांच्या भिंती, त्यातील पोकळ्या, फटी या भूशास्त्रीय जागा आणि तळभागातील तळी या सगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे निवास आहेत आणि त्यामुळेच सेहा हे जैवविविधतेमुळे संपन्न असे प्रदेश आहेत. सेहा या रचना पूर्णपणे भूशास्त्रीय प्रक्रियांनी तयार झालेल्या असून पन्नाच्या केवळ याच भागात दिसून येतात. त्यातील गाळाची रचना, गाळाच्या खडकांचे वेगवेगळ्या जाडीचे रंगीबेरंगी थर, पाणी झिरपण्याची ठिकाणे, पोकळ जागा आणि त्यांचे भूशास्त्रीय वय, या सर्वच बाबतीत सेहा एकमेवाद्वितीय अशा रचना आहेत. पन्नाच्या दक्षिणेला पोवई गावानजीकच्या डोंगराळ भागातही एक सेहा असून (२४.२१ अं.उ./८०.१९ अं.पू.) तो धबधबा केवळ १० मीटर उंच आहे. असे असले तरी त्या रचनेतही अनेक आडवे स्तर आणि वरच्या भागात एक सुंदर अधःकर्तित भाग दिसून येतो. सेहांच्या अशा विलक्षण सुंदर भूशास्त्रीय रचना कोरड्या ऋतूतच स्पष्टपणे दिसतात. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या धबधब्यांच्या रौद्र आणि भीषण प्रपातांमुळे या रचना नीटशा दिसू शकत नाहीत. पन्ना प्रदेशातील विशिष्ट भूरूपिकी (Geomorphology) आणि कर्णावती नदीपात्रातील व तिच्या उपनद्यांतील घळ्या, धबधबे, गुहा आणि नदीखोऱ्यातील वनस्पतींचा विचार करून पन्ना प्रकल्प तयार करण्यात आला होता. वाघासह इतरही अनेक वन्यजिवांना निवास करणे सहज सोपे व्हावे हा त्या मागचा हेतू. धुंदवा सेहा धबधब्याच्या परिसरात १६ एप्रिल २००९ रोजी अनेक वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदा वाघाचे दर्शन झाले होते. आज सेहांच्या नदीखोऱ्यात अनेक ठिकाणी वाघ दिसतो. त्याच्यासाठी सेहांच्या पायथ्याशी असलेली घळई ही खूप सुरक्षित जागा आहे. प्रस्तावित केन बेटवा नदीजोड प्रकल्प हा अनेक जलशास्त्रज्ञांच्या आणि पर्यावरण अभ्यासकांच्या मते चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेला प्रकल्प असून पन्ना व्याघ्र प्रकल्प आणि त्यातील सेहाप्रमाणेच इतर अनेक संपन्न भूरूपे त्यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. लक्षावधी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास असलेले ‘सेहा’ धबधबे हा तर पन्ना राष्ट्रीय उद्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण असा 

भूवारसा! तो टिकवून ठेवणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

स्थान संदर्भ 

  • २४.७३ अंश उत्तर अक्षांश/८०.०१ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ३५० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : १.३ अब्ज वर्षे
  • सेहांची सरासरी उंची : ३० मीटर   

संबंधित बातम्या