हम्पीचे शिलाखंड द्वीपगिरी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 24 मे 2021

भूवारसा पर्यटन

हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीकाठी वसलेले बेल्लारी जिल्ह्यात एक गाव आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. युनेस्कोने हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

अनेक टेकड्यांवर वसलेल्या या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी आहे. विजयनगर म्हणजे पूर्वी एक मोठी सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर या साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५मध्ये तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा नाश केला गेला. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते उद्‍ध्वस्त करण्यापलीकडचे होते. या संहारात शिल्लक राहिलेल्या वास्तू आजही इथे दिमाखात उभ्या असलेल्या दिसून येतात.  

पंधरा ते वीस किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण, त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.

विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे १९७६ सालात हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. ४० ते ५० चौ.किमीच्या  परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू केले गेले.  काही वास्तू उत्तम स्थितीत आढळल्या तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी करावी लागली. युनेस्कोने १९८८मध्ये जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून हम्पीला मान्यता दिली व तेव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथल्या कमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास दाखविला गेला आहे. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसहित मांडलेली आहेत. 

मुख्य प्रवेशद्वारासमोर कृष्णदेवराय व त्याच्या दोन राण्यांचे अतिशय रेखीव पुतळे आहेत. या राजांनी दक्षिणेतील अनेक हिंदू देवस्थानांना भेट देऊन सोने, हिरे, माणके यांच्या राशी भेट दिल्या. संपूर्ण दक्षिणेत हिंदू धर्माला राजाश्रय मिळाला. हम्पी शहराची स्थापना झाल्याचे ७७ शिलालेख या परिसरातील खेड्यात मिळाले. त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. हम्पी हे एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते जेवढे महत्त्वाचे पुरातत्व (Archaeological) वारसास्थळ आहे, तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा थोडे जास्त महत्त्वाचे भूवारसा (Geoheritage) स्थळ आहे. हम्पी इथे जी अनेक मंदिरे आहेत त्यांच्या आसपास आढळणारे लक्षवेधी आणि आकर्षक भूरूप म्हणजे इथले द्वीपगिरी (Inselbergs). हे द्वीपगिरी अनेक मोठ्या शिळा खंडांनी (Boulders) तयार झालेले आहेत, म्हणूनच त्यांना शिलाखंड द्वीपगिरी असे म्हटले जाते. या द्वीपगिरींचे अनेक प्रकार हम्पीच्या परिसरात सर्वत्र पसरलेले दिसतात. हे द्वीपगिरी कुठल्याही ज्वालामुखीय क्रियांनी किंवा पृथ्वी कवचाच्या उत्थापनातून (Uplifting) तयार झालेले नाहीत, तर ते एका अतिप्राचीन अशा एकसंध आणि अतिविशाल खडकाच्या (Monolith) विदारणातून तयार झाले आहेत.   

इथले द्वीपगिरी जगातील इतर द्वीपगिरींप्रमाणेच अनाच्छादन (Denudation) क्रियेनंतर शिल्लक राहिलेले डोंगरांचे शिल्लक भाग आहेत. त्यांची उंची साधारणपणे दीडशे ते अडीजशे मीटर असल्याचे दिसून येते. या उघड्या पडलेल्या अवशिष्ट टेकड्यांवर (Residual hills) एक मीटर ते १० मीटर व्यासाच्या आकाराचे अनेक लहानमोठ्या आकाराचे मूळ खडकाचे विदारण झालेले ग्रॅनाईटचे तुकडे किंवा गाभादगड (Corestones) पसरलेले आढळतात. हे तुकडे या प्रदेशात खोलवर घडून गेलेल्या विदारण प्रक्रियेचे पुरावेच आहेत.  पृथ्वीवर जे फार दुर्मीळ असे उघडे पडलेले शिलाच्छादित प्रदेश आहेत, त्यातलाच हा एक प्रदेश आहे. तुंगभद्रा नदी इथल्या ४२२ मीटर उंच असलेल्या ऋषिमुख टेकडीला वळसा घालून पुढे जाते. या टेकडीला ‘हम्पी बेट’ असेही म्हटले जाते. मलयवन्त नावाच्या टेकडीवर एकावर एक गाभादगड असलेला द्वीपगिरी दिसून येतो. 

पृथ्वीच्या कवचाचे ज्या काळात घनीभवन (Solidification) झाले, त्या काळात म्हणजे २५० कोटी वर्षांपूर्वी हम्पीचे मूळ ग्रॅनाईट खडक निर्माण झाले. त्या काळी पृथ्वीच्या अंतरंगातून बाहेर पडलेला वितळलेला लाव्हा कवचावर येऊन थंड आणि घट्ट  झाला. त्याचे मोठे मोठे घुमटाकृती उंचवटे (Domes) आणि सपाट प्रदेश (Sheets) झाले. ते तयार होत असताना त्यात अनेक आडव्या उभ्या भेगा पडल्या. या भेगांना अनुसरून कालांतराने त्यांचे विदारण झाले. त्यातून अनेक गाभादगड आणि इतर लहान आकाराचे भरड पदार्थ तयार झाले. भरड पदार्थ काळाच्या ओघात निघून गेले, मात्र गाभादगडयुक्त अवशिष्ट टेकड्यांवर द्वीपगिरी स्वरूपात शिल्लक राहिले. या संपूर्ण भूशास्त्रीय प्रक्रियेचा एक अतिशय विलोभनीय असा आविष्कार हम्पीच्या या प्रदेशात दिसतो.   

अनेक ठिकाणी गाभादगड एकमेकांवर संतुलन साधून, अस्थिर अवस्थेत थांबून राहिल्यासारखे (Balancing rocks), तीन चार मोठ्या खडकांचा समुच्चय होऊन, एकमेकांवर रचल्यासारखे किल्ल्याच्या बुरुजाप्रमाणे (Castel Koppies) दिसतात आणि आजूबाजूचा प्रदेश खडकांच्या तुकड्यांनी आच्छादित दिसतो.

हम्पीचा सगळा परिसरच संपन्न पुरातत्त्व आणि भूशास्त्रीय इतिहासाचा साक्षीदार आहे. भारतासाठी तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे यात शंका नाही.

स्थान संदर्भ 

  • १५.३४ अंश उत्तर अक्षांश/७६.४६ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ४३० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २५० कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : होस्पेट (१३ किमी)

संबंधित बातम्या