सेंट मेरी आयलंड

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 31 मे 2021

भूवारसा पर्यटन

कर्नाटकातील उडुपीला सुंदर समुद्र किनारा आणि वाळूची पुळण आहे, त्याचं नाव आहे मालपे बीच. या बीचपासून सहा किलोमीटर अंतरावर निसर्गातील एका भूशास्त्रीय आश्चर्याने समुद्रातून डोके वर काढले आहे.ते म्हणजे सेंट मेरी आयलंड समूहातील उत्तरेकडचे ‘कोकोनट बेट’ आणि त्याच्या दक्षिणेला चार, पाच आणि सहा किमी अंतरावरची आणखी तीन बेटे. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्टकोनी अशा उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेटे तयार झालेली आहेत. भारतातली अशा प्रकारचा हा एकमेव बेटसमूह असून जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडियाने २००१ साली या बेटांना ‘नॅशनल जिओग्राफिक मॉन्युमेंट’चा दर्जा दिलेला आहे.

उडुपी या ठिकाणी असलेल्या जेटीपासून सेंट मेरी आयलंडला जाण्यासाठी बोटी मिळतात. धक्क्यावरून साधारण अर्ध्या तासात आपण सेंट मेरी बेटांपैकी कोकोनट आयलंडपाशी पोहोचतो. स्थानिक दंतकथेप्रमाणे केरळला जाण्यापूर्वी १४९८मध्ये वास्को द गामा प्रथम या बेटांवर आला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला ‘सेंट मेरी आयलंड’ असे नाव दिले. हे बेट २४ एकरांवर पसरलेले आहे. बेटावर काही माडाची झाडे आणि खुरटी झुडु

पे पाहायला मिळतात. बेटावरची जमीन वाळूने तयार झालेली नसून शंख शिंपल्यांनी तयार झालेली आहे. बेटावर अगणित शंख शिंपले पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शंख शिंपले इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळेच या बेटाला वाळूचा किनारा नसून या शंख शिंपल्यांनी तयार झालेला किनारा आहे. बेटाच्या आजूबाजूला खडक असल्याने समुद्रही पोहोण्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही. बेटावर फिरताना वरून पाहिले, तर कासवाच्या पाठीसारखे आणि बाजूने पाहिले तर खांबांसारखे दिसणारे बेसॉल्टचे दगडी स्तंभ दिसायला लागतात. 

चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्टकोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले आहेेेत. ज्वालमुखीच्या उद्रेकानंतर लाव्हारस जर खोलगट भागात जमा झाला, तर अशा प्रकारची रचना तयार होण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून चालू होते. वरचा भाग थंड झाल्यावर हळूहळू खालचा भाग थंड होत जातो. अशा प्रकारे द्रवरूपातून घनरूपात येताना तो आकुंचन पावतो आणि त्यामुळे त्याला भेगा पडतात. सामान्यतः या भेगा एकमेकांशी ६० अंशाच्या कोनात पडतात. त्यामुळे दगडाला षटकोनी आकार येतो. या भेगा पृष्ठभागाशी ९० अंशाचा कोन करतात त्यामुळे षटकोनी आकाराचे उभे स्तंभ तयार होतात. जर भेगा पडण्याच्या प्रक्रियेत काही बाधा आली तर चौकोनी, पंचकोनी आकारचे स्तंभ तयार होतात. वर्षानुवर्षे लाटांच्या आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे या ठिकाणी अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर,  जास्तीत जास्त ३ ते ४ मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात. दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर फुटणाऱ्या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख शिंपले यामुळे हा बेटांचा प्रदेश खूपच आकर्षक आहे.

दक्षिण कर्नाटकातील उडुपी जवळच्या मालपेच्या किनाऱ्यासमोर उत्तर - वायव्य (NNW) दक्षिण - आग्न्येय (SSE) दिशेत ही चार मोठी खडकांनी तयार झालेली बेटे (Rock islands) आहेत. या सगळ्यांना मिळून ‘सेंट मेरी बेटे’ असे म्हटले जाते. चिकट, मंद गतीने पुढे सरकणाऱ्या सिलिकायुक्त अशा आम्ल धर्मीय लाव्हामुळे ही सगळी बेटे तयार झाली आहेत. यातील सगळ्यांत मोठे ‘कोकोनट आयलंड’ हे मालपे गावाच्या वायव्येला ५ किमी अंतरावर असून बाकीची तीन बेटे मालपे पुळणीच्या पश्चिमेला आढळतात. या तीन बेटांना अनुक्रमे ‘नॉर्थ आयलंड’, ‘दर्या बहादुरगड बेट’ आणि ‘साऊथ आयलंड’ म्हटले जाते. 

‘कोकोनट’ या सर्वांत मोठ्या बेटाची उंची केवळ १० मीटर इतकीच आहे. खडकांत दिसणारे स्तंभरूपी जोड (Columnar joints) हे इथले खूप वेगळे असे आकर्षण आहे. ६.५ कोटी वर्षांपूर्वी दख्खन पठाराच्या निर्मितीच्यावेळी झालेल्या लाव्हा उद्रेकातून ही बेटे तयार झाली असावीत असा पूर्वी समज होता. मात्र नवीन संशोधनातून असे लक्षात आले आहे, की त्याही आधी म्हणजे ८.५ कोटी वर्षांपूर्वी जेव्हा भारत आणि सेशेल्स भूखंड एकमेकांपासून वेगळे झाले, त्या काळात ती निर्माण झाली असावीत. या बेटावर नारळाची झाडे मोठ्या संख्येने असल्यामुळे या बेटाला ‘कोकोनट आयलंड’ असे नाव दिले गेले आहे. समुद्रकडे, तरंग घर्षणाने तयार झालेले चबुतरे (Benches) आणि वाळूच्या पुळणी अशी अनेक अपक्षरणाची भूरूपे या सर्व बेटांवर दिसून येतात. समुद्र सपाटीजवळ आणि

१.५, ३ आणि ६ मीटर उंचीवर तरंग घर्षित मंच (Wave cut platforms) आढळतात, जे आधीच्या वेगवेगळ्या उंचीच्या उत्थापन प्रक्रियेनंतर आणि समुद्र पातळी खाली वर झाल्यामुळे तयार झाले आहेत. समुद्र सपाटीपासून ३ मीटर उंचीवर आढळणारे अवसाद (Sediments) ३ हजार वर्षे जुने असल्याचे कालनिश्चिती पद्धतीतून लक्षात आले आहे. या बेटांवर वाळूच्या पुळणी संख्येने फारच कमी आहेत. ज्या आहेत त्या खूप अरुंद असून त्यावर असलेले वाळूचे आवरणही कमी जाडीचे (Thin) आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालपे आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात दिसणारे खडक पूर्णपणे वेगळे आहेत. हे खडक ४०० कोटी वर्षे जुने ग्रॅनाईट खडक असून त्यावर जांभ्या खडकांचे थरही आढळतात. कोकोनट बेटावरील खडकांचे स्तंभ प्रामुख्याने षटकोनी किंवा पंचकोनी असून त्या प्रकारचे खडक आपल्या कोकण किनाऱ्यावर कुठेही आढळत नाहीत.

सेंट मेरी द्वीपशृंखला साऊथ आयलंडच्या पुढे वायव्य आग्नेय दिशेने अजून पुढे जाते आणि उडीयावरह गावाच्या पश्चिमेला अडीच किमी अंतरावर असलेल्या दोन लहान बेटांपाशी संपते असे अलीकडेच लक्षात आले आहे. या शेवटच्या दोन लहान बेटांची समुद्र सपाटीपासून उंची १२ मीटर इतकी आहे. या सर्व बेटांवरचा तळ खडक (Basal Rock) हा किनाऱ्यावरील खडकाप्रमाणेच ग्रॅनाईट आहे. भूशास्त्रीय अनुक्रम (Geochronology) आणि प्राचीन चुंबकत्व (Paleomagnetism) या संकल्पनांनुसार १० ते ६ कोटी वर्षांपूर्वी भारत आणि मादागास्करचे भूखंड एकमेकांपासून तुटून दूर जाऊ लागले, तेव्हा जी खचदरी (Rift) निर्माण झाली त्यातून झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर या बेटांवरील षटकोनी आणि पंचकोनी आकाराचे शिलास्तंभ तयार झाले. याचाच अर्थ असा की इतका जुना भूवारसा या द्वीपश्रुंखलेने आजही जपून ठेवला आहे!

स्थान संदर्भ 

  • कोकोनट बेट - १३.३८ अंश उत्तर अक्षांश/ ७४.६८ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : १० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : ८.५ कोटी  वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : मालपे (५ किमी)

संबंधित बातम्या