बेइनो कॅसल

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 28 जून 2021

भूवारसा पर्यटन

मिझोराम राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या सैहा प्रांताच्या पश्चिमेला बेइनो किंवा कोलोडाईन नदीपात्रात किल्ल्यासारख्या किंवा किल्ल्याच्या बुरुजासारख्या दिसणाऱ्या खडकांच्या विलक्षण अशा नैसर्गिक रचना तयार झाल्या आहेत. ८ ते १० मीटर उंचीच्या या रचना नदीच्या दोन्ही तीरावर दिसतात. बोइनो कॅसल या नावाने त्या प्रसिद्ध आहेत.

लोमसू येथून छोट्या होडीतून किंवा मोटरबोटीतून करता येणाऱ्या कोलोडीन किंवा कोलोडाईन म्हणजेच बेइनो नदीतून लोडाव आणि सफाव गावांच्या दरम्यान नदीपात्रात ही विलक्षण सुंदर अशी शिळा शिल्पे दिसतात. वर्षातला फार मोठा काळ इथे पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याचदा इथले रस्ते चिखलामुळे वाईट अवस्थेत असतात. शिवाय प्रदेश अतिशय दुर्गम आहे त्यामुळे फारसे पर्यटक इकडे फिरकत नाहीत. पण सध्या लोमसूपासून सफावपर्यंत रस्ता झाला आहे. इतरही काही मार्ग असल्यामुळे इथे जाणे थोडेसे सोईस्कर झाले आहे.

इथल्या दगडांच्या नैसर्गिक भिंतींनी नदीकाठी एखादा किल्ला तयार व्हावा अशा अचंबित करणाऱ्या खडक रचना आपली नजर खिळवून ठेवतात. इतक्या सुंदर आणि कुतूहल वाटावे अशा भूशास्त्रीय रचना असूनही अजून त्यांचा सविस्तर अभ्यास झाल्याचे कुठेही आढळून येत नाही. मिझोराम राज्यातील एक आकर्षक पर्यटन स्थळ यापलीकडे त्याचा भूशास्त्रीय इतिहास आणि वारसा या दृष्टीने हा भाग आजही दुर्लक्षितच आहे.

मिझोरामच्या सैहा प्रांतातील बेइनो नदीकिनारी असलेल्या लोडाव आणि सफाव गावांच्या दरम्यान सव्वादोन किमी लांबीच्या नदीमार्गात ही शिलाशिल्पे नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना लागून पसरलेली दिसतात. मिझोरामची राजधानी ऐझाॅल पासून हे ठिकाण साधारणपणे १५० किमी अंतरावर दक्षिणेकडे आहे. नदीच्या ज्या भागात हे खडक दिसतात तिथे नदीपात्राची रुंदी ७० ते ९० मीटर असून नदीमार्ग सफावपाशी ९० मीटर उंचीवर, तर लोडावजवळ ५८ मीटर उंचीवर आहे. उंचीतील हा फरक केवळ २.२५ किमी अंतरात होतो, म्हणजेच नदी प्रवाह खूपच संथ आहे. असे असले तरी या संथ प्रवाहात अनेक खळाळ (Rapids) असल्याचे दिसून येतात, जिथे प्रवाहाचा वेग एकदम वाढतो. नदीत अनेक ठिकाणी वाळूची लहानमोठी बेटेही आढळतात.

सैहाच्या प्रदेशातील खडक चार कोटी वर्षांपूर्वीचे वालुकामय (Arenaceous) आणि मृण्मय (Argillaceous) प्रकारचे स्तरीत खडक आहेत. या सगळ्या खडकांचे नंतरच्या काळात वलीकरण (Folding) आणि प्रस्तरभंग (Faulting) झाले. त्यातून अपनती (Anticline) या उंच डोंगररांगा आणि अवनती (Syncline) या अपनतींना समांतर अशा दऱ्या निर्माण झाल्या, ज्या या भागात सर्वत्र दिसून येतात.  

इथल्या खडकांच्या विदारणातून (Weathering), अपक्षरणातून व झिजेतून पंकाश्म, मृण्मय पंकाश्म (Siltyshales) आणि वालुकाश्म खडक तयार झाले. ही सर्व प्रक्रिया पुढच्या काही कोटी वर्षांपर्यंत चालू होती. त्यानंतर बेइनो नदीखोऱ्यात जे खडक तयार झाले त्यांना भूबन निर्मिती (Bhuban formation) म्हटले जाते. यांचे भूशास्त्रीय वय दोन कोटी वर्षांच्या थोडे मागे पुढे आहे. याला निओजीन कालखंड म्हणतात आणि २ कोटी ते २.३ कोटी वर्षांपूर्वीच्या या काळात सस्तन प्राणी व पक्षी यांची पूर्ण उत्क्रांती झाली.

साडेपाच ते तीन कोटी वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय भूतबकाचा (Tectonic plate) हा अतिपूर्वेकडचा भाग पूर्वेकडच्या आराकान योमा या पर्वत रांगेखाली घसरला (Subduction) तेव्हापासून वलीकरण आणि प्रस्तरभंग अशा घटना घडू लागल्या. त्याच वेळी पूर्व पश्चिम दिशेत अनेक अपनती अवनती तयार झाल्या. अवनतींच्या अपनत्यांना समांतर घळयांतून इथल्या नद्या वाहतात. अपनतींच्या उंच डोंगररांगांमध्ये वरच्या भागात अनेक विभंग प्रदेश आणि भंग रेषा आहेत. वलीकरणही झाले असल्यामुळे वळ्यांचे नानाविध प्रकार निर्माण झाले आहेत. त्यांच्या झिजेमुळे साडेतीन कोटी वर्षांपासून गाळ संचयन चालू आहे. अलीकडच्या काळात नदीने केलेल्या अपक्षरण कार्यामुळे गुळगुळीत झालेले अनेक शिलाखंड नदीपात्रात दिसून येतात.या भागातील गाळ प्रामुख्याने मायोसीन काळात म्हणजे २ कोटी ते ५० लाख वर्षांपूर्वी एका खोलगट बशीसारख्या भागात साचला. गाळाचे खूप जाड आणि उंचच उंच थर तयार झाले. भारतीय तबक म्यानमारच्या तबकावर आपटल्यानंतर ते थोडे पश्चिमेकडे वळले त्यामुळे गाळ संचयनात अधिकच क्लिष्टपणा आला. या भागात भूकंपाची कंपनेही जाणवू लागली.

आज बेइनो नदी खोऱ्यात वालुकामय स्तरीत खडकापासून तयार झालेले ११०० मीटर जाडीचे अनेक थर आढळून येतात. हेच थर बेइनो कॅसल परिसरात नदीपात्रात उघडे पडले आहेत. त्यात घट्ट झालेली वाळू, चिखल, दगडगोटे अशा अवसादांचे थर अतिशय आकर्षक स्वरूपात उघडे पडलेले दिसून येतात. त्यांना एका विशिष्ट दिशेत कल (Dip) असून त्यात अनेक संधी, जोड आणि भेगाही आढळतात. या खडकांत, ते स्तरीत आणि गाळाचे असल्यामुळे, प्राचीन काळातील काही जीवावशेष (Fossils)सुद्धा आढळून आले आहेत. नदीकाठी असलेल्या अनेक गावात स्तरीत खडकांचे मोठ मोठे थर उघडे पडलेले दिसून येतात. त्यात जशा गुहा निर्माण झाल्या आहेत, तशीच पाणी झिरपून लहान मोठी तळीसुद्धा तयार झाली आहेत. 

या संदर्भात झालेल्या मर्यादित संशोधनावरून असे लक्षात आले की इथल्या राखाडी आणि करड्या रंगाच्या वालुकाश्म खडकांत अनेक बिळे (Burrows) असल्याचे दिसून येते. याचबरोबर अनेक उर्मीचिन्हे (Ripple marks), तिरक्या स्तर रचना (Laminations) आणि चिखलावर दिसणारी वाळूची चिन्हेही (Sole marks) दिसतात. उथळ पाण्यातील गाळात सापडणारे अनेक जीवावशेष, उथळ पाण्यातील जीवांनी तयार केलेली बिळे आणि इतर पोकळ्या अशा अनेक रचनाही आढळतात. त्यावरून या गाळाचे मूळ संचयन उथळ समुद्रात, खाडीत किंवा सरोवरात झाले असावे असा निष्कर्ष काढता येतो. भारतातील इतर भूवारसा पर्यटन ठिकाणांपेक्षा बेइनो कॅसल हे दुर्गम आणि कमी सुविधा असलेले ठिकाण आहे. असे असले तरी पूर्णपणे भूशास्त्रीय आणि भूवारसा पर्यटन करण्यासाठी भारतातील हे एकमेव असे आदर्श ठिकाण आहे. माणसाचा हस्तक्षेप अजिबात नसल्यामुळे केवळ निसर्गाने कोट्यवधी वर्षांच्या काळात तयार केलेले हे विलक्षण विलोभनीय असे शिला शिल्प आहे यात शंका नाही.

स्थान संदर्भ 

  • २२.३१ अंश उत्तर अक्षांश/९२.८२ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ५०-९० मीटर 
  • भूशास्त्रीय वय : २ कोटी वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : ऐझॉल (१५० किमी)

संबंधित बातम्या