पंचमढी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 19 जुलै 2021

भूवारसा पर्यटन

पंचमढी हे मध्य प्रदेशात जबलपूरच्या नैऋत्येला सुमारे १७० किमी अंतरावर असलेले एक महत्त्वाचे गिरिस्थान आहे. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेच्या जंगलवेष्टित महादेव टेकड्यांनी वेढलेल्या ६० चौ.किमी. क्षेत्रफळाच्या पठारावर आणि समुद्र सपाटीपासून १,०६७ मी. उंचीवर वसले आहे. 

पंचमढी हा पंच मठींचा (पाच प्राचीन गुहा) अपभ्रंश असावा. येथे असलेल्या या पाच गुहा पांडवांच्या काळातील असून वनवास काळात पांडव काही काळ येथे राहिले होते, असे मानले जाते. काही अभ्यासक त्या गुहांचा संबंध बौद्ध काळाशी जोडतात. पूर्वीच्या एका तळ्याच्या ठिकाणीच सध्याचे पंचमढी वसलेले आहे. कॅप्टन जे. फॉरसिथ यांनी १८५७मध्ये एक आरोग्यवर्धक केंद्र म्हणून या ठिकाणाची प्रथम स्थापना केली.

मुंबई-अलाहाबाद या मध्य लोहमार्गावरील पिपरिया हे पंचमढी जवळचे (५० किमी) लोहमार्गस्थानक आहे. पिपरिया येथून पंचमढीला मोटार वाहतूक चालते. येथे वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २६ अंश सेल्सिअस व १५ अंश सेल्सिअस आणि पर्जन्यमान २०६ सेंमी. असते. येथील हवा आल्हाददायक असते. हिवाळ्यात तापमान खूप कमी होत नाही वा उन्हाळ्यात ते जास्त वाढतही नाही. याचा बराचसा भाग जंगलवेष्टित असून त्यात साल, हिरडा, साग, जांभूळ, आंबा, महआ अशा प्रमुख वनस्पतींशिवाय निरनिराळे पक्षीही आढळतात.

पंचमढीपासून नैऋत्येला सात किमी अंतरावरील धूपगढ (१,३५५ मी.), आग्न्येय दिशेला नऊ किमी वरील महादेव (१,३३० मी.) व चौरागढ (१,३०८ मी.) ही येथील प्रमुख शिखरे होत. यापैकी धूपगढ हे सातपुडा पर्वतरांगेतील अत्युच्च शिखर आहे. येथून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश सहज दिसतो. महादेव डोंगरावरील गुहेपासून चार किमीवरील चौरागढ हे गोंड आदिवासींचे धार्मिक ठिकाण आहे. येथून ३२ किमीवरील झरिया जंगल शिकारीसाठी महत्त्वाचे ठिकाण होते. पठाराच्या उतारावर वालुकाश्माच्या खाणी आहेत. येथील पांडव गुहा, गोल्फ मैदान व त्याच्या जवळील ४८५ हेक्टर क्षेत्राचे सुंदर शासकीय उद्यान, अनेक जलप्रपात आणि वनश्रीने वेढलेले लहानलहान ओढे, जमना कुंड, एकांतगिरी व राजेंद्रगिरी या टेकड्या इत्यादी विविध प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटकांची येथे खूप गर्दी होते. २००९च्या मे महिन्यात पंचमढीचा समावेश युनेस्कोच्या जैव आवरण संरक्षित क्षेत्रांच्या (Biosphere reserve) यादीत करण्यात आला आहे.

पंचमढीचा सगळा परिसर भूशास्त्रीयदृष्ट्या संपन्न अशा विविध भूरूपांनी समृद्ध आहे. डोंगर आणि पर्वत कडे, आकर्षक धबधबे, अनेक घळया, रांजण खळग्यांनी भरून गेलेले नदीमार्ग, झरे, गुहा अशी भूरूपे इथे जागोजागी विखुरलेली दिसून येतात. पंचमढी पठाराच्या सर्व बाजूंनी खालच्या सपाट भागाकडे कोसळणारे असंख्य धबधबे आणि त्यांनी तयार केलेले कडे यांनी या पठाराला वेगळेच सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. पठारावर उगम पावलेल्या देनवा, सोनभद्र, बैनगंगा, नागदूआरी, बोरी आणि दुधी अशा अनेक नद्या पठाराच्या कड्यावरून खाली कोसळतात आणि पठाराभोवतीच्या परिसरात त्या अनेक घळयांतून वाहतात. या नद्यांच्या उपनद्या अनेक तीव्र वळणांनी आणि खोल नदीपात्रातून मुख्य नद्यांना जाऊन मिळताना दिसतात. यावरून असे लक्षात येते की या प्रवाह मार्गांवर विभंग (Faults) आणि भित्तिखडक (Dykes) यांचे नियंत्रण आहे.

या १३५० मीटर इतक्या अनाकलनीय उंचीवरच्या पठारी भागात गोंडवाना कालखंडातील ५५ कोटी वर्षांपूर्वीचे अवसाद (Sediments) सापडतात. धूपगडावर २५ कोटी वर्षांपूर्वीच्या नद्यांनी केलेल्या संचयनामुळे साठविला गेलेला भरड गाळ सापडतो. भारतातील बाकीच्या गोंडवाना प्रदेशात इतके जुने अवसाद कुठेही आढळत नाहीत. त्यामुळे असे म्हणता येते की पंचमढीचे हे विलक्षण पठार या भागात घडून गेलेल्या भूपृष्ठीय घुमटाकृती उत्थापनामुळे (Domal uplifting) तयार झाले असावे. हे उत्थापन दख्खनच्या पठारावरील लाव्हाच्या उद्रेकानंतरच्या काळात म्हणजे ६.५ कोटी वर्षांपूर्वी झाले असण्याची शक्यता आहे. धुपगडावर सातपुडा पर्वत शृंखलेत गोंडवाना कालखंडातील वालुकाश्म आणि शेल खडक विपुल प्रमाणात आढळतात. यापैकी मृदू आणि सच्छिद्र वालुकाश्म खडकात भूजल झिरपून अनेक पोकळ्या  तयार झाल्या आहेत. या पोकळ्यांचे रूपांतर मोठमोठ्या गुहांमध्ये झाल्याचे दिसते. प्राचीन मानवाने या गुहांचा उपयोग आसरा स्थाने (Shelters) म्हणून केल्याचेही दिसून येते. इ. स. पूर्व ७०० ते २००० वर्षांपूर्वी या गुहांमध्ये माणसाने काढलेली अनेक रंगचित्रे आढळतात. काही रंगचित्रे तर दहा हजार वर्षे जुनी असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देनवा नदीचा दक्षिणेकडचा उगम प्रदेश हा दख्खन पठारावरच्या अग्निज बेसॉल्ट खडकात तयार झाला आहे. पंचमढी उत्थापित पठाराच्या भोवती असलेल्या कड्यावरून रजत प्रपात (Silver Falls), जमुना प्रपात (Bee Falls), जलावतरण (Duchess Falls) असे अनेक साधारणपणे शंभर मीटर उंचीचे आकर्षक धबधबे आहेत. पठाराच्या ईशान्येला अनहोनी गावानजीक एक उष्ण पाण्याचा झराही आहे. शहराच्या दक्षिणेला हंडी कोह नावाची १०० मीटर खोल दरी आहे. 

पंचमढी पठार प्रामुख्याने पंचमढी वालुकाश्म या २५ ते २२ कोटी वर्षांपूर्वीच्या खडकात निर्माण झाले आहे. या खडकाखाली असलेला ३० कोटी वर्षे जुना बिजोरी पंकाश्म (Shale) गाळाचा खडक देनवा नदीत उघडा पडलेला दिसून येतो. याचबरोबर ६.५ कोटी वर्षे जुना बेसॉल्ट खडकही काही भागात आढळून येतो. पंचमढी हा गोंडवाना काळातील एक अनावृत (Exposed) आणि अलग (Isolated) असा भूमीचा छोटेखानी तुकडा असून त्यावर साडेचौदा कोटी वर्षे जुने शिलापट्ट (Sills) आणि भित्तिखडक (Dykes) घुसलेले दिसून येतात.

पंचमढीच्या या विलक्षण भूप्रदेशात जटाशंकर नावाचे एक मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा ५५ कोटी वर्षांपूर्वीच्या चुनखडकात तयार झालेल्या एक गुहेत आहे. मंदिराच्या परिसरात अनेक अधोमुखी आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ (stalactites/stalagmites) असून त्यातून नेहमी पाणी ठिबकत असते. 

पंचावन्न कोटी वर्षांपूर्वीपासून चालत आलेला हा संपन्न भूशास्त्रीय वारसा पंचमढी पठाराने आजही सांभाळून ठेवला आहे. त्याचे जतन करणे आणि काळाच्या ओघात तो नष्ट होऊ न देणे हे खरोखरच महत्त्वाचे आहे.

स्थान संदर्भ 

  • २२.४७ अंश उत्तर अक्षांश/७८.४३ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : १०६६ मीटर
  • क्षेत्रफळ : १२,००० चौ. किमी.
  • भूशास्त्रीय वय : ५५ कोटी वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : पिपरिया (५० किमी), जबलपूर (१७० किमी)

संबंधित बातम्या