महानदीचा त्रिभुज प्रदेश  

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

भूवारसा पर्यटन

महानदी भारताच्या पूर्वांचल राज्यातील एक मोठी नदी आहे. या नदीची लांबी ८५८ किमी असून ही एक महत्त्वाची नदी आहे. ती छत्तीसगड राज्यातील सिहावाच्या (Sihawa) दक्षिणेला उगम पावते. ही टेकडी घाटाचा वाढीव हिस्सा आहे. ८५८ किलोमीटर प्रवास करून ती ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर (पारदीप) या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. महानदीचा त्रिभुज प्रदेश हा भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा भूवारसा प्रदेश आहे.

एकेकाळी महानदीला भयानक पूर येत व प्रचंड नुकसान होत असे. या नदीला ‘ओडिशाचे अश्रू’ म्हणत. १९५३मध्ये हिराकूड धरण व अनेक कालवे बांधून या नदीच्या विध्वंसक रूपाला बऱ्यापैकी बंधन घातले गेले आहे.   

नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात. नदीच्या मुखापाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो. तो ग्रीक लिपीतील ‘डेल्टा’ (r) या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात. तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. 

नदी समुद्राला मिळते तेथे म्हणजे मुखाशी उतार खूपच कमी झालेला असतो. संथ वाहणाऱ्या नदीला गाळ वाहून नेणे शक्य होत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचतो व मुख भरून येते. मग नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते. असे करत करत नदी बहुमुखी होते. एखाद्या पंख्यासारखा (Fan) दिसणाऱ्या या भूभागाला नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीने वाहून आणलेल्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह इत्यादी  घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांना त्रिभुज प्रदेश नसतात. 
भारताचा विचार केला तर पश्चिम घाटात किंवा हिमालयात उगम पावून पूर्व किनाऱ्याकडे गेलेल्या नद्या खूप अंतर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. या प्रवासात त्या मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. त्यामुळे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गंगा, महानदी, कृष्णा वगैरे नद्यांच्या मुखापाशी मोठ्या आकाराचे त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ सुंदरबन, भितरकनिका इत्यादी. याउलट पश्चिम घाटातून उगम पावून, विशेषतः कोकणातून, अरबी समुद्राला मिळवणाऱ्या नद्या उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत जेमतेम ७० किलोमीटर अंतर कापतात. सह्याद्री पर्वतरांगेच्या उतारावर मिळालेला वेग व प्रवास केलेले अत्यल्प अंतर यामुळे या पश्चिम वाहिनी नद्यांच्या मुखापाशी मोठे त्रिभुज प्रदेश दिसत नाहीत.
गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांगलादेशमधील त्रिभुज प्रदेश, अ‍ॅमेझॉन, नाईल, मिसिसिपी, ऱ्‍हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.             
सुमारे ८०० किमीचा प्रवास करून महानदी, कटक शहराजवळच्या नारज गावापाशी आपल्या बिरुपा, चित्रोतपला, काठजोरी या वितरिकांच्या (Distributaries) मार्फत किनाऱ्याच्या दिशेने पाणी पसरवू लागते. ‘देवी’ ही तिची प्रमुख वितरिका आहे. या त्रिभुज प्रदेशात भरती ओहोटी मर्यादा (Tidal range) केवळ १.८ मीटर असून भरती ओहोटीचे चक्र अर्ध दैनिक स्वरूपाचे (Semi diurnal) आहे. महानदीचा हा त्रिभुज चापाकृती (Arcute) असून तो गोंडवाना कालखंडातील एका विस्तीर्ण खोलगट भागात (Graben) तयार झाला असावा असे भूशास्त्रज्ञांचे मत आहे. 

या प्रदेशातील गाळ २४०० मीटर जाड आहे. नदीतून येणाऱ्या प्रचंड गाळामुळे गेल्या दहा हजार वर्षांत त्रिभुज प्रदेशाचा समुद्रवर्ती भाग समुद्राच्या दिशेने वाढला असल्याचेही दिसून येते. पृष्ठभागाखाली असलेला सगळा गाळ १६.५ ते १४.५ कोटी वर्षांपासून १०.५ कोटी वर्षे (Late Jurassic/Early Cretaceous) जुना आहे. पृष्ठभागावरचा गाळ मात्र अलीकडच्या काळातीलच आहे.

महानदीच्या या त्रिभुज प्रदेशाचा वास्तविक विकास हा समुद्र पातळीत १.५ ते २ कोटी वर्षांपूर्वी (Miocene) जी घट झाली त्यापासूनच सुरू झाला. आजही सागर पातळीत वर आणि खाली या प्रमाणे होणाऱ्या  बदलांनुसार हे बदल होतच असतात. गेल्या ८०० ते ६ हजार वर्षांत त्रिभुज प्रदेशाचा विस्तार आणि जाडी खूपच वाढली आहे.

त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील किनाऱ्यावर अनेक रोधक द्वीपे (Barrier islands), वाळूचे दांडे आणि पुळणी तयार झाल्या आहेत. मॉन्सूनमध्ये या किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर झीज होते.

महानदीच्या त्रिभुज प्रदेशातील केंद्रपाडा जिल्ह्यात भितरकनिका (Bhitarkanika) किंवा  वित्रकर्णिका राष्ट्रीय उद्यान आहे. महानदी त्रिभुज प्रदेशाच्या ईशान्य बाजूला हा भाग असून तीन बाजूला नद्या आणि अनेक खाडीमुखे यामुळे हा त्रिभुज प्रदेश झाला आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने हे अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला ऑलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध असा गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी भितरकनिका राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले.   

खारफुटी वनस्पतींच्या वैविध्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. ६७२ चौ.किमी क्षेत्रात पसरलेली सुंदरबन खालोखाल भितरकनिका ही भारतातील नंबर दोनची खाजण वनांनी आच्छादलेली जागा आहे. नदीच्या काठावर मगरी दिसतात. भारतातील खाऱ्या पाण्यातील सर्वात जास्त मगरी येथे आढळतात. भितरकनिका येथे दरवर्षी डिसेंबर अखेरीस मगरींची गणना होते. आत्तापर्यंत जवळपास तीन हजार मगरींची नोंद झाली आहे. त्यापैकी १० टक्के मगरी १८ फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या आहेत. ही  जगातील एक एकमेवाद्वितीय गोष्ट आहे. येथे ३२० जातीचे पक्षी आढळतात. खंड्या पक्ष्याच्या आठ जाती येथे दिसतात. विणीच्या हंगामात ओपन बिल्ड स्टॉर्क, इग्रेट, आयबीस यांसारखे पक्षी हजारोंच्या संख्येने भितरकनिकामधील खारफुटी झाडांवर घरटी बांधून अंडी घालतात. अजगरासारखे सरपटणारे प्राणी, मड स्किपर, सस्तन प्राण्यांच्या अनेक जाती यामुळे भितरकनिका प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध आहे.

भूदृश्य आणि भूवारसा पर्यटनासाठी महानदीचा हा विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश अतिशय आदर्श असा प्रदेश आहे. 

स्थान संदर्भ 

  • १९.६७ अंश ते २०.५८ अंश उत्तर अक्षांश/८५.६७ अंश ते ८६.७५ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : १२ मीटर
  • क्षेत्रफळ : ६७२ चौ.किमी.
  • भूशास्त्रीय वय : १६.५ कोटी वर्षे
  • प्रदेशातील मोठी ठिकाणे : कटक, भुवनेश्वर, पुरी                
     

संबंधित बातम्या