डोव्हरचा चुनखडकातील समुद्रकडा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 20 डिसेंबर 2021

भूवारसा पर्यटन

आग्नेय इंग्लंडमधले, केंट काऊंटीमध्ये लंडनपासून ९० किमी अंतरावर असलेले ‘डोव्हर’ हे त्याच्या भूवारशाच्या दृष्टीने एक विलक्षण सुंदर आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. इंग्लिश किनाऱ्यावरच्या या ठिकाणासमोरच इंग्लिश चॅनल किंवा डोव्हरची सामुद्रधुनी (Strait) आहे आणि त्या पलीकडे आहे फ्रान्सचा किनारा. 

डोव्हर हे ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याचे व ब्रिटनमधून बाहेर पडण्याचे इतिहासकालीन स्थळ होते, याला या किनाऱ्यावरचे पुराजीवशास्त्रीय (Archaeological) पुरावे पुष्टी देतात. अश्मयुगीन कालखंडापासूनच इथे वस्ती असावी, असेही पुरावे या भागात सापडतात. डोव्हरच्या किनाऱ्याजवळ असलेला चुनखडकातला समुद्रकडा ११० मीटर उंच आहे. डोव्हरच्या दोन्ही बाजूला असलेल्या या कड्याची लांबी १३ किमी आहे. इंग्लिश चॅनलच्या युरोपकडील भागाकडून झालेल्या सर्व ऐतिहासिक आक्रमणांना थोपवून धरण्याचे काम, या भरभक्कम समुद्रकड्याने केल्याचे उल्लेख आढळतात. डोव्हरची चुनखडकातल्या कड्याची ही १३ किमी लांबीची भिंत, निसर्गाचा एक अतिशय सुंदर असा आविष्कार आहे!

क्रिटेशिअस या भूशास्त्रीय कालखंडात, म्हणजे सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी समुद्रतळावर साठलेल्या चुन्याच्या गाळातले भूशैवालांचे अवशेष या समुद्रकड्यावर आढळतात. या कड्याच्या भिंतीवर अनेक पक्ष्यांची घरटीही आढळतात. शंभर मीटर उंचीचा हा कडा फ्लिंट, गारगोटी आणि चुनखडक यांच्या अवसाद कणांनी तयार झालेला आहे. पूर्वी याची उंची आजच्यापेक्षा निश्चितच जास्त असावी. आज दरवर्षी २० सेंमी या वेगाने त्याचे विदारण चालूच आहे. २००१ आणि २०१२मध्ये या कड्याच्या समुद्रवर्ती बाजूवरून मोठमोठ्या चुनखडकाच्या शिळा खाली घसरल्या होत्या.

आग्नेय इंग्लंडचा सगळा किनारा चुनखडीयुक्त आहे. त्याचे विघटन होऊन वाळू तयार होत नाही. ‘फ्लिंट’ या गारगोटी दगडगोट्यातच त्याचे विभाजन होते. ज्या फ्लिंटचे वाळूत रूपांतर झाले, ती वाळू पुळणीच्या समुद्राकडील बाजूवर साठल्याचे सगळीकडे दिसते. पुळणीच्या वरच्या भागात मात्र सगळीकडे दगडगोट्यांचे संचयन आढळते. इथे ब्लेंक रॉकच्या पूर्वेस असलेला चुनखडकातला समुद्रकडा आणि त्यात आढळणारी प्राचीन समुद्रपातळीशी निगडित असलेली उत्थापित पुळण, हा विलक्षण सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. 

साधारणपणे सात कोटी वर्षांपूर्वी ब्रिटिश बेटे आणि युरोपचा मोठा भाग समुद्राच्या पाण्याखाली बुडालेला होता. क्रिटेशिअस कालखंडात समुद्रतळावर कोकोलीथ या एकपेशीय वनस्पतींनी संचयित केलेल्या जीवावशेष असलेल्या चिखलयुक्त गाळाचे मोठे थर तयार झाले होते. हे थर दरवर्षी अर्धा मिलिमीटर इतक्या संथ गतीने एकावर एक तयार होत गेले आणि त्यांचे चुन्याचे ५०० मीटर उंचीचे घट्ट थर तयार झाले. त्यानंतर आल्प्स पर्वताच्या निर्मितीनंतर समुद्रतळावरील या गाळाचे समुद्र पातळीच्या वर उत्थापन (Uplifting) झाले. 

साडेचार ते दीड लाख वर्षांपासून १२ हजार वर्षांपूर्वीच्या शेवटच्या हिमयुगापर्यंत ब्रिटन आणि युरोप एकमेकांना एका अपनती पर्वतरांगेने (Anticlinal ridge) जोडलेले असल्यामुळे ब्रिटन हा युरोपचाच भाग होता. ही पर्वतरांग म्हणजे उत्थापन चालू असताना झालेल्या वलीकरण क्रियेचा परिणाम होता. या पर्वतरांगेने ‘नॉर्थ सी’चे पाणी अडविले होते आणि त्याचे गोड्या पाण्याचे सरोवर झाले होते. याच काळात नॉर्थ सीला दोन वेळा आलेल्या महाप्रलयामुळे या पर्वतरांगेला मोठे खिंडार पडले होते. ही रांग भूशास्त्रीय दृष्ट्या अलीकडची (Young) असून तिचा शिल्लक भाग इंग्लिश चॅनेलच्या तळभागावर आजही शिल्लक आहे. 

यातून वर आलेला हा समुद्रकडा सुरुवातीला १८० ते २०० मीटर उंच असावा असे अनुमान आहे. नंतर झालेल्या झिजेमुळे आज त्याची उंची कमी झाली आहे. शेवटच्या हिमयुगानंतर जगभरातले बर्फ वितळून समुद्र पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे ब्रिटन आणि युरोपच्या दरम्यान इंग्लिश चॅनलची निर्मिती झाली.

आज दिसणाऱ्या डोव्हरच्या कड्यावर पाणी शोषणारे सूक्ष्मजीव (Spong) आणि प्लवकजीव असलेले (Plankton) गारगोटीचे गडद रंगाचे पट्टे दिसून येतात. याच बरोबर शार्क माशाचे दात आणि चुनखडकातील अनेक पोकळ्यांत (Cavities) सागरी जिवांचे अवशेष व गारगोटीचे स्फटिकही आढळतात. प्राचीन गाळ संचयनाची आणि तो घट्ट होत असतानाची सगळी प्रक्रिया या कड्यावरच्या मृदू चिखलाच्या असंख्य तुकड्यांतून, छिद्रांतून आणि पट्ट्यातून सहजपणे आजही ओळखता येते.

या कड्याची झीज सतत चालू असून गेल्या दीडशे वर्षांत त्याच्या झिजेचा वेग पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढला आहे. पूर्वी हा वेग दरवर्षी पाच सेंमी होता, तो आता दरवर्षी २० सेंमी इतका वाढल्याचे दिसून येते. हवामान बदलामुळे आणि समुद्रात वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे संहारक वादळांची संख्या या परिसरात वाढली आहे. त्यांचा परिणाम होऊन कड्याची झीज होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कड्याची पश्चिमेकडील बाजू जास्त झिजली असून त्यावरचे सात कोटी वर्षे जुने चुनखडकाचे थर उघडे पडले आहेत. कड्याच्यावरचा भाग जंगली फुले, फुलपाखरे आणि पक्ष्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. अनेक त्रासदायक आक्रमक वनस्पती (Invasive plants) इथे मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. त्या नेहमी काढून टाकाव्या लागतात. इंग्लिश चॅनेलवरून उडत येणाऱ्या पक्ष्यांसाठी डोव्हरचा कडा हे उतरण्याचे सोईस्कर ठिकाण आहे. अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे या कड्यावर निवास असल्याचे आढळून येते.

क्रॅबलपासून वेस्टर्न डॉक्सपर्यंतच्या डोव्हर जवळच्या डोउर नदीखोऱ्यात सापडणाऱ्या होलोसीन कालखंडातील दहा हजार वर्षे जुन्या गाळाखाली भरड आणि टोकदार असा अडीच लाख वर्षे जुना गाळ सापडतो. यात अनेक अवजारे आणि प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. जुन्या अश्मिभूत नदीच्या काठी प्राचीन मृदा आणि वीटमृदा (Brickearth) यांच्या अस्तित्वाचे पुरावेही सापडले आहेत. या सगळ्या गोष्टींतून इथल्या प्राचीन पर्यावरणाचा अंदाज येऊ शकतो.

डोव्हरचा सगळा प्रदेश चुन्याचा आहे. त्यावर पूर्वी डोउर नदी वायव्य-आग्न्येय दिशेत वाहत असावी, असे सुचविणारे अनेक पुरावेही इथे सापडतात. एका विलक्षण आणि नाट्यमय भूशास्त्रीय घडामोडीतून डोव्हरचा भूभाग आणि कडा तयार झाला आहे आणि म्हणूनच ब्रिटनसाठी तो महत्त्वाचा भूवारसा ठरला आहे. त्याचे हे भूशास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन त्याची झीज थांबविण्याचे, त्यावरील पुराजीवशास्त्रीय अवशेष सुरक्षित ठेवण्याचे आणि त्यावरील वनस्पती जतन करून ठेवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 

स्थान संदर्भ : 

  • ५१.१३ अंश उत्तर अक्षांश/१.३५ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ११० मीटर 
  • कड्याची लांबी : १३ किमी
  • भूशास्त्रीय वय : ६.५ कोटी वर्षे

संबंधित बातम्या