श्रीलंकेतील अनोखा पर्वताविष्कार...

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

भूवारसा पर्यटन

श्री पद शिखर किंवा ॲडम्स शिखर हा एक  त्रिकोणी आकाराचा २,२४३ मीटर उंचीवरचा पर्वत श्रीलंकेच्या मध्यवर्ती डोंगराळ भागातील प्रसिद्ध पर्वत आहे. भौगोलिक आणि भूशास्त्रीय दृष्ट्या तो वैशिष्ट्यपूर्ण असला, तरी त्याच्या शिखरावर दगडात कोरलेले १.८ मीटर उंचीचे मोठे पदचिन्ह दिसत असल्यामुळे प्रामुख्याने तो विविध धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. 

श्रीलंका बेट तिथल्या मध्यवर्ती आणि दक्षिण भागातील उंच पर्वतांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती भागातील डोंगराळ प्रदेशात कँडी, नुवारा एलीया आणि एला ही शहरे वसली आहेत. अतिशय सुंदर अशा निसर्गसौंदर्याने हा सगळाच प्रदेश नटून गेलाय. क्वार्टझाइट, नीस अशा खडकातून प्रचंड उंचीवरून खाली कोसळणारे ‘रावण धबधब्या’सारखे जलप्रपात, आजूबाजूच्या खडकांत दिसणारे प्रस्तरभंग, खोल नदी पात्रे ही सगळी भूरूपे मध्यवर्ती एला प्रांताची शक्तिस्थाने आहेत. मी आमच्या अभ्यास गटाबरोबर दोन वर्षांपूर्वीच याचा जवळून अनुभव घेतलाय.

श्रीलंकेच्या नैऋत्येकडे आणि मध्यवर्ती भागातील डोंगराळ आणि पर्वतीय भागाच्या सर्व बाजूंना उंचच उंच कडे आहेत. इथली पर्वतांची उंची १,५२५ मीटरपेक्षाही जास्त आहे. एकप्रकारे अनेक उंच पर्वतांनी तयार झालेला श्रीलंकेतील हा एक उंच कड्यांची तटबंदी असलेला महाकाय किल्लाच आहे. या पर्वतीय भागाला २०१०मध्ये जागतिक वारसा समितीने जागतिक वारसा स्थळाचा दर्जाही दिला आहे. याच्या उत्तरेकडच्या भागाला नकल्स (Knuckles) किंवा डुंबारा गटातील पर्वत आहे. त्यात ‘नकल्स शिखर’ हे १,८६३ मीटर उंचीचे ठिकाण आहे. याच्या दक्षिणेला २,१०० ते २,३०० मीटर उंचीवरील ‘होर्टन प्लेन’ व नैऋत्येला ३०० ते २२०० मीटर उंचीवरील ‘पीक विल्डरनेस’ (Peak Wilderness) हे पर्वतीय भाग आहेत. ‘श्री पद’ शिखर या पीक विल्डरनेसमध्ये नैऋत्येकडच्या प्रदेशात आहे.

श्रीलंकेतील सर्वच पर्वत त्यांच्या विविध आणि समृद्ध पारिस्थितिकींसाठी (Ecologies) जगप्रसिद्ध आहेत. दाट जंगले, अनेक नद्यांचे उगम आणि लहानमोठे असंख्य धबधबे यांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. ‘श्री पद’ शिखर (Sri Pada) किंवा ‘ॲडम्स शिखर’ (Adam's Peak) हा एक  त्रिकोणी (Conical) आकाराचा २,२४३ मीटर उंचीवरचा पर्वत श्रीलंकेच्या मध्यवर्ती डोंगराळ भागातील प्रसिद्ध पर्वत आहे. भौगोलिक आणि भूशास्त्रीय दृष्ट्या तो वैशिष्ट्यपूर्ण असला, तरी त्याच्या शिखरावर दगडात कोरलेले १.८ मीटर उंचीचे मोठे पदचिन्ह (Footprint) दिसत असल्यामुळे प्रामुख्याने तो विविध धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. बौद्ध धर्मीय या पदचिन्हाला गौतम बुद्धाचे पदचिन्ह, तर हिंदू त्याला शिवाचे किंवा हनुमानाचे पदचिन्ह मानतात. इस्लाम व ख्रिश्चन पंथीयांसाठी ते अनुक्रमे आदम व सेंट थॉमसचे पदचिन्ह आहे. त्यामुळेच सर्व धर्मीयांचे ते श्रद्धास्थान झाले आहे. 

श्री पद पर्वताचा शिखराचा भाग एक लहानसे पठार असून त्याची लांबी २३ मीटर व रुंदी ७ मीटर आहे. त्याने एकूण १६० चौ.मीटर क्षेत्र व्यापले आहे. या भागात अडीच मीटर उंचीची एक प्रचंड मोठी शिळा आहे आणि हा पर्वताचा सर्वोच्च बिंदू असून इथेच पवित्र पद्मचिन्ह आहे. स्थानिक लोककथेनुसार, खरे पद्मचिन्ह याच शिळेखाली आहे आणि ते अपवित्र होऊ नये म्हणून देवानेच ते मोठ्या शिळेखाली सुरक्षित करून ठेवले आहे.

हे पदचिन्ह अडीच मीटर उंचीच्या शिळेत असून ते १.७ मीटर लांब, बोटांजवळ ७८ सेंमी रुंद आणि टाचेजवळ ७४ सेंमी रुंद आहे. त्याची पितळ वापरून केलेली कड हिऱ्यांनी अलंकृत केलेली आहे. हे पदचिन्ह मानवी पावलासारखे दिसत असले, तरी त्याचा आकार खूपच मोठा आहे. त्यामुळे ते नैसर्गिक आणि कृत्रिमही वाटते.

श्रीलंकेच्या रत्नपुरा आणि नुवारा एलिया जिल्ह्यातील रत्नपुराच्या ईशान्येला आणि हटनच्या नैऋत्येला असलेला हा पर्वत दाट जंगलांनी भरून गेलेल्या आजूबाजूच्या अनेक लहान टेकड्यांच्या समूहात एकमेव उंच पर्वत आहे. श्रीलंकेतील मध्यवर्ती गिरिपिंडाभोवतीच्या (Massif) दक्षिण प्रदेशात याचे स्थान असून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश निर्मनुष्य आडरान (Wilderness) आहे.     

 श्री पद शिखर ज्या पर्वतरांगेवर आहे, तिच्या पूर्वेला अतिशय सुंदर अशी मस्केलिया ओया, केहेलगामुआ ओया आणि केलनी ही तीन नदी खोरी आहेत. श्री पद शिखराचा भाग केलनी, वाळवे आणि कालूगंगा या नद्यांचे उगमस्थान आहे. श्रीलंका ज्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ज्यामुळे श्रीलंकेला रत्नद्वीप असे म्हटले जाते, ते पाचू, नीलम दगड आणि माणिक असे मौल्यवान खडक या पर्वताच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर मिळतात.   

खडकातील कमी जास्त उंचीच्या हजारो पायऱ्या चढून दोन ते तीन तासांत पर्वताच्या शिखरावर पोचता येते. मात्र इतकी उंची चढत असताना तापमानात आणि वाऱ्याच्या वेगात होणारे बदल सतत जाणवत असतात. पर्वताच्या पायथ्यापासून वर येणारे ढग आणि माथ्यावरचा वेगवान वारा यामुळेही पर्वताचे वेगळेपण लक्षात येते. श्रीलंकेतील सर्वोच्च उंचीचा पर्वत आहे पिद्रुतलागला किंवा माउंट पेड्रो. त्याची उंची आहे २,५२४ मीटर. हा पर्वत श्री पद शिखराच्या पायथ्याशी असलेल्या डलहौसी पुलापासून  ईशान्येला ८० किमी अंतरावर आहे. मधला सगळा प्रदेश खोल घळया, धबधबे, निबिड अरण्ये आणि डोंगरांनी दुर्गम झाला आहे. अनेक वर्षे श्री पद हाच श्रीलंकेतील सर्वात उंच पर्वत असल्याचे मानले जात होते, पण प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर तसे नसल्याचे लक्षात आले. 

ता. २६ एप्रिल १८१५ रोजी या पर्वतावर लेफ्टनंट विल्यम माल्कम यांनी सर्वप्रथम आरोहण केले.  १२९८मध्ये इटालियन व्यापारी मार्को पोलोने त्याच्या प्रवास वर्णनात या पर्वतावर कोणतेही पदचिन्ह असल्याचे म्हटलेले नाही, मात्र १८१७मध्ये जॉन डॅव्ही यांनी आपण तिथे फार मोठ्या आकाराचे एक पदचिन्ह एका दगडात कोरलेले पाहिले असल्याचा उल्लेख केला आहे. 

मस्केलिया गावाहून जाणारा हटन मार्ग आणि कुरुविता गावाजवळून जाणारा रत्नपुरा मार्ग, हे शिखराकडे  जाणारे दोन मार्ग पुरातन काळातील मार्ग होते आणि ते राजेमहाराजे वापरीत असत. आज श्री पद पर्वत चढण्यासाठी सहा मार्ग उपलब्ध आहेत, मात्र ते सगळेच खडतर मार्ग आहेत. श्री पद शिखर चढणे म्हणूनच सगळ्यांना जमत नाही. 

श्रीलंकेच्या मध्यवर्ती पर्वतमय प्रदेशात असलेल्या एला (Ela) या नितांतसुंदर शहरापासून दोन किमी अंतरावर ‘लिटल ॲडम्स पीक’ किंवा ‘लघु श्री पद’ नावाचे १,१४१ मीटर उंचीवर एक ठिकाण आहे. तिथे अनेकांना सहजपणे जाणे शक्य होते. आकर्षक निसर्ग आणि तिथून दिसणारा मनमोहक सूर्यास्त यासाठी हे ठिकाण मुख्य श्री पद शिखराइतकेच प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या