‘अ ड्रीम कम्स ट्रू!’

डॉ. हितेंद्र महाजन, नाशिक
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

‘रॅम’ हे आमच्यासाठी सत्यात उतरलेले स्वप्न आहे. फेब्रुवारी २०१४मध्ये आम्ही ‘डेक्कन क्लिफहँगर’ स्पर्धा जिंकून ‘रॅम’मध्ये भाग घेण्यास पात्र झालो तेव्हापासूनच ह्या स्वप्नाने आमच्या मनात घर केले होते.

ता. २८ जून २०१५. पहाटेचे तीन वाजले होते. ठिकाण, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील अॅनापोलिस. ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’चे (रॅम) शेवटचे दोन मैल. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण डोळ्यासमोर येऊन ठेपलेला. एकीकडे अफाट आनंद तर दुसरीकडे आनंदाश्रू प्रयत्न करूनही थांबत नव्हते. गेले नऊ महिने टीमने घेतलेले कष्ट आणि गेल्या आठ दिवसातला ऊन, वारा, पाऊस, जखमा, अपुरे जेवण, अपुरी झोप कशाचीही पर्वा न करता ध्येयप्राप्तीसाठी केलेला खडतर प्रवास डोळ्यांसमोरून सरता सरत नव्हता. बघता बघता आम्ही जगातील सर्वात अवघड व खडतर अशा रॅम स्पर्धेची फिनिश लाईन पार केली. रॅमची फिनिश लाईन ओलांडणारे आम्ही पहिले भारतीय ठरलो. स्पर्धा आम्ही फक्त दिलेल्या वेळेच्या नऊ तास अगोदर पूर्ण केली नव्हती, तर या स्पर्धेतल्या १८ ते ५० वयोगटातल्या ‘ऑल मेन टीम ऑफ टू’ प्रकारात आम्ही प्रथम क्रमांक पटकावला होता. 

आम्ही दोघे सख्खे भाऊ. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रातील. एकाच घरात राहतो व योगायोगाने आमचे छंदही सारखेच. मी हितेंद्र, अॅनेस्थेशियालॉजिस्ट, भूलतज्ज्ञ; आणि महेंद्र माझा लहान भाऊ हा डेंटिस्ट, दंतरोग तज्ज्ञ. बरीच वर्ष ट्रेकिंग व मॅरॅथॉन रनिंग केल्यानंतर गेली काही वर्षे आम्ही सायकलिंग करीत आहोत. कुठलाही खेळ असो, सतत मोठे लक्ष्य ठरवून त्याला गवसणी घालणे हा आमचा छंद. कुठलेही यश प्राप्त करायचे असेल तर ध्येय दृष्टिपथात ठेवून सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा. निश्चित लक्ष्य असले तरच सरावात सातत्य राहून यशप्राप्ती सोपी होते. 

गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून अमेरिकेत होत असलेली सायकलिंग क्षेत्रातली सर्वात अवघड, लांब पल्ल्याची व माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अक्षरशः अंत पाहणारी स्पर्धा म्हणजे रॅम. तीन हजार मैलांचे अंतर नऊ दिवसात पार करण्याचे आव्हान असणाऱ्या या स्पर्धेची गणना ‘टॉप टेन एक्स्ट्रीम चॅलेंजेस ऑफ दी वर्ल्ड’मध्ये होते. स्पर्धेची सुरुवात पॅसिफिक महासागराच्या म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील ओशनसाइड गावापासून होते, आणि वाळवंट, बर्फाच्छादित डोंगर रांगा, वादळी वारे आणि कोसळणाऱ्या पावसाचा सामना करून ती संपते अॅटलाटिंकच्या म्हणजे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील अॅनापोलिसमध्ये. स्पर्धकाला एकंदर एक लाख सत्तर हजार फुटाची चढाई करावी लागते. प्रत्येक स्पर्धकाला व त्याच्या प्रत्येक टीम मेंबरला रेसच्या नियमांबरोबरच अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळावे लागतात, अन्यथा टीमला वेळेच्या स्वरूपात पेनल्टी दिल्या जातात. सहाव्या पेनल्टीला टीम स्पर्धेतून बाद केली जाते. 

रॅमचे स्वप्न आम्ही पाहिले याची कारणे दोन. पहिले कारण म्हणजे या स्पर्धेतला कठीणपणा. जितके कठीण टार्गेट तितक्या जास्त आनंदाची प्रचिती. दुसरे कारण म्हणजे त्यावेळपर्यंत भारतीय तिरंगा ध्वज रॅममध्ये कधी फडकला नव्हता. या पूर्वी दोन भारतीयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, पण ते स्पर्धा पूर्ण करू शकले नव्हते.

सुरुवात म्हणून मी जून २०१४मध्ये अॅटलांटाच्या टीम सोबत नॅव्हिगेटर म्हणून सहभागी झालो. स्पर्धेचे नियम, अमेरिकेतील विविध राज्यातील वाहतुकीचे नियम, संपूर्ण मार्ग, वातावरणातील बदल, लागणारा लॉजिस्टिक सपोर्ट याची संपूर्ण माहिती मिळवली. सपोर्ट क्रू टीमचे महत्त्व इथे लक्षात आले. 

सप्टेंबर महिन्यापासून आमचे प्रशिक्षण सुरू झाले. दररोज तीन तास व रविवारी पंधरा ते अठरा तास. पहिले तीन महिने ‘लाँग डिस्टन्स एन्ड्यूरन्स’ अर्थात सलग न थांबता लांबपर्यंत सायकल चालवता येणे, नंतरचे तीन महिने ‘स्ट्रेंथ बिल्डअप ट्रेनिंग’ अर्थात लांब पल्ल्यासाठी लागणारी ताकद वाढवणे व शेवटचे तीन महिने ‘इंटेन्सिटी ट्रेनिंग’ अर्थात कमीत कमी वेळात अतिशय वेगात सायकल चालवून जास्तीत जास्त अंतर कापायचे याप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन होते. भूलतज्ज्ञ असल्यामुळे माझी चांगलीच तारांबळ उडायची. मी कधी सकाळी तर कधी रात्री सराव करायचो. बऱ्याच वेळेला तर हॉस्पिटलला इमर्जन्सी असल्यामुळे सराव मधेच सोडून यावे लागायचे. काम झाले की मी परत सरावासाठी जायचो. महिंद्रचा क्लिनिक टाइम फिक्स असल्यामुळे त्याचा सराव सकाळी असायचा. मात्र कुठल्याही परिस्थितीत रोजचा सराव ठरल्याप्रमाणे झालाच पाहिजे ह्याकडे आमचे विशेष लक्ष असायचे. रॅमच्या मार्गावर खूप चढ उतार असल्यामुळे रविवारी कसारा घाटात पाच ते सहावेळा वर खाली करायचो. सुरुवातीला कसारा घाट चढायला आम्हाला ३५ मिनिटे लागायची, तोच घाट नंतर आम्ही अवघ्या एकोणीस मिनिटात चढायला लागलो. 

स्पर्धेचे तीन हजार मैल (४८६० किलोमीटर) नऊ दिवसात पार करायचे होते. त्यासाठी रोज साधारण ६०० ते ७०० किलोमीटर अंतर पार करणे भाग होते आणि असे सलग नऊ दिवस करावे लागणार होते. आमची स्पर्धेतली एंट्री ‘टीम ऑफ टू’ या प्रकारात असल्यामुळे आम्हा दोघा भावांना ‘रिले फॉरमॅट’मध्ये आळीपाळीने पण सतत सायकल चालवत ही स्पर्धा पूर्ण करायची होती. ‘ट्रेन, पेन अँड गेन’ ह्यावर आमचा ठाम विश्वास असल्याने ऊन-पाऊस, दिवस-रात्र कशाचीही परवा न करता आणि दवाखान्याची व घरची सर्व जबाबदारी सांभाळून आमचा दोघांचाही सराव आखल्याप्रमाणे तंतोतंत सुरू होता. कुठल्याही एन्ड्यूरन्स क्रीडा प्रकारासाठी शारीरिक क्षमतेच्या बरोबरीने, किंबहुना थोडी जास्तच मानसिक क्षमतेची गरज असते. त्यामुळे मानसिक क्षमता वाढविणाऱ्या प्रशिक्षणावरही आमचा विशेष जोर होता. ‘रॅम’ सारख्या अतिशय अवघड स्पर्धेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी स्पर्धक थकतो. त्यामुळे तिसऱ्या दिवसानंतर सायकल चालणार होती ती मनाच्या ताकदीवर.

आमच्याप्रमाणेच आम्हाला मदत करणाऱ्या क्रू टीमची तयारीही तितकीच महत्त्वपूर्ण होती. कारण स्पर्धेदरम्यान त्यांनी जरी चूक केली तरीसुद्धा टीमला पेनल्टी मिळणार होती. ‘राइडिंग स्ट्रॅटेजी’ म्हणजे स्पर्धेदरम्यान वातावरण व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून मी व महेंद्रपैकी कोण किती वेळ सायकल चालवणार याचे नियोजन करणे व ‘क्रू एक्स्चेंज’ म्हणजे टीममधील सदस्यांनी करायची कामे व त्यांची अदलाबदल करणे याचे नियोजन तितकेच महत्त्वाचे होते. सहा दिवस नऊ तासांत स्पर्धा संपवायच्या दृष्टीने आमची तयारी चालली होती. यासाठी सायकलीच्या सरासरी ताशी वेगाची गणना केली. हा वेग गाठण्याकरिता माझे व महेंद्रचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स, स्ट्रेंथ व विकनेसेस् लक्षात घेऊन कोणी कुठे किती सायकल चालवायची याचे नियोजन केले गेले होते. उदाहरणार्थ, मी थंडीपेक्षा ऊन सहन करू शकतो आणि त्याउलट महेंद्र उन्हापेक्षा थंडी. त्यामुळे मी वाळवंटात व महेंद्रने बर्फाळ प्रदेशात जास्त सायकलिंग करायचे असे ठरले. नियोजन व्यवस्थित असेल तर अर्धी लढाई जिंकलेलीच असते, त्यामुळे आमचा नियोजनावर खूप जोर होता.

तयारी बरोबर दिशेने जात आहे हे सांगणारे कोणीही नव्हते. म्हणून मग फेब्रुवारी महिन्यात आम्ही स्वतःचीच परीक्षा घ्यायचे ठरवले. यासाठी मी व महेंद्रने ‘रॅम’ स्पर्धेच्या नियमांनुसार सलग ७२ तास आळीपाळीने सायकल चालवली. नाशिक-शहापूर-नाशिक व नाशिक-शिरपूर-नाशिक या रस्त्यांवर प्रत्येक फेरीला कसारा घाट किमान दोन वेळा चढून ७२ तासात आम्ही १९०० किलोमीटर अंतर पार केले. या ‘सिम्युलेशन राइड’मध्ये आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला ‘रॅम’ स्पर्धेच्या नियमांनुसार मदत केली, त्यामुळे त्यांचाही सराव झाला. नेमक्या याच वेळेस महाराष्ट्रभर वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला. फेब्रुवारीत असा पाऊस ध्यानीमनी नसल्याने आमची काहीही तयारी नव्हती. पण परिस्थितीला तोंड देत आम्ही सायकलिंग चालू ठेवले. जणू अचानक आलेल्या धो धो पावसाने आमच्याकडून ‘रॅम’ स्पर्धेमध्ये अशा अचानक येणाऱ्या संकटांवर कशी मात करायची याची रंगीत तालीमच करून घेतली.

***

स्पर्धेसाठी अमेरिकेत ओशनसाइड येथील हॉटेलला पोचताच सर्वचजण कामाला लागले. ’जेटलॅग’ काय असतो हे अनुभवायलासुद्धा कोणाला वेळ नव्हता. सायकल फिटिंग होणे महत्त्वाचे होते, कारण दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेत सराव करायचा होता. अमेरिकेतल्या वाहतूक नियमांची ओळख होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूने सायकल चालवायची सवय होणे, हे या सरावाचे मुख्य कारण होते. आमच्या बरोबर आमच्या सपोर्ट टीमचाही सराव सुरू झाला. 

मी आणि महेंद्र स्पर्धेला एकत्र सुरुवात करून पहिले चार मैल, म्हणजे परेड झोनचे अंतर सोबत पार करणार होतो. त्या नंतरचे वीस मैलांचे अंतर मी एकट्याने पार करायचे ठरले होते. त्याप्रमाणे माझी फॉलो कार सोबत असणार व महेंद्रची फॉलो कार चार मैल अंतर झाल्यावर त्याला वीस मैल पुढे घेऊन जाणार होती. त्याप्रमाणे सर्व क्रूने आपापली जबाबदारी समजून घेत आपापली जागा घेतल्या. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कुठलीही चूक परवडणारी नव्हती याची सर्वांना जाण होती.

***

वीस जूनला रेस डायरेक्टरने आम्हाला जीपीएस ट्रॅकर दिल्यावर काउंट्डाउनला सुरुवात झाली. दहा, नऊ.... तीन, दोन, एक... आणि अख्ख्या टीमने जोरात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर केला! आमच्या स्पर्धेला सुरुवात झाली. 

स्पर्धा पूर्ण करायला नऊ दिवस दिलेले असले तरी ८६० मैलांवरच्या दुरांगो गावापर्यंत एकसष्ट तासांत पोचणे बंधनकारक असते. ह्या पहिल्या कटऑफ लाइनपर्यंत पोचायला पंधरा मिनिटे उशीर झाला तरी टीम स्पर्धेतून बाद होते. अॅरिझोना ओलांडताना उन्हामुळे आम्हाला हवी तशी गती पकडता आली नव्हती. एका क्षणी, पहिल्या कट ऑफसाठी दुरांगोला पोचायला आम्हाला तेरा तासात दोनशे मैल पार करायचे होते. इथे आम्ही राइडिंग स्ट्रॅटेजीत बदल करून सरासरी वेग वाढवायचे ठरवले. मी व महेंद्रने प्रत्येक पाच मैलांवर अदलाबदल करून वेगात सायकल चालवायचे ठरवले. यामुळे लगेच फरक पडला. 

स्पर्धेतला कुठला ना कुठला दिवस अतिशय त्रासदायक असणार आम्हाला कल्पना होती. त्यासाठी आम्ही मनाची तयारीही केली होती आणि नेमका पाचवा दिवस आमच्याकरिता ‘वाईट’ दिवस ठरला. मिसुरी राज्यात शिरताच आमचे स्वागत मुसळधार पावसाने केले. रस्त्यात चार वेळा मिसिसिपी नदी ओलांडावी लागत होती. त्यात दोन ठिकाणी पुलावरून पाणी वाहत होते, त्यामुळे ऐन वेळेला स्पर्धेचा मार्ग बदलला गेला. पण आमच्या नॅव्हिगेटरनी अत्यंत शांतपणे शेवटच्या क्षणी झालेला मार्गबदल समजावून घेऊन आम्हाला योग्य ठिकाणी पोचवले. संपूर्ण रेसमध्ये फक्त एकदाच महेंद्रची सायकल पंक्चर झाली आणि ती पण त्याच दिवशी. महेंद्रच्या फॉलो कारचे टायर त्याच दिवशी पंक्चर झाले. त्याच रात्री पावसाचा जोर खूप वाढल्यामुळे आणि व्हिजिबिलिटी अक्षरशः तीन मीटरपर्यंत कमी झाल्याने दोनदा आम्हाला तीन तीन तास एकाच जागेवर थांबून राहावे लागले होते. ह्यासाठी कुठलाही वेगळा वेळ मिळत नाही, पण सुरक्षेच्या दृष्टीने अशा वेळेला थांबणे हिताचे असते. त्याच रात्री जोरदार पावसामुळे आंतरराज्य महामार्गावर आमच्या तिसऱ्या गाडीचा अपघात झाला. सुदैवाने कोणाला खरचटलेसुद्धा नाही. 

***

सातव्या दिवशी संपूर्ण रेसमध्ये सर्वात अवघड समजला जाणारा फोर सिस्टर्स हा सेक्शन पार करायचा होता. सर्व क्रूने मिळून फोर सिस्टर्स कमीत कमी वेळात पार करायची एक स्ट्रॅटेजी ठरवली. प्रत्येक चढावर मी व महेंद्रने आळीपाळीने ३०० ते ४०० मीटर फास्ट चढायचे व संपूर्ण उतार महेंद्रने उतरायचा असे ठरवले. क्रू मेंबर तिरंगा ध्वज घेऊन कधी सोबत पळून, तर कधी ओरड़ून आम्हाला प्रोत्साहन देत होते. या स्ट्रॅटेजीमुळे अवघ्या दोन तासात फोर सिस्टर्सचा सर्वात अवघड टप्पा आम्ही पार केला. 

आता रेस संपल्यात जमा झाली होती. इथून पुढे फक्त दिडशे मैल अंतर बाकी होते व त्यासाठी आमच्या हातात अजून चोवीस तास होते. ‘टीम ऑफ टू - १८ ते ५० वयोगट’ कॅटेगरीत कुठलीही कॉम्पिटिटर टीम आमच्या जवळपाससुद्धा नव्हती, हे एव्हाना आमच्या लक्षात आले होते. गेले आठ दिवस संपूर्ण टीम रेस वेळेच्या आत पूर्ण करायच्या तणावाखाली होती. शेवटचे दिडशे मैल आम्ही जरा आरामात, मेरीलँड राज्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळत पार करायचे ठरवले. गेल्या आठ दिवसांचा प्रवास डोळ्यांपुढे तरळत होता. अॅरिझोना वाळवंटातील ४८ डिग्री तापमान, कोलोरॅडोचे उंच बर्फाच्छादित डोंगर, कॅन्सास पठारावरचा उत्तरेला सुसाट वाहणारा वारा, मिसुरी राज्यातील वादळी पाऊस, मेरीलँड राज्यातील आपलाँचेन डोंगरातील सारखा वर खाली जाणारा रस्ता व गारठून टाकणारी थंडी आणि पाऊस. फर्स्ट कट ऑफ लाइन पकडण्याच्या नादात उटाह राज्यात उतारावर झालेला फॉल, अंगभर झालेल्या जखमा आणि उजव्या हाताच्या बोटाचे निखळलेले नख, चुकलेला रस्ता, दिवसाला मिळेल तेव्हा व मिळेल तिथे फक्त तीन तास झोप घेऊन सर्व क्रू मेंबर्सनी घेतलेले कष्ट, वर्षभरापासून घरच्यांनी, मित्रांनी दिलेली साथ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नाशिकच्या सायकल प्रेमींनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी काढलेली सायकल रॅली, व्हॉटस्अॅप आणि फेसबुकवर येणारे शुभेच्छापर संदेश... मन या सर्व विचारांचा सुखद अनुभव घेत असताना पाय मात्र सायकलचे पॅडल फिरवत होते. 

***

शेवटचे शंभर मीटर. सर्व क्रू मेंबर हातात तिरंगा फडकवत ‘भारत माता की जय’ घोषणा देत होते. आठ दिवस चौदा तासात आम्ही मोठ्या जल्लोषात अॅनापोलिस येथील टाइमलाइन पार केली. गेले आठ दिवस एकमेकांना क्षणोक्षणी वेगवेगळ्या सूचना देणारे आमचे क्रू मेंबर्स आणि आम्ही रायडर्स अचानक शांत झालो. कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हता. पण सर्वांच्या चेहऱ्यावर ‘येस, वी डिड इट’चे समाधान होते. 
त्या वर्षी खूपच खराब वातावरणामुळे कुठलाही रेकॉर्ड होऊ शकले नाही. रेकॉर्ड तर सोडाच पण बऱ्याच टीमना स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्णसुद्धा करता आली नाही.  
टाइमलाइन फिनिशला रेसचे आयोजक तुम्हाला घ्यायला येतात व पुढचे आठ मैल अंतर अॅनापोलिस गावातून परेड फॉर्म म्हणजेच फेरीच्या स्वरूपात घेऊन जातात. अमेरिकेसारख्या देशात, पुढे आयोजकांची पायलट कार, त्यांच्या मागे सायकलवर मी व महेंद्र व आमच्या मागे आमच्या क्रू मेंबर्सच्या फॉलो कार्स. तिरंगा फडकवत त्या ऐतिहासिक गावातून जाताना उर भरून आला. 

मित्रांनो, आम्ही दोघा भावांनी ही रेस जिंकली असली तरी याचे संपूर्ण श्रेय आमच्या क्रूला, आमच्या आत्मविश्वासात भर घालणाऱ्या प्रशिक्षकांना, सर्व ती मदत करणाऱ्या मित्रांना व आमच्या कुटुंबीयांना जाते. 

अमेरिकेत ही स्पर्धा सुरू असताना नाशिकमध्ये पण एक स्पर्धा चालू होती. आदिवासी बांधवांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याची. आम्ही जे काही करतो त्यातून समाजाला काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. रॅम स्पर्धेदरम्यान कल्पतरू फाउंडेशनच्या टीमने ठरल्याप्रमाणे २८८ ऐवजी ३७२ शस्त्रक्रिया करून आमचे ‘टीम इंडिया व्हीजन फॉर ट्रायबल्स’ हे नाव सार्थ ठरवले. 

आमच्या संपूर्ण टीमसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता, जो आमच्या आयुष्याचा ठेवा झाला आहे.

संबंधित बातम्या