सायकलींचा विलक्षण संग्रह

गौरी पेंडसे
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

‘सायकलींचे शहर’ ही पुण्याची फार पूर्वीपासूनची आणखी एक ओळख. आताच्या काळात जरी आजूबाजूला स्वयंचलित दुचाक्यांचे राज्य दिसत असले तरी सायकलबद्दलचा पुणेकरांच्या मनातला जिव्हाळा उणावलेला नाही. सायकल प्रेमींसाठी पर्वणी असणारे ‘विक्रम  पेंडसे सायकल म्युझियम’ हादेखील या जिव्हाळ्याच्याच एक आविष्कार!

दुचाकी हा विक्रम पेंडसे यांच्या आवडीचा विषय. त्या आवडीतून विक्रम दुचाकी दुरुस्तीच्या व्यवसायात उतरले, त्यात उत्तम जम बसविला. दुचाक्यांचा स्नेह आणि व्यवसायातून मिळणारा अनुभव यातून त्यांना अत्यंत वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण दुचाकींच्या संग्रहाची वाट सापडली. याच वाटेवर त्यांना काही जुन्या, वैशिष्ट्यपूर्ण सायकली भेटल्या आणि विक्रम आजवर फार कोणी न केलेल्या संग्रहाकडे वळले. त्यांनी सायकली ‘जमवायला’ सुरुवात केली आणि हा माणूस त्यात रमून गेला. संग्रह वाढत गेला आणि जुन्या सायकली आणि दुचाकींसोबतच इतरही अनेक जुन्या, वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही त्यांच्या संग्रहात सामील झाल्या.

विक्रम पेंडसे सायकल म्युझियममध्ये देशी आणि विदेशी बनावटीच्या जवळजवळ दिडशे सायकली पाहायला मिळतात. पाहणाऱ्याला जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या सायकली त्यात आहेतच, पण सायकलींच्या बदलत्या ट्रेंडशी नाते सांगणाऱ्या नव्या सायकलीही आहेत. १८ गियर्सची रेसिंग सायकल, हॅण्डल लॉक करता येणारी, फक्त पॅडल उलटे फिरविल्यावर ब्रेक लागणारी, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैनिकांसाठी तयार केलेली पॅराशूटने विमानातून उडी मारताना बरोबर घेण्याची फोल्डिंगची आणि बंदूक अडकविण्याची सोय असलेली सायकल, १९१४ची तीन गियरची सनबीम सायकल -ही या म्युझियममधली सर्वात जुनी सायकल, बुलेटसाठी माहिती असणाऱ्या रॉयल एन्फिल्ड कंपनीची सायकल अशा विविध नमुन्यांबरोबर लहान मुलांसाठी खास बनवलेल्या विविध सायकलीही येथे पाहायला मिळतात. 

ही यादी इथेच संपत नाही. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये दोघेजण एकत्र चालविताना पाहायला मिळणारी दुर्मीळ टँडम सायकल, बाजूबाजूला मोठ्या सीटवर बसून दोघांनी एकत्र चालवायची, उभे राहून चालवायची, सर्वात हलकी रेसर सायकल, माणसांनी ओढायची कोलकात्याच्या रस्त्यांवरची सायकल रिक्षा, हॅण्डलमध्येच टूल्स ठेवायची सोय असलेली अशाही सायकली इथे आहेत.

सायकलींव्यतिरिक्त असंख्य जुन्या दुर्मीळ वस्तूची मांडणी कलात्मकतेने येथे केली आहे. सायकलींच्याबरोबर ‘आवश्यक’ या सदरात इतरही अनेक वस्तू येतात. हवा भरण्याचे विविध प्रकारचे पंप, सायकलींच्या सीट्स, बेल्स, हॉर्न्स, दिवे, मोनोग्राम्स, मागचे दिवे, दुरुस्तीची हत्यारे, टूलबॉक्स, डायनॅमो, बॅटरीज, सायकलींच्या जुन्या जाहिराती असे सायकलींचे असंख्य नातेवाईक येथे हजर आहेत. मनाला भुरळ घालणाऱ्या या सगळ्या सायकली आकर्षकपणे मांडल्या आहेतच, पण येथे तंतोतंतपणे उभे केलेले सायकल दुरुस्तीचे दुकानही पाहण्यासारखे आहे. या सर्वांना जोड लाभली आहे ती शंभर वर्षे जुन्या आणि उत्तम अशा संबंधित छायाचित्रांची.

सायकलींच्या जोडीनेच लक्ष वेधून घेतात त्या १९३४, १९४७ आणि १९५१ सालच्या तीन ऑस्टिन मोटारी आणि त्यांच्या बरोबरीने नॉर्टन, एरिअल, जावा, यझदी, व्हेस्पा, बॉबी राजदूत, लॅंब्रेटा, लुना आणि अगदी टीव्हीएस50 अशा वीसेक दिमाखदार स्वयंचलीत दुचाक्याही. दुचाकींच्या या ताफ्यातील ओरिजिनल रंगातील यामाहा आरएक्स Rx100 आणि इंडसुझूकीही जाणकारांच्या नजरेत भरतात. 

रॉकेलवर चालणार पंखा, मूव्ही बायस्कोप, असंख्य प्रकारचे दिवे, जुन्या काळी घरात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू, बाटल्या, रेडिओ, ऍशट्रे, हिप फ्लास्क्स, पाइप्स, घड्याळे, खेळणी, वजने-मापे-तराजू, टाइपरायटर्स, जुनी कुलपे, पानसुपारीचे डबे इत्यादी जुन्या वस्तू आजही येथे दिमाखात उभ्या आहेत. जुन्या काळातील लोखंडाची अखंड इस्त्री (थेट विस्तवावर गरम करून वापरण्याची) येथे पाहायला मिळते. त्याच बरोबर कोळशावर चालणारी आणि धुरांडे असलेली, रॉकेलवर चालणारी आणि चक्क कुकिंग गॅसवर चालणारी अशा विविध इस्त्रीही येथे पाहता येतात.  पेंडसे यांच्या संग्रहातल्या सायकली आणि इतर वस्तू बघताना प्रत्येकाच्याच मनात प्रश्न येतो की हे सगळे कुठून आणि कसे जमा केले असेल. म्युझियममधल्या प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र इतिहास आहे आणि त्या वस्तू विक्रम पेंडसेंच्या संग्रहात कशा आल्या त्याचाही प्रत्येक वस्तूचा एकएक किस्सा आहे. 

एका गॅरेजवाल्या मित्राकडून विक्रमना ढवळे यांच्याकडील मोठ्या तीन चाकी सायकलबद्दल कळले. लगेच विक्रम ती बघायला गेले. इंग्लिश मेकची जेम्स कंपनीची, १९२४ सालातली, मोठ्या माणसांनी वापरायची तीन चाकी सायकल ढवळे यांच्या गॅरेजमधे छताच्या खुंटीला टांगलेली होती. अर्थात ती वापरात नव्हती, पण ‘ही सायकल विकायची असेल तर मला हवी आहे’, असे विक्रमनी त्यांना सांगितले. त्यावर ‘तसा काही विचार नाही’, असे ढवळे यांचं उत्तर. ही अतिशय दुर्मीळ अशी सायकल हातून जाऊ नये म्हणून विक्रम सतत ढवळे यांच्याशी संपर्क ठेवून होते. साधारण वर्षभरानंतर ढवळे यांनी स्वत: फोन करून विक्रमना सायकल घेऊन जायला सांगितली.

म्युझियममध्ये प्युजो कंपनीची एक दिमाखदार रेसर सायकल पाहायला मिळते. ही सायकल विक्रमना एक इमारतीच्या जिन्याखालच्या अडगळीत दिसली. इमारतीत चौकशी करून ते सायकलच्या मालकांच्या घरी गेले. ज्याच्यासाठी ती महागडी सायकल घेतली होती तो उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला होता. मुलाच्या हौसेखातर घेतलेली सायकल विकायचा प्रयत्न त्याच्या आईनी केला होता. पण त्या बारीक रिमच्या सायकलसाठी योग्य टायर न मिळाल्यामुळे ती साभार परत आली होती. सायकलबद्दल विचारायला असता मालकीणबाईंनी निक्षून सांगितले, ‘७५० रुपये द्या आणि सायकल घेऊन जा. आणि नंतर पार्ट्स मिळाले नाहीत, म्हणून परत आणायची नाही.’ ‘टूर द फ्रान्स’ सारख्या रेसमध्ये वापरली जाणारी ही सायकल अशा पद्धतीने म्युझियममध्ये दाखल झाली. डहाणूकर कॉलनीतल्या जावडेकरांकडून विक्रमनी एक लहान मुलांची तीन चाकी सायकल आणि एक दुचाकी सायकल विकत घेतली होती. ह्या दोन्ही सायकली नव्या सारख्या तयार झालेल्या पाहिल्यावर जावडेकर अतिशय खूष झाले. ज्या सायकलवर त्यांच्या मुलांचे लहानपणचे फोटो होते, ती सायकल त्यांनी नातवंडांचे फोटो काढण्यासाठी आवर्जून चार दिवसांसाठी मागून नेली. त्यानंतर जावडेकरांकडून विक्रमना अत्यंत प्रेमानी त्यांच्या वडिलांची १९२४च्या सुमाराची रज कंपनीची अतिशय दुर्मिळ सायकल, १९२० सालचा रेमिंग्टन कंपनीचा टाईपरायटर आणि एक शंभर वर्षंे जुने लाकडी डॉलहाऊस भेट म्हणून दिली. जुन्या सायकली पुन्हा नव्या सारख्या करायच्या म्हणजे त्यांचे पार्ट्स शोघणे आले. त्यामुळे प्रत्येक रविवारी विक्रम जुन्या बाजारात जाणारच. इस्त्रीच्या संग्रहाची सुरूवात जुन्या बाजारातूनच झाली. तिथे त्यांनी एक धुरांडे असलेली जड लोखंडी इस्त्री दिसली. त्या इस्त्रीमुळे त्यांच्या मनात, ही कुठल्या काळातील इस्त्री असेल? घरगुती वापराची असेल की ती व्यावसायीक वापरची असेल, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि ती इस्त्री घरी आली. इस्त्रींमधील वैविध्य जसे दिसत गेले तसा इस्त्रीसंग्रह वाढत गेला.

ह्या सर्व सायकली आणि इतर वस्तू सुस्थितीत आणण्याच्या कामात विक्रम यांना सहकारी पांडुरंग गायकवाड यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. गायकवाड स्वतः एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले सायकलपटू. त्यांच्या कसबी हातांनी या संग्रहालयातील जुन्या वस्तूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून दिले आहे. या मांडणीचे सारे श्रेय प्रदर्शन मांडणीतील तज्ज्ञ अनिल गुजर यांचे. 

आधी म्हटले तसे या म्युझियममधल्या प्रत्येक वस्तूमागे एक किस्सा आहे, पण त्या सगळ्यामागे आहे विक्रम पेंडसे यांची पारखी नजर आणि वस्तूसंग्रहाबद्दलची आत्मीयता. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी आवर्जून पहावे अशा या संग्रहालयाच्या अधिक माहितीसाठी : www.vikrampendsecycles.in

Simply superb! It is fitting that what Poona and now Pune is known for as the city of cycles, has a museum devoted to it. The passion and commitment of it’s curator cum collector cum custodian is exemplary and has to be admired. Hope Pune can now get a motorcycle museum.
- Adil Jal Darukhanwala, Pune (Automotive Journalist & Editor, and Writer)

जुन्या वस्तू आणि विशेषतः सायकली जमा करणे, त्या पुन्हा मूळ स्थितीत जतन करणे, त्यांचा अभ्यासपूर्ण आणि सुसंगत संग्रह मांडणे हे खरेतर भगवान विश्वकर्म्याचेच काम! विक्रम पेंडसे, आपण हे काम इतके अप्रतिम केले आहे की ते मोजक्या शब्दात मांडणेही अशक्य! हा संग्रह अधिकाधिक संपन्न होवो, वाढत राहो!
- मकरंद करंदीकर, अंधेरी पूर्व, मुंबई (दिव्यांचे संग्राहक)

आज अप्रतिम संग्रह पाहण्याचा योग आला. सायकलींचा व इतर दुर्मीळ वस्तूंचा संग्रह पाहून, एका जिद्दी आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्वाच्या संग्राहकाचा संग्रह पाहून खूप समाधान वाटले. ही वाट किती बिकट आहे याचा मी गेल्या अनेक दशकांपासून अनुभव घेत आहे. अवर्णनीय! अद्वितीय! अनंत शुभेच्छा!
- मोतीराम जठार, नाशिक (विश्वसमाचार पत्र संग्रहालय, नाशिक)

संबंधित बातम्या