सायकलींमधली विविधता

ज्योती बागल 
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

सायकल हे वाहन अगदी कोणालाही खरेदी करता येऊ शकते. मात्र सायकल खरेदी करताना कोणती सायकल घ्यावी? कोणत्या कंपनीची, ब्रँडची सायकल चांगली असेल? गिअरची की नॉन गिअरची, सध्या जास्त मागणी कशाला आहे? सध्याच्या किमती काय आहेत? लहान मुलांसाठी कोणत्या सायकल आहेत? असे अनेक प्रश्‍न पडतात. त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न...

सायकल म्हणजे सदा सर्वकाळ उपयोगी पडणारे वाहतुकीचे एक महत्त्वपूर्ण साधन. सध्या कोरोनामुळे लोकांनी आरोग्याकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केल्यामुळे किमान व्यायामाचा भाग म्हणून का होईना, अनेकांनी नियमित सायकल चालवायला सुरुवात केलेली दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासही हातभार लागत आहे. शारीरिक फायद्यांमुळे लोकांनी सायकलिंगकडे पुन्हा एकदा नव्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली आहे असे म्हणता येईल.    

काही वर्षांपूर्वी लेडीज, जेन्ट्‌्स आणि मुलांसाठीच्या सायकल अशी सरळ विभागणी असायची. मात्र आता युनिसेक्स सायकलींचे प्रमाण वाढले असल्याने लेडीज-जेन्ट्‌्स सायकल हा प्रकार खूप कमी झाला आहे. युनिसेक्स सायकल मुले-मुली, तरुणांपासून ज्येष्ठांना चालवता येईल अशा प्रकारे डिझाईन केलेली असते. याचबरोबर अलीकडच्या चार-पाच वर्षांत, रोड बाईक, हायब्रीड बाईक, माऊंटन बाईक, रोडस्टर बाईक अशी सायकलची विभागणी झालेली पाहायला मिळते.  

रोड बाईक वजनाने अतिशय हलकी असल्याने शर्यतींमध्ये भाग घेण्यासाठी, तसेच लांबच्या प्रवासासाठी या सायकली म्हणजे उत्तम पर्याय ठरतो. याचे हँडल शक्यतो खालच्या बाजूस वळलेले असते. एमटीबी म्हणजेच माऊंटन बाईक (सायकल) या ऑफ रोड बायकिंग, ट्रेकिंगसाठी चांगल्या असतात. यांचे टायर नेहमीच्या टायरपेक्षा जाड आणि रुंद असल्याने डोंगराळ भागात सायकल चालवताना बॅलन्स करणे सोपे जाते. हायब्रीड बाईक्स वजनाने हलक्या आणि माध्यम आकाराचे टायर असल्याने डांबरी रस्त्यावर चालवण्यासाठी चांगल्या फायदेशीर ठरतात. रोडस्टर म्हणजे नेहमीची साधी सायकल. वरील तीन प्रकारांपेक्षा ही सायकल नक्कीच स्वस्त असते आणि रोजच्या वापरासाठीही जास्त उपयुक्त ठरते.     

सध्या बाजारात उपलब्ध असलेले सायकलींचे प्रसिद्ध ब्रँड पाहिले तर यामध्ये हिरो (Hero), ॲटलास(Atlas), फायरफॉक्स (Firefox), हर्क्युलस (Hercules), अवोन (Avon), ह्यूज (Huge), ट्रेक (Trek), कॉसमॉस (Cosmos), जायंट (Giant), बीएसए लेडीबर्ड (BSA Ladybird), मॉन्त्रा (Montra), जीटी (GT), रॅले (Raleigh), कॅनॉनडले (Cannondale), श्विन (Schwinn), स्कॉट (Scott), फुजी (Fuji), सॅन्टा, क्यूब बाईक्स (Cube Bikes), ऑरेंज माऊंटन बाईक्स (Orange Mountain Bikes) हे प्रमुख ब्रँड आहेत. यातील काही अमेरिकी कंपन्या आहेत, मात्र त्यांचे उत्पादन भारतात केले जाते. या सर्व ब्रँडच्या सायकली गिअर आणि नॉन गिअर या दोन्ही प्रकारांत उपलब्ध असून या सर्व सायकली स्टील आणि ॲल्युमिनियमपासून तयार केल्या आहेत. गिअरच्या सायकली साधारण १४ हजारांपासून पुढे घेऊ तशा उपलब्ध आहेत. ब्रँड आणि स्पेसिफिकेशननुसार किमतीत बदल होतात. नॉन गिअर सायकली साधारण ८-९ हजारांपासून पुढे उपलब्ध असून गिअरपेक्षा नॉन गिअरच्या सायकलींना जास्त मागणी असल्याने दिसून येते. मोठ्यांसाठीच्या सायकलमध्ये साईज/हाईट पाहिली, तर २४, २६, २७, २७.५ आणि २९ इंचामध्ये सायकल उपलब्ध असून यात २१, २४, २७ गिअरच्या सायकल आहेत. 

 लहान मुलांसाठीच्या सायकलींमध्ये ग्लोबल आणि लोकल अशा दोन्ही प्रकारच्या सायकली पाहायला मिळतात. यामध्ये मॉन्स्टर, हिरो स्प्रिंट, हिरो स्कायपर, हिरो मिग, हायटेक (BMW), हर्क्युलस डायनामाइट, रोव्हर २०टी, ओमोबाईक्स, हिरो डिजनी ब्रँड, अपोलो, किस्टो, स्नेल, रोडर आणि डॅश, दिनेशसारख्या लोकल ब्रँडच्या सायकली पाहायला मिळतात. मॉन्स्टर सायकल साधारण ४ हजार रुपयांपर्यंत येते. हिरो स्प्रिंटची किंमत ४,५०० असून या सायकलला जास्त मागणी दिसते. अपोलो सायकल ५,५०० रुपयांपर्यंत मिळते. हिरो मिगची किंमत ९,६०० रुपये आहे. किस्टो आणि स्नेल ६ हजारांपर्यंत मिळतात. रोडस्टर सायकलची किंमत ४,५०० रुपये आहे. हायटेक सायकल १७ हजारांपर्यंत येते. रोव्हर २०टी ९ हजारांपर्यंत येते. 

लहान मुलांच्या सायकलमध्ये १४, १६ आणि २० इंचाच्या सायकली उपलब्ध आहेत. यामधील काही सायकलींना समोर बास्केट असते. या लहान मुलांच्या सायकलींमध्ये सिंगल, सहा, सात अशा प्रकारे गिअर असतात. पण जास्त मागणी नॉन गिअर सायकलला आहे. कारण लहान मुलांना गिअरची तेवढी माहिती नसते. अगदी लहान मुलांसाठी डॅश आणि दिनेश अशा आणखी काही लोकल ब्रॅण्डच्या सायकल उपलब्ध असून यांच्या किमती अगदी ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत आहेत.   

इलेक्ट्रिक सायकल  

सध्या काही इलेक्ट्रिक सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत. इलेक्ट्रिक सायकलमध्येदेखील गिअर आणि नॉन गिअर या दोन्ही प्रकारात सायकल उपलब्ध आहेत. यामध्ये हिरो, मोन्त्रा, लेक्ट्रो ई-मोबिलिटी सोल्यूशन्स लिमिटेड, नेक्सझु मोबिलिटी, वोल्ट्रॉन मोटर्स, हार्ले डेव्हिडसन, पोर्श, टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची स्ट्राइडर कंपनी, गो झिरो अशा आणखी काही कंपन्यांच्या सायकली बाजारात दाखल झाल्या असून इलेक्ट्रिक नॉन गिअरच्या ₹  २५,५००-३० हजार रुपयांच्या दरम्यान असून गिअरच्या सायकलची किंमत ₹  ३२,५००-४५ हजारांच्या दरम्यान आहे. इलेक्ट्रिक सायकलमध्ये मात्र २७.५ ही एकच साईज उपलब्ध असून सध्यातरी हिरो इलेक्ट्रिक सायकलला मागणी असल्याची माहिती सिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. स्ट्राइडरने लाँच केलेल्या कॉन्टिनो ETB-१०० आणि वॉल्टीक 1.7 E या सायकलची सुरुवातीची किंमत २९,९९५ रुपये असून या दोन्हींवर दोन वर्षांची वॉरंटी मिळते. फ्लेडो कंपनीची इलेक्ट्रिक सायकल २८ हजार रुपयांमध्ये येते. ही सायकल २-२.३० तास चार्ज केली की जवळजवळ ३० किलोमीटर चालते. गो झिरोच्या सायकलची किंमत ३४,९९९ रुपये आहे. या सर्व इलेक्ट्रिक सायकलमध्ये मोटर मोड आणि पेडल मोड हे दोन ड्रायव्हिंग मोड दिलेले असतात. 

 अलीकडेच नेक्सझु मोबिलिटीने (Nexzu mobility भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक सायकल ‘रोडलार्क'' (Roadlark) लॉँच केली आहे. या सायकलचा आकर्षक लूक, चांगला बॅटरी पॅक, उत्तम मोटर इत्यादींमुळे ही सायकल चर्चेचा विषय ठरत आहे. बॅटरी सहज चार्ज करता येत असून पूर्ण चार्ज होण्यासाठी ३-४ तास लागतात. ही सायकल सिंगल चार्जवर सर्वात जास्त म्हणजे १०० किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. स्पोक व्हीलबरोबर कॉटन ट्यूब टायर, डिजिटल डिस्प्ले, एलईडी हेडलॅम्प, ड्युअल बॅटरी सिस्टीम अशी फिचर असलेल्या या सायकलची सुरुवातीची किंमत ४२ हजार रुपये आहे. ग्राहक ही सायकल कंपनीच्या अधिकृत डिलरकडून आणि वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.   

खरेतर २०२०-२१ मध्ये अचानक सायकलींची मागणी वाढली असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे नसून सायकल चालवण्याचे प्रमाण वाढले आहे असे म्हणता येईल. आता सायकल चालवण्याचे फायदे आणि गरज लक्षात आल्याने लोकांनी पुन्हा नव्याने सायकलिंगला सुरुवात केली आहे इतकेच. त्याचबरोबर भविष्यात इलेक्ट्रिक सायकलचीही मागणी नक्कीच वाढेल असे दिसते.   

(लेखात दिलेल्या किमतीत बदल होऊ शकतो.)

सायकल खरेदी करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी

  • सायकल खरेदी करताना तिचा वापर किती आणि कसा होणार आहे हे लक्षात घ्यावे. 
  • सायकल शिकण्यासाठी घेत असाल तर सेकंडहँड सायकल घ्यायला हरकत नाही.  
  • बजेट हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने वेगवेगळ्या ब्रँडच्या सायकलींची तुलना करून पाहावी. 
  • सायकलबरोबर हेल्मेटदेखील आवर्जून घ्यावे. 
  • विदेशी ब्रँडची सायकल खरेदी करणार असाल, तर त्या सायकलचे तुमच्या भागात उपलब्ध होतील का ते आधी पाहावे.  
  • नव्याने शिकणाऱ्यांसाठी साधी सायकल उत्तम पर्याय आहे. 
  • सायकल निवडताना ब्रँड, बजेटप्रमाणेच आपल्या उंची आणि वजनाचा जरूर विचार करावा. 
  • खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या सायकलींची ट्रायल नक्की घेऊन बघावी. कारण बऱ्याचदा दिसताना छान दिसते, परंतु चालवताना सायकल कम्फर्टेबल असेलच असे नाही.
  • रायडिंग, ट्रेकिंगसाठी सायकल खरेदी करताना त्यासोबत सायकल किटही खरेदी करावे. 
  • सायकल किटमध्ये पंक्चर किट, सायकल पंप, ब्रेक आणि गिअरच्या कामासाठी अॅलन की, चेन टूल, वायर कटर, स्क्रू ड्रॉव्हर, हातोडी, इलेक्ट्रिकल टेप, कात्री, पाना, स्पोक पाना, गिअर ब्रश इत्यादी असावे.   

सध्या साध्या सायकलपेक्षा गिअरच्या सायकलला अधिक मागणी आहे. बरेचजण इलेक्ट्रिक सायकलबद्दल विचारणा करत आहेत. पण सध्या मार्केट चांगले असले तरीही पूर्वीसारखे नाहीये. कोरोना येण्याआधी सणावारांच्या काळात दर आठवड्याला माल आणावा लागत होता, मात्र हल्ली महिन्याला माल आणला जातो. म्हणजे आता पूर्वीपेक्षा निम्म्याच प्रमाणात विक्री होत आहे. 
- फिरोज लोहर, श्री साई सायकल मार्ट, धायरी. 

आमच्याकडे लहान मुलांसाठी लोकल ब्रँडच्या सायकली उपलब्ध आहेत. मात्र सध्या म्हणावी तशी विक्री होत नसून सध्या मार्केट थंडच आहे असेच म्हणावे लागेल. 
- रामची चौधरी, राजाराम सायकल मार्ट

आमच्याकडे सध्या इलेक्ट्रिक सायकल नाहीयेत, मात्र सारखी विचारणा होत असल्याने आम्हीदेखील लवकरच इलेक्ट्रिक सायकल विक्रीस ठेवण्याचा विचार करत आहोत. आमच्याकडे तरी सध्या चांगला सेल होत असून गिअर आणि नॉन गिअर दोन्हींना चांगली मागणी आहे. 
- रिषभ सुराणा, श्री सुराणा राईड्स 

आमच्याकडे किस्टो, स्नेल, डॉच या आमच्या ब्रँडच्या सायकल्स जास्त असून काही इतरही ब्रँड आहेत. एकूणच सगळे बघता सायकलींची किंमतही वाढली आहे आणि मागणीही वाढली आहे. पण सध्यातरी इलेक्ट्रिकपेक्षा साध्या सायकललाच लोक प्राधान्य देत आहेत.  
- प्रशांत पाटणकर, सेल्समन, सिंग एजन्सी.  
 

संबंधित बातम्या