थरार टूर द फ्रान्सचा

किशोर पेटकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

स्पर्धांमध्ये घाटमाथ्यावरून सायकलिंग करत अंतर कापणाऱ्या सायकल रायडरच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. अशा सायकल शर्यतींत ‘टूर द फ्रान्स’ शर्यत अग्रभागी असून अतिशय खडतर आणि आव्हानात्मक मानली जाते. 

सायकलला जगभरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे साधन बहुउद्देशीय असल्याने दळणवळणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयुक्त ठरते. क्रीडा क्षेत्रात सायकलने महत्त्वाची जागा मिळविली आहे. ऑलिंपिकमध्येही सायकलिंग स्पर्धा चुरशीने होतात. विविध प्रकारच्या शर्यतीत रायडरचा कस लागतो. मात्र खरा जोश दीर्घ पल्ल्याच्या सायकल शर्यतीत अनुभवण्यास मिळतो. ‘टूर द फ्रान्स’ शर्यत ही त्यापैकीच एक. दरवर्षी होणाऱ्या या शर्यतीत खडतर आव्हाने पार करत विजेता ठरणाऱ्या सायकल रायडरच्या चेहऱ्यावर मेहनतीचे चीज झाल्याची भावना ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीची महत्ता प्रकट करते. तब्बल २१ टप्प्यांत होणाऱ्या या शर्यतीत दरवर्षी जून-जुलैमध्ये तीन आठवड्यांच्या कालावधीत व्यावसायिक सायकलपटू साडेतीन हजार किलोमीटरच्या आसपास अंतर कापतात. या कालावधीत फ्रान्स देशाची विहंगम, प्रेक्षणीय प्रतिमाही जगासमोर येते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचा उत्साहही रायडरप्रमाणेच भन्नाट असतो. ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीने शतकमहोत्सव कधीच साजरा केला आहे, पण तिची नवलाई अजूनही कायम आहे. ‘गिरो डी इटालिया’ आणि ‘व्यूएल्टा एस्पाना’ या जगातील आणखी दोन आव्हानात्मक सायकल शर्यती आहेत. मात्र ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीचे वलय हे आगळेच, त्यामुळे या शर्यतीकडे जगभरातील प्रमुख व्यावसायिक रायडर आकृष्ट होतात. ही शर्यत मुख्यतः फ्रान्समध्ये रंगते, तरीही शेजारच्या बेल्जियम, इटली, जर्मनी, स्पेन या देशांचीही भेट होते. २००७ साली या शर्यतीच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याचे यजमानपद इंग्लंडने भूषविले होते. ‘टूर द फ्रान्स’ ही केवळ एक क्रीडा शर्यत नसून त्यास सांस्कृतिक किनारही आहे. दूरचित्रवाणीवर सर्वाधिक प्रेक्षण लाभणारी ही सायकल शर्यत आहे.  

शर्यतीने गाठला मोठा टप्पा

‘टूर द फ्रान्स’ शर्यतीचा उगम एका आगळ्या कारणास्तव झाला होता. १९०३ साली पहिली शर्यत झाली. विजेता फ्रान्सचाच मॉरिन गॅरिन ठरला. शर्यतीच्या शुभारंभीच्या वर्षी विजेत्याने २,४२८ किलोमीटर अंतर कापल्याची नोंद आहे. फ्रान्समधील ल ऑटो (आताचे ल एक्विपे) दैनिक चालविणारे हेन्री देग्रांज हे नावाजलेले पत्रकार आणि पट्टीचे सायकलपटूही. आपल्या वर्तमानपत्राच्या प्रसिद्धीच्या हेतूने त्यांनी ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीचा बेत प्रत्यक्षात आणला. देग्रांज यांचे १९४० साली निधन झाले, तोपर्यंत त्याने रोवलेले ‘टूर द फ्रान्स’ सायकल शर्यतीचे रोपटे पॅरिसमध्ये चांगलेच रुजले होते. महायुद्धाचा कालखंड वगळता दरवर्षी नियमितपणे स्पर्धा होणे हे नियतीनेही मान्य केले आहे. कोविड-१९ महासाथीचे सावट असूनही २०२० व २०२१मध्ये ही शर्यत पार पडली. शर्यतीत १९१० साली सर्वप्रथम धोकादायक घाटमाथ्यावरील वळसा समाविष्ट करण्यात आला. या टप्प्यात सायकल रायडरला जोखीम पत्करावी लागते, पण सायकलप्रेमींत हा टप्पा अतिशय लोकप्रिय आहे. 

‘टूर द फ्रान्स’ शर्यतीत रायडरना मिळणाऱ्या जर्सींना अतीव महत्त्व आहे. प्रत्येक दिवसअखेर शर्यतीत सर्वांत कमी वेळ घेणाऱ्या रायडरला यलो जर्सीचा मान मिळतो. ही परंपरा १९१९ साली सुरू झाली, त्यासही वृत्तपत्रीय महत्त्व आहे. देग्रांज यांचे वर्तमानपत्र पिवळ्या रंगात छापले जात असे, त्यामुळे दिवसभरातील उल्लेखनीय रायडरला या रंगाची जर्सी दिली जाऊ लागली. ही जर्सी प्राप्त करणे हा सायकल रायडरसाठी एकप्रकारे बहुमानच असतो. पोल्का-डॉटेड जर्सी घाटांचा राजा ठरणाऱ्या रायडरला मिळते. शर्यतीच्या टप्प्यातील काही घाट खूपच उंच असतात. त्यासाठीचे सायकलिंग अतिशय दमछाक करणारे असते. सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्यास ग्रीन जर्सीचा, तर २५ आणि कमी वयोगटातील सर्वांत कमी वेळ नोंदविणाऱ्या रायडरला व्हाइट जर्सी परिधान करण्याचा मान मिळतो. 

शर्यतीला व्यावसायिकतेची झालर
देग्रांज यांनी वृत्तपत्रीय व्यवसाय नजरेसमोर ठेवून ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीस खतपाणी घातले. ही शर्यत आता पूर्णतः व्यावसायिक झाली आहे. शर्यतीचे टप्पे पार करताना सायकलपटूस वेगवेगळ्या धाटणीच्या सायकली वापराव्या लागतात. टाइम ट्रायल्ससाठी, सपाट रस्त्यांसाठी वेगळी सायकल असते, तर डोंगरमाथ्यावरून जाण्यासाठी अतिशय हलकी सायकल वापरावी लागते. ही शर्यत आंतरराष्ट्रीय असल्याने आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनचे (यूसीआय) नियम बंधनकारक असतात.  

शर्यतीच्या इतिहासात डोकावता, सुरुवातीच्या कालखंडात सायकल निर्मात्यांचे संघ भाग घेत असत. १९३०नंतर देशपातळीवर सहभाग सुरू झाला, नंतर साठीच्या दशकात पुन्हा सायकल उत्पादकांचे संघ व त्यांचे व्यावसायिक रायडर शर्यतीत भाग घेऊ लागले. कालांतराने पुरस्कर्त्यांचे पाठबळही मोठ्या प्रमाणात लाभू लागल्याने सायकलपटू ‘टूर द फ्रान्स’सह जगभरातील सायकल शर्यतींकडे कारकीर्द या नात्याने पाहू लागला, आर्थिक सुबत्तेमुळे त्यांचा हुरूप वाढला. आता फ्रँचायजी संघ पातळीवर सहभागासाठी तयारी होते. सांघिक दृष्टिकोनातून नियोजन होते. प्रत्येक संघाची खासियत वेगळी असते. सायकलपटूंना करारबद्ध करण्यासाठीही चढाओढ राहते. 

कलंकित सायकल रायडर 
खेळ कोणताही असो, त्यात जेता ठरण्यासाठी क्रीडापटू खूप परिश्रम घेतो, त्याग करतो. काही वेळा जिंकण्यासाठी अनिष्ट प्रथांचा अवलंब केला जातो. खिलाडूवृत्तीस काळिमा फासणाऱ्या, कलंकित करणाऱ्या घटना सर्वच खेळात आहेत, त्यास सायकलिंगही अपवाद नाही. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अतिशय हुशारीने सायकल रायडर व त्यांचे संबंधित उत्तेजकांचा वापर करतात हे सिद्ध झालेले आहे. सायकलिंगमध्ये विशेषतः लाल रक्तपेशी अधिक तीव्र करण्यासाठी आणि स्नायूंतील प्राणवायूचा प्रवाह संतुलित राखण्यासाठी विशिष्ट संप्रेरकाचा वापर सायकलपटू करतात, ज्यावर जागतिक पातळीवर बंदी आहे. क्रीडाक्षेत्र उत्तेजकविरहित करण्यासाठी सक्त पहारा असला, तरी कुप्रवृत्ती डोके वर काढतेच, पण ती लपून राहत नाही. ‘टूर द फ्रान्स’ शर्यतीला हल्लीच्या काळात उत्तेजकांमुळेही कुप्रसिद्धी मिळाली आहे. १९९६ साली जिंकलेला डेन्मार्कचा बियार्न रिस हा उत्तेजक सेवनामुळे अपात्र ठरविण्यात आलेला पहिला रायडर ठरला. आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे विजेतेपद काढून घेण्यात आले आणि शर्यतीतूनही कायमची हकालपट्टी झाली. २००७ साली उत्तेजक सेवनाचा कडेलोट झाला, त्यामुळे बऱ्याच संघांना शर्यतीतून माघार घ्यावी लागली. अमेरिकेचा लान्स आर्मस्ट्राँग याचे प्रकरण खूपच धक्कादायक आणि जगभरात गाजले. आर्मस्ट्राँगने जबरदस्त कामगिरी करताना १९९९ ते २००५ या कालावधीत सलग सात वेळा विजेतेपद मिळविले. अचाट शारीरिक क्षमतेमुळे त्याचे अफाट कौतुक झाले, पण तो क्रीडाक्षेत्रातील गुन्हेगार असल्याचे २०१२ साली उघडकीस आले. अतिशय गुप्तपणे आणि खुबीने त्याने शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी रक्ताच्या माध्यमातून उत्तेजकाचे सेवन केल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याची सातही विजेतेपदे काढून घेण्यात आली. तेव्हापासून ‘टूर द फ्रान्स’, तसेच अन्य टूर सायकल शर्यतीत भाग घेणाऱ्या रायडरची खूपच सक्त चाचणी होऊ लागली. 
यशस्वी ‘टूर द फ्रान्स’ विजेते
फ्रान्सचा जॅकिस एनक्वेटिल, बेल्जियमचा एडी मेर्क्स, फ्रान्सचे बर्नार्ड हिनॉ व मिगेल इंडुरेन यांनी पाच वेळा ‘टूर द फ्रान्स’ शर्यत जिंकण्याचा संयुक्त पराक्रम केला आहे. इंडुरेन याने १९९१ ते १९९५ या कालावधीत सलगपणे दबदबा राखला. ब्रिटिश रायडर ख्रिस्तोफर फ्रूम याने चार वेळा बाजी मारली, त्यात २०१५ ते २०१७ या कालावधीत त्याने हॅटट्रिक साधली. स्लोव्हेनियाचा २२ वर्षीय तादेज पोगासार याने गतवर्षी आणि यंदा विजेतेपदाचा मान मिळविला. हल्लीच टोकियो ऑलिंपिकमध्ये तो रोड रेस प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. असा पराक्रम करणारा तो पहिला ‘टूर द फ्रान्स’ विजेता आहे.

संबंधित बातम्या