मनाली-लेह-खारदुंग ला... सायकलिंगचा खरा थरार

मिलनकुमार परदेशी
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

सायकलच का? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. आपल्याला अगदी साधी, तळातली माणसे  आपुलकीने भेटतात, लोकजीवन, खाद्यपदार्थ, भाषांमधील विविधता अनुभवता येते. देश खऱ्या अर्थाने कळतो. निसर्गाचा निवांत आणि मनसोक्त आनंद मिळतो हा सायकलवर देश फिरण्याचा आणखी एक फायदा..

पुणे-अक्कलकोट, पुणे-गोवा, पुणे-कन्याकुमारी, वाघा बॉर्डर ते पुणे, पुणे-गिरनार अशा सायकल मोहिमांनंतर सर्व सायकल प्रेमींना साद घालणारी आणि भारतातील सर्वात खडतर समजली जाणारी मनाली-लेह-खारदुंग ला ही सायकल राइड करण्याचे आमच्या टीमने ठरवले. या आव्हानात्मक सायकलस्वारीसाठी जून २०२१मध्ये लगेच तेवढीच खडतर तयारीही सुरू केली. आठवड्यातून तीन वेळा आसपासच्या सगळ्या घाटवाटांवर सराव  सुरू केला. मुख्य भर होता तो शिवापूर-गराडे रस्त्यावरील मरीआईघाट, डोणजे आणि कोंढणपूर मार्गे सलग दोन वेळा सिंहगड करण्यावर आणि तीन दिवसांच्या जिममधल्या सरावावर.

आमच्या स्वप्नातल्या राइडला प्रत्यक्ष सुरुवात झाली २२ जुलैला. मी, संदीप रायकर, युवराज सोनार, नितीन देडगे, अनिरुद्ध पुरंदरे, सचिन बेनकर, राजवर्धन गोरे आणि उर्वी तांबे अशी सगळी टीम पुणे चंदिगढ प्रवास करून मनालीला पोहचलो. 

२३ जुलै : सायकली ताब्यात घेऊन त्यावर एक तिथेच प्रॅक्टिस राइड करून सज्ज झालो.

२४ जुलै : प्रत्यक्ष प्रवासाला सुरूवात झाली. सा़डेपाच हजार फूट उंचीवरच्या सुंदर मनालीला मागे ठेवून सततचा चढ चढत ३५ किलोमीटरवरील मर्ही या सुंदर ठिकाणी मुक्कामी पोचलो. देवदारच्या अतिशय नयनरम्य आणि घनदाट अरण्यातून एक सुंदर वाट गुलाबो या गावातून मर्हीपर्यंत जाते. एकूण अंतर ४२ किलोमीटर. फक्त चढ. वेळ सात तास. इथे वाटेत पाऊस लागला. या पहिल्याच टप्प्यात आमच्या सोबतीला आलेल्या पावसानी शेवटपर्यंत आमची पाठ सोडली नाही.

२५ जुलैः सकाळी मर्हीपासून चढत आधी बियास कुंडला आलो. दुसऱ्या वेळी व्यास तपश्चर्या गुफेचे दर्शन आणि बियास नदीच्या उगमस्थानाचे दर्शन घेऊन १३,०६० फुटांवरील रोहतांग ‘ला’ पास इथे पोचलो ..  ‘ला’ म्हणजे खिंड. 

इथे पहिला टास्क यशस्वीपणे पूर्ण झाला. मग उतरून खाली आलो, तिथे स्पिती व्हॅली मधील चंद्रताल या प्रसिद्ध सरोवरातून उगम पावणारी ‘चंद्रा’ नदी लागली. तिच्या काठाचा सुंदर रस्ता, शेती आणि पुढे भारतीय सैन्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ‘अटल टनेल’ पाहून सिसू या सुंदर गावी मुक्कामी पोचलो. 

२६ जुलै : सिसू सोडून चढ उतार करत पुढचा टप्पा गाठला, तांडी. इथून एक वाट काश्मीर खोऱ्याकडे जाते आणि इथेच चंद्रा नदी भागा नदीशी संगम पावून ‘चंद्रभागा’ होते. हीच पुढे वाहत जाऊन काश्मीरमध्ये किश्तवाड या ठिकाणी ‘चिनाब’ होऊन पुढे पाकिस्तानात जाते. इथून पुढे केलॉंग, टिंगरी अशी सुंदर गावे करून जिस्पा येथे भागा नदीच्या तीरावर मुक्काम केला. हे मनाली-लेह मार्गावरील महत्त्वाचे गाव आहे.

२७ जुलै : जिस्पा, दारचा, पटसीओ अशी गावे चढून नितळ पाण्याचा दीपक ताल पाहून परत सात किलोमीटरचा घाट चढून १३,६०० फुटावर झिंगझिंगबारला पोचलो. पाऊस साथीला होताच. मुक्कामाला पोचलो ते चिंब भिजून, कुडकुडतच.

२८ जुलै : पुढच्या मार्गातला पहिला टप्पा होता अतिशय नयनरम्य असे सुरजताल. हे भागा नदीचे उगमस्थान आहे. सोळा हजार फूट उंचीवरच्या सुरजतालला पोचण्यासाठी झिंगझिंगबारपासून सलग सतरा किलोमीटरचा घाट चढावा लागतो. सुरजतालच्या भोवती बर्फाचे विस्तृत ग्लेशियर आहे. फारच दिलखेचक परिसर. इथून थोडे पुढे बारलच्चा पास ही दुसरी खिंड सर झाली. इथे पुन्हा प्रचंड पाऊस सुरू झाला. तीव्र उतार, दगडगोट्यांचा रस्ता, बर्फाळ वारे, पाऊसपाण्यातून वाट काढत सायकल चालवणे म्हणजे काय, हे पहिल्यांदा कळले. पाऊस थांबल्यावर मग सारचू या गावी पोचलो. इथे हिमाचल प्रदेश संपून लडाख सुरू होतो. इथून परत पाऊस आणि चिखल पार करून झंकसार नदीच्या काठी अतिशय दुर्गम अशा ‘ब्रॅंडी नाला’ 

या १४,११० फुटांवरील ठिकाणी मुक्काम केला.

२९ जुलै : एकंदर प्रवासातला हा खडतर दिवस. एकाच दिवसात तीन महत्त्वाच्या खिंडी, पास, होत्या. सगळ्यात आधी प्रसिद्ध ‘गाटालुप्स’चे तब्बल एकवीस हेअरपीन टर्न घेऊन १५,२८० फुटांवर पोचलो. लगेच परत वर चढून १५,६८० फुटांवरचा ‘नकी ला पास’ सर करून परत दोन हजार फूट उतरून ‘व्हिस्की नाला’ येथे आलो. इथून परत बावीसशे फूट घाट चढून ‘लाचुंग ला’ पास (उंची १६,११६ फूट) पार करून खाली उतरायला सुरूवात केली तर परत पावसाने तडाखा दिला. पडता पाऊस, उतारावर वारे, वाटेत बऱ्याच दरडी कोसळलेल्या असल्याने चिखलमाती, दगड यातून वाट काढत गेलो. हाडे गोठवणारी थंडी अनुभवली; पण आजूबाजूला इतका रौद्रसुंदर, पर्णहीन हिमालय पाहून डोळे आणि मन आनंदून गेले होते. संपूर्ण चिखलमय झालेल्या भोवतालातल्या तपकिरी रंगाच्या छटा पाहात संपूर्ण चिखलमय होऊन १५,२८० फुटावरील पांग या गावी मुक्कामी पोचलो. तपकिरी रंगाच्या इतक्या छटा याआधी ‘मॅकन्नाज् गोल्ड’मध्ये दाखवलेल्या कोलोरॅडो व्हॅलीच्या दृश्यातच पाहिल्या होत्या. सगळी टीम पूर्ण कुडकुडत होती, ऑक्सिजन कमी असल्यामुळे श्वास पण कमी होता, पण मजा आली ... 

(नकी ला खिंडीच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या दोन ओढ्यांना ‘ब्रॅंडी नाला’ आणि ‘व्हिस्की नाला’ अशी नावे का पडली, ते शोधायचा थोडा प्रयत्न केला, पण विशेष काही कळले नाही.)

३० जुलै : ही राइड बऱ्यापैकी आरामदायी होती. फक्त सात किलोमीटरचा चढ चढून प्रसिद्ध अशा मोरे प्लेन्सला आलो. साडेपंधरा हजार फुटांवरचा हा विस्तीर्ण पठारी प्रदेश. मग एक सरळ सुंदर रस्ता पार करून डेबरींगला मुक्कामी गेलो. इथे आर्मीचा छोटा कॅम्प आहे. गलवान घाटीच्या युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी भारतीय रणगाडा दल इथेच सराव करत होते ..

३१ जुलै : सकाळीच निघून एकवीस किलोमीटरच्या घाटवाटेला लागलो. पुढचा टप्पा होता ‘तान्गला ला पास’ -जगातला वाहतूकयोग्य असा दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता. उंची १७,५८२ फूट. इथे बर्फवृष्टी सुरू झाली. थोडे खाली उतरल्यावर त्याचे पावसात रूपांतर झाले. भिजतच बावीस किलोमीटर उतरून खाली आलो. थंडीने हाताचे पंजे बधीर झाले होते. जरा ऊन पडल्यावर आठ किलोमीटरवरच्या सुंदरशा रुमसे गावी पोचलो. आता तेरा हजार फुटांपर्यंत खाली आल्याने टीम पुन्हा तरतरीत झाली होती. मोठे गाव, मोठी घरे, हॉटेल्स, शेती असे खऱ्या अर्थाने लेह मधील वातावरण सुरू झाले. 

१ ऑगस्ट : लेहकडे कूच केले. नागमोडी रस्ता, बऱ्यापैकी उतार. भोवताली हिरवागार प्रदेश, राबती गावे, सुंदर बौद्ध मंदिरे (चोरटेन) पाहात उपशीला पोचलो. इथे कोविडसाठी अँटीजेन टेस्ट झाली. इथेच पवित्र सिंधू नदीचे दर्शन झाले. एका कैलास यात्रेत सिंधू नदीचा उगम पाहण्याचे भाग्य लाभले होते. सध्या चीनशी होणाऱ्या वाटाघाटींच्या संदर्भात ऐकू येणाऱ्या चुशूल या सीमेवरील गावाकडे इथूनच एक रस्ता जातो. 

पुढे थोड्या अंतरावर भारतीय सैन्यदलाचा अतिशय मोठा तेवढाच सुंदर ‘त्रिशूल’ नावाचा कॅम्प लागला. त्याच्या पुढे भव्य ‘थिकसे’ मॉनेस्ट्री, लेहच्या राजाचा संपूर्ण लाकडी कोरीवकाम असलेला ‘शे पॅलेस’ लागला. लेहच्या अलीकडेच इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांचा प्रचंड मोठा तळ आहे. आज जवळपास ऐंशी किलोमीटर सायकलिंग करून लेहला पोचलो. जल्लोष केला आणि हॉटेलमध्ये आरामदायी मुक्काम असल्याने सहा दिवसांनी अंघोळीचे स्वर्गसुख मिळवले. 

२ ऑगस्ट : आज समिट डे. आजच्या राइडचे वैशिष्ट्य म्हणजे बारा हजार फुटांपासून सलग चढत १८,३०० फुटांवरील खारदुंग लाला पोहचणे. अंतर फक्त चाळीस किलोमीटर. तीव्र चढ आणि हळूहळू कमी होणाऱ्या ऑक्सिजन पातळीशी सामना करत पंचवीस किलोमीटरवरील साऊथ पिलू येथे पोचलो. इथे १५ हजार फूट, म्हणजे राहिलेल्या चौदा किलोमीटर अंतरात ३,३०० फूट चढून जायचे अवघड आव्हान. मजल दरमजल करत बरोबर सात तासात सायकलिंगचे हे ‘एव्हरेस्ट’ सर करून आम्ही ध्येय गाठले. आनंदी आनंद… जल्लोष… भारतीय सेनेच्या जवानांकडून टाळ्या वाजवून स्वागत, वाफाळता चहा... 

आमचा एक मित्र आहे. मयूर वाल्हेकर. आमच्या प्रत्येक सायकल प्रवासात हा कुठल्याही टप्प्यात येऊन भेटतो. समिट बरोबर पाच किलोमीटरवर असताना मयूर आम्हाला भेटला. पुण्याहून त्याची कार घेऊन आला होता. आमच्यासाठी प्रिंट केलेले कॉफी मग घेऊन स्वतःच्या हाताने गरमागरम ब्लॅक कॉफी बनवून इतक्या उंचीवर त्याने आमचे स्वागत केले. त्याचे हे प्रेम खरोखरच निःशब्द करणारे.. आणखी एक कृतज्ञतेचा उल्लेख बोनी शर्मा आणि त्यांच्या टीमचा. आमच्या सायकली, खाणेपिणे,  टेंट व्यवस्था ही जबाबदारी त्यांची होती. 

एक स्वप्न पूर्ण झाले. प्रचंड सुंदर हिमालय, दुर्गम प्रदेश, साधी शांत कष्टाळू लडाखी माणसे. जागोजागी जागता पहारा देणारे सैन्यदल. निसर्गाची विविध रूपे पहात केलेला हा प्रवास भारतीय सैन्याच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ‘प्रोजेक्ट दीपक’, ‘प्रोजेक्ट हिमांक’, ‘प्रोजेक्ट विजयंक’ या रस्तेबांधणी विभागाचे आभार मानल्याशिवाय अपूर्ण राहील. इतक्या दुर्गम भागात, इतके सुंदर रस्ते बांधून त्याची अहोरात्र देखभाल ते करत आहेत. त्यांना सॅल्युट.... प्रत्येकाने अनुभव घ्यावा असा हा प्रवास आहे हे नक्की..

संबंधित बातम्या