सायकलिंग-व्यावहारिक निरीक्षणे

श्रीनिवास निमकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

कोविडने हिसका दाखवल्याला आता दीड वर्ष झालंय. यादरम्यान वैयक्तिक आरोग्याबाबत भरपूर चर्चा आणि बऱ्‍यापैकी जागृती झाल्याने सायकलिंगला एकदम महत्त्व आले आहे, तेही आपल्याकडील सायकलिंगच्या इतिहासात बहुधा प्रथमच! इतके की सायकली चक्क मिळेनाशा झाल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ‘वेटिंग’ आहे, तीस वर्षांपूर्वी कार किंवा मोटरसायकलला असायचे तसे. परिणामी आज सर्वत्र, विशेषतः शहरी रस्त्यांवर, आठ ते साठ (आणि अधिकही) वयोगटातील अनेकजण उत्साहाने सायकली दामटताना दिसतात... मात्र त्यांच्या काही अतिशय ढोबळ चुका होत आहेत असे मला आणि इतरांनाही आढळले आहे. नव्यानेच सायकल चालवू लागणाऱ्‍यांनी यात लक्ष घालून योग्य ते बदल केले, तर त्यांचे सायकलिंग अधिक कार्यक्षम होईल आणि त्यांना जास्त आनंद मिळेल असे वाटते. दोनचार मूलभूत मुद्द्यांबाबत अगदी साध्या (अ-तांत्रिक) भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

गियरची निवड हा सर्वांत पहिला आणि अत्यंत कळीचा मुद्दा आहे. यासाठी गियर बदलण्यामागची संकल्पना समजून घ्यावी. सायकलला दोन ठिकाणी गियर्स दिसतात, पॅडल जोडलेल्या अक्षावर आणि मागच्या चाकाच्या अक्षावर. पुढे साधारणपणे तीन गियर असतात आणि मागे ६ ते ९. कार किंवा मोटरसायकलचा चालक सपाट रस्त्यांवर वाहन टॉप म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या गियरमध्ये चालवतो, चढावर मात्र वाहन गरजेप्रमाणे तिसऱ्‍या, नंतर दुसऱ्‍या किंवा पहिल्याही गियरमध्ये आणतो. अगदी हेच आपल्याला सायकलिंगमध्ये पाळायचे असते. परंतु, अनेकजण सपाट रस्त्यांवरही जोरजोरात पॅडल मारताना दिसतात... मात्र त्या प्रमाणात ते अंतर कापत नसतात. याचे साधे कारण म्हणजे ते गरज नसताना (गाडीच्या भाषेत) पहिल्या किंवा दुसऱ्‍या गियरमध्ये असतात! त्यामुळे वाहनाला खेचण्याची शक्ती (पुलिंग पॉवर ऊर्फ टॉर्क) खूप मिळते परंतु ते वेग घेऊ शकत नाही. शिवाय असे चालवल्याने बरेचदा स्नायूंपेक्षा सांधेच अकारण दमतात. अगदी साध्या भाषेत सांगायचे तर सपाट रस्त्यांवर सायकल चालवताना तुमच्या सायकलची चेन मागच्या गियर्समधील सर्वात छोट्या चक्रावर असली पाहिजे आणि पुढच्या गियर्समधील सर्वांत मोठ्या चक्रावर. हा सायकलचा ‘टॉप गियर’ आहे. आपण कार किंवा बाइक सपाट रस्त्यांवर पहिल्या-दुसऱ्‍या गियरमध्ये चालवतो का, नाही ना? 

 सायकलचे गियर बदलतानाची आणखी एक छोटी बाब अशी की प्रत्यक्ष चढ सुरू होण्याआधीच काही सेकंद गियर बदलावा. गाडीच्या गियरबॉक्सची रचना वेगळी असते, शिवाय तिला क्लच असल्यामुळे ऐनवेळी गियर बदलला तरी चालते. याउलट सायकलच्या चेनवर अशावेळी अतिरिक्त ताण येऊन प्रसंगी ती तुटतेसुद्धा. शिवाय आयत्यावेळी गियर बदलल्याने विशेष फायदा मिळत नाही. 

सीटची उंची व चालवण्याची पद्धत यावरही सायकलिंगचा आनंद अवलंबून असतो. ‘सॅडल हाइट’बद्दल इंटरनेटवर आणि वैयक्तिकही भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे. सायकलवर ताठ बसावे की वाकून, किती पुढे वाकून याबद्दलही अनेक मते आहेत. परंतु, उंच हॅँडल हातांत धरून ताठ बसून म्हणजेच ‘क्रूझिंग पोझिशन’मध्ये सायकल चालवल्याने आरामदायक राइड मिळतो. मात्र वेग घेता येत नाही, तसेच ‘कोअर’ स्नायूंना व्यायाम होत नाही, त्यासाठी थोडे पुढे वाकणे आवश्यक वाटते.

इतर कोणत्याही दुचाकीप्रमाणेच, सायकलचेही दोन्ही ब्रेक दाबणे गरजेचे असते. फक्त मागचा ब्रेक दाबून ती चटकन थांबत नाही, फक्त पुढचा ब्रेक लावल्यास ती त्या चाकावर उलटू शकते. सायकलचे ब्रेक, मोटरसायकलच्या ब्रेकइतके मजबूत नसतात. त्यामुळे, विशेषतः उतारावर मनात कितीही वाटले तरी, ते सतत लावून धरू नयेत (अर्थात ‘इमर्जन्सी स्टॉप’ची बाब निराळी!). ब्रेक काही काळ दाबणे-सेकंदभर सोडणे, पुन्हा दाबणे-सोडणे या पद्धतीने वेगनियंत्रण करावे. 

अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी सायकल चालवतात. सायकलिंग हा उत्कृष्ट ‘कार्डिओ’ व्यायाम आहे यात शंकाच नाही. परंतु काही रायडर्स खुद्द सायकललाच इतक्या ‘ॲक्सेसरीज’ लावतात की बस्स! फ्रेमवर दोन ठिकाणी पाऊच, मागे मोठ्या कॅरियर बॅग्ज, लहानमोठे दिवे... एका सायकलवर तर मी ४ ‘बॉटल होल्डर’ बसवलेले पाहिलेत – फ्रेमवर दोन आणि पुढच्या चाकाच्या दोन्ही बाजूला एक-एक ‘जयविजय’!! शहरी भागातील १०-१५ किमी.च्या राइडदरम्यान इतके पाणी कशाला बाळगावे? सुविधा लावा, पण सायकलच्या एकूण वजनाकडेही लक्ष असूद्या. कारण ते खेचण्याची मेहनत तुम्हालाच करायची आहे! 

 मेहनतीवरून आठवले - सायकलची चेन आणि गियरव्हीलचा वातावरणाशी थेट संपर्क येत असल्याने त्यांच्यावर अल्पावधीत धूळ आणि चिकटा जमून पॅडल मारण्याचे कष्ट वाढत जातात... परंतु हे इतके हळूहळू होते, की चेन साफ केल्यानंतरच्या राइडमध्ये आपल्याला जाणवते, इतके दिवस किती बैलमेहनत केली ते! सांगायचा मुद्दा काय, तर चेन नेहमीच स्वच्छ ठेवावी. विविध चेन क्लीनर्स मिळतात, आपल्या बजेटप्रमाणे घ्यावे. परंतु पाणी, जुना टूथब्रश, गाडी पुसायचा कपडा आणि रॉकेल/पेट्रोल/डिझेलनेही घरच्याघरी चेन पुरेशी स्वच्छ होऊ शकते. इतर कोणत्याही वाहनाप्रमाणेच सायकलचेही वर्षातून एकदा पूर्ण ‘सर्व्हिसिंग’ करून घ्यावे, वापर कमी असला तरी. टायरमधील हवेच्या दाबाचा आकडा टायरवरच बाजूला लिहिलेला असतो. राइडला निघण्याआधी हवा अवश्य तपासावी. कमी हवेमुळे अनुत्पादक मेहनत होतेच शिवाय टायर लवकर खराब होतो.

‘सायकल चालवताना रस्त्याच्या कडेने चालवावी’ हे विधान व्यवहारात अर्धसत्य स्वरूपाचे आहे. कारण रस्त्याकडेच्या (दुभाजक नव्हे) पांढऱ्‍या पट्टीपलीकडील जागा सायकलस्वाराला पुरेशी असली तरी तिथे दुर्दैवाने कचरा, वाळू, खड्डे इ. प्रकार असतात. त्यामुळे सायकल शक्य तितकी कडेने चालवावी एवढेच म्हणू. वाहतुकीच्या मुख्य प्रवाहात सामील होताना चटकन मागे नजर टाकून सफाईने तिरक्या रेषेत मधे यावे, अचानक काटकोनात नको. वाचक म्हणतील एवढेही कळत नाही का आम्हाला... पण बरेचदा असे होताना दिसते म्हणून लिहिले. सायकलवाला आणि पादचारी यांना, इतर वाहनांपासून (आणि निसर्गापासूनही) कोणतेही संरक्षण नाही हे लक्षात ठेवावे. 

सध्या बऱ्‍याच भागांत सायकल ट्रॅक केलेले असतात, परंतु त्यांवरून सायकल चालवण्यात अनेकांना तितकासा आनंद मिळत नाही. अर्थात याला कारण आम्ही सायकलस्वार नाही तर इतर वाहनचालक आहेत! सायकल ट्रॅकवर वाहने घुसवणाऱ्‍यांना अडथळा होण्यासाठी त्यावर ठरावीक अंतराने खांब लावलेले असतात. या खांबांमधील जागा (मुद्दामच) अरुंद ठेवलेली असल्याने मूळ हेतू बऱ्‍यापैकी साध्य होतो. तरी त्यामधून जाताना खुद्द सायकलवाल्यांनाही वेग कमी करावा लागतो. परंतु सायकल ट्रॅकवरील अतिक्रमणाच्या समस्येला तूर्त तरी अन्य उपाय दिसलेला नाही. जाताजाता – अतिक्रमण नाही परंतु सायकल ट्रॅकवर खड्डे किंवा ड्रेनेजची झाकणे असणे, तो भरड वा उंचसखल असणे किंवा रस्त्याकडेचा निरुपयोगी भाग सायकल ट्रॅक म्हणून घोषित करणे... या समस्या अगदी पुढारलेल्या देशांतही आहेत बरे का!! असो. सर्वांना सर्वच मुद्दे पटतील अशी अपेक्षा नाही, परंतु कार्यक्षम आणि पर्यायाने आनंददायक सायकलिंगसाठी काही नक्कीच उपयोगी पडतील. सायकल चालवण्याचे प्रमाण वाढणे पर्यावरण जपण्यासाठीही महत्त्वाचे आहे!

संबंधित बातम्या