सायकलिंग एक साधना

उल्हास जोशी
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

सायकल हे प्रवासाचं साधन आहे, तुम्ही साधक आहात, सायकलिंग ही साधना आहे आणि साध्य केवळ आनंद आहे. 

‘जीवन हा एक प्रवास आहे,’ असे आपण नेहमी म्हणतो आणि ते खरंही आहे. प्रवास जितके तुम्हाला शिकवतो, बदल घडवून आणण्याची संधी देतो तितकी संधी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीतून तुम्हाला मिळत नसते. त्यामुळे प्रवास हा प्रत्येकाचाच एक अंगभूत गुण असावा असे मला वाटते. असा काय बदल प्रवासमुळे घडत असेल? तर प्रवासामुळे जाणवणारा सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सहनशीलता येते, कोणतीही परिस्थिती स्वीकारण्याची तुमची क्षमता वाढते. ताजमहाल बघून आलेल्या चार वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या चारोळ्या नक्कीच वेगळ्या असतात, आणि त्यातल्या एकाचेच बरोबर आणि इतर तिघांचे चूक असे नसते. अगदी त्याच प्रमाणे एका गोष्टीला अनेक पैलू असतात हे प्रवासामुळे समजते. 

प्रवासाचा वेग किती असावा, म्हणजे मग प्रवास करताना तो मनामध्ये साठवता येईल. प्रवास ग्रहण करून त्यातून शिकून काही आत्मसातही करता येईल, इतका वेळ तुमच्याकडे प्रवासासाठी असायला हवा. त्यामुळे प्रवास खूप वेगाने केला तर तो क्षणभंगुर ठरतो, त्या प्रवासातील प्रत्येक क्षण आत्मसात होण्यापूर्वीच विरून जातो. त्यामुळे प्रवास असा करावा की वेग मिळेल मात्र अतिवेग नसेल. याकरिता माझ्या मते योग्य साधन सायकल हेच आहे. सायकल चालवताना आपण धरतीवर असतो, वाऱ्याच्या स्पर्श होतो, अग्निरूपी सूर्य सतत वरती असतो, आकाश साथ देत असते आणि पाणी हे जीवन आहे हे नेहमीच अनुभवता येते. ही पाचही तत्त्वे स्वतःजवळ असल्याची जाणीव करून देतात.  

जेव्हा तुम्ही गाडीतून प्रवास करता तेव्हा तुम्ही एका बंद डबीत असता. कार मला एक पिंजरा वाटतो. तुम्ही पिंजऱ्यामध्ये आहात, फक्त तुमचा पिंजरा फिरता आहे. एका छोट्या खिडकीतून तुम्ही जग बघता. कधी तीदेखील बंद करून अनैसर्गिक वारे अंगावर घेता. निसर्गाचा गंध, पक्ष्यांचे आवाज कसलेच अनुभव जगता येत नाहीत. मात्र सायकल तुम्हाला हे स्वातंत्र्य देते, निसर्गाच्या जवळ नेते, योग्य तो वेग देते. म्हणून सायकल हेच प्रवासाचे उत्तम साधन आहे.

मी बघतो, बहुतांश लोकांची सायकल शाळेच्या वयानंतर मागे पडत जाते. पण खरेतर सायकल सोडणे म्हणजे आनंद सोडून भलत्या गोष्टींच्या मागे लागण्यासारखे आहे. मी कधी सायकल सोडू शकलो नाही कारण सायकल मला नेहमी आनंद देत होती. शाळेतदेखील आणि आजदेखील. 

स्ट्रेस बस्टर म्हणून सायकल जे काम करते तसे दुसरे कोणतेच वाहन करत नाही. उलट बाकी बरीचशी वाहने ताण वाढवतात. हा मधेच कसा थांबला? इकडूनच का गेला? किती वेगाने गेला? सायकलवर जाणारा माणूस मस्त गुणगुणत आनंद लुटत जातो.  

सायकलमुळे तुमचे आरोग्य राखले जाते, सायकलिंग हा व्यायाम आहे, त्यासाठी वेगळे कोणतेही इंधन लागत नाही, तुमचा आहारच सायकलचे इंधन असतो. सायकलच्या वापराने लोकांचे आरोग्य सुधारेल, पैसे वाचतील, प्रदूषण कमी होईल, एक गाडीच्या जागेत पाच सायकली बसतील, ट्रॅफिक कमी होईल, सायकलींचे अपघातही सर्वसाधारणपणे जीवघेणे नसतात. सायकलचे फायदे सांगावे तितके कमी आहेत. 

ही सृष्टी आणि आपण पंचतत्त्वाने बनलेले आहोत आणि या पंचतत्त्वांच्या जवळ जायचे असेल, त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, आपल्या शरीराचे आणि पंचतत्त्वाचे नाते जाणून घ्यायचे असेल; तर सायकल शिवाय दुसरे साधन नाही. सायकलवरील प्रवास तुम्हाला तुमच्या अधिक जवळ नेतो. 

सायकलमुळे माझ्यात खूप बदल झाले. अनेक अनोळखी लोकांना भेटण्याची, त्यांच्या सोबत राहण्याची संधी मला मिळाली, जगाकडे पाहण्याच्या माझा दृष्टिकोन बदलला, सहनशीलता वाढली, व्यक्तीगणिक मते निरनिराळी असतात याची जाणीव झाली, संपूर्ण जग विविधतेने नटलेले आहे हे कळले. सायकलवर प्रवास करत असल्यामुळे पर्यटन स्थळावर फक्त ‘टिकमार्क’ करून आम्ही परतलो असे कधी झाले नाही. अनेकांसोबत आमचे दृढ संबंध निर्माण झाले. 

एक अनुभव सांगावासा वाटतो. ओरिसातल्या चिलका सरोवराच्या परिसरात मच्छीमारांच्या एका खेड्यात काही स्थानिक कारणांमुळे गावकऱ्यांनी बाहेरच्या लोकांसाठी गावबंदी केली होती. बाहेरच्या कोणालाच तेथे प्रवेश देत नव्हता. केवळ आम्ही सायकलवर प्रवास करत असल्याने त्यांनी आम्हाला गावात येऊ दिले. गावकऱ्यांबरोबर बोलताना महिलांची अनुपस्थिती जाणवली. आम्ही आग्रह केल्यावर काहीजणी आल्या. गावातल्या शाळेत एक अनाथ मुलगी भेटली. तिचे दोन्ही पालक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले होते. तिची कहाणी ऐकून मन हेलावून गेले, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तिचा सांभाळ करत आहोत. लडाखमधल्याही काही मुलांचे आम्ही असेच पालकत्व स्वीकारले आहे. अनेक लोकांबरोबर माझे असे कौटुंबिक संबंध निर्माण झाले ते केवळ सायकलमुळे. हाच प्रवास आम्ही गाडीने केला असता तर तलावावर जाऊन, काही फोटो काढून परतलो असतो, या लोकांना कदाचित आम्ही भेटू शकलोच नसतो. 

दहा-अकरा वर्षांपूर्वी ‘सकाळ’ने लहान मुलांची सायकल राइड आयोजित केली होती. चव्वेचाळीस मुलांना मी दिवेआगर ते हरिहरेश्वर या कोकण सायकल राइडला घेऊन गेलो होतो. ती मुले प्रत्येक किलोमीटरवर थांबत होती. फुलपाखरू दिसले तरी त्यांना थांबून त्याला हात लावून बघायचे होते, रस्त्याकडेच्या पाण्यात आलेली कमळे बघायची होती. ते क्षण तेव्हा ती मुले खऱ्या अर्थी जगली, त्यांना खराखुरा आनंद लुटला. आजही ते मनमोहक दृश्य माझ्या नजरेसमोर आहे. ती सगळी मुले तेव्हा पाचवी ते आठवीच्या वर्गातली होती. त्यातले चौघे आज राष्ट्रीय पातळीवरचे सायकलिस्ट आहेत. त्या सायकल राइडमधील मुलांनी जो निरागस आनंदाचा अनुभव दिला तसा आजवरच्या राइडमध्ये क्वचितच मिळाला, त्यामुळे ती राइड माझ्या दृष्टीने अविस्मरणीय आहे. 

मी नेहमी म्हणतो सायकलिंग करा आणि तुमच्यातली उमेद जागृत ठेवा. वयानी तर तुम्ही मोठे होत राहणार, मात्र मनाचे तारुण्य जपा. ते जपण्यासाठी सायकल तुम्हाला ताकद देईल. आज मी साठी ओलांडली आहे, पण सायकलमुळे मी मनानी तरुण आहे आणि आनंदात आहे.  

माझ्या सायकल प्रवासांसाठी मला कुटुंबाकडून नेहमीच सहकार्य मिळाले. माझी पत्नी गायत्रीही सायकलप्रेमी आहे, आम्ही अनेक राइड सोबत करत असतो. आता मी माझ्या नातवांवरही सायकलिंगचे संस्कार करत असतो. 

मी काही थोड्या स्पर्धांमध्येही भाग घेतला, पण म्हणावा तेवढा त्यात रमलो नाही. आता मात्र एक-दोन स्पर्धा करायच्या आहेत. खरेतर जिंकण्यासाठी सायकल चालविण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी सायकल चालवत राहावे, असे मला वाटते.

माझा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास होता ५,६०० किलोमीटरचा पुणे-श्रीलंका-पुणे. १९८२च्या अखेरीस माझ्या आठ मित्रांसोबत ही सफर केली होती. तेव्हा माझ्याकडे आम्हा ‘भय्या सायकल’ म्हणतो ती साधी सायकल होती. माझ्या त्या सायकलचे नाव मी ‘काळा घोडा’ ठेवले होते. ते आमचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं, आणि ते कायम लक्षात राहण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यातून पुण्याहून श्रीलंका आणि परत अशा सायकल प्रवासाची कल्पना सुचली. मित्रांना ही कल्पना सांगितल्यावर सुरुवातीला अनेकांनी उत्साह दाखवला, शेवटी मात्र आम्ही नऊ मित्रांनी हा ७२ दिवसांचा प्रवास पूर्ण केला. या ७२ दिवसांत आम्हा नऊ जणांचं नातं इतकं घट्ट झालं होत की आम्ही एक कुटुंब बनलो होतो. आमचे एकमेकांबरोबरचे संबंध सख्ख्या भावांपेक्षा घनिष्ठ होते. त्याकाळात सगळ्या प्रवासाला आम्हाला प्रत्येकी आठशे रुपये खर्च आला. त्या खर्चासाठी पैसे उभे करण्यासाठी आम्ही अक्षरशः पडतील ती कामे केली. पेपर टाकले, दूध विकले. वर्षभर आधीपासून आमची तयारी सुरू होती. नकाशाचा अभ्यास, कुठून कुठे जायचे, कुठे थांबायचे या सगळ्याची तयारी, आणि दर शनिवारी-रविवारी सायकल चालवण्याचा सराव. या प्रवासादरम्यान अनेक लोकांनी आम्हाला मदत केली, सोईसुविधा दिल्या, आमचे स्वागत केले, सत्कार केले. 

फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांचे वास्तव्य तेव्हा कर्नाटकातल्या मडिकेरी येथे होते. जातानाच्या प्रवासात केवळ त्यांना भेटायचे म्हणून वाट वाकडी करून आम्ही मडिकेरीला गेलो होतो. कोण ही पुण्यापासून सायकलवर आलेली मुलं, अशा उत्सुकतेनी फिल्ड मार्शल करिअप्पांनी आम्हाला भेट देऊन आमची इच्छा पूर्ण केली होती. त्यांच्याबरोबरचा फोटो ही माझ्या आठवणीतली एक सोनेरी आठवण आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून मी सायकलिंग करतो आहे. धर हँडल आणि मार पॅडल इतके सोप्पे आहे हे. फार काही वेगळे करावे लागत नाही. भरपूर वेळ काढा आणि प्रवासाला सुरुवात करा. आपले आयुष्यही एक सायकलच आहे आणि म्हणूनच आमच्या ग्रुपचे नाव मी ‘लाइफसायकल राइडस्’ असे ठेवले आहे. लक्षात असू द्या सायकल हे प्रवासाचे साधन आहे, तुम्ही साधक आहात, सायकलिंग ही साधना आहे आणि साध्य केवळ आनंद आहे. 

(लेखक पुण्यातील उद्योजक व सायकलप्रेमी आहेत.)

(शब्दांकनः लेखादिव्येश्वरी चंद्रात्रे)
 

संबंधित बातम्या