अमेरिकेत विद्यार्थी-मोर्चा

मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

विशेष

२५ मार्च २०१८ ! वॉशिंग्टन डी. सी. तील पेनसेल्वेनिया पथावर, कॅपिटल इमारतीसमोर जवळजवळ २ लाखाहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि जनतेचा महासागर लोटला होता. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण यावं, बंदूक विकत घेणाऱ्या व्यक्तीची पूर्ण तपासणी व्हावी, मानसिक विकृतीवर वेळीच उपाय करावेत, या मागणीसाठी  हे आंदोलन सुरू झालं आहे. ही फक्त सुरवात आहे याची ग्वाही विद्यार्थी संघटनेचे नेते देत आहेत. कारण आहे १४ फेब्रुवारीला फ्लोरिडा राज्यातील पार्कलॅड गावातील डग्लस शाळेत झालेला गोळीबार. गोळीबारातून वाचलेल्या विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यापासून सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढती आहे.  मुलांच्या हातात पडणाऱ्या बंदुका आणि त्यांनी केलेला बेछूट गोळीबार एव्हाना अमेरिकन नागरिकांच्या अंगवळणी पडल्यासारखं झालं आहे. आपल्या गावात, शाळेत हे होऊ नये, ही प्रार्थना करत पालक अशा घटना घडल्या, की हळहळतात, काही काळ तावातावाने चर्चा घडतात, बदलासाठी प्रयत्न सुरू होतात, शाळांमधली सुरक्षितता वाढवली जाते, मुलांना शाळेत अचानक केव्हाही चौकशीच्या चक्रातून जावं लागतं, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं आणि हळूहळू सारं शांत होत जातं ते पुन्हा अशी घटना घडेपर्यंत. पण यावेळचं चित्र वेगळं आहे.  युवापिढीने सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. या वातावरणात मोठं होण्याचंच नाकारलं आहे त्यासाठी सत्ता ढवळून काढण्याचा त्यांचा पक्का निर्धार आहे. १४ मुलं आणि ३ शिक्षक/कर्मचारी गमावलेल्या डग्लस शाळेतील मुलांनी याची चुणूक गोळीबारानंतर अक्षरश: काही तासात दाखवून दिली. सुरवात झाली सोशल मिडीयावरुन या घटनेचा निषेध नोंदवून. या शाळेतील अगणित मुलांनी सोशल मिडीयातून आपल्या संतापाला वाट मोकळी करुण दिली. त्यांच्या उद्वेगाला मिळालेला प्रतिसादच त्यांना संघटित करणारा ठरला. हादरलेल्या, भयभीत झालेल्या मुलांची मनं एका क्रांतिकारी विचाराने पेटून उठली. अशा घटनांना खीळ घालण्याच्या अट्टहासाने डग्लस शाळेतले विद्यार्थी एकत्र जमले. आणि या क्षणाची इतिहासात नोंद होण्याची नांदी झाली. डग्लस शाळेतील गोळीबारानंतर अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन बंदूक नियंत्रण कायदा व्हावा यासाठी संघटितपणे पावलं उचलली. एकाच शाळेत शिकणारे पण फारसा परिचय नसणारी ही मुलं सोशल मिडीयावरुन त्यांनी उठवलेल्या आवाजामुळे एकत्र आली. आता थांबायचं नाही हा

निश्‍चय त्यांनी पुढे काय करायचं त्याचं व्यवस्थित नियोजन करुण पक्कं केलं. 
ही मुलं शाळांमधील हिंसाचार ऐकत, पाहत मोठी झाली, असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत राहिली. आणि अखेर मोठ्यांच्या नाकर्तेपणावर निराश होऊन स्वत:च आशेचे किरण शोधायला बाहेर पडली आहेत. आता बास! फार झालं! मोठी माणसं जर आमच्यासाठी काही करु शकत नसतील तर आता आम्हालाच एकत्र येऊन काहीतरी करणं भाग आहे. प्रौढांनी आमच्यासाठी काही केलं नाही त्यामुळे आता आम्हीच तोडगा शोधून काढणार हा त्यांचा निश्‍चय पक्का झाला आणि ’March For Our Lives’  नावाच्या संकेतस्थळाची निर्मिती झाली.  

एका चळवळीची सुरवात! 
  रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर मार्को रुबीओ यांना, पार्कलॅड गोळीबारातून वाचलेल्या विद्यार्थ्याने ’रुबीओ नॅशनल रायफल असोसिएशनकडून (NRA) देणगी न स्वीकारण्याची खात्री देऊ शकतात का?’ असा प्रश्न सभेत बिनदिक्कत विचारला. रुबीओंनी सुरवातीला प्रश्नालाच बगल दिली पण जमलेल्या विद्यार्थ्यांनी रुबीओंच्या टाळाटाळीचा आरडाओरडा करुन निषेध केला. ’कॅस्कीने, तुम्ही विषयाला बगल देत आहात, देणगी स्वीकारणार नाही याची ग्वाही देता का?’ हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यावर अखेर तसं करु शकत नाही हे रुबीओंनी अनेक स्पष्टीकरण देत मान्य केलं. बंदूक नियंत्रणासाठी त्यांच्या हातून जे करता येणं शक्‍य आहे ते, ते करतील असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला तरी खरंच तसं होईल ही भाबडी आशा कुणीच बाळगून नाही. रुबीओंनी दोन वेळा निवडणुकीला उभं असताना एन आर आय कडून देणगी स्वीकारली आहे. नॅशनल रायफल संघटनेचे जवळजवळ ५ मिलियन सभासद आहेत. संघटनेला पाठिंबा मिळावा यासाठी राजकीय पक्ष, राजकारणी लोकांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून देणग्या दिल्या जातात. १३ मार्च २०१८ मंगळवारी कॅपिटल इमारतीसमोर ७००० बुटाचे जोड ठेवून २०१२ नंतर आत्तापर्यंत बंदुकीला बळी पडलेल्या जीवांच्या स्मृती पुन्हा जागवल्या गेल्या. निष्क्रिय सरकारला walk in my shoes या म्हणीचा अर्थ कळावा यासाठी ही धडपड.  हे बूट नंतर धर्मादायी संस्थेला दान करण्यात आले. १४ मार्च २०१८ ला डग्लस शाळेतल्या गोळीबाराला बरोबर एक महिना झाला आणि March For Our Lives  च्या विद्यार्थ्यांनी आवाहन केल्याप्रमाणे देशातल्या जवळजवळ सर्व शाळांतील मुलांनी  ठीक १० वाजता मूकफेरी काढली. ही मूकफेरी होती १७ मिनिटांची. शाळेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकासाठी १ मिनिट. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषण झाली. कितीतरी ठिकाणी मोर्चे निघाले. विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्य जनताही यात समाविष्ट झाली. ठिणगी पेटती राहिली. त्याचवेळेस २५ मार्च २०१८ च्या मोर्च्याची तयारी सुरू झाली. वॉशिंग्टन डी. सी. ला धडकण्याची! दरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेत भेटायला येऊनही बंदूक नियंत्रणाबद्दल विषयही न काढल्याबद्दल आणि नंतर बंदूक नियंत्रण कायद्यात बदल न होण्याचं खापर डेमोक्रॅट पक्षावर फोडल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्पनाच धारेवर धरलं. ’भूतकाळ उकरुन काढण्याची ही वेळ नाही, यापुढे काय करायचं ते ठरवा, अशी वक्तव्य करणं तुमच्या पदाला शोभत नाही.’ असं ठणकावून सांगितलं. पुन्हा असं होऊ द्यायचं नाही या निर्धाराने जे करता येईल ते करायला सरसावलेल्या  विद्यार्थ्यांच्या पाठीशी विविध क्षेत्रातील नामवंत आहेत.  स्टीव्हन स्पिलबर्ग, जॉर्ज क्‍लूनी, ओप्रा अशा अनेकांनी जवळजवळ ५ लाख डॉलर्सची मदत वॉशिंग्टन डी. सी. येथे होणाऱ्या मोर्च्यासाठी केली. इतर नामवंतानी सोशल मिडियातून त्यांचा पाठिंबा व्यक्त केला. आणि महत्त्वपूर्ण बाब अशी, की डी. सी. मधील शाळकरी मुलांनी या मोर्च्यासाठी येणाऱ्यांना आपल्या घरी मोफत राहण्याची व्यवस्था करुण दिली. 

 कॅपिटल इमारतीसमोर २५ मार्च २०१८ रोजी २ लाखाहून अधिक लोकांचा लोटलेला महापूर. त्यांच्यासमोर विद्यार्थी नेत्यांची झालेली आवेशपूर्ण भाषणं. एमाच्या हृदयद्रावक भाषणाने प्रत्येकजण गहिवरला. जेवढा वेळ शाळेत त्या मुलाला गोळीबार करायला लागला तेवढा वेळ एमा शांत उभी होती. त्यानंतर त्या ६ मिनिटं २० सेकंदात किती जणांची  आयुष्य क्षणात बदलली याबद्दल ती बोलली. ती वेळ, प्रसंग, जखमी मुलं, निष्प्राण जीव, पोलिसांच्या गाड्या, हेलिकॉप्टरचे आवाज, पालकांची गर्दी आणि आपल्या माणसाचा शोध...! एकामागोमाग एक विद्यार्थी बोलत होते. आवाहन करत होते. विद्यार्थ्यांची एकच मागणी आसमंतात घुमत राहिली. शाळा हा राजकीय खेळ करु नका. बंदुकांवर नियंत्रण येऊ द्या, बंदूक विकत घेणाऱ्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करा. मानसिक आजारावर वेळीच उपाय करा.  हे सर्व होण्याकरता कायद्यात जे बदल आवश्‍यक आहेत ते करा. राष्ट्रीय बंदूक संघटनेकडून ( National Rifle Association) मिळणाऱ्या देणग्या स्वीकारणं राजकारण्यांनी बंद करावं  हे जसं राजकारण्यांच्याच तोंडावर बिनदिक्कत विद्यार्थ्यी नेत्याने सांगितलं तसंच जाहीरपणे ’एनआरआय’ला पाठिंबा देणारं सरकार उलथून पाडण्याचं आवाहन या भाषणांतून मुलांनी केलं. त्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून कळकळीची विनंती भाषणांमधून केली. मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी फक्त ३ मिनिटं लागतात याची जाणीव करुन दिली. स्वयंसेवी संघटना या मोर्च्यांच्यावेळेस मतदार नोंदणीचा अर्ज मुलांना देत होत्या. याचवेळेस पुढच्या तारखेची घोषणा झाली.

 यानंतर २० एप्रिल २०१८ रोजी पुन्हा एकदा सर्व शाळांतून मुलं या दिवशी बाहेर पडतील. मूकफेरी काढतील. २० एप्रिल १९९९ मध्ये कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. या घटनेला इतकी वर्ष होऊनही हे सत्र चालूच आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा दिवस.

प्रथमच प्रसारमाध्यमांनीही ज्या विद्यार्थ्यांने हा गोळीबार केला त्याला फारसं प्रकाशझोतात न आणता जे विद्यार्थी यातून वाचले त्यांच्या मुलाखतींवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या विरोधाला, बंदूक नियत्रंण कायद्यासाठी होणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांना जास्त प्रसिद्धी दिली आहे. 

याच कारणासाठी या लेखातही हेतुपूर्वक गोळीबार करणाऱ्या त्या मुलाचं नाव दिलेलं नाही किंवा नक्की त्याने कसा गोळीबार केला याचं वृत्त.  तरुण रक्त पेटून उठलं आहे. आता थांबायचं नाही, पुन्हा असं घडू द्यायचं नाही हे एकच ध्येय या युवावर्गाचं आहे. राज्यकर्त्यांना जाब विचारायला ही मुलं कचरत नाहीत. आपल्या भाषणात आजचा दिवस क्रांतिकारी आहे हे सांगणाऱ्या या मुलांचा कायद्यात  बदल होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा इरादा आहे. जे इतक्‍या वर्षात झालं नाही ते ही मुलं करु पाहत आहेत. भरपूर पावसाळे पाहिलेल्या, अनुभवी, त्यांच्यापेक्षा मोठे अशी बिरुद लावणाऱ्या पौढांनी या मुलांची घोर निराशा केली आहे. त्यामुळेच दुसऱ्या कुणावर न सोपवता मुलांनी अखेर आपलं भविष्याची दोरी स्वत:च्या हातात घेतली आहे. त्यांना यश लाभो आणि शाळा या हसण्या - बागडण्यासाठीच असाव्यात, मृत्यूचे सापळे नसावेत ही प्रत्येकाच्या मनातली इच्छा साकार व्हावो!  

संबंधित बातम्या