थोडं समजून घेऊया?

प्राजक्ता कुंभार 
गुरुवार, 8 मार्च 2018

ब्लॉग
 

मध्यंतरी आलियाचा एक मुव्ही आला होता, हायवे. ज्यात रणदीप हुड्डा तिचं अपहरण करतो आणि त्या प्रवासात.. सहवासात ती त्याच्या प्रेमात पडते..शेवटाकडे जातो तसं तिच्या या जवळिकीने भावुक झालेला रणदीप तिला विचारतो..‘प्रेमात पडलीयेस वगैरे ठीक...पण पुढे काय.. माझ्याशी लग्न करणारेस? की माझ्या मुलांना जन्म देणारेस?‘ यावर ‘याबद्दल मी काहीच विचार केला नाही‘ असं अगदी सहज उत्तर आलिया त्याला देते आणि त्याच्या कुशीत शिरते..दोनेक वर्षे झाली असतील..पण आलियाचा या प्रसंगातला निर्विकारपण  खूप काही व्यक्त करणारा चेहरा आजही डोक्‍यात तसाच आहे.

आजही आपल्याही नकळत आपण प्रेम या संकल्पनेला, खरंतर भावनेला ’लग्न’  या एकाच टोकाशी अगदी घट्ट बांधून टाकतो. प्रेम वगैरे ठीक.. पण लग्न कधी? हा प्रश्न येतोच की आपल्या डोक्‍यात. अगदी आजच्या ’रिलेशनशिप’च्या जमान्यातही ही लक्ष्मणरेषा  इतकी ठळक आखतो आपण, की त्याबाहेर जाणारी व्यक्ती आपल्याकडून सहज स्वीकारली जात नाही. अगदी असाच आपल्यातला वाटावा असा क्रेझी स्ट्युपीड लव्ह नावाचा मुव्ही आहे. तो प्रेमात असतो तिच्या. अगदी लहानपणापासून. चाईल्डहूड बेस्टीज वगैरे. तिचाही जीव असतो त्याच्यावर.. लग्न होतं. संसार सुरु होतो आणि एका संध्याकाळी अचानक ती त्याला सांगते ’माझ्या ऑफिसमध्ये असणाऱ्या एका सहकाऱ्यासोबत माझे संबंध आहेत, मला वेगळं व्हायचंय तुझ्यापासून, विभक्त होऊ आपण.’ कोसळतो हा. कारण याच्या आयुष्यात ती, त्यांची दोन मुलं आणि त्यांचं घर हे सगळं कसं अगदी नीटनेटकं, व्यवस्थित..सुरळीत सुरु असतं. याने तिच्याशिवाय बाकी कोणाचा कधी विचारही केलेला नसतो. त्याला उमजत नाही. समजत नाही.  ’का .. कशामुळे.. कशासाठी’ प्रश्‍नांची वारुळं तयार होतात. तो घर सोडतो.. पण घर सोडताना तिला तिच्याच नजरेत उतरवून जातो. ’’तुझ्याशी किती प्रामाणिक होतो आणि तू कसं सगळं उध्वस्त केलं’ हे स्वतःच्या वागण्यातून तिला जाणवून देतो.  मग पुढे त्याला ’जॅकोब’ भेटतो.. त्याचे विचार बदलतात. सुखी शेवटासह हा मूवी संपतो खरा पण त्याच्या नजरेत सतत तिच्यासाठी असणारा ’गरज काय होती?’ हा प्रश्न अस्वस्थ करतो कुठेतरी.

आपण गोंधळ कुठे करतो, माहितीये? एखादी व्यक्ती आवडून तिच्या प्रेमात पडावसं वाटतं म्हणजे, ते प्रत्येक वेळी शारीरिक गरजेतून निर्माण होतं असा विचार करतो. कुठेतरी हे स्वीकारण्याची गरज आहे, की तुमची प्रत्येक गरज मग ती भावनिक असो, मानसिक असो किंवा शारीरिक, एकाच व्यक्तीकडून शंभर टक्के पूर्ण झाली पाहिजे, हा अट्टहास चुकीचा आहे. आणि ते पूर्णत्व न मिळताही त्या व्यक्तीला दोष न देता आनंदाने जगता यायला हवं. 

आयुष्यात माणसांची गरज असते. एकटेपणा सुसह्य करण्यासाठी. या गरजा वाढतात, कमी होतात. कधी पूर्ण कराव्याश्‍या वाटतात, कधी वाटतही नाही. नावीन्याची ओढ आणि अपूर्णतेचा ध्यास, याभोवती तर फिरतं आयुष्य आपलं. यात असमाधान हा मुद्दाच गौण नाही ठरत का? गरज व्यक्तिसापेक्ष असू शकतात हेच विसरून जातो आपण आणि मग घुटमळतो एकाच प्रश्‍नाभोवती ’होतं ना सगळं .. मग हे असं करायची गरज काय होती?’ असं होतं ना अनेकदा, कोणीतरी आपल्याला एखादी गोष्ट अगदी जीव तोडून सांगत असतं, पण आपल्याला ती पटत नसतं आणि पटत असलं तरी समजून घ्यायचं नसतं. आपण  संवादाचे सारे मार्ग सरळ सरळ बंद करतो आणि मग त्याच्या एकतर्फी प्रयत्नांना काही अर्थ उरत नाही. स्वतःच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊन तो निराश होतो, पण आपण समजून घेत नाही, आपल्याला पटत नाही. अगदी सहज ’’तू विश्‍वासघात केलाय माझा’’ असं बोलून जातो आपण.

विश्‍वास आणि प्रामाणिकपणा एकत्र जोडू पाहतो. वर्षानुवर्षांच्या सहवासातून एकमेकांबद्दल निर्माण होणारी ही ’विश्‍वासा’ची भावना कोणत्यातरी एखाद्या कृतीने पूर्णपणे उद्धवस्त होते आणि मग ’ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून’ला येऊन थांबतो आपण. मुळात व्यक्तीचा प्रामाणिकपणा हा कोणत्यातरी एका कृतीतून कसा काय ठरवला जाऊ शकतो? तुम्ही जगता, तुमच्या आयुष्याची ठराविक तत्त्व, विचार घेऊन आणि त्या विचारांच्या विरुद्ध कृती करणारी व्यक्ती आपल्याला नजरेसमोरही नको असते. लक्षात घेत नाही आपण, की ’अपेक्षा’ही आपलीच असते आणि समोरच्याला गृहीतही आपणच धरतो. व्यक्ती म्हणून एकमेकांमध्ये असणाऱ्या फरकाचा स्वीकार करणं अवघड असेल कदाचित पण त्याचा किमान आदर तरी करता यायला हवा.

एकूण काय तर ’माझ्याकडे हे नाहीये’ म्हणून फार क्वचित सुरु होतो नावीन्याचा शोध हे समजून घेणं गरजेचं आहे. गरजेचा विचार करून किती वेळा माणसं जोडतो आपण..? माझ्या आयुष्यात असणारा हा माणूस या गरजेमुळे मी जोडलाय हे स्वतःकडे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा तरी आपल्यापैकी किती जणांकडे असतो? माणसांना आयुष्यात येऊ देताना आपणही चाचपडतोच की.. मग सहवासात आलेल्या, रुजलेल्या माणसाला स्वतःपासून दूर करताना एवढे निर्दयी कसे होतो? विश्‍वासघाताची कोणती लिटमस टेस्ट असते का?

संबंधित बातम्या