चौकट

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 5 एप्रिल 2018

ब्लॉग

विचार करा, तुम्हाला कुठंतरी फिरायला जायचंय..काय येईल डोक्‍यात पहिल्यांदा? कोणतं प्लॅनिंग सुरू होईल? बॅगेत काय काय पॅक करू किंवा मग अगदीच हॉटेल बुकिंग, इतर रिझर्व्हेशन वगैरे? बरोबर? पण हे सगळं प्लॅनिंग करताना डोक्‍यात हे पक्कं असेलच ना तुमच्या, की जायचंय नक्की कुठं? आणि समजा, कुठं जायचंय हेच माहीत नसेल तर? असं उगाच, कुठं जायचंय याची कोणतीही कल्पना नसताना, सहज म्हणून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि समजा पडलोच तर किमान याची तरी खात्री असते, की पुन्हा यायचंय ते घरीच... पण कुठे जायचंय आणि परत कुठं यायचं हेच माहिती नसेल तर? मुक्कामाच्या ठिकाणाचा कोणते नकाशा मनात न आखता, असं स्वैर भटकणं कसं असेल? दिशा माहीत नाही, डोक्‍यात प्रवासाची कोणतीही पूर्व कल्पना नाही, पण बाहेर तर पडायचं, चालायचं, भटकायचंय.. कसं असेल असं निरर्थक भटकणं? खरंच निरर्थक असेल, की असं अर्थ गवसतील ज्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असू? मग असंच स्वैर भटकण्याचा विचार जर आपल्या आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या किंवा वर्षानुवर्षे रुळलेल्या- मुरलेल्या नात्यांबद्दल करून पहिला तर? भन्नाट ना..!

म्हणजे कसंय, आपण प्रत्येक नात्याला ठराविक चौकटीत बसवतो. नात्याची प्रत्येक व्याख्या, त्या नात्याला दिलं जाणारं विशिष्ट नाव, मग ते आई, वडील, भाऊ, बहीण किंवा अगदी कोणतंही, त्या नात्याच्या चौकटीची जाणीव करून देणार असतं. अशी ठराविक चौकट आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक  नात्याला असते. खरंतर दोन चौकटी असतात अशा. कोणतंही नातं या दोन चौकटींमध्ये बसवतो आपण, किमान एकतरी. ’या नात्यात काय करायचंय आणि कितपत करायचंय’  ही एक आणि ’काय करायचं नाहीये’ ही ती दुसरी चौकट. त्यातही मग परत समाजमान्य, अधिकृत आणि समाज ज्या नात्यांकडं तिरस्कृत नजरेनं पाहतो, जी नाती सहज स्वीकारली जात नाहीत, अशी ही नाती असतात. पण या अमान्य, अनैतिक नात्यांनाही ’चौकट’ असतेच.

आपल्या आयुष्यात नव्यानं येऊ पाहणाऱ्या अनेकांना आपण आपल्याही नकळत कोणत्या ना कोणत्या चौकटींमध्ये बसवतोच की. एका ठराविक साच्यात ते नातं बसवलं, की आपण निर्धास्त होतो. अनेकदा ही नवी नाती ’या माणसासोबत काय करायचं नाहीये’ अशा स्वतःला घातलेल्या मर्यादांमधूनही उलगडत जातात. मग कोणतीही चौकट नसणार नातं? जिथे नात्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार याचा विचार केला जात नसेल असं नातं? किंवा असं नात जे कोणत्याही ठराविक हेतूखेरीज निर्माण होतं.... म्हणजे... ? म्हणजे सांगायचं झालं तर इजाजत पाहिलाय? गुलजारांचा, सुधा..महिंदर आणि मायाचा...? वो रात भुला दो, मेरा वो सामान लौटा दो असं म्हणणारा...किंवा ... प्यासी हूं मै प्यासी रेहेने दो असं गुणगुणत स्वतःभोवती गिरक्‍या घ्यायला लावणारा...किंवा ना जाने क्‍यों, दिल भर गया.. ना  जाने क्‍यों आँख भर गयी  म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा...

एकूण काय तर तुम्हाला उद्‌ध्वस्त करण्याची ताकद असणारा...या इजाजतमध्ये महिंदर आणि मायाच जे नातं आहे ते म्हणतीये मी. ना ते दोघे फक्त मित्र आहेत, ना फक्त प्रेमी, ना मायाला लग्न करायचंय त्याच्यासोबत, तिला महिंदरच्या आयुष्यातली त्याची बायको खटकत नाहीये, तिला तिची जागा घ्यायची नाहीये, तिला तोही कायमचा सोबत नकोय. तिच्यासाठी तो आहे ते ठीक, तो नसेल तरी ठीक. ना त्यांनी त्या नात्याला कोणतं नाव दिलंय ना कोणत्या चौकटीत बांधलय. तो प्रयत्न महिंदरने केलायही पण मायाला त्याच्याशी फारसं घेणंदेण नाहीये. ते सोबत आहेत, जगताहेत,  ना मरेपर्यंत सोबत राहण्याची कमिटमेंट, ना एकमेकांच्या आयुष्यावर कोणती रिस्ट्रिक्‍शन्स. जेव्हा सोबत आहेत, ते सुखात आहेत, सोबत नाहीयेत, तेव्हा ते सोबत नसणंही सुखावतंय त्यांना. पण अशावेळी त्या दोघांपेक्षाही समाज त्याकडं कोणत्या फिल्टर मधून बघतो हेच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे सुधा सहानुभूती मिळवते आपली, महिंदरचा राग येतो आणि माया? ती तर नजरेसमोरही नकोशी होते आपल्याला. का असावं असं? ब्लॅक किंवा व्हाइट असंच का बघायचं असतं आपल्याला? ग्रे शेडही असतेच, की प्रत्येक गोष्टीला. एकूण काय तर, ’ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम’ प्रकारचं रिलेशन प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदातरी अनुभवावं. जगावं निवांत. कोणतीही बंधन नाहीत, आखीव रेखीव पायवाटा नाहीत, हवं तसं एक्‍सप्लोर करा, पुढे नाही जावंस वाटल तर थांबा, पण इथंच जाऊन थांबायचं असा शेवटाचा कोणताही विचार करू नका. अनुभव घ्या, समृद्ध व्हा आणि कंटाळा आला, की दूर व्हा.

लिहायला आणि वाचायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं नसलही कदाचित हे. किंबहुना अशा चौकटी नसलेल्या नात्यांमध्ये जास्त जबाबदारीने वागावं लागतं. बाकी कोणत्याही नात्याला धक्का न लावता, त्या चौकटी तशाच अबाधित ठेवून बाकीच्यांचा आपल्यावर असणारा हक्क, त्यांच्या वाटणीचं प्रेम यात कुठही काही कमी न पडू देता, स्वतःलाच स्वतःमध्ये नव्याने शोधायचं. हा प्रयोग वाटतोय तितका सहज नसेलही कदाचित, पण समजा असं वागायला जमलच तर याहून जगावेगळी अनुभूती देणार दुसरं काही नसेल. कधीकधी स्वत्वाच्या शोधासाठी, स्वतःला कुणामध्ये हरवावं तर लागत असं म्हणतात. मग हरवायच आहेच, तर अशा कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या जागी का हरवू नये. काही गवसलं तर उत्तम, नाही तर तसंही संदर्भाविनाच भटकायला सुरवात केली होती ना? निरर्थक, चौकटीबाहेरचं, स्वतःला नव्याने शोधणार पण सहज स्वीकारलं न जाणार आयुष्य जगण्यात आनंद मिळेल, की चौकटीतलं चाकोरीबद्ध, ठराविक आयुष्यच भुरळ पाडेल? चौकटींचे गवसतील का असे नवे अर्थ? 

संबंधित बातम्या