निरगाठ

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 15 जून 2018

ब्लॉग
 

व्हाइट शर्ट, यु ट्यूब काहीतरी वेगळ्याच संदर्भाचं सर्च करताना, भलत्याच लिंकवर क्‍लिक होऊन समोर आलेली शॉर्ट फिल्म १८ मिनिटांची गोष्ट. वाणी आणि अविकची. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याची.  प्रेम, लिव्ह इनमधे राहणं, रिलेशनमधे असतानाही एका पार्टनरच बाहेर सुरू होणारं अफेअर आणि त्यातून होणार ब्रेकअप या सध्याच्या अतिशय कॉमन टप्प्यांवरची पण एका व्हाइट शर्टमुळे अनकॉमन ठरणारी गोष्ट.

 अविकच्या बाहेर सुरू असणाऱ्या अफेअरमुळे दोघांचं ब्रेकअप होतं. नंतर हा अविक घर सोडून जातो खरा पण स्वतःचा एक पांढरा शर्ट मुद्दाम कपाटात विसरून जातो. त्यानिमित्ताने का असेना पण वाणी त्याला विसरणार नाही याची तजवीज करून जातो तो. कधीतरी कपडे आवरताना तिला तो शर्ट सापडतो आणि त्या शर्टच्या रूपाने अविची नको असलेली सोबत, त्याचा नकोसा सहवास, त्याचे विचार पुन्हा येतात तिच्या आयुष्यात. अविकचे कॉल्स रिसिव्ह करणं, पुन्हा पुन्हा त्याच विचारांभोवती घुटमळणं सारं काही सुरू होत नव्यानं. त्याचं नसलेलं अस्तित्व त्या शर्टमधून ती पुन्हा जगायचा प्रयत्न करते ती. त्या शर्टचा स्पर्श, त्याचा वास सगळं पुन्हा फिरून फिरून तिला अविभोवती आणून सोडतं.

 आता पुढे या शॉर्टफिल्मचा शेवट काय होतो, वाणी आणि अविक एकत्र येतात का? हा सगळा माझ्या दृष्टीने दुय्यम विषय आहे. महत्त्वाचं काय तर, वस्तूंमधून माणसं जपण्याचा प्रयत्न. आपल्यापैकी प्रत्येकानं आयुष्यात कधीनाकधी केलेला. सोबत नसणाऱ्या किंवा अर्धवट सोडून गेलेल्या व्यक्तीच नसलेलं अस्तित्व उगाच स्वतःभोवती पांघरून ठेवायचा निरर्थक अट्टहास. मग तो मुद्दाम विसरलेला रुमाल असुदे, किंवा कोणी उगाच गिफ्ट केलेलं कीचेन, एखादी पर्फ्युमची बॉटल किंवा सहज लिहायला म्हणून दिलेला पेन. कधीकधी तर बस किंवा मुव्हीच्या तिकिटांभोवती पण भावनांचा गुंता असतो आपला. त्यातही पुन्हा, वस्तू देणाऱ्याची भावना आणि आपली इमोशन याची काहीतरी वेगळीच स्टोरी असते.

निर्जीव वस्तूंमध्ये, निर्जीव शब्दांमध्ये जीव अडकतो आपला. आपल्याही नकळत या गोष्टी सवयीच्या होतात. बोलण्याच्या लकबीसारख्या शब्दांचे वापर, शब्दांच्या लकबी आपल्याशा वाटायला लागतात. आपल्याही नकळत आपण काही सवयी, शब्द, अर्थ, वस्तूंचे वापर आपलेसे करतो. कपड्यांचे स्पर्श आणि त्यामध्ये मुरलेला शरीराचे वास तर सगळ्यात जास्त ॲडक्‍टिव्ह असतात.

कदाचित  वस्तूंच्या सवयीपेक्षा, त्या वस्तूभोवती इन्व्हेस्ट केलेला वेळ आणि उगाचच्या आठवणी डोक्‍यात पक्‍क्‍या बसलेल्या असतात आपल्या. त्यातून या आठवणींना अनेक संदर्भ असतात. म्हणजे एखाद्या कॉफी शॉपमध्ये, एखादा ठराविक टेबल फक्त आपला आणि आपलाच म्हणून ठरलेला असतो. त्या टेबलावर उगाच हक्क वगैरे असतो आपला. बरं, त्या टेबलवर ठरविक व्यक्तीसोबत बसताना जे आपलेपणाचं फीलिंग येतं ते इतर कोणी सोबत असताना येत नाही. या निर्जीव वस्तू उगाच लाडक्‍या होतं नाहीत. त्या वस्तूंशी संदर्भ असणारी माणसं लाडकी असतात आपली आणि त्यांच्या त्या आठवणी या वस्तूंना स्पेशल बनवतात. 

वस्तू, जागा, वास, स्पर्श, रंग वरवर हे सगळं निर्जीव. तिऱ्हाईत नजरेने पाहून नजरेआड करता येण्यासारखं. पण माणसांच्या गर्दीतून अंगावर येणारा त्या एका पर्फ्युमचा वास नजरेसमोर ठराविक आठवणीच उभ्या करतो. जागांभोवती भावना गुंतलेल्या असतात. रहदारीच्या रस्त्यावरचा एखादा कोपरा हा आपलाच असतो. तो उगाच आपलासा होत नाही. त्याला संदर्भाचे अनेक कंगोरे असतात. त्या कोपऱ्याभोवती  माणसांचे गुंते असतात. ही गुंतागुंत नकोशी वाटते अनेकदा, पण सोडवत नाही. म्हणजे त्या जागेशी संदर्भ असणारी माणसं सोडून गेली तरी या जागा आपल्याच असतात.  खरी गोम तर इथेच आहे. माणसं सोडून जातात स्वतःहून, पण या निर्जीव गोष्टी कुठे जात नाहीत. परीकथांमधल्या राजकुमाराच्या जीव जसा पोपटाच्या कंठात वगैरे असतो तसा आपण आपल्याही नकळत या निर्जीव वस्तूंमध्ये, जागांमध्ये आपला जीव गुंतवतो. कोणीतरी लिहून पाठवलेले शब्द जगतो. या सगळ्याशी संदर्भ असणारी माणसं व्हॅनिश होतातही कापरासारखी, पण त्यांच्या सोबत असण्याची जाणीव या सहवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नित्यनेमाने करून देत राहतात. ते सहन करणं एका क्षणानंतर अनझेपेबल होऊन जातं. नवे प्रवास, नव्या लोकांना आपल्या आयुष्यात मिळणार प्रवेश या साऱ्या गोष्टींवर या निर्जीव गुंतवणुकीचा परिणाम होतो, किंबहुना आपल्याला हे परिमाण जाणवत असतानाही आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. का होत असेल असं? अनेकदा ज्या व्यक्तीमुळं आपल्या आयुष्यात नको असणारे अनेक मानसिक मनस्ताप आपल्याला सहन करावे लागतात, त्या व्यक्तीचे संदर्भ डोळ्यासमोरून दूर करताना मात्र त्रास होतो का? या निर्जीव जाणिवांची सवय झालेली असते म्हणून की त्यांच्याशिवाय जगण्याचा एकटेपणा अंगावर येत असेल म्हणून? आणि या निर्जीव संदर्भांच्या आठवणी जपताना स्वतःवरच अन्याय होत असेल तर हा गुंता सोडवायचा कसा?

संबंधित बातम्या