मग... लग्न कधी?

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 27 जुलै 2018

ब्लॉग
 

मागच्या काही महिन्यांपासून आमच्या घरी प्रत्येक रविवारची सुरवात, ’मग, आता काय ठरवलंय तुम्ही दोघांनी, लग्न कधी करणार, किती वर्ष अजून हे असंच चालू राहणारे तुमचं?’ वगैरे प्रश्नांनी होते. शिक्षण-करिअरपासून इतर कोणत्याही बाबतीत ’तुला हवं ते कर’ म्हणणारे आई-बाबा ’लग्न’ हा विषय आला, की असे टिपिकल का वागायला सुरवात करतात, या प्रश्नालाही ’ठराविक वयानंतर’ फारसा अर्थ उरत नाही. त्यात आजूबाजूचे लोकही इतक्‍या उत्साहाने एंगेजमेंट, लग्न, हनिमून, झालंच तर मॅटर्निटी फोटोशूट, बाळाचा पहिला वाढदिवस साजरा वगैरे करत असतात की. या लोकांची फेसबुकची वॉल बघून आपण नक्की नॉर्मलचं आहोत ना असा प्रश्न पडतो. चुकून कोणाच्या लग्नाला जायचं म्हणून आईला साडी नेसवून दे असं सांगायला गेलं तर ’जग कुठे चाललंय, आणि तू अजूनही माझ्याकडून साडी नेसून घेतीस’ हे असे काहीतरी हावभाव आईच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. बॉयफ्रेंड म्हणून ओळख करून दिलेल्या कोणत्याही मुलाला ’होणारा जावई’ म्हणूनच बघायला घरच्यांनी सुरवात केलेली असते आणि ’लग्न’ या एकमेव विषयावर घरात चर्चासत्र रंगायला सुरवात झालेली असते.

वयाच्या पंचविशीपासून तिशीच्या उंबरठ्यापर्यंत नातेवाईक, कलीग, मैत्रिणी- मित्रांपासून उगाच कधीतरी चुकून हाय-बाय करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला तुमच्या आयुष्याबद्दल फक्त एकचं उत्सुकता असते, ’ ते बाकी काम वगैरे सगळं ठीके , पण लग्न कधी?’ ज्यांचा तुमच्या रिलेशनबद्दल माहिती असतं त्यांच्याकडून ’तसेही इतकी वर्ष सोबत आहात, मग लग्न करायला प्रॉब्लेम काय आहे नक्की?’ असंही ऐकायला मिळतं. मग हा प्रॉब्लेम असतो नेमका कुठे? आजूबाजूचा प्रत्येक जण ’ लग्न करा’ असं सांगत असताना  या विषयाला असं सरळ-सरळ इग्नोर मारावस का वाटतं?

मुळात ’इतकी वर्ष सोबत आहात म्हणून लग्न करा’ या वाक्‍याला फारसा अर्थ नाही. इतकी वर्ष प्रेमात  आहेस ना मग कर की लग्न, या वाक्‍यात लग्न आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षातच नाही घेत कोणी. ’अमुक इतकी वर्ष’ लग्नाचा निर्णय घ्यायला इनफ असतात अशी शाश्वती कोण कशी देऊ शकेल? मुळात नात्याचा सीरिअसनेस वर्षांच्या गणितात मांडणं बंद करायला हवं सर्वात आधी.  

एकतर पंचविशी पर्यंत स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशनवर जगायला सुरवात झालेली असते. स्वतःपुरत आयुष्य डिफाइन करून झालेलं असतं. ’मला हे असंच आवडतं, मला हे असंच हवंय, मला ही अशीच सवय आहे’ अशा चौकटी स्वतःसाठी  आखून झालेल्या असतात. पुढच्या किमान पाच वर्षांचं प्लॅनिंग डोक्‍यात रेडी असतं. ’आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवंय’ असा काहीतरी शोध चालू असतो डोक्‍यात एकाबाजूला. सगळं स्वतः स्वतःच करायची सवय झालेली असते. निर्णय घेण्याची, चुकलेल्या निर्णयांच्या परिणामांना सावरून घ्यायची तयारी झालेली असते आणि यातच स्वतःला समोरच्याप्रमाणे बदलायची, ॲडजस्ट करण्याची सवय कमी होत जाते. मग अशावेळी मानसिक - शारीरिक सोबत हवी असते; पण चोवीस तासांचा पहारा नको वाटतो. वयाप्रमाणे निर्माण होणाऱ्या शारीरिक गरजांच्यापलीकडे जाऊन ते नातं जपणं, त्याला वेळ देता येणं हे महत्त्वाचं असतं आणि नेमकं इथेच गणित चुकायला सुरवात होते.

अनेक वर्ष रिलेशनमध्ये असणं आणि दिवसाचे चोवीस तास एकमेकांसोबत राहणं यात फरक आहे. दोघांच्या वेळा सांभाळून आठवड्यातून काही दिवस, काही तास एकमेकांना भेटणं, किंवा दिवसभरात कधीतरी व्हॉट्‌सअपला ’आय लव्ह यू’ ’जेवलास का’ ’पोचलास का’ असं टाकणं आणि सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत कोणासोबत(मग तो अनेक वर्ष सोबत असणारा पार्टनर का असेना) तरी एकत्र राहणं, या दोन गोष्टींमध्ये बराच फरक आहे. जबाबदारी आणि ॲडजेस्टमेन्टमध्ये स्वतःची स्पेस हरवण्याची भीती म्हणजे हा फरक. स्वतःच्या विश्वात रमायला आवडणाऱ्यांसाठी ही बदलांची भीती मोठी असते.

लग्न हे संस्कार आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये या नात्याला समाजमान्यता आहे, एक वेगळं स्थान आहे, हे सगळं मान्य आहेच. म्हणूनच आमच्या पिढीला ’लिव्ह इन’चा पर्याय उपलब्ध असला तरी शांता शेळकेंच्या ’पैठणी’तलं अहेवपण आजही आपलंस वाटतंचं की. त्यामुळे लग्नाला नकार देणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्‍यात असणारे विचार, नकारामागची कारणं वेगळी असली तरी यामागे कुठेही लग्नसंस्था चुकीची असा टोकाचा विचार नसतो. लग्न या जबाबदारीच्या चौकटीत अडकण्याची तयारी महत्त्वाची आहेचं पण मुळात या चौकटीत अडकायचं, की नाही हा मुद्दा आहे; आणि अडकायचं म्हटलंच तर या मानसिक तयारीसाठी प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगळा असणार हेही समजून घ्यायला हवं. लग्नाशिवाय असं एकट्याने आयुष्य एक्‍सप्लोर करणं हेही कमी चॅलेंजिंग नसणार. एकूण काय, तर लग्नाचं ठराविक वय वगैरे अंधश्रद्धा बाजूला ठेवल्या तर आयुष्य खरंच सुंदर आहे.

संबंधित बातम्या