’कलमां’पलीकडचं जगणं

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

ब्लॉग
 

व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ हे कोर्टाने नुकतंच अवैध ठरवलं. अनेकदा ’शारीरिक गरज’ या एकाच कारणाशी जोडले जाणारे विवाहबाह्य संबंध या निकालामुळे किमान व्यभिचार, अनैतिकता यासारख्या ठराविक वैचारिक चौकटीतून तरी बाहेर पडले. नैतिक अनैतिकतेच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या समीकरणांमध्ये व्यक्तीचं वागणं, बोलणं, त्याचे प्रतिसाद आजही तपासले जातात. वैचारिक पातळीवर पुरोगामित्व कितीही मिरवायचं झालं, तरी सामाजिक चौकटींच्या, नीती- नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करायला आजही कचरायला होतं. बायकांनी असंच वागावं, याच मर्यादांमध्ये राहावं, अशी अपेक्षा आजही केली जाते. शारीरिक संबंधांवर बोलणारी, लिहिणारी, व्यक्त होणारी स्त्री बंडखोर ठरते. स्वतःच्या शारीरिक गरजांबद्दल जागरूक असणारी, त्या पूर्ण व्हायला हव्या अशी ठाम मानसिकता असणारी बाई चौकटीबाहेरची ठरते. तिला, तिच्या संबंधांना एका ठराविक चष्म्यातून बघितलं जात. अशावेळी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचं ‘लैंगिक पसंती रोखणारा हा कायदा असांविधानिक आहे. लग्नानंतरही स्त्रियांना लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही‘ असं व्यक्त होणं हे कदाचित ’शारीरिक सुख’ ही गोष्ट परीकल्पना वगैरे वाटणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी दिलासादायक ठरेल.

जेंडर बायसिंगच्या पलीकडे आजही आपल्याला नैतिकतेचे संस्कार महत्त्वाचे वाटतात, अगदी प्रत्येक नात्यात. प्रेमात पडलेल्या जोडप्याने लग्नाचे संस्कार स्वतःच्या नात्यावर केले, की त्या नात्याची विश्‍वासार्हता वाढते. लग्नाआधीच्या मातृत्वावर शंका उपस्थित करणारा समाज, नैतिक मातृत्वाचं मात्र कोडकौतुक करतो. हे असंच चालू आहे आणि समाजात राहायचं म्हटल्यावर आपणही या चौकटी, हे संस्कार नकळत आपलेसेही करतो. समाज म्हणून जडणघडण होताना ते गरजेचंही असेल. पण एखाद्याच्या गरजांना, मग त्या शारीरिक असुदे, मानसिक किंवा भावनिक, ’व्यभिचार किंवा अनैतिकता’ असं लेबल करण्याची खरंच गरज असते? एकाच पार्टनरकडून माझ्या सर्व गरजा भागल्या पाहिजेत किंवा समजा त्या गरजा अपूर्णच राहिल्या तर ती अपूर्णता सोबत घेऊन मला आनंदी राहता यायला हवं, हा विचार एका पातळीनंतर अतिरेक ठरत असेल असं का नाही वाटत?

आपल्याला नेमकं काय सुखावतं? आपल्या साथीदाराचं आपल्यावर असणारं प्रेम, की आपल्या साथीदाराचं ’फक्त’ आपल्यावर असणार प्रेम? आपल्यापुरतं मर्यादित असणारं, फक्त आणि फक्त आपल्यालाच हवं ते देणार, झालंच तर आपल्या प्रत्येक गरजेचा विचार करणार. प्रत्येक नात्यात प्रेमापेक्षा मालकीहक्क ही भावना जास्त सुखावणारी असते. त्याच माझ्यावर प्रेम आहे यापेक्षाही तो माझा आहे, ही भावना अहंकार कुरवाळणारी असते. साथीदाराचं समर्पण हे फक्त माझ्यासाठी हवं, त्यात एकही भागीदार नको, अशी सरळसोपी आखणी असते ही. त्यामुळेच ’माझ्याशिवाय त्याला इतर कोणीतरी आवडतंय, किंवा इतर कोणी त्याच्या गरजांना पुरेसं पडतंय’ हा विचार नाती उध्वस्त करणारा ठरतो. गरज ही व्यक्तिसापेक्ष असू शकतात हेच विसरून जातो आपण, आणि मग पुन्हा सुरू होतो नैतिक अनैतिकतेचा ‘खेळ’ विश्वासघात या शब्दांना जोडीला घेऊन.

मुळात अनैतिकता किंवा व्यभिचार हा ठराविक व्याख्येत कसा बसवता येईल, प्रत्येकाच्या जडणघडणीनुसार ती व्याख्या बदलणार नाही का? कोणतंही नातं हे एका गरजेपोटी जन्म घेतं. आता ती गरज समाजाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणून अनैतिक ठरवायची, की ती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असणारं. या गरजेमुळे, आयुष्यात अनेकवर्ष असणार एखाद नातं जर विस्कटणार असेल तर, गरज की नातं हाही प्रत्येकाचा स्वतंत्र कॉल असणारंच. मात्र आपल्या प्रत्येक गरजेला एकच माणूस पुरेसा असणारं आहे, याला नैतिकता म्हणणं निदान मला तरी पटत नाही. आपल्याला सतत माणसांची गरज असते आणि आपल्याला माणसं मिळत राहतात. या नव्याने येणाऱ्या माणसांशी जुळणारी लय पुन्हा त्यांच्यासोबतच्या नात्यांचे संदर्भ बदलते. आता जोपर्यंत या गोष्टी मानसिक किंवा भावनिक पातळीपर्यंत मर्यादित असतात, त्यांचा फारसा त्रास करून घेतला जात नाही. पण अशा नात्यांना शाररिकतेचे संदर्भ जोडले गेले, की प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलतो. हे असं का होतं, याचं कोणताही ठराविक उत्तर नाहीये.

मला अनेकदा असं वाटतं, की शारीरिक संबंधांच्या पलीकडे जाऊन अशा नात्यांकडे बघण्याची गरज आहे. भावनिक गुंतवणुकीतून निर्माण होणार शारीरिक आकर्षण अगदीच नैसर्गिक आहे. त्यामुळेच नात्यातल्या भावनिक असमाधानावर उत्तर शोधता यायला हवं. अनेकवर्ष एकमेकांसोबत राहून नात्यात आलेल्या त्याच त्या पणामुळे निर्माण होणाऱ्या या भावनिक शारीरिक किंवा मानसिक गुंतवणुकीच्या गरजा समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन स्वतःची घुसमट किती जणांना सांगता येते? किंवा माझ्या आयुष्यात असणारा हा माणूस मी या ठराविक गरजेमुळे जोडलाय हे स्वतःकडे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा तरी किती जणांकडे असतो? आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण करणारी माणसं शोधात राहतो. अनैतिकता, व्यभिचार हे नात्यांचे  संदर्भ आपल्या गरजेनुसार बदलत जातात. गरज आहे ती या वास्तवाला स्वीकारण्याची.

संबंधित बातम्या