अनोळखी ओळख 

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

ब्लॉग
 

अमेझॉन प्राइमला ‘द अफेअर’ नावाची सिरीज आहे. या सिरीजच्या नावातूनच गोष्टीचा विषय अगदी ढळढळीत समोर येतो खरा, पण तरीही ही गोष्ट एवढी सरळ साधी नाही. कधीकधी नावातून सरळ सरळ कळणाऱ्या गोष्टी सांगणे जरा जास्तच अवघड असते. ‘विवाहबाह्य संबंध’ ही थीम लाइन असली, तरी चार सीझनच्या प्रत्येक एपिसोडमधून अंगावर येणारे, कधी स्वतःच्या मर्यादा, विचारसरणी तपासून पाहायला लावणारे, ‘हे असे कोण कसे वागेल?’ हा प्रश्‍न दहा वेळा निर्माण करून मेंदूला मुंग्या आणणारे प्रसंग अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवतात. ही गोष्ट आहे नोहा-हेलन आणि ॲलिसन-कोल या जोडप्यांची. एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न केलेली, सुखाने संसार करणारी आणि आपापल्या आयुष्यात रमलेली. पुढे नोहा आणि ॲलिसन एकमेकांच्या प्रेमात पडतात (का, कसे, कुठे हा प्रवास त्यांच्या या गोष्टीतूनच जाणून घ्यायला हवा) आणि सुरू होते ‘द अफेअर’... 

तर मुद्दा हा, की चार मुलांचे आई बाबा असणारे नोहा आणि हेलन, जवळपास २० वर्षे एकत्र राहून वेगळे होतात. त्यावेळी हेलनचे सांत्वन करणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत दिसणारा ‘तू खरेच इतक्‍या वर्षांत त्याला ओळखलेय असे वाटते तुला?’ हा प्रश्‍न तिला अस्वस्थ करतो. त्या दोघांचे कॉलेजपासून बरोबर असणारे मित्र, कधीकाळी त्यांच्या लग्नाला विरोध करणारे तिचे आईवडील, नोहाची बहीण, अगदी त्या दोघांची मोठी मुलगी, हे सगळे तिला आडून-आडून हेच सुचवू पाहतात, ‘मान्य आहे, तुम्ही प्रेमात पडून लग्न केले. मान्य आहे तुम्ही २० वर्षे एकत्र राहिलात... पण खरेच.. तुला असे वाटते तू ओळखतेस त्याला?’ हेलन सुरुवातीला शांत राहते... मग सतत नजरेसमोर येणाऱ्या त्याच त्या प्रश्नचिन्हावर वैतागते.. आणि शेवटी स्वतःच्याच खात्रीसाठी ‘ते’ उत्तर शोधू पाहते. 

मला तिची त्या उत्तरासाठी सुरू असणारी धडपड अस्वस्थ करून.. बऱ्यापैकी हादरवून गेली. ‘फक्त माझे आणि माझेच’ म्हणून कित्येक वर्षे सतत आजूबाजूला असणाऱ्या लोकांभोवती मला हेच प्रश्‍नचिन्ह दिसायला लागले. खरेतर सहवास आणि नाती वर्षांच्या गणितात मोजतो आपण. ‘सहवासातून माणूस कळायला’ अमुक इतक्‍या वर्षांची सोबत पुरेशी आहे, असे साधेसोपे गणित असते आपले या मागे. नात्याच्या सिरिअसनेसला वर्षांच्या गणितात मोजताना, आपण कधीकाळी ज्याला ओळखत होतो ते माणूस कदाचित बदलू शकेल ही शक्‍यताही गृहीत धरत नाही आपण. त्याच्या आवडीनिवडी, सहवासाची आसक्ती किंवा सतत सोबत राहण्याची गरज याचा आलेख काळानुरूप वरखाली होऊ शकतो हे असे काही दूरदूरपर्यंत आपल्या डोक्‍यातही नसते. मग हा असा विचार करायला लागल्यावर.. मी ओळखते की त्याला लहानपणापासून, दहा वर्षांपासून आम्ही सोबत वाढलोय, एकाच शाळेत शिकलोय किंवा इतकी वर्षे एकत्र एकाच फिल्डमध्ये काम केलेय... हे सगळे तकलादू वाटायला लागते. सहवासातून माणसे पारदर्शी कळतात की अगदी आपल्याला अंतर्बाह्य ओळखण्याचा दावा करणाऱ्या लोकांसाठीही आपण अनोळखी असतो? 

‘नोहाला मी खरेच कितपत ओळखते’ हा शोध घेणारी हेलन, पुढे काही वर्षांनी ॲलिसनला भेटल्यावर हाच प्रश्‍न तिलाही विचारते. इथे दोघींच्या सहवासाची तुलना करून स्वतःचे मोठेपण मिरवणे असा कोणताही हेतू नसतो तिचा.. पण इतकी वर्षे ज्याच्याबरोबर राहिलो तो माणूस नेमका आहे तरी कसा ही उत्सुकता तिला शांत बसू देत नाही. गंमत म्हणजे एकाच माणसाबरोबर, वेगवेगळ्या वेळी राहिलेल्या या दोघींच्या उत्तरात तफावत असतेच पण मालिकेतून आपल्यासमोर उलगडत जाणारा नोहा या उत्तरांपेक्षा भयाण वेगळा असतो. 

हीच तर मजा आहे. इतरांबरोबर वागण्याचे वेगवेगळे पॅटर्न्स असणारे आपण स्वतःशी तरी किती प्रामाणिक असतो? अनेकदा स्वतःच्या निर्णयाची खात्री असणारी उत्तरे आपण एका क्षणात बदलतो. ‘तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते’ हे ऐकण्याची सवय असणारे आपण, अनेकदा स्वतःला अनपेक्षित असणाऱ्या अनेक गोष्टी करतो, काही मुद्दाम घडवून आणतो. इतरांनी आपल्याला समजून घेण्याआधी आपण स्वतःला किती उलगडलेले असतो हाही प्रश्‍नच आहे. माझ्याबाबतीत हे अनेकदा झाले आहे. आयुष्यात नव्याने येणाऱ्या माणसांमुळे असेल किंवा स्वतःच्या क्षमता उगाच तपासून बघण्याची खुमखुमी, कधीकाळी न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या अनेक गोष्टी मी करून पाहिल्यात. पण म्हणून मी स्वतःला अगदी पूर्णपणे ओळखते असे अजूनही मला वाटत नाही. जिथे स्वतःचीच स्वतःला खात्री नसते, तिथे फक्त सोबतीची गरज आहे किंवा एकटेपणाची भीती वाटते, म्हणून ‘कोणासोबत’ तरी एकत्र राहणे योग्य की अयोग्य याचे उत्तर प्रत्येकाप्रमाणे बदलेलही कदाचित, पण ज्याच्याबरोबर अमुक वर्षे घालवलीयेत, तो माणूस एखाद्या क्षणी अचानक अनोळखी वाटणे, जास्त अंगावर येणारे नाही का? की स्वतःचे अनोळखीपण स्वतःच्याच नजरेने बघणे हे जास्त भयाण असेल?

संबंधित बातम्या