निरक्षरता ‘पडेगी मेहेंगी...’

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 29 एप्रिल 2019

ब्लॉग
 

हसन मिन्हाज नावाचा एक अवलिया आहे. अमेरिकन स्टॅंडअप कॉमेडीयन, लेखक आणि टीव्ही होस्ट. त्याची नेटफ्लिक्‍सवर ‘द पॅट्रीऑट ॲक्‍ट’ नावाची सीरिज आहे. मध्यंतरी या सीरिजमधल्या एका एपिसोडमुळे ट्विटरवर ‘#बायकॉटनेटफ्लिक्‍स’ हा ट्रेंड सुरू झाला होता. याचं कारणही तितकंच भन्नाट होतं. हा एपिसोड होता ‘इंडियन पॉलिटिक्‍स’ या नावाचा. ३० मिनिटांच्या या एपिसोडमध्ये त्याने भारतीय राजकारणाच्या भल्यामोठ्या जिगसॉ पझलचे तुकडे गोळा करून, ते एकत्र जोडण्याचा प्रयत्न तर केला खरा, पण ही ३० मिनिटं कमीच पडली.

भाजप, काँग्रेस या देशातल्या दोन मुख्य पक्षांबद्दल बोलताना त्याने काश्‍मीरचा प्रश्न, पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला, २००२ मध्ये झालेल्या गुजरातच्या दंगली, नोटबंदी, गोहत्या आणि बेरोजगारी अशा शक्‍य तितक्‍या मुद्द्यांवर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. त्याने नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना केली, काँग्रेस नेते शशी थरूर यांची मुलाखतही घेतली. पण तरीही ही ३० मिनिटं कमीच पडली.

खरं तर ३० मिनिटांच्या भागात, देशातल्या राजकारणावर सखोल चर्चा करणं किंवा त्यातून एखाद्या ठराविक निष्कर्षाला पोचणं किमान मला तरी शक्‍य वाटत नाही. कारण भारतातलं राजकारण हा ३० मिनिटांचा क्रॅश कोर्स नाहीये. पण तरीही हा एपिसोड पाहिल्यावर, जगभरातले लोक भारतीय राजकारण आणि निवडणूक यांच्याकडे इतका ठराविक दृष्टिकोन ठेवून खरंच बघत असतील का? हा प्रश्न पडला आणि मग असंही वाटून गेलं, की कदाचित माझ्या आसपास असणारे, मित्र प्रकारात मोडणारे अनेकजणही असाच ‘स्टिरीओटाइप’ विचार करत असतील. खरं तर मीही राजकारणाचा काहीसा असाच विचार करते की!

माझ्यासाठी लोकसभेची यंदाची दुसरी निवडणूक. २०१४ ची निवडणूक माझ्यासाठी तुलनेनं सोप्पी होती. राजकारणाचं काही ज्ञान नव्हतं (जे आताही फारसं नाहीच आहे). पहिल्या मतदानाची एक्‍साइटमेन्ट सोडली, तर डोक्‍यात ‘हे सगळे राजकीय पक्ष आणि प्रतिनिधी देश लुटायला बसलेत’ हे अगदी पक्कं होतं. उमेदवारांची नावं माहिती होती, पण त्यांनी गेल्या पाच वर्षात केलंय काय याविषयी मी अक्षरशः ब्लॅंक होते किंवा ते जाणून घ्यायची त्यावेळी गरजही वाटली नाही. त्यामुळे राजकारण आणि लोकशाही यांचा फारसा संबंध नाही हे ठरवताना त्यातलं निवडणूक प्रक्रियेचं महत्त्व माझ्या लक्षात येण्याचीही शक्‍यता नव्हती. जायचं आणि ‘नोटा’ प्रेस करायचं हे समीकरण डोक्‍यात पक्कं होतं आणि मी केलंही तेच. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावरही ‘राजकीय उलथापालथ झालीये’ किंवा ‘मोदी लाटेचा विजय झालाय’ हे असलं काही डोक्‍यातही आलं नाही माझ्या. ‘मी मतदान केलं ना, झालं तर!’ एवढ्यापुरतीच २०१४ ची निवडणूक माझ्या आयुष्यात होती. माझी हीच चार वर्षांपूर्वीची अवस्था आजही माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक मित्रांमध्ये बघतीये. जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि जे अजूनही ‘तरुण’ या कॅटेगरीमध्ये मोडतात, अशा अनेकांमध्ये एकूणच राजकारणाविषयी असणारी अनास्था पाहिली, की ‘नेमकं चुकतंय काय’ हा प्रश्न मला पडतो.

२०१९ च्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आकडेवारी जाहीर झाली आणि ‘युवा’ कुणाच्या बाजूने? सारख्या वर्तमानपत्रातील मथळ्यांनी या निवडणुकीवेळी वाढलेल्या तरुण टक्‍क्‍यांवर शिक्कामोर्तब केलं. निर्णायक मतदान करण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न होण्यास सुरुवात झाली. यासाठी वयानं तरुण असणाऱ्या उमेदवारांपासून ते वय विसरून तरुण होऊ पाहणाऱ्या अनेकांनी ऐन निवडणुकीत तरुणांना सिरियसली घेण्याची धडपड सुरू केलीही आहे. पण खरा मुद्दा आहे तो, माझ्या वयाच्या अनेकांच्या राजकीय निरक्षरतेचा. राजकीय पक्षांच्या राजकारणाला हेच तरुण कितपत सिरियसली घेतात याचा.

सर्वांनी मतदान करावं, अधिकाधिक तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी होणारे प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत. मग ती माध्यमं असोत किंवा सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, प्रत्येकजण आपापल्यापरीने तरुणांचं प्रतिनिधित्व करू पाहतोय. खरं तर या सोशल प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होणारी, स्वतःची एकतर्फी-उथळ मतं मांडणारी, प्रसंगी राजकीय वारसदारांना ट्रोल करायला मागे पुढे न पाहणारीही अनेक तरुण मंडळी आहेत. पण खरी गरज आहे, ती राजकारणाकडं त्या एकाच ठराविक दृष्टिकोनातून बघणाऱ्या अनेकांना ‘राजकीय साक्षर’ करण्याची.

राजकारणाविषयी असणारी अनास्था, राजकीय नेत्यांकडे बघून आणि त्यांची मतं ऐकून येणारी निराशा, सरकार कोणतंही असो आपल्या आजूबाजूला काहीच फरक पडत नाही, ही मानसिकता असणारे माझे अनेक मित्र माझ्या आसपास आजही आहेत. गरज आहे ती या सगळ्यांना ‘फरक पडतो’ हे समजावून सांगण्याची, या प्रक्रियेत सहभागी झाल्यानं, स्वतःची चुकीची का असेना पण मतं मांडल्यानं, ‘फरक पडतो’ हे लक्षात आणून देण्याची. मतदानाचा टक्का तर वाढायलाच हवा, पण यासोबत माझ्यासारख्या अनेकांमध्ये असणारी राजकीय अनास्था आणि निराशा कमी करता आली, तर क्‍या बात!   

संबंधित बातम्या