झायरा, नेमकं घडलं काय?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 15 जुलै 2019

ब्लॉग
 

शाळा नावाच्या प्रकरणाची नुकतीच आपल्या आयुष्यात सुरुवात झालेली असते. ‘ट्विंकल ट्विंकल’ आणि ‘बाबा ब्लॅक शिप’चा ठराविक परफॉर्मन्स आपला अगदी तोंडपाठ असतो. आई-बाबा, येणारे जाणारे पाहुणे आपल्या अंगातले हे कलागुण पाहून एकूणच आपलं कौतुक करताना थकत नाहीत आणि नेमकं याच घातवेळी एखादा लांबचा काका-मामा एक गुगली आपल्यासमोर टाकतो. ‘मोठेपणी कोण होणार तू?’ त्या वयात ना प्रश्नाचा अर्थ समजतो ना व्याप्ती. आपल्या इवलुशा नजरेत आपल्याला जे भव्यदिव्य वाटतं ते उत्तर आपण देऊन टाकतो. पण खरंतर त्या उत्तरामागं हमखास एक व्यक्ती असते. आपल्या आजूबाजूची, कधीतरी एकदा नजरेसमोरून गेलेली किंवा टीव्ही-चित्रपटांतून आपल्याला भेटलेली. आपला आणि फक्त आपलाच असणारा एक आयडॉल.

‘दंगल’नंतर अभिनेत्री झायरा वसीमही अशीच अनेकांचा आयडॉल झाली असणार. गेल्या आठवड्यापर्यंत तिच्याकडं आयडॉल म्हणून बघणाऱ्या देशभरातल्या कित्येकांना आपल्या स्वप्नांवर क्षणभर का असेना शंका आली असणार. आपण जी स्वप्न पाहतोय, ती आपल्या देवाला आवडणार नाहीत, त्या स्वप्नांमुळं आपण त्याचे नावडते होऊ, हे असे अनेक प्रश्न अनेकांच्या डोक्‍यात आवर्तनं करत असणार. कारण या घटनेची ही टोकाची बाजू जेवढ्या आकांडतांडव पद्धतीनं समोर आली, तितकीच कुजबुजत चर्चा तिला तो निर्णय का घ्यावा लागला असेल यावर झाली.

आमीर खान सारख्या सुपरस्टारसोबत बॉलिवूडमध्ये लाँच होणं ही साधी गोष्ट नाही आणि पदार्पणाच्या चित्रपटामुळं ‘राष्ट्रीय पुरस्कारा’चा मानकरी होणं ही तर त्याहून अवघड बाब. बॉलिवूडच्या किंगची सोबत पहिल्याच चित्रपटात मिळणं हे कदाचित ‘बिगिनर्स लक’ असेलही. पण प्रदर्शित झालेल्या फक्त दोन चित्रपटांच्या माध्यमातून ‘अभिनया’च्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं, हे उपजत गुण आणि अपार मेहनत यावरच शक्‍य आहे. चित्रपट सृष्टीत मोठा पल्ला गाठण्याची क्षमता असणाऱ्या या अभिनेत्रीला अवघ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतर या क्षेत्रातून बाहेर पडावंसं वाटणं आणि त्यासाठी तिनं धर्माचं कारण पुढं करणं या अगदी अनपेक्षित गोष्टी मागच्या आठवड्यात घडल्या. झायराच्या या पोस्टवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. सगळेजण आपापल्या परीनं व्यक्त झाले. कोणी तिला विरोध केला, कोणी तिची थट्टा केली, कोणी या कृतीला पब्लिसिटी स्टंट म्हटलं, तर काहींनी ‘दीदी, आप हमारी आयडॉल हो’ असं सांगत तिच्या या कृतीचं समर्थन केलं. मी मात्र अजूनही कन्फ्युज्ड आहे. इतर वेळी स्वतःचं मत तयार करायला एवढा वेळ न लावणारी मी, यावेळी मात्र ‘नेमकं काय घडलं असेल?’ यातच अजूनही अडकलीये.

एका सर्वसामान्य घरातून आलेली, अभ्यासात हुशार असणारी, १७-१८ वर्षांची मुलगी अचानक एखाद्यादिवशी ‘बॉलिवूडमध्ये माझी प्रगती होत असली, तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं सोशल मीडियावर लिहून मोकळी होते, आणि आपण आपापले निष्कर्ष काढून मोकळं होतो. हा निर्णय तिचा स्वतःचा असेल आणि अगदीच व्यक्तिगत असेल तरीही तिची सहा पानांची पोस्ट वाचून तिच्यावर कोणताच दबाव नव्हता, असं स्पष्टपणे सांगता येईल का?

झायराच्या बाबतीत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना, ज्या भौगोलिक परिस्थितीचं ती प्रतिनिधित्व करते यातूनच स्पष्ट होतात. वयाच्या १२ व्या वर्षांपासून डिप्रेशनचा सामना करणाऱ्या, ‘दंगल’ चित्रपटासाठी केस बारीक कापले म्हणून काश्‍मीरमधल्या कट्टावरवाद्यांच्या जीवे मारण्याच्या धमक्‍या सहन करणाऱ्या, काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यावर फुटीरतावाद्यांची कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी ऐकणाऱ्या या १८ वर्षांच्या मुलीकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? चंदेरी पडद्यावर इन्सिया साकारलेल्या, स्वतःच्या वडिलांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या मुलीला अचानक याच चंदेरी दुनियेचा उबग येतो? हे सगळं असं सहज आणि उगाच का घडेल? अतिरेक होतोय, पण नेमका कशाचा?

सतत हिंसाचार-अशांतता असणाऱ्या वातावरणात वाढलेली झायरा ज्यावेळी सहजसोप्या वाटणाऱ्या मुख्य प्रवाहात येऊ पाहते, तेव्हा तिला विरोध करणारे अनेक धार्मिक आवाज तिच्या आजूबाजूला सतत घुमत राहतात. ते तिला तिच्या चुकांची, तिच्या वागणुकीमुळं धर्माला, वर्चस्वाला पोचणाऱ्या धक्‍क्‍यांची जाणीव करून देतात. आपल्यासारख्यांसाठी तिचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं अगदी साधं सरळ, नेहमीचं असतं, पण धर्म आणि परंपरा यांचा अतिरेक करू पाहणाऱ्यांना ते सहन होत नाही. गरज नेमकी आहे कसली? या धार्मिक दबावाला बळी न पडता, संघर्ष करण्याची, की संघर्ष करावा इतकी टोकाची परिस्थिती निर्माणच होणार नाही याची काळजी घेण्याची? धर्मव्यवस्था ही आपलं जगणं सोपं करणारी हवी ना? झायरानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय नेमका का घेतला हे कदाचित कधीतरी स्पष्टपणे समोर येईलही किंवा ती तिचा निर्णय बदलेलही. पण गरज आहे ती कोणत्याही धर्माच्या अतिरेकी दबावाला कमी करण्याची.  

संबंधित बातम्या