नॉट सो कंफर्टेबल!

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ब्लॉग
 

''वेरॉनिका डिसाइड्स टू डाय'' हे असं खरं तर कोणाचं तरी मरण सजेस्ट करणारं किंवा अशा अर्थाचं नाव असणारं पुस्तक असू शकेल? पण आहे... पाउलो कोएलो या ब्राझिलियन लेखकाचं. 'अलकेमिस्ट'वाल्या पाउलोचंच हे पुस्तक फक्त जरा कमी रुळलेलं. तर या पुस्तकातली गोष्ट आहे ती वेरॉनिकाची. चोवीस वर्षांची मुलगी. या चोवीस वर्षांत आपलं आयुष्य जगून आणि उपभोगून झालंय असा विचार करणारी. आता रोज नव्याने उगवणारा दिवस तेच ते रुटीन जगण्यात घालवण्यापेक्षा, मेलेलं बरं असा विचार करून आत्महत्या करायचं ठरवते. 

आत्महत्येचा मार्ग निवडतानाही, तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या आसपास असणाऱ्या लोकांना कसा कमी त्रास होईल याचाही ती विचार करते. इमारतीवरून उडी मारली, तर एकुलत्या एका मुलीच्या डोक्याचा आणि मेंदूचा झालेला लगदा आई वडिलांच्या नजरेसमोरून कधीच जाणार नाही. हाताची नस कापली, तर हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या ननला ते रक्त साफ करणं किंवा त्या खोलीसाठी नवा भाडेकरू शोधणं अवघड होईल असा सगळा विचार करून शेवटी झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवायचं ठरवते.

 ती त्या गोळ्या खाते, पण त्यातून वाचते (नाहीतर पुस्तक १० पानांत संपलं असतं). मात्र, शुद्धीवर येते ती असायलममध्ये. मग पुढं २०० पानांत तिचं असायलममधलं पाच दिवसांचं आयुष्य उलगडत जातं आणि तिला आठवणाऱ्या अनेक प्रसंगातून, घटनांतून भेटणारी वेरॉनिका आपल्यातलीच वाटायला लागते. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर वैतागलेली, इतरांच्या अनुभवातून आपलं आयुष्यही असंच कंटाळवाणं असणार असं ठरवून टाकलेली, मी हे असंच जगणार हे मनाशी पक्क केलेली. स्वतःला हवं तसं आयुष्य जगण्याची मुभा असताना, स्वतःला एका कंफर्टझोनमध्ये अडकवून घेणारी आणि मग उगाच स्वतःच ठरवलेल्या या कंफर्ट झोनवर वैतागणारी वेरॉनिका, माझ्यासारखीच वाटली मला.

 खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाचाच एक कंफर्ट झोन असतो. ज्यामध्ये आपण जगतो, रुळतो, ज्याच्या नियम-अटी, मर्यादा आपण आपल्या मर्जीनं ठरवतो. आपल्या वर्तुळात असणारे ठराविक लोक, आपले मित्र, आपलं कामाचं ठिकाण, तिथली ठराविक जागा, हातात रुळलेला माऊस किंवा कीबोर्ड, उठण्याची-झोपण्याची-जेवणाची वेळ, घरात असणाऱ्या टेबल खुर्चीची जागा, झोपतानाची डावी किंवा उजवी कुशी, फिरण्याच्या-बाहेर जाण्याच्या-जेवणाच्या ठरलेल्या जागा, ठरलेली पुस्तकं-चित्रपट अशी छोटीमोठी सगळी गणितं आपल्या डोक्यात पक्की असतात. मीही माझ्या या अशा कंफर्ट झोनमध्ये अगदी आनंदी, खुश असते. मी या वर्तुळात राहण्यासाठी स्वतःला पटवलेलं असतं. आयुष्य असंच असतं, असलं काहीतरी सांगून, हे असंच मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक नकारात्म घटनांच्या बाबतीतही वागते. सेल्फ पिटीचा एक वेगळाच कंफर्टझोन. माझ्याच आयुष्यात सगळं वाईट होतंय, माझ्याबरोबर सगळे वाईट वागत आहेत, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही असं स्वतःला सांगून सतत तीचं ती दुःख आणि घटना कुरवाळत बसते मी अनेकदा, स्वतःला सहानुभूती देत.

 आनंद किंवा दुःखाच्या या कंफर्ट झोनमधून बाहेर पडणं आपल्याला अगदी सहज शक्य असतं. पण हे इतकं सवयीचं होतं, की यातून बाहेर पडायची इच्छाच होतं नाही. मग एका क्षणी आयुष्य रुटीन वाटायला लागतं. इतरांच्या आनंदाबरोबर तुलना सुरू होते. आपल्याकडं काय नाही याची लिस्ट वाढायला लागते. ज्या घटनांनी, विचारांनी आपल्याला त्रास होतो, त्यांची सतत उजळणी केल्यानं फक्त वाईट वाटणार हे आपल्याला कळत असतं. मग फक्त ''माझ्या आयुष्यात किती दुःख आहेत, मी किती सहन करतीये'' हे स्वतःला दाखवण्यासाठी आपण स्वतःला सेल्फ पिटी मोडमध्ये अडकवतो. म्हणजे खरं तर स्वतःला बरं वाटावं म्हणून ठरवल्या गोष्टींचाच एका मर्यादेनंतर त्रास व्हायला सुरुवात होते आणि 'असं का होतंय?' या प्रश्नाचं उत्तर समोर असूनही दिसत नाही.

 का अवघड वाटत असेल स्वतःला एका ठराविक रुटीनच्या बाहेर घेऊन जाणं? अगदी कंटाळा आला तरी, तरी तेच ते जगायचं का थांबवता येत नसेल? स्वतःच्या ठराविक कंफर्ट झोनला शक्य तितकी कारणं देऊन ओढूनताणून स्वतःबरोबर ठेवण्याची धडपड का करत असू आपण? आजवर ज्याची सवय झाली, ज्यानं आनंद दिला ते रुटीन सोडून नव्यानं काही ट्राय करणं कदाचित थोडं अवघड असेल, पण या बदलामुळं नवं काही अनुभवता येणार असेल, तर वाईट काय? तसंही ज्या कंफर्ट झोनची सवय झाली, त्याच्या नियम, अटी, मर्यादा सगळं तर आपल्याला तोंडपाठच असणार. त्यामुळं कधीही मागं फिरलं, तरी रस्ता सवयीचा आणि ओळखीचाच. मग समजा आलाच कंटाळा स्वतःच्या कंफर्ट झोनचा, तर आयुष्यावर आणि आजूबाजूच्या माणसांवर वैतागण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडायला काय हरकत आहे. काहीच जमलं नाही, तर आयुष्य आहेच की वैतागायला. पण समजा जमलंच कंफर्ट झोन सोडायला तर... क्या बात!   

संबंधित बातम्या