निरोगी चेहऱ्यासाठी ‘फेस पॅक’

स्वप्ना साने
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

फेस पॅक म्हणजे नेमके काय? त्याचा नियमित वापर करावा का? माझ्या त्वचेला नेमका कोणता पॅक चालेल? तिला तो पॅक सूट झाला मग मलापण होईल का? साठी आली आता का फेस पॅक वापरायचा? आई म्हणते हळद आणि बेसनाचा पॅक लाव, गोरी होशील, खरेच का? असे आणखीही बरेच प्रश्‍न सगळ्यांच्या मनात येतात, पण उत्तर मिळत नाही. पण आज या लेखात या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील.

फेस पॅक हे असे प्रॉडक्ट आहे, जे चेहऱ्याला लावल्यावर ते त्वचेची रोमछिद्रे स्वच्छ करतात, मृत त्वचा निघून नवीन पेशींना पोषण देतात, रक्ताभिसरण चांगले होते, चेहरा तजेलदार आणि स्वस्थ दिसतो. यात वेगवेगळ्या प्रकारच्या ‘क्ले’चा उपयोग होतो, तसेच हर्बल पावडर आणि अरोमा ऑइल्स मिक्स करूनपण पॅक तयार करतात. 

हल्ली बाजारात फेस पॅकसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. उदा. क्ले पॅक पावडर फॉर्ममध्ये मिळतो, जो गुलाब जलमध्ये मिक्स करून लावायचा. क्ले, हर्बल पावडरी आणि क्रिम बेस असलेला पॅक, जो डायरेक्ट लावायचा. सध्या ‘जेल पॅक’ आणि ‘शीट मास्क’ची बाजारात धूम आहे, कारण हे पॅक जास्त हायड्रेटिंग असतात आणि नॉर्मल आणि ड्राय एजिंग स्किनसाठी परफेक्ट आहेत.

वेगवेगळ्या स्किन टाइपसाठी वेगवेगळे पॅक लावायचे असतात. नॉर्मल त्वचेला बेसिक क्ले पॅक म्हणजेच मुलतानी माती, चंदन पावडर आणि गुलाब जलचा पॅक सूट होईल. पण हाच पॅक ड्राय स्किनला चालणार नाही, कारण मुलतानी माती त्वचेमधील नैसर्गिक तेल शोषून घेते. ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनला पॅक थोडा फार सूट होईल, पण पाहिजे तो ग्लो मिळणार नाही. 

म्हणूनच, फेस पॅकची निवड करताना स्किन टाइप, चेहऱ्यावरचा टॅन, पिगमेंटेशन किंवा वांग, मुरूम आणि पुटकुळ्या, स्किन ॲलर्जी, एजिंग स्किन या काही गोष्टी लक्षात ठेवून पॅक घ्यावा. शक्य असल्यास ब्यूटी थेरपिस्ट अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पॅकची निवड करावी.

ड्राय आणि एजिंग स्किनला हायड्रेटिंग पॅकची गरज असते, स्किनला जास्त नरीश आणि सॉफ्ट करणारा, तसेच ऑईल आणि वॉटर बॅलन्स रीस्टोर करणारा पॅक हवा. जेल पॅक किंवा क्रिम पॅक हे नॉन ड्राइंग पॅक बेस्ट आहेत. 

ऑइली स्किनसाठी क्ले पॅक बेस्ट असतात. म्हणजे स्किनमधील एक्सेस ऑईल ते शोषून घेतात. 
चेहऱ्यावर मुरूम असतील तर अँटिसेप्टिक आणि हीलिंग पॅकचा वापर करावा, तोही शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच. तसेच पिगमेंटेशन असेल तर त्याप्रमाणे स्किन लायटनिंग पॅक वापरावा. 

वयोमानानुसार त्वचेमधील कोलाजेन आणि इलासटीन, जे स्किनला लवचीक ठेवतात, त्याचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून रेग्युलर फेशिअल करणे आवश्यक असते. तसेच, दर आठवड्याला हायड्रेटिंग पॅक लावावा म्हणजे त्वचा लवचीक आणि टवटवीत दिसते.

सेन्सेटिव्ह त्वचा किंवा स्किन ॲलर्जी असेल, तर कृपया आपल्या मनाने काहीही वापरू नका, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रॉडक्ट्सचा वापर करावा. एखादा अमुक पॅक एखाद्याला सूट झाला म्हणून तो तुम्हालापण फायद्याचा असेलच असे नाही, त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि जागरूक व्हा.

आठवड्यातून एकदा फेस पॅक लावायला हरकत नाही, कारण योग्य तो पॅक लावल्यावर त्वचेला पोषण मिळेल आणि त्वचा सुदृढ दिसेल. टीनएजर असो वा तरुण, मध्यमवयीन असो वा प्रौढ, स्त्री-पुरुष सर्वांसाठीच फेस पॅकचा उपयोग गुणकारी आहे. योग्य प्रॉडक्टचा वापर केला तर आणि वेळेत ही काळजी घेतली, तर रिंकल्स तुमच्या जवळपासही दिसणार नाहीत.

होम मेड फेस पॅक्स

  • इन्स्टंट ग्लोसाठी फेस पॅक- ॲलोव्हेरा जेल आणि थोडे ग्लिसरीन मिक्स करून १५ मिनिटे ठेवावे आणि गार पाण्याने धुवावे. लगेच चेहरा चमकायला लागेल.
  • भिजवलेल्या बदामाची पेस्ट आणि एग व्हाईट चांगले मिक्स करून १५ ते २० मिनिटे लावून ठेवावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे. मस्त ग्लो येतोच पण ड्राय स्किन असेल तर पोषणपण मिळेल.
  • पपईचा गर, एक चमचा मध आणि थोडी मलई चांगले मिक्स करून २० मिनिटे ठेवून धुवावे. पपईमध्ये असलेल्या ‘पपैन’ एन्झाइममुळे टॅन कमी होतो.
  • हळद ही अँटिसेप्टिक आहे आणि तिचे इतर फायदेपण आहेत. ती सौम्य प्रमाणात ब्लिचिंग करते. बेसन लावल्यानेपण टॅन कमी होऊन त्वचा उजळते. दहीसुद्धा सौम्य ब्लिचिंग करते. म्हणूनच या तिन्ही पदार्थांचे मिश्रण करून लेप तयार करून १५ मिनिटे लावावा. त्वचा ड्राय असेल तर पॅक ओला असतानाच धुवावा.
  • कुठलाही पॅक लावल्यानंतर टोनर आणि मॉयश्चरायझर नक्की लावावे. म्हणजे स्किनमधील ऑईल आणि मॉयश्चर मेंटेन राहते.

संबंधित बातम्या