दुर्लक्षित भागांची काळजी

स्वप्ना साने
सोमवार, 1 जून 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

लॉकडाउनमध्ये विविध रेसिपीज करण्यापासून कलाकुसर, DIYs, आर्ट, पेंटिंग, योगा, वाचन असे सगळे करून झाले, पण लॉकडाउन काही संपेना. आता नवीन काय करायचे हा प्रश्‍न आहेच. चला तर मग, आज आपण लक्ष देऊया आपल्या स्वतःकडे आणि आपल्या शरीराच्या ‘उपेक्षित’ आणि ‘दुर्लक्षित’ अवयवांकडे. म्हणजेच, चेहऱ्याव्यतिरिक्त आपण ज्या भागांची काळजी घेत नाही, नीट स्वच्छता करत नाही आणि उपेक्षा करतो, दुर्लक्ष करतो... जसे मानेवर तयार झालेला काळा पट्टा, काळी आणि रफ झालेली कोपरे (elbow), गुढघे, मांड्यांच्या आतला भाग आणि काळे झालेले अंडरआर्म्स!
आपल्यापैकी बरेच जण काळजी घेतही असतील किंवा काहींची त्वचा मुळातच खूप नितळ आणि सॉफ्ट असेल. पण बहुतांश लोकांची या भागांमधील त्वचा रफ आणि काळी झालेली असते. बहुतेक स्त्रियांची त्वचा प्रेग्नन्सीमध्ये काळी पडते, त्याचे कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल. मेनोपॉजमध्येही अचानक चेऱ्यावर वांग येणे, कोपरे आणि मान काळी होणे, अंडरआर्म्स काळे होणे या सगळ्या गोष्टी हार्मोनल चेंजेसमुळे होतात. काहींची त्वचा मुळातच सेन्सिटिव्ह असते, तर काहींचे ‘मेलॅनिन’ म्हणजेच त्वचेमधील कलर पिगमेंट हे जास्त ॲक्टिव्ह असते.

डार्क नेक 
म्हणजेच मानेवर तयार झालेला काळा पट्टा. खूप सिव्हियर झाल्यास त्वचाही रफ होते. ही स्किन कंडिशन बहुतेक वेळा प्रेग्नन्सीमध्ये होते. पण इतरही कारणे आहेत, जसे खूप जास्त वजन वाढल्यास, सतत गळ्यात खूप दागिने घालून ठेवल्यास आणि मान नीट स्वच्छ न केल्यासही मान काळी पडते. हार्मोनल इम्बॅलन्समुळेही हे होऊ शकते. मानेवरच्या त्वचेवर मृतकोशिकांचे थर साचत जातात आणि दुर्लक्ष केल्यास त्यावर काळपट लेयर तयार होतो.
उपाय : रोज आंघोळीच्या वेळी लुफाने, शक्य असल्यास वाळ्याचा लुफा घेऊन मान स्वच्छ करावी. एक दिवसाआड उटणे लावावे आणि त्वचा मॉइस्चराईझ करावी.

डार्क एलबो अँड नीज 
म्हणजेच काळी आणि रफ झालेली कोपरे आणि गुढघे. लहान मुलांचे गुढघे बरेच वेळा डार्क आणि रफ जाणवतात. पण मोठ्यांचीसुद्धा कोपरांची आणि गुढघ्यांची त्वचा रफ आणि काळी होते. रोजच्या धावपळीच्या रुटिनमध्ये घाईत केलेल्या आंघोळीमुळे गुढघे आणि कोपरे व्यवस्थित स्वच्छ करायचे राहून जातात. त्यामुळे मृत त्वचेचा थर साचत जातो. त्यात जर वारंवार कोपर किंवा गुढघ्याच्या त्वचेचे घर्षण होत असेल तर ती जागा रफ होत जाते. दुर्लक्ष केल्यामुळे काळपटपणा वाढत जातो.
उपाय : घरगुती उपाय म्हणून लिंबाचे साल घासावे. व्हिटॅमिन सी स्किन लायटनिंगचे काम करते. त्यामुळे लिंबाचे साल घासून १० मिनिटांनी त्वचा धुऊन घ्यावी. असे रोज करावे. शुगर आणि कॉफीचा स्क्रब तयार करून आठवड्यातून दोन वेळा त्वचा सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करावी आणि गार पाण्याने धुऊन बॉडी लोशन लावावे.

डार्क अंडरआर्म अँड इनर थाय 
बऱ्याच जणांचे अंडरआर्म्स आणि मांड्यांच्या आतील भाग काळा आणि रफ झालेला असतो. याचे कारण हार्मोनल बदल तर आहेत, पण काही वेळा वजन जास्त वाढून चालताना मांड्यांचे घर्षण होऊन ती त्वचा डॅमेज होते; परिणामी रफनेस येतो. सतत घट्ट जीन्स घातल्यामुळेही रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे त्वचा काळी पडते. अंडरआर्म्सची त्वचाही काळी आणि रफ होते, पण नाजूक जागा असल्यामुळे खूप जोरात घासून स्वच्छ करता येत नाही. काहींचे अंडरआर्म्स डिओचा सतत वापर केल्यामुळेही काळे होतात, तर काहींचे हेअर रिमुव्हर प्रॉडक्ट्स वापरल्यामुळे.
उपाय : अंडरआर्म्स स्वच्छ करायला कॉफी आणि शुगर स्क्रब वापरावा. त्वचेवर हळुवार स्क्रब करून मृत त्वचा साफ करावी. मुलतानी आणि चंदन पावडरचा पॅक दह्यात मिक्स करून १५ मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुऊन घ्यावे. दह्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्वचा लाइट होते.
मांड्यांच्या आतील भाग रोज आंघोळ करताना लुफाने स्वच्छ करावा. आठवड्यातून दोन वेळ उटणे लावावे. मसूर डाळ पीठ दह्यात मिक्स करून तो पॅक १५ मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुऊन बॉडी लोशन लावावे.

वरील सर्व उपाय नित्य नेमाने केले, तर नक्कीच तुम्हाला त्वचा उजळलेली आणि सॉफ्ट जाणवेल. पण खूप जास्त डॅमेज झालेली त्वचा असेल, तर आपल्या ब्यूटी थेरपिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. वेळेत काळजी घेतली तर त्वचा लवकर हील होईल.

संबंधित बातम्या