व्हाइट अँड ब्लॅक हेड्स

स्वप्ना साने 
बुधवार, 1 जुलै 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

सुंदर, सतेज, सुदृढ, नितळ त्वचा असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. केमिकल्स, प्रदूषण आणि स्ट्रेसच्या दुनियेत अशी त्वचा असणारे फार कमी लोक आहेत. काहीना काही स्किन प्रॉब्लेम्स प्रत्येकाला असतातच. कोणाला पिगमेंटेशन, तर कोणाला पिंपल्स, कोणाला टॅनिंग तर कोणाला ड्रायनेसमुळे त्रास होतो. साधारण ९० टक्के लोकांना ब्लॅक अँड व्हाइट हेड्स येतात! स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही ब्लॅक हेड्स किंवा व्हाइट हेड्स असू शकतात. आज आपण ब्लॅक अँड व्हाइट हेड्सबद्दल जाणून घेऊ आणि त्यावर काय उपचार करता येतील ते बघू.

ब्लॅक, व्हाइट हेड्स म्हणजे काय?
त्वचेची रोम छिद्रे जेव्हा तैलग्रंथीमधील तेल (sebum) आणि मृत त्वचेमुळे ब्लॉक होतात, तेव्हा तयार होतात ते ब्लॅक अँड व्हाइट हेड्स. जेव्हा हे स्किन पोर्स बंद असतात, तेव्हा याला व्हाइट हेड्स म्हणतात. जेव्हा हे पोर्स ओपन असतात आणि हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात, तेव्हा ऑक्सिडेशन प्रोसेस होऊन ते ब्लॅक होतात. त्यांना ब्लॅक हेड्स म्हणतात. मेडिकल टर्ममध्ये यांना ‘सीबेशिअस प्लग किंवा कोमेडोन’ असे म्हणतात.

  • ब्लॅक अँड व्हाइट हेड्स असणे हे कॉमन असले, तरी काही कारणांमुळे ते वाढू शकतात जसे-
  • त्वचा खूप जास्त तेलकट असेल, तर तैलग्रंथी जास्त सक्रिय असतात आणि sebum जास्त प्रमाणात तयार होते. 
  • मृत त्वचेचा लेअर वाढला असेल, तर हेअर फोलिकलमध्ये sebum आणि मृत त्वचा ट्रॅप होऊन ब्लॅक हेड्स वाढतात. 
  • काही कारणास्तव हार्मोनल चेंजेस झाले तर, त्यावेळी तैलग्रंथी सक्रिय होतात, त्वचा जास्त तेलकट होते, जसे टीनएज, मेन्स्ट्रुएशन किंवा बर्थ कंट्रोल पिल्समुळे. 
  • खूप जास्त घाम येत असेल, तरी व्हाइट हेड्स तयार होण्याचे प्रमाण वाढते. 
  • ब्लॅक आणि व्हाइट हेड्स हे नाकावर नाकाच्या बाजूला स्किन फोल्ड्समध्ये, हनुवटीवर, गालावर तयार होऊ शकतात. याशिवाय व्हाइट हेड्सचे प्रमाण पाठीवर आणि छातीवर अधिक आढळून येते. हे ब्लॅक अँड व्हाइट हेड्स क्लीन केले नाहीत, तर याचे रूपांतर पुटकुळ्या किंवा मुरुमामध्येही होऊ शकते. वेळेत काळजी घेतली नाही, तर यांचे प्रमाण वाढते आणि त्वचा रफ होते, निस्तेज दिसायला लागते.

उपाय
व्हाइट हेड्स रिमुव्ह करणे हे फार कठीण आहे, कारण हे पोर्स बंद असतात. मुद्दाम ते एक्सट्रॅक्टरने दाबून ओपन केले, तर इन्फेक्शन होऊ शकते आणि डाग पडू शकतात. म्हणून ऑईल फ्री क्लिन्सिंग करावे. दिवसातून दोन वेळा त्वचा क्लीन करावी. शक्य असल्यास टी-ट्री ऑईल असलेले किंवा विच हेझल असलेले क्लिन्झर्स वापरावे. यात अँटिसेप्टिक आणि अस्ट्रिंजे प्रॉपर्टी असते, त्यामुळे इन्फेक्शन होत नाही. ब्लॅक हेड्स रिमुव्ह करायला आजकाल स्ट्रीप्स मिळतात, त्यांनी बऱ्यापैकी फायदा होतो. खूप जास्त प्रमाणात आणि डीप असतील, तर हलकी वाफ घेऊन तज्ज्ञांकडून ब्लॅक हेड्स काढून घ्यावेत. वाफ घेतल्यावर मृत त्वचा लूज होते आणि पोर्स सॉफ्ट होतात, त्यामुळे ब्लॅक हेड्स लगेच काढता येतात.

ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स तयार होण्याची सुरुवात टीन एजमध्ये होते. त्यावेळीच योग्य ती स्किन केअर घेतली, तर त्याचे प्रमाण कमी होते आणि नियंत्रण ठेवता येते. पुढे स्किन मॅच्युअर होते जाते, तसे रेग्युलर क्लीन अप आणि फेशियल घ्यावे. होम केअरमध्ये क्लिन्सिंग फेस पॅक लावावे आणि त्वचा टी-ट्री ऑईलयुक्त फेस वॉशने स्वच्छ करावी. खूप जास्त प्रमाणात ब्लॅक हेड्स किंवा व्हाइट हेड्स असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. आजकाल खूप चांगल्या आणि माइल्ड पिलिंग ट्रीटमेंट्स आल्या आहेत, त्याचा वापर करून त्वचा हील करू शकतो. पण नंतर होम केअर घेणे अत्यावश्यक असते. 

क्विक टिप्स

  • आठवड्यातून एकदा फेस स्क्रब वापरावा.
  • त्वचा खूप तेलकट असेल, तर क्ले बेस्ड पॅक आठवड्यातून दोन वेळा वापरावा. मुलतानी माती, गुलाब जल आणि त्यात चार थेंब टी-ट्री ऑईल घालावे आणि १५ मिनिटांनी हा पॅक धुवावा. 
  • ड्राय स्किन असेल तर साधे ओट्स बारीक करून त्यात थोडे दही आणि अर्धा लिंबू पिळून, हा पॅक १० मिनिटे लावावा. हलक्या हाताने स्क्रब करत धुऊन घ्यावे. ऑईल फ्री मॉइस्चरायझर लावावे.
  • रात्री झोपायच्या आधी त्वचा क्लीन करावी. त्वचेवर कुठलेही सन स्क्रीन किंवा मेकअपचे ट्रेसेस राहिले, तर त्यामुळे रोम छिद्रे ब्लॉक होतात. म्हणून चांगल्या फेस वॉशने चेहरा धुऊन नंतर लाइट मॉइस्चरायझर लावावे.

संबंधित बातम्या