नरम मुलायम हातांसाठी....

स्वप्ना साने
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

कोरोनाच्या काळात हँडशेकला बाद करून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दोन्ही हात जोडून आपण नमस्ते करायला शिकलोय. सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून दुरूनच एकमेकांना हाय... हॅलो... आणि नमस्ते करायला लावणारा हा जंतू या बाबतीत अख्ख्या जगाला एक चांगली सवय लावून जाणार हे नक्की. 

पण हा विषाणू आहे तोपर्यंत आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून हँड वॉश आणि सॅनिटायझरचा वापर दिवसभरात असंख्य वेळा करायला लागतो. गेले सहा महिने सतत पाणी, हँड वॉश आणि सॅनिटायझरचा मारा आपले हात सहन करतायत, केवळ इन्फेक्शन होऊ नये म्हणून. हे रूटीन सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे.

सौंदर्याच्या दृष्टीने बघता, आपल्या चेहऱ्यानंतर आपले हात हा दुसरा असा अवयव आहे, जो जास्त एक्स्पोज होतो. हँड शेक किंवा हात जोडून नमस्कार करताना हेच हात जर प्रेझेन्टेबल नसतील, तर आपल्यालाच ऑकवर्ड फील होते. इथे प्रेझेन्टेबलचा अर्थ वेल मॅनिक्युअर्ड, सॉफ्ट आणि मोइस्चराइज्ड हात असा आहे. 

अनेक वेळा स्ट्राँग अँटी बॅक्टेरिअल हँड वॉश आणि त्यानंतर सॅनिटायझरचा वापर करून आपण कोरोनाच्या विषाणूपासून तर आपले संरक्षण करतोय. पण यामुळे हात खूप ड्राय आणि रफ होत आहेत. हातावरच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसायला लागल्या असतील, तर समजावे की तातडीने हातांची काळजी घ्यायला हवीय.

उपेक्षित हातांची काही लक्षणे

 • हाताच्या त्वचेवर सुरकुत्या येणे
 • काळवंडलेले हात किंवा बोटे आणि जॉइंट्स
 • रफनेस, रफ एल्बो
 • पॅची स्किन
 •  खूप जास्त ड्रायनेस

अशी काहीशी लक्षणे जर तुमच्या हातावर दिसत असतील, तर खाली दिलेल्या उपाययोजना जरूर करून बघाव्यात

 1. नियमित एक्सफोलिएशन करणे, म्हणजेच मृत त्वचेचा थर काढून टाकणे. यासाठी चांगल्या स्क्रबचा वापर करावा. तुम्ही घरगुती स्क्रबसुद्धा तयार करू शकता. १ कप ऑलिव्ह ऑईल आणि १ कप साखर, एका बरणीमध्ये भरून ठेवावी आणि थोडे थोडे घेऊन हाताला हळुवार स्क्रब करावे. 
 2. कोमट पाण्याने हात धुऊन घ्यावेत. खूप गरम पाणी घेऊ नये, नाहीतर त्वचेतील नॅचरल मॉइस्चर निघून जाते. व्हिटॅमिन ई युक्त हँडक्रीम किंवा बॉडी बटरने चांगला मसाज करावा. 
 3. आठवड्यातून एकदा हाताला पॅक लावावा. ४ चमचे ओटमील मिक्सरमध्ये बारीक करून त्यात दही मिक्स करावे. चिमूटभर हळद घालावी आणि हा होम मेड पॅक हाताला १५ मिनिटे लावून ठेवावा. कोमट पाण्याने धुवावे. 
 4. रोज रात्री चांगल्या मोइस्चराइझिंग क्रीमने हाताला मसाज करावा. व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीनेपण मसाज केल्यास लगेच फायदा होतो. अति रूक्ष त्वचा असल्यास हे नक्की करून पाहावे.
 5. बाहेर जाताना सन स्क्रीन जरूर लावावे. शक्य असल्यास हातमोजे वापरावेत. 
 6. आपल्या बॅगेमध्ये सॅनिटायझरबरोबर एक छोटी मोइस्चराइझरची बॉटलही ठेवावी. म्हणजे प्रत्येक वेळी हात सॅनिटाइझ केल्यावर लगेच मोइस्चराइजपण करता येतात.
 7. महिन्यातून एकदा आपल्या ब्यूटी थेरपिस्टकडून मॅनिक्युअर जरूर करावे. असे केल्याने नखांची काळजी घेतली जाते. क्युटिकल रिमूव्ह झाल्यावर बोटेही सॉफ्ट होतात. हात खूप ड्राय असतील तर वॅक्स पॅक ट्रीटमेंट घेतल्याने फायदा होतो. पण हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावे. 
 8. आपल्या किचनमध्येच बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपल्या हेल्थ आणि ब्यूटीची काळजी घ्यायला मदत करतात. जसे, कॉफी आणि साखरेपासून स्क्रब तयार होतो, बेसन आणि दही मिक्स करून पॅक तयार होतो आणि कोकोनट ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईलने मसाज करता येतो. 

चला तर मग, जे हात सगळ्यांची काळजी घेतात, त्या हातांची काळजी आपण घेऊया.

संबंधित बातम्या