किचन कॉस्मेटिक्स

स्वप्ना साने
सोमवार, 7 डिसेंबर 2020

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

आजी आणि पणजीच्या त्वचेवर वयोमानानुसार कितीही सुरकुत्या असल्या, तरी त्यांच्या त्वचेचा स्पर्श मात्र अगदी मऊ आणि मुलायम असतो. तुम्हालाही याचा अनुभव असेलच. त्या काळात कुठे ब्यूटी पार्लर असायचे? मग त्यांनी अशी काय ब्यूटी ट्रीटमेंट केली असावी, की ८० च्या वर वयाच्या असल्या तरी तुकतुकीत, चमकदार आणि सुरकुत्या असली तरीही डाग विरहित त्वचा त्यांना लाभली! त्यांचे ब्यूटी सिक्रेट दडले आहे, स्वयंपाकघरात! होय, पाकशास्त्र आणि सौंदर्यशास्त्राचा खजिना म्हणजे स्वयंपाकघरातील साहित्य. 

आपल्या भारतीय संस्कृतीच्या स्वयंपाकघरात विविध मसाले, फळभाज्या, पालेभाज्या, धान्य, कडधान्य, तेल, साजूक तूप, लोणी, दही, दूध, साय, मध, गूळ अशा गोष्टी सहज उपलब्ध असतात. चला तर मग, आज एक फेरफटका मारू या आपल्या स्वयंपाकघरात, स्वयंपाकासाठी नाही, तर ब्यूटी बेनिफिट्ससाठी!

चहा, कॉफी आणि दूध -

 • थोडे दूध किंवा सायीने चेहऱ्यावर मसाज करावा आणि ओल्या कापसाने पुसावे. चेहरा स्वच्छ दिसेल. कारण दूध हे नॅचरल क्लिन्सिंग एजंट आहे. 
 • थोडे दूध, साखर आणि कॉफीचे मिश्रण त्वचेवर हळुवार स्क्रब करावे, मृत त्वचा निघून जाईल आणि टॅनदेखील कमी होईल. त्वचा उजळेल. 
 • ग्रीन टी पीत असाल, तर वापरून झालेल्या टी बॅग्ज फेकून न देता त्या फ्रीजमध्ये ठेवाव्यात. दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा डोळ्यावर ठेवाव्यात. लगेच रिलॅक्स वाटेल आणि डार्क सर्कल्स असतील, तर तीदेखील कमी होतील. 

सॅलड -

 • काकडीचे साल काढल्यावर ते फेकून न देता त्याचा ब्यूटी बेनिफिट्ससाठी उपयोग करावा. काकडीचे साल किंवा दोन चकत्या डोळ्यावर ठेवाव्यात, डार्क सर्कल्स कमी होतील. 
 • काकडीचा रस पूर्ण चेहऱ्यावर लावावा आणि पंधरा मिनिटांनी धुऊन घ्यावे. त्वचा मस्त फ्रेश, टवटवीत वाटेल. काकडीमध्ये अस्ट्रिंजंट प्रॉपर्टी असल्यामुळे, त्वचा फ्रेश फील होते. 
 • तसेच टोमॅटोचे साल किंवा रस हा उत्तम ग्लो पॅक आहे. चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.
 • बिटाचा तुकडा किंवा साल ओठांवर लावल्यास, नॅचरल पिंक कलर येतो. तसेच बिटाचे नियमित सेवन केल्यास, भरपूर अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीराला मिळतात, ज्यामुळे एजिंग स्लो होते. त्यामुळे त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग दिसते. 
 • लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. पिंपल्स, स्कार किंवा एकन असल्यास लिंबाचा रस आणि त्यात मध मिक्स करून त्याचा पॅक दहा मिनिटे लावावा. नंतर कोमट पाण्याने धुवावे, त्वचेला फायदा होतो. जेवणातही रोज थोडे लिंबू असावे. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून आणि थोडा मध घालून उपाशी पोटी प्यायल्यास एका आठवड्यातच त्वचेमध्ये फरक जाणवेल. 

फळे -

 • थोडे केळे दह्यात मॅश करून त्याचा पॅक चेहऱ्याला लावावा. हा एक खूप इफेक्टिव्ह अँटिएजिंग पॅक आहे.  
 • डाळिंबाच्या दाण्यांचा रस, मोसंबीचा रस किंवा पपई मॅश करून त्वचेवर लावल्यास काळवंडलेली त्वचा उजळते. चेहऱ्यावरचे डाग कमी होतात. 

हळद, बेसन आणि दही -  

 • हळद अँटिसेप्टिक तर आहेच, शिवाय ती माइल्ड ब्लिचिंगचेसुद्धा काम करते. बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून तुम्ही बॉडी पॅक तयार करू शकता. बेसनामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी आहे, तसेच त्याने मृत त्वचासुद्धा निघते. दही एक नॅचरल क्लिन्सिंग आणि ब्लिचिंग एजंट आहे. दह्यात लॅक्टिक ॲसिड असते, जे मृत त्वचा काढून, त्वचेला मॉइस्चराईज करते. सन बर्न झाले असल्यास दही लावल्याने फायदा होतो. 

अंडी - 

 • दही आणि अंड्याचा हेअर पॅक एक उत्तम कंडिशनरचे काम करतो. हा पॅक दहा मिनिटे लावून ठेवावा. मग गार पाण्याने केस धुवावेत.  
 • यामुळे केस सॉफ्ट आणि चमकदार होतील.

मध - 

 • मधात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात, जी आपल्या शरीराला आवश्यक असतात. शिवाय मध त्वचा मॉइस्चराईझ करून हायड्रेटदेखील करतो. यात अँटिफंगल प्रॉपर्टी असल्यामुळे इन्फेक्शन होऊ देत नाही. 
 • ताण, प्रदूषण आणि केमिकल्सच्या वापरामुळे त्वचा डॅमेज झाली असेल, तर मध आणि त्यात थोडा लिंबाचा रस घालून नियमित त्वचेवर लावावे. दहा मिनिटांनी धुवावे. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 

नारळाचे तेल - 

 • नारळाच्या तेलाने केसांना उत्तम पोषण तर मिळतेच, शिवाय तेलाने त्वचेला रोज मसाज केल्यास त्वचा मऊ आणि ग्लोइंग दिसते. 
 • नारळाचे तेल एक उत्तम मेकअप रिमूव्हरसुद्धा आहे. तसेच सर्व प्रकारच्या स्किनला सूट होणारे आहे. 

साजूक तूप - 

 • साजूक तूप गायीचे असल्यास उत्तम. त्यामध्ये औषधी गुण असतात. ओठांवर भेगा असल्यास किंवा टाचेला भेगा असल्यास रात्री तूप लावावे. असे रोज करावे, म्हणजे लगेच आराम मिळेल. 

बदाम - 

 • बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावेत. त्याशिवाय भिजलेले काही बदाम दह्यात एकत्र करून त्यात थोडा मध घालावा व मिक्सरमध्ये फेटून पॅक तयार करावा. ड्राय आणि मॅच्युअर स्किनसाठी उत्तम नरीशिंग मिळते. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावल्यास खूप फायदा होतो. 
 • बदामाचे तेल बॉडी मसाजसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय या तेलामुळे केसांना पण भरपूर पोषण मिळते. नारळाच्या तेलात सम प्रमाणात बदाम आणि एरंडेल तेल मिक्स करून त्याने हेड मसाज करावा. केस गळती कमी होईल. 

मिरपूड - 

 • मिरपुडीमध्ये अँटिबॅक्टेरिअल प्रॉपर्टी आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे, त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. अँटिबॅक्टेरिअल असल्यामुळे या पॅकमुळे एकन आणि पिंपल्स हील व्हायला मदत होते. तसेच अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे, फाइन लाइन्स आणि रिंकल्स कमी होतात. 
 • एक चमचा मधात चिमूटभर मिरपूड घालून त्वचा स्क्रब करावी. मृत त्वचा निघून जाईल आणि ब्लॅक हेड्सदेखील कमी होतील. 
 • फ्लेकी (कोंडा) स्काल्प असल्यास, एक चमचा दही, त्यात दोन चमचे मिरपूड मिक्स करून पंधरा मिनिटे लावून ठेवावे आणि गार पाण्याने स्काल्प धुवावा. कोंडा कमी होईल. 

हेल्थ आणि ब्यूटी बेनिफिट्स असलेले असे बरेच बहुगुणी साहित्य आपल्याला स्वयंपाकघरात सापडेल. त्यामुळे घरच्या घरी हे प्रयोग नक्कीच करता येतील. पण प्रयोग करताना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुम्हाला कुठली ॲलर्जी असल्यास आधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नंतरच घरगुती पॅक लावावेत.

संबंधित बातम्या